परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून दुग्धव्यवसायात आणली स्थिरता

सुनील शिंदे यांना गायींचा लळा लागला आहे.
सुनील शिंदे यांना गायींचा लळा लागला आहे.

पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे इलेक्ट्रिशियन’ म्हणून व्यवसाय करता करता पारंपरिक दीड एकर क्षेत्रात भात, वांगी, टोमॅटो, काकडी अशी पिके घेत. मात्र उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नव्हता. अशावेळी दुग्धव्यवसायाचा हुकमी पर्याय मिळाला. सातत्य, अभ्यास, परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून संकरीत गायींचे संगोपन करीत व्यवसाय वाढवला. आता त्यात स्थिरस्थावर होत आर्थिक प्रगती करण्यात सुनील यशस्वी झाले आहेत. पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात रिहे गावात सुनील राजाराम शिंदे यांची पारंपरिक दीड एकर शेती आहे. मात्र एवढ्या अल्प शेतीक्षेत्रातून कुटुंबाचा चरितार्थ चालवणे शक्य नव्हते. त्यामुळे पिरंगुट येथे ‘इलेक्ट्रिक’ व्यवसायातील ठेकेदाराकडे सुनील यांनी रोजंदारीने काम करण्यास सुरुवात केली. त्याला अजून आर्थिक जोड देताना भात, वांगी, टोमॅटो, काकडी आदी पिकांचे उत्पादन घेण्यासही सुरुवात केली. हा भाजीपाला विक्रीसाठी ते पुणे बाजार समितीमध्ये पाठवित. मात्र तिथेही वाहतूक, हमाली, तोलाई, आडत आणि मिळणारा कमी दर यामुळे उत्पादन आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसेना. खर्चाची फक्त तोंडजुळवणी व्हायची. संकटात भर म्हणून की काय मुळशी परिसरात अन्य व्यावसायिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ लागल्याने शेतीला मजूर मिळणेही कमी झाले होते. अखेर पूर्ण विचारांती शेतीला अन्य सक्षम पर्याय शोधण्यास सुरुवात केली. अभ्यासातून त्यांना दुग्ध व्यवसायाचा पर्याय मिळाला. दुग्धव्यवसायाकडे वाटचाल मुळशी परिसरात शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येथे नागरी वसाहत वाढू लागली होती. त्यामुळे या ठिकाणी दुधाचा व्यवसाय चांगला होईल हा विचार सुनील यांनी केला. साधारण २००६ सालची ही गोष्ट म्हणावी लागेल. त्या वेळी एक गाय व कालवडीचा सांभाळ करण्यास सुरुवात केली. ही कालवड मोठी झाल्यावर दररोज १२ लिटरपर्यंत दूध देऊ लागली. मग आत्मविश्‍वास आला. त्यानंतर काष्टीच्या बाजारातून आणखी एक संकरीत गाय आणली. टप्प्याटप्प्याने व्यवसायात गती येऊ लागली. हुरूप वाढला. वासरांची अधिक दक्षतेने काळजी घेताना त्यांना दररोज पाच- पाच लिटरपर्यंत दूध पाजण्यात येऊ लागले. लुपीन फाउंडेशनकडून मार्गदर्शन सुनील म्हणाले, की पूर्वी पारंपरिक पद्धतीने गायींना रेतन करायचे. मात्र लुपीन फाउंडेशनच्या पशुधन विकासाचे काम मुळशी तालुक्यात सुरू झाले. त्यानंतर तेथील प्रशिक्षित पशुवैद्यकीय सल्लागारांनी कृत्रीम रेतन करण्याचा सल्ला दिला. बाएफ संस्थेच्या वतीने उच्चदर्जाच्या रेतनमात्रा दिल्या. त्यातून चांगल्या गायींची पैदास झाली. दूधही वाढले असे शिंदे यांनी सांगितले. कालांतराने गोठ्यात गायींची संख्या नऊपर्यंत तयार झाली. सद्यस्थितीत १५ संकरीत गायी आहेत. त्यापैकी नऊ गाभण आहेत. दररोजचे सरासरी दूध संकलन १०० लिटरपर्यंत होते. दुग्धव्यवसायातील ठळक बाबी १) दुग्ध व्यवसायासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी यू ट्यूबचा आधार घेतला. त्यात मुक्त गोठा पद्धत पाहण्यास मिळाली. त्यानुसार घरातील काही सामग्री आणि ‘स्क्रॅप’ साहित्याच्या आधारे कमी खर्चात मुक्त गोठा बांधला. २) दुधाचा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या फायदेशीर करायचा तर चारा आपल्याकडील असणे गरजेचे होते. त्यादृष्टीने दीड एकरांवर ऊस आणि अन्य चारा पिके घेतली. बाराही महिने आता हिरवा चारा चारा उपलब्ध होऊ लागला आहे. ३) गहू भरडा, सरकी पेंड, गोळी पेंड, मिनरल मिश्‍चर असा समतोल आहार गायींना दररोज सकाळी संध्याकाळी धारा काढण्यापूर्वी दिला जातो. यामुळे गायींचे आरोग्य चांगले राहून दुधातही सातत्य टिकून राहते असा शिंदे यांचा अनुभव आहे. वर्षभरात दोन वेळा लाळ्या खुरकुत आणि एफएमडी या रोगांसाठी लसीकरण करण्यात येते. ४) पहाटे पाच वाजता उठल्यानंतर गायींना कुट्टी देण्यात येते. सहा वाजेपर्यंत धारा काढण्यात येतात. त्यानंतर गायींना मुक्त वातावरणात सोडण्यात येते. दिवसभरानंतर संध्याकाळी वाजता पुन्हा गायी गोठ्यात येतात. चारा, खाद्य दिल्यानंतर संध्याकाळी धारा काढल्या जातात. दिवसभर मुक्त गोठ्यात असल्याने गायी गरजेनुसार पाणी आणि चारा खातात. त्यामुळे जास्त मनुष्यबळाची गरज भासत नाही विक्री व्यवस्थापन गावात रतीबाचे दूध पुरवणारे गवळी जागेवर दूध खरेदी करतात. परिसरातील दुधाच्या उपलब्धतेनुसार प्रति लिटर ३० ते ३२ रुपये लिटरने दुधाची विक्री होते. कामगारांचा पगार, चारा, आरोग्य व अन्य खर्च वजा जाता महिन्याला ३० ते ४० हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. या व्यवसायात आठ वर्षांच्या काळात आठ कालवडींची विक्री केली. काही खोंडे मोफतही दिली. मुक्त गोठा पद्धतीचे झालेले फायदे

  • गायींच्या मुक्त संचारामुळे त्या तणावमुक्त राहतात. परिणामी दुधात वाढ झाली.
  • त्यांचे आरोग्य चांगले राहिले. आजारी पडण्याचे प्रमाण अत्यल्प होते.
  • मुक्त गोठ्यात आपल्या गरजेनुसार गायी चारा- पाणी घेतात.
  • मुक्त वातावरणात फिरण्यातून शेण आणि गोमूत्राचे मिश्रण चांगले होते. त्याचा उपयोग चारापिकांसाठी खत म्हणून होतो.
  • कमी मनुष्यबळात गोठा व्यवस्थापन होते.
  • मित्राने धीर देत व्यवसायाला दिली चालना अनुभवाबाबत सुनील म्हणाले की चारा कापणे, तो घेऊन येणे, धारा काढणे ही कामे करत असताना गेल्या वर्षी गोठ्यात अचानक कोसळलो. या वेळी दवाखान्यात नेले असता मणक्यात अंतर पडल्याचे निदान झाले. जड ओझी उचलणे, खाली वाकणे, धारा काढणे आदी कामे करण्यास डॉक्टरांनी सक्त मनाई केली. मग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. तो मित्र अनिल भोसले यांना बोलून दाखविला. खरे तर त्यांनी माझ्या व्यवसायाची प्रेरणा घेऊनच दुग्धव्यवसाय सुरू केला होता. माझा व्यवसाय ताब्यात घ्यावा असे मी मित्रास सुचविले. मात्र मित्राने धीर देत व्यवसाय बंद न करण्याचे सांगत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर दूध काढणी यंत्रही घेऊन दिले. त्यानंतर कोकणातून तरुण दांपत्य कामासाठी आणले. त्या माध्यमातून शेतातून चारा आणणे, गायींना देणे, धारा काढणे आदी कामे सोपी झाली. कर्ज न घेता वाढविला व्यवसाय कोणतेही कर्ज न घेता संसार उभा केल्याचे सुनील आत्मविश्‍वासपूर्वक सांगतात. स्वतः इलेक्ट्रीशियन असल्याने पहिला गवताचा गोठा बांधणे शक्य झाले. जसजशा गायी वाढत गेल्या त्यानुसार व्यवसायातले उत्पन्न वापरत गोठा बांधला. पुढे मुक्त गोठादेखील उपलब्ध साधनांवर उभारला. संसार स्थिर झाल्यानंतर मुलीचे लग्न केले. आता स्वतःची मोठी चारचाकी खरेदी केली आहे. अर्थात त्यासाठी मात्र थोडेसे कर्ज काढावे लागले अशी कबुलीही सुनील देतात.

    संपर्क- सुनील राजाराम शिंदे - ९८८१४०२८१७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com