कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९
अॅग्रो विशेष
दोडका पिकाने उंचावले अर्थकारण
धामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत गुंजाळ टोमॅटो व दोडका या पिकांची नियमित शेती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. टोमॅटोचे पीक निघाल्यानंतर ते ऑगस्टमध्ये दोडका घेतात. दरवर्षी गादीवाफा, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन तसेच सुयोग्य व्यवस्थापनातून चांगले उत्पादन घेत त्यांनी या पिकापासून आपले अर्थकारण उंचावले आहे.
धामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत गुंजाळ टोमॅटो व दोडका या पिकांची नियमित शेती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. टोमॅटोचे पीक निघाल्यानंतर ते ऑगस्टमध्ये दोडका घेतात. दरवर्षी गादीवाफा, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन तसेच सुयोग्य व्यवस्थापनातून चांगले उत्पादन घेत त्यांनी या पिकापासून आपले अर्थकारण उंचावले आहे.
पुणे जिल्ह्यातील विविध भागांत व तालुक्यात हवामान व पर्जन्यमानानुसार पिकांची विविधता आढळून येते. त्यातही जुन्नर, आळे फाटा, नारायणगाव हे भाग भाजीपाला, द्राक्ष, अन्य फळे आदी व्यावसायिक पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. जुन्नर तालुक्यातील धामणखेल येथील चंद्रकांत बबन गुंजाळ यांची सुमारे १० ते ११ एकर शेती आहे. यामध्ये ते दरवर्षी हंगामनिहाय टोमॅटो, वालवड, सोयाबीन, झेंडू, शेवंती, बिजली आदी पिके घेतात.
दोडक्यातील अनुभवी शेतकरी
गुंजाळ पाच-सहा वर्षांपासून एक ते दीड एकर क्षेत्रावर दोडका घेतात. या पिकात त्यांचा चांगला अनुभव तयार झाला आहे. गावात सुमारे १० ते १२ अन्य शेतकरीदेखील हे पीक घेतात. टोमॅटोचा हंगाम संपल्यानंतर दोडका पिकाचा पर्याय गुंजाळ यांच्याकडे असतो. टोमॅटो पिकासाठी वापरण्यात आलेला मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, मांडवासाठी वापरलेल्या तारा, बांबू यांचा वापर यांचा या पिकासाठी वापर होत असल्याने त्यातून उत्पादन खर्चाचा भार कमी होतो.
यंदा पावसाने आणल्या अडचणी
यंदा गुंजाळ यांना सततच्या पावसाने दगा दिला. टोमॅटो पिकात असंख्य अडचणी आल्या. यंदा दोडक्याखाली एक एकर क्षेत्र आहे. ऑगस्टमध्ये लागवड केलेल हे पीक दरवर्षी ऑक्टोबर अखेरीपर्यंत चालते. एकूण साडेतीन महिन्यांपर्यंत प्लॉट चालतो. लागवडीनंतर झाडाच्या वाढीनुसार कळी, फूल आणि फळ धारणेच्या टप्प्यात विविध विद्राव्य खतांचा वापर होतो. किडींच्या प्रादुर्भावानुसार फवारण्या घेतल्या जातात. फळधारणेनंतर आठवड्याला तीन वेळा तोडणी केली जाते. प्रति तोडणीस साधारण ३०० किलोच्या पुढे उत्पादन मिळते. हंगामात सरासरी २४ तोडण्या होतात. फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गुंजाळ यांनी एकरी २० या संख्येनुसार सापळ्यांचा वापर केला आहे. सापळ्यांची संख्या अजून वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या उपायामुळे दोन कीटकनाशक फवारण्या कमी होऊन त्यावरील खर्चही कमी झाला आहे.
सततच्या पावसामुळे उत्पादनात घट
दरवर्षी हवामानाचे घटक व व्यवस्थापन यानुसार एकरी सात ते आठ टनांच्या आसपास उत्पादन मिळते. बॉक्सच्या हिशेबात एकरी कमाल सुमारे ३०० पर्यंत तर काही वेळा ३५० बॉक्स एवढेही उत्पादन मिळते. प्रति बॉक्स सुमारे ५० किलोचा असतो. अर्थात यंदा मात्र सततच्या पावसाने मुळांची व झाडांची वाढ चांगली न झाल्याने कळी आणि फूलधारणा कमी झाली. साहजिकच २५ टक्के उत्पादन घटणार असल्याचे गुंजाळ सांगतात. पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा लागवड क्षेत्र कमी केले आहे. दरवर्षी परिसरातून ३ ते ४ टेम्पो दोडका बाजारात पाठवला जातो. यंदा मात्र एक ते दोनच गाड्याच लोड होताना दिसत आहेत.
दोडक्याचे दर
गेल्या वर्षी किलोला १५ रुपये दर होता. हाच दर यंदा २० ते २५ रुपयांपर्यंत आहे. गेल्या वर्षी उत्पादन चांगले व दर कमी होता. यंदा उलट स्थिती असून उत्पादन कमी तर दर तुलनेने चांगले आहेत. गेल्या वर्षी सरासरी १३ टन उत्पादन मिळून सरासरी दर १५ रुपये मिळाला होता. दरवर्षी उत्पादन खर्च किमान ७० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत असतो. साधारण दोन वर्षांपूर्वी कमाल दर ४० रुपयांपर्यंत मिळाला होता. या पिकातून सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न हाती येत असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले. सर्व माल मुंबई (वाशी) येथे पाठवण्यात येतो. पुणे बाजारपेठ या पिकासाठी फायदेशीर होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
व्यवस्थापनातील बाबी
दोडक्याला दर चांगला मिळणे गरजेचे असल्यास त्याची लांबी एक ते दीड फुटापर्यंत हवी. त्याचा आकारही वेडावाकडा असून चालत नाही. तो रंगाने हिरवा व ताजा असावा लागतो. चांगले उत्पादन घेण्यासाठी दरवर्षी साडेतीन त चार एकरांत दोन ते चार ट्रक एवढा शेणखताचा वापर होतो. प्रत्येक वेळी क्षेत्र बदलून शेणखत दिले जाते. शेतात शेळ्याही बसवल्या जातात. त्यामुळे नैसर्गिक खताचा चांगला आधार मिळतो. पाण्यासाठी विहीर आहे. तसेच धरणातून पाइपलाइन केली आहे. गुंजाळ जवळपास प्रत्येक भाजीपाला पिकासाठी मल्चिंग पेपरचा वापर करतातच. त्यामुळे उन्हाळ्यात बाष्पीभन कमी होऊन पाण्याची गरज कमी होतेच, शिवाय तणांचा उपद्रवही कमी होतो.
अन्य पिकांचाही हातभार
दोडका पिकानंतर गुंजाळ कांदा, गहू यांसारखी पिके घेतात. कांद्याचे त्यांना एकरी १० ते १२ टनांपर्यंत उत्पादन मिळते. वालवडही सुमारे एक एकरात असते. त्याला किलोला ७ ते ८ रुपये दर मिळतो. टोमॅटो दरवर्षी तीन ते चार एकरांत असतो. एकरी सातशे क्रेटपर्यंत उत्पादन मिळते. प्रति क्रेट ३५० रुपये दर मिळतो. या पिकातूनही सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न हाती येते.
संपर्क- चंद्रकांत गुंजाळ- ९९७५६०३७१८
फोटो गॅलरी
- 1 of 436
- ››