agriculture story in marathi, Chinchvali Village of Sindhudurg Dist. has achieved its name in commercial vegetable farming. | Agrowon

प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने साधला विकास

एकनाथ पवार
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास भाजीपाला, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालनाची जोड देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली गावाने आर्थिक विकास साधला आहे. परिसरातील बाजारपेठांची गरज ओळखून गावातील शेतकऱ्यांनी विविध भाजीपाला घेत जिल्ह्याच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास भाजीपाला, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालनाची जोड देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली गावाने आर्थिक विकास साधला आहे. परिसरातील बाजारपेठांची गरज ओळखून गावातील शेतकऱ्यांनी विविध भाजीपाला घेत जिल्ह्याच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटणपासून दोन- तीन किलोमीटर अंतरावर चिंचवली (ता. कणकवली) गाव आहे. सुमारे साडेपाचशे लोकवस्तीच्या या गावाचा बहुतांशी भाग डोंगरांनी व्यापलेला आहे. वैभववाडी तालुक्यात उगम पावलेली शुक नदी या गावातून वाहते. सुमारे २० वर्षांपूर्वी परिसरातील अन्य गावांप्रमाणे या गावातही भात, नाचणी अशी पारंपरिक पिके घेतली जायची. गावातील मनोहर बाबू पेडणेकर आणि आकाराम गुरव या दोघांनी पीकबदल करताना सर्वप्रथम ऊस लागवडीचा श्रीगणेशा केला. याच कालखंडात हे कार्यक्षेत्र असलेला ऊस कारखाना असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथे उभा राहिला. मग आपसूकच भातशेतीपेक्षा शेतकरी ऊसशेतीकडे वळले. गावात माळरान क्षेत्र तसे कमी आहे. मात्र, सुमारे ६० एकरांत ऊस लागवड झाली आहे.

भाजीपाला पिकांतील संधी ओळखली
ऊस लागवडीतून शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारू लागले. मग व्यावसायिक शेतीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांत भाजीपाला पिकांबाबत ओढ निर्माण झाली. कोकणात भाजीपाला करणाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे बाजारपेठांमध्ये त्यास मागणी असते. परिसरात खारेपाटण, तळेरे, वैभववाडी या तीन बाजारपेठा आहेत. चिंचवली गावातील शेतकऱ्यांनी ही संधी ओळखली. उसाबरोबर भाजीपाला पिकांसाठीही पाण्याची मोठी गरज भासणार हे ओळखले. सर्वजण एकत्र आले. श्रमदानातून बंधारा घातला. त्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. मग मात्र शेतकऱ्यांनी मागे वळून पाहिले नाही.

शेतकरी गुंतले भाजीपाला शेतीत
गावात आज हिरवा व लाल माठ, मेथी, मोहरी, कोथिंबीर, वांगी, भेंडी, गवार, वाल, दोडका, वरणा, मिरची, नवलकोल, भोपळा अशी विविधता शेतातून दिसून येते. त्यातून त्यांना ताजा पैसा उपलब्ध होऊ लागला. शिवाय उडीद, कुळीथ, वाटाणा, हरभरा, चवळी, मूग आदी पिकेही शेतकरी घेऊ लागले. पहाटे लवकर उठून भाजीपाला लगतच्या बाजारपेठेत विक्री करण्यासाठी नेला जातो. ताजा माल मिळत असल्यामुळे ग्राहक शेतकऱ्यांची वाट पाहत असतो. सुमारे १५० कुटुंबांपैकी ५० ते ६० कुटुंबे आज भाजीपाला शेतीत गुंतली आहेत, तर २५ ते ३० कुटुंबे ऊसशेती करतात. डोंगरभागातील शेतकऱ्यांनीदेखील नियोजनबद्धपणे काजू, आंबा लागवड केली आहे.

तंत्रज्ञानाचा वापर
भाजीपाला शेतीतून खेळते भांडवल मिळू लागले. मग नव्या प्रयोगांसाठी उत्साह आला. कृषी विभागाच्या कित्येक योजना गावात राबविल्या जातात. शंकर तुकाराम पेडणेकर यांनी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करीत वांगी, मिरची, नवलकोलची लागवड केली आहे. अनिल पेडणेकर उसाचे पाचट न जाळता त्याचा वापर करतात. डोंगरात सहजासहजी वावरता येणार नाही अशा ठिकाणी त्यांनी काजूची पाचशे झाडे लावली आहेत. त्याचे दोन वर्षांपासून ते उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यात हरभरा घेणाऱ्यांची संख्याही नगण्य आहे. मात्र, महेश बांदीवडेकर यांनी हरभऱ्याची यशस्वी लागवड केली आहे. सापळा पीक म्हणून बांधावर मोहरी लावली आहे.

उलाढाल वाढली
पालेभाजीच्या एका जुडीचा दर १० रुपये गृहीत धरला तरी दररोज प्रत्येकी दोनशे ते तीनशे जुड्या विक्री केल्या जातात. सर्व मिळून पाचशेपर्यंत जुड्यांची विक्री होते. अनेक भाज्यांना ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. दररोज गावातून १५० ते २०० किलो भाजीची विक्री होते. त्यातून काही लाख रुपयांची उलाढाल हंगामात होते.

पूरक व्यवसायांना चालना
कुणी दोन, कुणी चार, पाच अशा म्हशी पाळून दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. सध्या गावचे मासिक दूध संकलन साडेचार हजार लिटर आहे. हे दूध लगतच्या खारेपाटण डेअरीला पुरवले जाते, त्यास लिटरला सरासरी ४० रुपये दर मिळतो. त्यातून दोन लाख रुपयांपर्यंतची उलाढाल होते. काहींनी देशी कुक्कुटपालन केले आहे. या कोंबड्यांना परिसरात मोठी मागणी आहे. गावात दुग्धव्यवसाय करणाऱ्या बारा शेतकऱ्यांकडे बायोगॅस प्रकल्प आहेत, त्यामुळे महिन्याला सिलिंडरसाठी मोजाव्या लागणाऱ्या ८०० ते ९०० रुपयांची बचत होते. ऊस, भाजीपाला, दूध अशा विविध स्रोतांमधून होणारी उलाढाल २५ ते ५० लाख रुपयांच्या पुढे निश्‍चित गेली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
गावातील बहुतांश लोकांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने श्रमदानाची परंपरा गावाला आहे. अनेक कामे त्यातूनच घडली आहेत. शेतीच्या माध्यमातून सतत एकमेकांशी वैचारिक संवाद होत असल्याने ग्रामपंचायत निवडणूकदेखील बिनविरोध होण्यास मदत झाली आहे. सध्या सरपंच म्हणून श्रृती भालेकर, तर उपसरपंचपदी अनिल पेडणेकर कार्यरत आहेत. गावाला आतापर्यंत निर्मलग्राम, तंटामुक्त, पर्यावरणसमृद्ध गाव, भातपीक जिल्हास्तर, लोकराज्य ग्राम, चंदेरी कार्ड प्राप्त आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

गावातील शेतकऱ्यांना पुरस्कार

  • मनोहर पेडणेकर- शेतीनिष्ठ
  • अशोक भिकाजी पाटील- भातपीक स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक
  • मधुकर बांदीवडेकर- भातपीक स्पर्धेत राज्यात प्रथम
  • अनील पेडणेकर- सिंधू शेतीनिष्ठ पुरस्कार, कृषिमित्र पुरस्कार

चिंचवली गावातील शेतकरी नावीन्यपूर्ण प्रयोगांत आघाडीवर आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गावाची निवड कोरडवाहू क्षेत्रविकास कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत दोन पॅक हाउस, तीन गांडूळ खत युनिट्स, २५ कुक्कुटपालन, तर तीन दुग्ध युनिट्स उभारण्यात येणार आहेत. फळबाग लागवड, हिरवळीच्या खतांची निर्मितीदेखील करता येणार आहे. हा प्रकल्प सुमारे सव्वा २४ लाख रुपयांचा असून, शासनाकडून १२ लाख १० हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
- गायत्री तेली
कृषी पर्यवेक्षक,
राहुल पाटील, कृषी साहाय्यक, चिंचवली

श्रमदानातून झालेल्या बंधाऱ्याने बदलले चित्र
गावातून वाहणाऱ्या शुक नदीला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असते. पूर आल्यानंतर वाहतुकीचा रस्तादेखील पाण्याखाली जातो. परंतु उन्हाळ्यात मात्र नदीच्या पाण्याची पातळी कमी व्हायची. पर्यायाने शेतीला पाणी कमी पडायचे, त्यामुळे ग्रामस्थांनी २०१३ पासून नदीपात्रात श्रमदानाने बंधारा उभारण्यास सुरुवात केली. सुमारे १५० ते दोनशे फूट लांबीच्या या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत असे. त्याचा वापर शेतीसाठी होतो. या वर्षी अरुणा प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे बंधारा उभारण्यात आलेला नाही.

संपर्क - अनिल पेडणेकर,
उपसरपंच
९९६०५०२३०३

 
दृष्टिक्षेपात प्रगती

गावात निनूदेवी सिंचन बचत गट स्थापन झाला असून, त्या माध्यमातून सुमारे २५ एकर जमीन ओलिताखाली आली आहे. मधुकर बांदीवडेकर यांचे प्रातिनिधिक उदाहरण सांगायचे तर भातशेतीखालील जमीन त्यांनी ऊस लागवडीखाली आणली. उसातून त्यांना ५० हजार ते एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शिवाय, भाजीपाला पिकांचे उत्पन्न आहे, बांबू लागवड केली आहे.
अनिल पेडणेकर सांगतात, की माझी १० एकर ऊसशेती आहे, त्यातून सरासरी ४०० टन ऊस उत्पादित होतो. प्रति टन २ हजार ७५० रुपये दर मिळतो. ऊसशेतीसोबत वालापासून ४० हजार, वांगी विक्रीतून ३० हजार, चवळी शेतीतून २० हजार, तर तीन वर्षांच्या काजू बागेतून ७० हजार रुपये उत्पन्न मिळते. दुग्धव्यवसायातून मासिक २० हजार रुपये मिळतात. शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून मुलाला इजिनिंअरिंगचे शिक्षण देत आहे. एक एकर जमीनदेखील खरेदी केली आहे.

शेती झाली फायदेशीर
भातशेती परवडत नव्हती. मग पालेभाज्या, विविध प्रकारची कडधान्ये घेऊ लागलो. त्यातून ५० हजार रुपयांच्या पुढे उत्पन्न हाती येते. घरातील सदस्य काम करीत असल्यामुळे खर्चात बचत होते. दुग्धव्यवसायातून महिन्याला १० हजार रुपये मिळतात. शेतीतील पैशांमधून काही क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे, पॉवर टिलरही खरेदी केला असे किशोर शंकर पेडणेकर सांगतात.

संपर्क- किशोर पेडणेकर
७७५६९३७४०१

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
औरंगाबाद जिल्ह्यात करटोलीची व्यावसायिक...कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील...
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे...योग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
भात शेतीला मिळाली कुक्कटपालनाची जोडनिवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव...
शेळी, कोंबडीपालनातून बसवली शेतीची घडीनेमके काय करायचे याची स्पष्टता असली की शेती किंवा...
गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना...कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक...
शाश्वत ग्राम, शेती अन कौशल्य विकासावर भरशाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि...
एका वर्षात दुबार द्राक्ष काढणीचा ‘आरा...द्राक्षशेतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जोखीम वाढत...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...