रंगबेरंगी फुलांसाठी विशेष प्रसिध्द चेन्नईचा फूलबाजार

चेन्नईच्या फुलबाजारात विविध फुलांची विविधता आढळते.
चेन्नईच्या फुलबाजारात विविध फुलांची विविधता आढळते.

तमिळनाडू राज्य विविध फुलांसाठी विशेष प्रसिध्द आहे. येथील मंदिरे, वेण्यांमध्ये माळण्यात येणारे गजरे, उत्सव, विशेष दिन आदींसाठी फुलांचे मोठे महत्त्व असून साहजिकच मागणीही प्रचंड असते. त्या अनुषंगाने चेन्नई येथे भरणारा फूलबाजार राज्यात किंबहुना दक्षिण भारतातील मोठा म्हणावा लागेल. दिवसरात्र विविध फुलांची आवक, जावक सुरू राहून रंगबेरंगी फुलांची उधळण करणारा म्हणून या बाजारपेठेकडे पाहावे लागेल. जगाचा विचार केला तर नेदरलॅंडमधील फूल बाजार आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द आहे. भारतातही फूलशेतीचा चांगलाच विकास झाला आहे. याच बंगळूर, जम्मू-काश्‍मीर तसेच महाराष्ट्रातील वडगाव, मावळ (पुणे) व नाशिक जिल्हा अशी काही उदाहरणे घेता येतील. चेन्नई मध्येही ‘कोयमेंदु होलसेल मार्केट कॉम्प्लेक्स’ त्यासाठी प्रसिध्द आहे. तेथे शिरता क्षणीच आपण प्रफुल्लित होऊन जातो. त्याचे कारण म्हणजे रंगेबेरंगी फुलांची उधळण करणारा इथला फूलबाजार विविध फुलांच्या सुगंधाने आणि रंगाने अक्षरशः न्हाऊन निघालेला असतो. कॉम्प्लेक्समधील घाऊक भाजीपाला व फळबाजाराला लागूनच फुलांचा भव्य बाजार आहे. आशिया खंडातील मोठ्या घाऊक बाजारापैकी त्याचा समावेश होतो. बाजाराची व्याप्ती येथील बाजारात फुलांचे सुमारे चारशे ते पाचशे ट्रक्स फुले घेऊन येताना नेहमी दृष्टीस पडतात. तमिळ भाषेत फुलास ‘पू’ तर बाजाराला ‘काडा’ म्हटले जाते. कोयमेंदु येथील पुकाडा म्हणजेच फूलबाजार पाहणे म्हणजे पर्वणीच असते. फुलांवर लाईटचे मोठे झोत सोडल्याने फुलांचे सौंदर्य अजून उठून दिसते. आणि वातावरणनिर्मिती चांगली होते. चेन्नई शहरात विविध ठिकाणी असलेला फळे, भाजीपाला तसेच फुलांचा बाजार बंद करून शहराच्या कोयमेंदु भागात घाऊक विक्रीचे भव्य दालनच निर्माण करण्यात आले. सन १९९६ साली बाजार सुरू झाला. ज्या कॉम्प्लेक्स हा बाजार भरतो ते सुमारे २९५ एकरांवर पसरलेले आहे. ‘चेन्नई मेट्रोपॉलीटीयन डेव्हलपमेंट अथॉरीटी’ने ते विकसित केले असून ‘तमिळनाडू मार्केट मॅनेजमेंट कमिटी’मार्फत चालवले जाते. मार्केटमधील दोन भागांत भाजीपाला, दुसऱ्या भागात फूल बाजार तर तिसऱ्या भागात फळांचा बाजार भरतो. येथे दिवसाला हजारो लोक ये-जा करतात. हा बाजार रात्रीही सुरू असतो. घाऊक बाजार रात्री १० ते सकाळी १० वाजेपर्यंत तर किरकोळ बाजार सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत चालतो. भल्या पहाटे लगबग सुरू चेन्नई शहर गाढ झोपेत असते त्या वेळी कायमेंदु बाजारपेठेत रात्री दोन वाजेपासूनच फुलांनी भरलेले ट्रक्स, टेम्पो येण्यास सुरवात होते. पहाटे चारपर्यंत ही लगबग सुरूच असते. दिवसाच्या प्रखर उन्हात फुले खराब होऊ नयेत म्हणून रात्री वाहतूक करण्यावर भर दिला जातो. मोठ्या प्रमाणाच आलेले फुलांचे बॉक्स, थैल्या, टोपले वाहून नेण्याऱ्यांची धावपळ पाहण्यास मिळते. “थल्लु थल्लु वाझिले निसाटे” असे तमिळ शब्द त्यांच्या तोंडून सतत ऐकण्यास मिळतात. पहाटे पाच वाजता फुलांची घाऊक विक्री सुरू होते. यानंतर किरकोळ खरेदीदार, फुले शोभिवंत करणारा व्यवसाय करणरे म्हणजे डेकोरेटर्स, फ्लोरीस्ट खरेदीसाठी येऊ लागतात. त्यानंतर घरगुती उपयोगांसाठी लागणारी फुले घेणाऱ्या ग्राहकांची रेलचेल सुरू होते. सकाळी नऊ वाजेपर्यंत फुलांच्या बहुतांश लॉटसची विक्री झालेली असते. सकाळी दहानंतर मग गर्दी कमी होण्यास मदत होते. नंतर दिवसभर किरकोळ बाजार सुरू राहतो. फुलांचे स्टॉल्स येथील फूलबाजारात घाऊक तसेच किरकोळ फूलविक्रीचे सुमारे ४०० हून अधिक स्टॉल्स आहेत. काही विक्रेते विविध प्रकारची फुले विक्रीस ठेवतात. परंतु, अनेक विक्रेते विशिष्ट फुलांच्या विक्रीसाठी प्रसिध्द आहेत. गुलाब, शेवंती, चमेली, मोगरा यांची विक्री येथे मोठ्या प्रमाणात होते. के. एस. के. ट्रेडर्स हे व्यावसायिक फेब्रुवारी ते ऑक्टोबर दरम्यान झेंडू व गुलाबाची विक्री करतात. यानंतर ते शेवंतीचा व्यवसाय करतात. फुलांचा उठाव व परराज्यातून आवक चेन्नईची लोकसंख्या मोठी असल्याने येथे फुलांचा खपही मोठा आहे. त्यामुळे तमिळनाडू राज्यातूनच नव्हे तर केरळ व कर्नाटक राज्यातूनही येथे फुले विक्रीसाठी येतात. सुशोभिकरणासाठी लागणारी ऑर्किड, डच, गुलाब आदी फुले बंगळूर व मदुराईहून येतात. सुट्या फुलांचे क्षेत्र व उत्पादन यामध्ये तमिळनाडू राज्य भारतात आघाडीवर आहे. यामागील कारण म्हणजे फुलांची मागणी जास्त असल्याने उत्पादनही जास्त होते. होसूर, धर्मापुरी, कोईबतूर, दिडीगूल, चेन्नई, वेल्लोर हे तमिळनाडू राज्यातील जिल्हे सुट्या फुलांच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहेत. होसूर व धर्मापुरी येथील वातावरण बटन गुलाब उत्पादनासाठी प्रसिध्द आहेत. या दोन जिल्ह्यातच त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. याचबरोबर संकरित झेंडूचीही वर्षभर येथे लागवड केली जाते. मोगरा व चमेली ही येथील ग्राहकांची अधिक पसंती मिळवणारी फुले आहेत. त्यामुळे या फुलांखालील क्षेत्रही मोठे आहे. फुलांचे वेड दक्षिण भारतात दोन गोष्टी फार प्रसिध्द आहेत. एक म्हणजे इडली- डोसा व फुले. दक्षिण भारतातील स्त्रिया मोगरा, चमेली फुलांचा गजरा वेणीत माळूनच कामाला घराबाहेर पडतात. त्यामुळे या फुलांचे गजरे तयार करणारी येथे अनेक दुकाने आहेत. नववधू, देव-देवता व नेत्यांचे पुतळे फुलांनी सजवण्याची येथे मोठी प्रथा आहे. गुलाब, चमेलीपासून बनवलेले चार फूट लांबीचे हार तयार करणारी येथे अनेक दुकाने आहेत. याचबरोबर विविध फुलांची रंगसंगती साधून तयार केलेले हारही येथे पाहण्यास मिळतात. नववधूला शेवंतीच्या फुलाचा ड्रेस घालण्याची प्रथा आहे. आवक व दर फुलांच्या दरात होणारी चढ- उतार अन्य बाजारांप्रमाणे येथेही होते. सणांचे दिवस, लग्नसराई, जयंती दिन, उत्सव या काळात फुलांचे भाव चढे राहतात. पोंगल, दिपावली, वरलक्ष्मी ओणम, गणेश चतुर्थी, कृष्णाष्टमी, फ्रेन्डशीप डे आदींच्या दिवशी येथे फुलांची मोठी आवक होते. बाजारात विक्रेते तमिळ भाषेत फुलांची नावे घेत विक्री करीत असतात. दरांबाबत प्रातिनिधीक उदाहरण सांगायचे तर यंदाच्या ऑगस्टमध्ये फुलांचे प्रतिकिलो सरासरी दर खालीलप्रमाणे होते. (कंसात तमिळ नाव)

  • झेंडू (सेंडुमल्ली)- ५० रुपये
  • चमेली (जाठीमल्ली) ४०० रु.
  • मोगरा (मेल्लिगाई) ३०० रु.
  • निशीगंध (साम्पन्गी) २०० रुपये
  • दवना (मारीकोलुन्थु) ३०० रु.
  • शेवंती (सान्थीनी) ८० रु.
  • बटन गुलाब- १०० रु.
  • अबोली (कनकम्बरम) ३०० रु.
  • (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.) संपर्क- डॉ. टी. एस. मोटे- ९४२२७५१६००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com