खेकडापालन करा, घरबसल्या उत्पन्न कमवा

वारे कुटूंब व त्यांनी केलेले खेकडापालन
वारे कुटूंब व त्यांनी केलेले खेकडापालन

गोड्या पाण्यातील खेकडापालनाचा यशस्वी व्यवसाय तीनशे रुपये किलोने हातोहात विक्री पुणे जिल्ह्यात ओतूर-मेंगाळवाडी येथील शांताराम व सतीश या वारे बंधूंनी बाजारपेठेचा अभ्यास, मागणी ओळखून, ज्ञान घेऊन खेकडापालन सुरू केले आहे. पूरक व्यवसायातील वेगळा मार्ग सुशिक्षित बेरोजगार किंवा शेतकऱ्यांना दाखवला आहे. गोड्या पाण्यात खेकड्यांचे संगोपन करून उत्कृष्ट व्यवस्थापन साधले आहे. तीनशे रुपये प्रति किलो दराने त्यांचा खेकडा हातोहात खपतो. विशेष म्हणजे जागेवरच ग्राहक मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळी, कोंबडीपालन हे व्यवसाय प्रचलित आहेत. मात्र या व्यवसायांमध्ये गुंतवणूक व कष्टही जास्त आहेत. मिळणारा नफा त्या प्रमाणात कमी व स्पर्धा मोठी अशी स्थिती आहे. त्या तुलनेत खेकडापालन हा एक हुकमी, आश्‍वासक पूरक व्यवसाय होऊ शकतो. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील ओतूरपासून अडीच किलोमीटर अंतरावरील मेंगाळवाडी येथील शांताराम व सतीश या वारे बंधूंनी हे आपल्या प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. व्यवसायाची संधी ओळखली वारे यांची केवळ दीड एकर शेती आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी ते सक्षम पर्याय शोधत होते. बाजारपेठांची पाहाणी करून खेकड्याला अधिक मागणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्थानिक नागीक, खवय्ये, रुग्णांकडून खेकड्याला पसंती देण्यात येते. मात्र खेकडा बाजारात फारसा उपलब्ध होत नाही. काही वेळा ग्राहकांना सर्वत्र फिरूनही ते वेळेवर मिळत नाहीत. हीच आपल्यासाठी संधी असल्याचे वारे यांनी जाणले. अखेर चाकोरीच्या बाहेर जाऊन हा प्रयोग करून पाहायचे त्यांनी ठरवले. अभ्यासातून प्रयोग सुरू वारे यांनी इंटरनेट तसेच अन्य स्रोतांमधून खेकडापालनाची तसेच मासळी बाजारपेठेत जाऊन बाजारपेठ, दर यांची माहिती घेतली. वारे यांना गोड्या पाण्यातील खेकडापालनाविषयी फार कमी माहिती उपलब्ध झाली. मग त्यांनी आपल्या घराजवळच कल्पकतेने २० बाय १५ फूट लांबी-रुंदीची व चार फूट खोलीची टाकी बनवली. त्याच्या बाजूस १५ बाय सहा फूट आकाराची दुसरी छोटी टाकी बनवली. या छोट्या टाकीत पूर्ण पाणी भरून ठेवले जाते. तर मुख्य टाकीत अर्धा फूट पाणी सोडून त्यात खेकडे पालन केले जाते. कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन नसल्याने वारे यांनी फक्त स्वतःच्या अनुभवावर मुख्य टाकीत तळाला माती आणि वाळू थोड्या प्रमाणात टाकली. खेकड्यांना आसऱ्याची जागा म्हणून फुलदाणीच्या वीस ते पंचवीस कुंड्या तसेच पाण्यात वाढणाऱ्या गवताचे मोठे गठ्ठेही ठेवले. खेकड्यांचे बीज व पैदास पिंपळगाव जोगा धरणातून पिंजऱ्यात खेकडे पकडणाऱ्या व्यक्तींकडून छोटे खेकडे व पिले विकत घेण्यात येतात. ती टाकीत सोडून त्यांचे संगोपन केले जाते. एक मादी सुमारे पाचशे ते एक हजार पिले देते. त्यामुळे खेकड्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. सर्वसाधारण वर्षभरानंतर खेकडा विक्रीयोग्य होतो. प्रति खेकड्याचे वजन २०० ग्रॅमपर्यंत असते. साधारण चार ते पाच खेकड्यांचे वजन एक किलोच्या आसपास भरते. नेटके व्यवस्थापन खेकडे ठेवलेल्या टाकीतील पाणी साधारण पंधरा दिवसांतून एकदा बदलावे लागते. त्यासाठी छोट्या टाकीतून पाणी घेण्याची व्यवस्था केली आहे. खेकड्यांना अन्न म्हणून काही प्रमाणात सुकट दिली जाते. घरातील शिल्लक राहिलेले अन्न वा भात यांचाही वापर होतो. खेकड्याना अन्न अत्यल्प लागते. त्यामुळे त्यावरील खर्च नाममात्र होतो. खेकडे टाकीच्या वरती येऊ नयेत म्हणून टाईल्सची व्यवस्था केली आहे. मार्केटिंग व विक्री वारे यांनी आपल्याकडील खेकड्यांचे मार्केटिंग व्हॉटसॲप ग्रुपद्वारे करण्यास सुरुवात केली. त्यानुसार ग्राहकांकडून चौकशी होऊ लागली. आज तीनशे रुपये प्रति किलो दराप्रमाणे जिवंत खेकड्याची विक्री केली जात आहे. पूर्वी दिवसाला १० किलोपर्यंत खप व्हायचा. आता हीच संख्या ३० ते ३५ किलोपर्यंत पोचली आहे. बाजारात नेऊन विक्री करण्याची गरज भासत नसून ग्राहक स्वतः संपर्क करून घरूनच खेकडे विकत घेऊन जातात. गेल्या तीन वर्षांच्या अनुभव काळात वारे यांनी व्यवसायात चांगला जम बसविला आहे. या व्यवसायात सुमारे ५० ते ६० टक्के नफा होत असल्याचे त्यांनी सांगितले. खेकडा भाजीनिर्मितीतूनही उत्पन्न वाढले वारे म्हणाले की सूप, सॅलड, स्टार्ट्स आणि भाजी आदी वेगवेगळ्या प्रकारांतून आपण खेकडेे खाऊ शकतो. त्यांच्यामध्ये विविध प्रकारची खनिजद्रव्ये, प्रथिने आहेत. विविध विकारांवर त्यांचा उपयोग होऊ शकतो. आता आम्ही खेकडा व रस्साभाजीदेखील बनवून देऊ लागलो आहोत. ग्राहकांकडून त्यास चांगली मागणी आहे. पाचशे रुपये प्रति किलो खेकडा भाजी डिश असा दर ठेवला आहे. एकतर ही भाजी तयार करणेही वेळखाऊ व गुंतागुंतीचे आहे. याची रेसीपीदेखील कमी जणांना माहित आहे. त्यामुळे या मूल्यवर्धनातून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी असल्याचे वारे म्हणाले. रानभाजी महोत्सवातून हातोहात विक्री वारे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी नाणेघाट परिसरात रानभाजी महोत्सव आयोजित केला होता. त्या वेळी महिला बचत गटाला खेकडे पुरवले होते. त्या वेळी अडीच तासांत दीडशे रुपये प्रति प्लेट दराने भाजी हातोहात खपली. दहा किलो खेकड्यांची विक्री झाली. श्रम व जागा कमी, उत्पन्न चांगले खेकडे पालनासाठी अन्य जोडव्यवसायांपेक्षा श्रम, जागा व खर्च कमी येतो. तुलनेने उत्पन्न जास्त मिळते. छोटे खेकडे खरेदी, किरकोळ खर्च वगळता कोणताच मोठा खर्च होत नाही. देखभालही फार नाही, असे वारे सांगतात. संपर्क-  शांताराम वारे - ९८९००७८९९३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com