रोहड्याच्या शेतकऱ्यांनी कमावले कापूस बिजोत्पादनात नाव

रोहडा- रोजगार देणारे गाव कुंभारी, मारवाडी, हनवतखेडा, सत्तरमाळ, बेलोरा या गावांतील मजुरांना रोहडा गावातील बिजोत्पादनामुळे रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. गावात भाजीपाला लागवडही असून पुसद, अमरावती, चंद्रपूर, उमरखेड, यवतमाळ या शहरांना येथूनच भाजीपाला पुरवठा होतो.
 रोहडा गावातील कपाशीचे बिजोत्पादन क्षेत्र.
रोहडा गावातील कपाशीचे बिजोत्पादन क्षेत्र.

यवतमाळ जिल्ह्यातील रोहडा गाव कापूस बिजोत्पादनासाठी अनेक वर्षांपासून अोळखले जाते. इथल्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावात सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र बिजोत्पादनाचे असावे. पारंपरिक पिकांच्या तुलनेत या पिकाचे अर्थकारण त्यांना किफायतशीर वाटते. बिजोत्पादनासोबतच जलसंधारण व अन्य विकासात्मक कामेही प्रगतिपथावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यात पुसदपासून सुमारे २९ किलोमीटरवर असलेल्या माळपठारावरील रोहडा गावाची लोकसंख्या तीन हजारांवर असल्याचे सरपंच संजय डोईफोडे सांगतात. संरक्षित सिंचनाचे पर्याय नसल्याने गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवरच भर दिला आहे. त्याचबरोबर कापूस बिजोत्पादनातही अनेक वर्षांपासून इथल्या शेतकऱ्यांनी वेगळी अोळख तयार केली आहे. बिजोत्पादकांचे गाव सन १९८४-८५ च्या दरम्यान एका बियाणे क्षेत्रातील कंपनीद्वारे कापूस बिजोत्पादनाला प्रोत्साहन दिले गेले. पारंपरिक शेतीच्या तुलनेत बिजोत्पादन कसे फायदेशीर आहे, त्याला प्रति क्‍विंटल जादा दर मिळण्याची संधी कशी आहे हे पटवून देण्यात आले. शेतकऱ्यांनीही मग या पद्धतीचा अभ्यास केला. त्यासाठी सकारात्मकता दर्शविली. त्याचे प्रयोग सुरू झाले. हळूहळू क्षेत्र विस्तारले. आता गावशिवारातील कापूस बिजोत्पादन क्षेत्र सुमारे एक हजार हेक्‍टरपर्यंत पोचले असावे अशी शक्यता रोहडाचे सरपंच संजय डोईफोडे व काही अनुभवी शेतकरी व्यक्त करतात. सन १९९० नंतर कंपन्यांची संख्या गावाकडे वळू लागली. शेतकरीही बिजोत्पादनात तांत्रिकदृष्ट्या पारंगत झाल्याने त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी कंपन्यांना विशेष कष्ट घ्यावे लागले नाहीत. याच गावाच्या अनुकरणातून सत्तरमाळ, बेलोरा, मारवाडी या लगतच्या गावांतील शेतकरीही बिजोत्पादनासाठी प्रोत्साहित झाले. या गावांसाठी ही नव्या परिवर्तनाची जणू नांदीच ठरली. बिजोत्पादनातील शेतकऱ्यांचे अनुभव पारंपरिक पिकांपेक्षा परवडते खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून आपल्या कापूस वाणाचे बिजोत्पादन करून घेतात. गावातील मोहन वानखेडे म्हणाले की, पंधरा वर्षांपासून मी या शेतीत आहे. साधारण एक एकरच क्षेत्र त्यासाठी राखीव ठेवतो. साडेतीनशे ग्रॅम वजनाचे बियाणे पाकीट असते. त्यासाठी १७०० रुपये मोजावे लागतात. एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. प्रति क्विंटल १६ हजार ते १७ हजार रुपये दर बिजोत्पादनासाठी मिळतो. हाच कापूस जर बाजारात थेट विकला तर क्विंटलला ४००० रुपयांपर्यंत दर मिळतो. बिजोत्पादनाचा खर्चही जास्त असतो. कौशल्याने पीक व्यवस्थापन ठेवावे लागते. एकरी एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती येते. मात्र सर्वात मोठी समस्या म्हणजे कंपनीकडून पेमेंट मिळायला किमान १४ महिने तरी लागतात. काही वेळा निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दर कंपनी देते. असे असले तरी पारंपरिक पिकांच्या तुलनेत हे बिजोत्पादन परवडते असेही वानखेडे यांनी सांगितले. आत्महत्या थांबल्या यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखला जातो. रोहडा गावात बिजोत्पादनाच्या बळावर आर्थिक शाश्वतता आली असली तरी दहा वर्षांपूर्वी गावात एका आत्महत्येची नोंद झाली. त्यानंतर मात्र अशी एकही नोंद झाली नसस्याचे सरपंच संजय डोईफोडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, माझी ४५ एकर एकत्रित शेती आहे. साधारण दोन एकरांत कापूस बिजोत्पादन घेतो. सध्या माझे क्षेत्र मी बटईने करावयास दिले आहे. एकरी आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. मात्र क्विंटलला मिळणारा १६ हजार ते १८ हजार रुपये दर बिजोत्पादनात सर्वात महत्त्वाचा ठरतो. बिजोत्पादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बियाण्यांची शुद्धता तपासण्याकरीता ५०० ग्रॅम बियाण्याचे नमुने संबंधित बियाणे कंपनीद्वारे घेतले जातात. काही बियाणे कृषी विभागाकडे चाचणीसाठी तर काही कंपनीकडे ठेवले जाते. कंपनीला वितरकांकडून पैशाचा पुरवठा झाल्यानंतर सरासरी 1१४ महिन्यांनंतर शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे चुकारे दिले जातात. गावातील रमेश कानडे यांनी दोन एकरांवर बिजोत्पादन केले आहे. एकरी उत्पादन खर्च हा किमान ४० हजार रुपये वा त्यातून अधिक होऊ शकतो. मात्र पारंपरिक पिकांच्या तुलनेत हे पीक परवडते, असे त्यांनी सांगितले. गावात झाली २८ शेततळी संरक्षित पाण्याविषयी व्यापक जागृती करण्यात आल्यानंतर शेततळ्यांचे महत्त्व ग्रामस्थांना पटले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीही ग्रामस्थांना त्यासाठी प्रोत्साहित केले. परिणामी आधी एकही शेततळे नसलेल्या या गावात टप्प्याटप्प्याने तब्बल २८ शेततळी पूर्णत्वास गेली. यंदाच्या पावसाळ्यात भरलेल्या या शेततळ्यांमध्ये मत्स्यव्यवसाय करण्याची इच्छा अनेक शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली. त्यातून पूरक व्यवसायाचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. विहिरीच्या पाण्याची पातळी वाढीस लागली आहे. संपर्क- मोहन वानखेडे- ९७६७६६८२४३ संजय डोईफोडे- ९८५०७००००९  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com