पाण्याचे महत्त्व ओळखूनच सुधारले पीक व्यवस्थापन 

-केळीत कलिंगडाचे पीक. उन्हाळ्यात नैसर्गिक आच्छादन व बाष्पीभवन रोखण्यासाठी त्याचा फायदा होतो.
-केळीत कलिंगडाचे पीक. उन्हाळ्यात नैसर्गिक आच्छादन व बाष्पीभवन रोखण्यासाठी त्याचा फायदा होतो.

सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उभे ठाकलेले संकट व बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन माचला (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक पाटील यांनी पीकपद्धतीची रचना केली आहे. केळी, त्यातील आंतरपीक पद्धती, हंगाम कालावधी, पीक अवशेषांचा वापर, असे मुद्दे त्यांनी नियोजनात केंद्रस्थानी ठेवले. त्यामुळेच दुष्काळातही शेती किफायतशीर करणे शक्य झाले आहे.    जळगाव जिल्ह्यात माचला (ता. चोपडा) परिसरात काळी कसदार जमीन आहे. पाण्याचे फारसे संकट या भागात पूर्वी नव्हते. शिवाराला गूळ नदीचा आधार आहे. परंतु, पाऊसमान घटत चालले तसा या भागातील शेतीवर परिणाम होऊ लागला. पाऊसमानाचा लहरीपणा लक्षात घेऊन गावातील दीपक पाटील यांनीही पीक व्यवस्थापनात बदल सुरू केले. काका भाईदास व चुलतबंधू सतीश यांची मदत त्यांना मिळते. त्यांची संयुक्त २३ एकर शेती आहे. दोन सालगडी, पाच कूपनलिका आहेत. दोन वर्षांपासून पाणीपातळी १५० फुटांवरून ३०० फुटांपर्यंत खोल गेली आहे. दहा एकर शेती हिश्‍याने कसण्यात येते. एक ट्रॅक्‍टर, एक बैलजोडी, दोन म्हशी, दोन गायी, वासरू असे दहापर्यंत पशुधन आहे. गोठा व्यवस्थापन चुलतबंधू सतीश पाहतात.  पीक व्यवस्थापन  केळी व कापूस ही दीपक यांची प्रमुख पिके. लागवड सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये असताना केळीला एप्रिल, मेमध्ये प्रतिदिन सुमारे १८ लिटर प्रतिझाड पाणी द्यावे लागायचे. या काळात अतिउष्णतेमुळे घड सटकणे, झाडे मोडून पडायची. पाऊसमान कमी झाल्याने पाणीबचतही महत्त्वाची होती. अलिकडे दरवर्षी सात ते आठ एकर लागवड फेब्रुवारीत होते.  आंतरपीक पद्धतीचा फायदा  आंतरपीक पद्धतीतून एकाच क्षेत्रात दुहेरी उत्पादन मिळते. केळीला नैसर्गिक आच्छादन मिळते. केळीला प्रतिझाड प्रतिदिन सात-आठ लिटर पाणी एप्रिल, मेमध्ये दिले जाते. वाफसा कायम राहतो. उष्ण वाऱ्यात पश्‍चिमेकडे झाडे मोडून पडण्याची समस्या नाहीशी होते. ही केळी पावसाळ्यात निसवते. त्यामुळे घडही जोमात पक्व होऊन किमान ९५ टक्के काढणी होऊ शकते. मागील वर्षी कलिंगडास जागेवर किलोला सात रुपये, तर या हंगामात साडेसात रुपये दर मिळाला. वेलींच्या अवशेषांचेही आच्छादन केले जाते. त्यातून जमिनीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब टिकविण्यात येतो. कलिंगडाचे एकरी २० टन उत्पादन मिळते.  टिंडाचे आंतरपीक  यंदा दोन एकर केळीत टिंडाचे आंतरपीक घेतले. फेब्रुवारीत घरीच रोपे तयार करून मार्चमध्ये लागवड केली. दररोज पाच क्विंटल उत्पादन मिळाले. विक्री जळगाव बाजार समितीत सरासरी २० रुपये प्रतिकिलो दराने केली. या बागेलाही नैसर्गिक आच्छादन मिळाल्याने एप्रिल, मेमध्ये प्रतिदिन सात लिटर पाणी पुरेसे ठरले.  कांद्याचेही उत्पादन  दोन एकरांत केळीत कांद्याचे आंतरपीक घेण्याचा प्रयोग केला आहे. डिसेंबरमध्ये प्रथमच पाच फूट उंच गादीवाफ्यावर कांद्याची लागवड होते. या वाफ्यांनजीकच्या खोल सरीत फेब्रुवारीत केळी लागवड होते. केळी लागवडीनंतर महिनाभरात कांद्याची काढणी सुरू होते. या क्षेत्रात कांद्याचे एकरी १५ ते १८ टनांपर्यंत उत्पादन दीपक यांनी साध्य केले आहे. कांद्यास मागील वर्षी १० रुपये, तर यंदा साडेसात रुपये प्रतिकिलो दर मिळाला.  व्यवस्थापन वैशिष्ट्ये

  • मृग बहार केळीची लागवड पाऊस पडल्यानंतर किंवा जुलैमध्ये. पावसामुळे सिंचनाची गरज नसते. कंद जोमात अंकुरतात. 
  • चार ते पाच एकरांतील मृग बहार केळीमध्ये पीलबाग (खोडवा). या बागेला खर्च कमी होतो. कमी पाण्यात फुटव्यांची चांगली वाढ होते. कारण, फुटव्यांनजीक काढणी झालेल्या केळी खांबांची सावली असते. 
  • साधारण ४५ अंश तापमानात या केळीला प्रतिदिन चार ते साडेचार लिटर पाणीही पुरेसे असते. साधारण २० महिन्यांत एकाच क्षेत्रात केळीचे दोन हंगाम (खोडव्यासह) साध्य केले जातात. फेब्रुवारीत लागवडीच्या व मृगबाग केळीची २२ किलोपर्यंतची रास घेतात. 
  • सन २०१७ मध्ये ठिबक, प्लॅस्टिक मल्चिंगवर भुईमूग. त्याची लागवड डिसेंबरमध्ये केली. 
  • मल्चिंगमुळे पाण्याच्या सहा पाळ्यांत उत्पादन. एरवी आठ ते नऊ वेळेस पाटपद्धतीने पाणी द्यावे लागते. 
  • सन २०१७ मध्ये ९० गुंठ्यांत मार्चमध्ये पपई. त्यात तुरीचे आंतरपीक. पपईचे ४० टन, तर तुरीचे १५ क्विंटल उत्पादन. पपईला जागेवर प्रतिकिलो साडेचार रुपये दर. 
  • तुरीचे अवशेष, पालापाचोळा शेतातच राहिल्याने पपईला प्रतिदिन प्रतिझाड केवळ सहा ते सात लिटर पाणी उन्हाळ्यात लागले. 
  • पूर्वहंगामी कापसाची काळ्या कसदार जमिनीत १२ ते १४ एकर लागवड. कमी पाण्यात तग धरणाऱ्या देशी वाणांना प्राधान्य, तर १० एकरांत बीटी वाणांची लागवड. 
  • लागवडीसाठी तीन टप्पे. पहिला २५ मेपासून. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लागवड पावसाळा सुरू होण्याचा अंदाज घेऊन १० ते १२ दिवसांपूर्वी. यामुळे पाणी नियोजन संतुलित. 
  • संपर्क- दीपक पाटील- ९७६४९५६०६२, ७०२०६०३७९८  .

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com