पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट 

 नागपूर येथील महात्मा फुले मार्केटमध्ये झालेली मका आवक
नागपूर येथील महात्मा फुले मार्केटमध्ये झालेली मका आवक

सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (मधुमका) व साध्या मक्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. नुकतीच पावसाने अनेक शहरांमधून विश्रांती घेतली असली, तरी या काळात  ग्राहकांकडून स्वीट कॉर्नला मागणी असते. नागपूरची बाजारपेठ महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशासाठीही सोयीची आहे. येथील कळमणा आणि महात्मा फुले बाजारात मधुमका आणि साध्या मक्याची सुमारे एक लाख नगापर्यंत आवक आहे, दरही उत्साहवर्धक आहेत. मध्य प्रदेशातील शिवणी आणि छिंदवाडा भागात मक्याचे क्षेत्र वाढीस लागले असल्याने तेथून अधिक आवक असल्याची बाब विशेष म्हणावी लागेल.    मध्य प्रदेश हे सोयाबीन पिकासाठी देशात प्रसिद्ध असलेले राज्य आहे. सोयाबीनचे मोठे क्षेत्र असल्याने राज्यातील इंदूर येथे सोयाबीन संशोधन संचालनालयाची उभारणीदेखील भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून (आयसीएआर) झाली. अलीकडील काळात मात्र किडी-रोग तसेच अन्य कारणांमुळे या भागातील शेतकरी अर्थकारण उंचावण्यासाठी पर्यायी पिकांकडे वळले. मका आणि भाजीपालासारख्या नगदी पिकांवर हा शोध थांबल्याचे छिंदवाडा येथील मका उत्पादक योगेश पटेल सांगतात.  महाराष्ट्रातील मका पोचतो ऑगस्टनंतर  मध्य प्रदेशसह देशाच्या अन्य भागातील मक्याची आवक जूनअखेरनंतर सुरू होत सप्टेंबरपर्यंत राहते. औरंगाबाद, नाशिक भागातील मका नागपुरात ऑगस्टनंतर पोचतो. या वेळी पाऊसमान कमी झाल्याने खवय्यांकडून तेवढी अपेक्षित मागणी राहत नसल्याचे व्यापारी लतीफ शेख यांनी सांगितले. एक लाख नग अशी दररोजची आवक असलेल्या नागपूरच्या बाजारपेठेत हातोहात मक्‍याची विक्री होते. शेतकऱ्यांना तत्काळ रोखीने पेमेंट केले जाते. मालाची प्रतवारी झाल्यानंतर काही व्यापारी पोत्यात भरून, तर काही ढीग लावून विक्री करतात. नागपूरच्या टन मार्केटमध्ये व्यापार करणारे प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा मध्य प्रदेशातील शिवणी, छपारा भागातूनही आवक होत आहे. साडेचारशे ते साडेसहाशे रुपये प्रति मधुमका पोते, तर साध्या मका कणसाचे ३०० ते ४५० रुपये हेच घाऊक दर आहेत.  ठेल्यांवर कणसांची विक्री  पावसाळ्यात म्हणजेच रिमझिम पडणाऱ्या पावसात भुट्ट्याचा (मक्‍याचा) आस्वाद घेतला जातो. एकट्या नागपूर शहरात ठेल्यांवर मका विक्री करणाऱ्यांची संख्या ७०० पेक्षा अधिक आहे. हातठेल्यावर प्रति नग स्वीटकॉर्न २५ रुपये, तर साधे मक्‍याचे कणीस २० रुपयांना विकले जात आहे. प्रति हातगाडीवरून दररोज सरासरी ७० ते १०० नगांची विक्री होत असल्याचे राजकुमार तिवारी सांगतात. ते घाऊक व्यापारी आहेत. शिवाय, हातगाड्या भाडेतत्त्वावर देत ते शहरात मक्‍याची किरकोळ विक्रीही करतात. मूल्यवर्धनातूनही मक्याला चांगले दर मिळवण्याची संधी विक्रेते सोडत नाहीत. सुमारे साडेचारशे ते साडेसहाशे रुपयांना प्रति १०० नग याप्रमाणे हंगामात मक्‍याला दर राहतो. हातठेल्यावर विक्री करताना खवय्यांना तो भाजून द्यावा लागतो. त्यासाठी कोळसा, लिंबू, बटर, कोथिंबीर, पुदीना, मिरची, आले असे चव वाढवणारे घटक वापरले जातात. त्यामुळे मक्‍याची किंमत वाढते. ग्राहकांकडून अशाच मक्याला  अधिक मागणी राहते.  मका उत्पादकांचे अनुभव  मध्य प्रदेशातील शिवणी ते नागपूर हे अंतर सुमारे १६० किलोमीटर आहे. यासह छिंदवाडा परिसरात मका क्षेत्र वाढीस लागले आहे. शिवणी येथील रामसिंग चंद्रवंशी यांची २५ एकर शेती आहे. सुमारे २० वर्षांपासून त्यांचे या पिकात सातत्य आहे. एप्रिल महिन्यात लावलेले हे पीक जूनमध्ये काढणीस येते. एकरी सरासरी २० हजार रुपये उत्पादन खर्च होतो. शिवणी येथीलच सूर्यभान चंद्रवंशीदेखील तब्बल २५ एकरांत मका घेतात. हे पीक या भागातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा ठरत असल्याचे त्यांनी आत्मविश्‍वासाने सांगितले.  आश्‍वासक उत्पन्न देणारे पीक  मॉन्सून चांगला राहिला तर हे पीक फायदेशीर राहते, असे कुंडाली (ता. छिंदवाडा, मध्य प्रदेश) येथील युवा शेतकरी योगेश पटेल सांगतात. एकरी सरासरी ६० पोत्यांचे उत्पादन मिळते. (प्रतिपोत्यात १०० याप्रमाणे सहा हजार नग). ते पंधरा एकरांत मका घेतात. दररोज सरासरी सहा ते आठ हजार नग माल ते नागपूरच्या बाजारात पोचवितात. नागपूर ते छिंदवाडा हे अंतर १२५ किलोमीटर आहे. आठ हजार पोते वाहतूक करणाऱ्या छोट्या वाहनासाठी सहा हजार रुपये, तर मोठ्या ट्रकची क्षमता १५ ते २० हजार पोते एवढी असल्याने १० हजार रुपये भाडेशुल्क आकारले जाते. यावर्षीच्या हंगामात मधुमक्‍याला ८ रुपये प्रतिनग दर मिळाला, तो काहीसा दिलासादायक असल्याचे योगेश म्हणाले. बाजारात शंभर रुपयांमागे आठ रुपये कमिशन आकारण्यात येते. नागपूरच्या बाजारात विविध टप्प्यांवर शुल्क आकारणी होते. सर्व खर्च वजा जाता एकरी २० ते २५ हजार रुपयांचे उत्पन्न हे पीक देऊन जाते असा योगेश यांचा अनुभव आहे.  वाहतुकीवेळी त्रास  योगेश यांचे वडील अशोक यांचेही मका लागवडीत सातत्य होते. छिंदवाडा ते नागपूर मका किंवा अन्य शेतमाल वाहतूक करतेवेळी पोलिसांचा मोठा त्रास होतो. प्रवेश शुल्क द्यावे लागते. हा प्रकार अन्यायकारक असल्याची खंत योगेश यांनी व्यक्त केली. छिंदवाडा परिसरात सुमारे एक हजार एकरांपर्यंत मका लागवड असावी, असा अंदाज योगेश यांनी व्यक्त केला.  नागपूर कळमणा व महात्मा फुले भाजीबाजार (कॉटन मार्केट) 

  • व्यापारी, मध्यस्थ संख्या - ५० 
  • दररोज मका कणीस आवक - एक लाखापर्यंत 
  • स्थानिकांसह चंद्रपूर, बल्लारशाह, उमरेड, भंडारा व राज्याच्या अन्य भागाला पुरवठा. 
  • दर - (प्रतिनग) साधे मका कणीस - ४ ते ६ रुपये 
  • मधुमका - ७ ते १० रु. 
  •    संपर्क - योगेश पटेल - ०९४२४९६१७००  छिंदवाडा, मध्य प्रदेश   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com