गोठ्यातील सर्व जनावरांचे एकाच वेळी जंत निर्मूलन करावे.
गोठ्यातील सर्व जनावरांचे एकाच वेळी जंत निर्मूलन करावे.

वेळीच करा जनावरांमधील आंत्र परोपजीवींचे नियंत्रण

आंत्रपरोपजीवीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची भूक मंदावून उत्पादनात व प्रजोत्पादनात घट येते. त्यामुळे लक्षणे अोळखून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते.   जनावरांच्या आहारातील पोषण मूल्यांपैकी २० ते ३० टक्के पर्यंत सत्व परोपजीवी खातात. जंताचे प्रमाण कमी असताना विशेष लक्षण न दिसल्याने होणारे नुकसान जास्त असते, कारण प्रथम दर्शनी जनावर निरोगी भासत असते. असे हे नुकसानकारक परोपजीवी आंत्र व बाह्य दोन प्रकारचे असतात. आंत्र परोपजीवींमध्ये गोल कृमी, चपटे कृमी व पर्णकृती असे तीन उप प्रकारात आढळतात तर बाह्य परोपजीवीमध्ये उवा, गोचीड, लिखा, गोमाशी, डास यांचा समावेश होतो. या शिवाय एकपेशीय परोपजीवी हा सुद्धा एक नुकसानकारक प्रकार आढळून येत आहे. लक्षणे

  • नवीन कालवडी, पारड्या, बकरे, करडे यांची वाढ व्यवस्थित होत नाही.
  • जनावरांची भूक मंदावून उप्तादनात व प्रजोत्पादनात घट येते.
  • जनावर व्यवस्थित माजावर येत नाही.
  • रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होऊन जनावर कायम आजारी पडते.
  • लसीकरणाचा योग्य परिणाम दिसत नाही.
  • जनावराचे पचन बिघडून शेण पातळ होणे, शेणाचा वास येणे, शेणात आम पडणे असे लक्षण दिसून येतात.
  • केसांची चमक कमी होऊन केस राट होतात.
  • वाढीच्या वयातील कालवडी, पारडी व गोऱ्हे यांचे पोट ढेबरे होते. वजन वाढ योग्य प्रमाणात होत नाही तर जनावर गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते. दूध उप्तादनात घट येते.
  • उपचार

  • सर्वसाधारणपणे वर्षातून तीन ते चार वेळा जंत निर्मूलनाचा कार्यकम हाती घेणे गरजेचे आहे.
  • बंदिस्त अथवा एकाच जागी असणाऱ्या जनावराकरिता तीन वेळा व चारावयास जाणाऱ्या जनावराकरिता चार वेळा जंत निर्मूलन करणे गरजेचे असते. यापैकी ऋतू बदलावेळी म्हणजे पावसाळ्यापूर्वी पावसाळ्याच्या नंतर हिवाळा संपताना व गरज भासल्यास पावसाळ्याच्या मध्यावर जंत निर्मूलन कार्यक्रम करणे गरजेचे असते.
  • वाढीच्या वासरामध्ये योग्य प्रकारे जंत निर्मूलन कार्यक्रम केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतात. अशा बाबींमध्ये १२ ते १३ महिने वयाची कालवड २५० किलो वजनाची झाल्याची उदाहरणे दिसून आलेली आहेत.
  • जंत निर्मूलनाकरिता अल्बेन्डेझोल, फेनबेन्डेझोल, मेबेन्डेझोल, लीव्होमिसोल, मोरेन्टेल सायटरेट, ऑक्सिक्लोज़ेनाइड, निक्लोज़्यामाइड, आयव्हरमेकटीन ही औषधे वजनानुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वापरली जातात.
  • जंत निर्मूलन करताना घ्यायची काळजी

  • सर्व जनावरांचे एकाच वेळी जंत निर्मूलन करावे.
  • गाभण जनावरांमध्ये अल्बेन्डेझोल हे औषध वापरू नये, योग्य पर्यायी औषध पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावे.
  • औषध योग्य मात्रेतच द्यावे, त्याकरिता वेष्टनावरील सूचना पाळाव्यात.
  • जास्त मात्रा अपायकारक तर कमी मात्रा योग्य परिणामकारक दिसून येत नाही.
  • प्रत्येक वेळी औषध बदलून द्यावे म्हणजे जंतामध्ये औषधी प्रतिरोधकशक्ती विकसित होणार नाही.
  • औषध सकाळी चारा देण्यापूर्वी उपाशी पोटी दिल्यास परिणामकारकता वाढते.
  • जास्त प्रादुर्भाव असल्यास पंधरा दिवसांनी पुन्हा औषध पाजावे.
  • लसीकरण करण्यापूर्वी जंत निर्मूलन केल्यास लसीची परिणामकारकता वाढते.
  • संपर्क ः डॉ. रवींद्रनाथ निमसे, ०२४२६ - २४३३६१ (गो संशोधन व विकास प्रकल्प, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com