agriculture story in marathi, Chandrakant Patil from Palghar Dist. has learned the techniques of Organic Farming. | Agrowon

सेंद्रिय शेतीचे तंत्र केले आत्मसात

उत्तम सहाणे
बुधवार, 17 मार्च 2021

आगर (ता. डहाणू, जि. पालघर) येथील चंद्रकांत पाटील यांनी दहा वर्षांच्या अनुभवातून सेंद्रिय शेतीचे तंत्र आत्मसात केले आहे. फळपिकांवर आधारित शेतीत विविध निविष्ठा ते शेतातच तयार करतात. मालाचा दर्जा चांगला जोपासल्यानेच दरही चांगले मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

आगर (ता. डहाणू, जि. पालघर) येथील चंद्रकांत पाटील यांनी दहा वर्षांच्या अनुभवातून सेंद्रिय शेतीचे तंत्र आत्मसात केले आहे. फळपिकांवर आधारित शेतीत विविध निविष्ठा ते शेतातच तयार करतात. मालाचा दर्जा चांगला जोपासल्यानेच दरही चांगले मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या आगर येथे चंद्रकांत रामचंद्र पाटील यांनी सेंद्रिय उत्पादक शेतकरी म्हणून ओळख मिळवली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते सेंद्रिय शेतीचा अनुभव घेत आहेत. पूर्वी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती साधारण होती. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. चंद्रकांत यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली. त्यानंतर संगणक विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून डहाणूजवळच खासगी कंपनीत नोकरीला लागले. आज ते व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

फळबाग व सेंद्रिय पद्धतीवर भर
चंद्रकांत दररोज सकाळी दोन तास शेतीला देतात. संध्याकाळीही नोकरी संपवून शक्य तो वेळ शेतीची कामे करतात. पत्नी सौ. कीर्तिका अर्थशास्त्रामध्ये पदवीधर असून, त्या पूर्णवेळ शेती पाहतात. दहा वर्षांपूर्वी या कुटुंबाने दोन एकर जमीन खरेदी केली. त्या वेळी तेथे जंगली झाडे आणि वेली वाढल्या होत्या. जमीन तयार करून ती वहितीखाली आणली. कृषी विभागामार्फत फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतला. आज चिकू व आंब्याच्या प्रत्येकी सुमारे २०, सफेद जांबची ६ ते ७ झाडे, तर पेरूची १० ते १५ झाडे आहेत. सर्व फळपिकांमध्ये सेंद्रिय तंत्राचा वापर केला जातो. फळबागेत आंतरपिके म्हणून थोड्या क्षेत्रात मिरची, टोमॅटो, वांगी, वाल अशी पिके घेतली जातात.

सेंद्रिय शेतीतील तंत्र
कृषी विभागामार्फत २०१६ मध्ये सेंद्रिय गटशेतीची योजना आली. त्यातून डहाणू भागात २९ शेतकऱ्यांचा संजीवनी सेंद्रिय शेती गट स्थापन करण्यात आला. या भागातील प्रयोगशील शेतकरी अनिल वामन पाटील गटाचे अध्यक्ष झाले. गटाच्या माध्यमातून चंद्रकांत यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन मिळाले. पुढे गटाच्या खजिनदार पदावरही त्यांची नियुक्ती झाली. कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड (केव्हीके) यांच्या मार्फत दिलेल्या प्रशिक्षणातून सेंद्रिय शेतीतील ज्ञान वाढत गेले. त्यातून विविध निविष्ठा कशा बनवायच्या हे शिकता आले. आज गांडूळ खत, कंपोस्ट खत, जिवामृत, दशपर्णी अर्क आदींची निर्मिती केली जाते. कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसायही आहे. घरच्या तीन गीर गायी आहेत. गरजेनुसार देशी गायीचे शेण बाहेरूनही आणले जाते.

गांडूळ खताचे तंत्र
चंद्रकांत यांच्याकडे इआयसेनिया फेटिडा या जातीची गांडूळ बीजे आहेत. गांडूळ खतनिर्मितीसाठी जुन्या पद्धतीच्या दोन सिमेंट टाक्या आहेत. त्याचबरोबर नव्या पद्धतीत प्लॅस्टिकच्या चार चौकोनी बॅग्ज देखील आहेत. खत फळझाडांच्या सावलीत तयार केले जाते. सुरुवातीला
शेणखत आणि पीक अवशेष एकत्र केले जातात. सावलीत सिमेंटच्या टाकीत ते टाकून त्यावर पाणी मारून एक महिना ठेवले जाते. त्यामुळे हे मिश्रण अर्धवट कुजते. त्यानंतर गांडूळ खतासाठी बनवलेल्या टाकीत किंवा बॅगमध्ये ते टाकून त्यावर दोन ते तीन किलो गांडुळे सोडली जातात. यावर रोज पाणी शिंपडले जाते. त्यामुळे गांडुळांना योग्य ओलावा मिळून त्यांची संख्या भरपूर वाढते. सुमारे दीड महिन्यात चांगल्या प्रकारचे खत तयार होते.

सात टनांपर्यंत खतनिर्मिती
खत काढताना पाणी फवारणी बंद केली जाते. वरच्या थरातील खत हलक्या हाताने काढले जाते. अशा प्रकारे वर्षाला सात ते आठ टन खताचे उत्पादन घेतले जाते. आता महिन्याला तेवढे उत्पादन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकरीदेखील खत विकत घेऊन जातात. किलोला १० रुपये असा त्याचा दर आहे. हा खत प्रकल्प आणि सेंद्रिय शेती पाहण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची सहलही येथे आयोजित केली जाते. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावले जाते. जिवामृत, दशपर्णी अर्काची देखील विक्री केली जाते.

जिवामृत निर्मितीचे तंत्र
जिवामृत बनवण्यासाठी शेतातीलच वस्तू वापरण्यात येतात. यात घरच्या गीर गायीचे गोमूत्र दहा लिटर, शेण दहा किलो, डाळीचे पीठ दोन किलो, गूळ एक किलो आणि वडाखालील माती एक किलो असे प्रमाण घेतले जाते. हे मिश्रण बारीक करून टाकीमध्ये सोडले जाते. टाकी सावलीत ठेवली जाते. मिश्रण दररोज दोन वेळा काठीने ढवळले जाते. पाच दिवसांनंतर शेतात वापर केला जातो. एकरी २०० लिटर या प्रमाणात फळझाडे व भाजीपाला पिकांमध्ये मुळाजवळ आळवणी केली जाते.

दशपर्णी अर्क
कीडनियंत्रणाच्या दृष्टीने शेतात आणि गावात उपलब्ध वनस्पती दशपर्णी निर्मितीसाठी वापरल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने कडुनिंब, घाणेरी, सीताफळ, निर्गुंडी, टणटणी, करंज, जंगली एरंड, पपई, गुळवेल आदींचा वापर होतो. प्रत्येकी दोन किलो पाला घेऊन त्यांचे तुकडे व २०० लिटर पाणी असे द्रावण सोडलेली टाकी सावलीत ठेवली जाते. यात मिरचीचा ठेचा आणि लसूणही वापरला जातो. मिश्रण काठीने दररोज हलवले जाते. एक महिना झाल्यानंतर छोट्या टाक्यांमध्ये ते ठेवले जाते. दर आठ दिवसांनी फवारणी होते. भाजीपाला पिकांत रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी रंगीत चिकट सापळे लावले जातात. अळीचे नियंत्रण करण्यासाठी दहा ते बारा ओळींनंतर एक ओळ झेंडूची लावली जाते. ही फुले नियमित तोडली जातात.

उत्पादन प्रति महिना दर (प्रति लिटर)

  • गोमूत्र ३०० लिटर १० रू.
  • जिवामृत ६०० लि.. १० रु..
  • दशपर्णी अर्क २०० लि. १० रु..
  • गांडूळ कल्चर १५ ते २० किलो ५०० रु..

सेंद्रिय उत्पादनांना मागणी
संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने कीड- रोगनियंत्रण केले जाते. भाजीपाला स्थानिक बाजारात विकला जातो. चिकूचे एकरी १५ ते २० उत्पादन घेण्यात येते. आंब्याचे व सफेद जांबचे एकरी दोन टनांपर्यंत उत्पादन मिळते. दिवसाला सुमारे तीन डझनांपर्यंत पेरूची काढणी होते. १५ रुपये प्रति नग दराने त्याची विक्री होते. चंद्रकांत सांगतात की सेंद्रिय पद्धतीने पिकवल्यामुळे आंब्यांची गोडी, रंग व एकूणच गुणवत्ता चांगली असते. वजनही ३०० ते ४०० ग्रॅम असते. त्यामुळेच डझनाला ३०० ते ४०० रुपये दराने ग्राहक थेट बांधावरून माल घेऊन जातात. चिकू मात्र लिलाव बाजारात विकले जातात. त्यांचा रंग, आकार उत्तम असल्याने इतरांपेक्षा किलोला तीन ते चार रुपये दर नेहमीच अधिक मिळतात.

सेंद्रिय शेतीच्या चळवळीतही
गावातील श्री केवडादेवी मंदिराचे चंद्रकांत ‘ट्रस्टी’ आहेत. ‘केव्हीके’ व कृषी विभागाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करतात.

संपर्क- चंद्रकांत पाटील, ९९२३४५७८७३

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणू, जि. पालघर येथे कार्यरत आहेत.)
संपर्क- ७०२८९००२८९


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
इलेक्ट्रिक वाहने डिझेल वाहनांशी नक्कीच...डिझेल इंजिनवर चालणारी वाहने आणि शेतीपयोगी...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये...
सायकलचलित गिरणीमुळे घरगुती पीठ मिळवणे...नागपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील...
कोकरांच्या वेगवान वाढीसाठी मिल्क...मेंढ्यांच्या मांसाला वाढणारी मागणी पुरवण्यासह...
निचऱ्यासाठी मोल नांगर, सबसॉयलरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
पीकविषयक माहितीसाठी मोबाईल ॲपकोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली...
मालमत्ता मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा...पंचायतराज मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार तयार...
शेती व्यवस्थापनात सेन्सर तंत्रज्ञानड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापरउसासाठी योग्य ठिबक सिंचन शक्यतो १६ मी.मी....
रेशीम उत्पादकाने सुरू केली कच्चा धागा...सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र...
सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित...पीक संरक्षणाच्या  खर्चात वाढ होत असून,...
सूक्ष्म सिंचनामध्ये स्वयंचलित यंत्रणासूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत...
सीआयसीआर’ने विकसित केली कापूस वेचणी बॅग नागपूर ः कापूस वेचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे...
बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणालीदक्षिण कर्नाटकमध्ये सामान्यतः सरासरी तापमान कमाल...
पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाइन...अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन...
कच्च्या हळदीपासून भुकटी करण्याचे वेगवान...* १२ ते २४ तासांत ओल्या हळदीपासून भुकटी शक्य *...
सेंद्रिय शेतीचे तंत्र केले आत्मसातआगर (ता. डहाणू, जि. पालघर) येथील चंद्रकांत पाटील...
कृषी क्षेत्रामध्ये महिला अनुकूल यंत्रे...प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान कौतुकास्पद...
हरितगृहावरील पांढरा थर शेवंती पिकाला...शेवंतीसारख्या प्रकाशासाठी संवेदनशील पिकामध्ये...
ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन...मोबाईल हाती आला तरी अद्याप शेतकरी व ग्रामीण...