उत्तम प्रतिच्या हिरव्या चाऱ्यासाठी चवळी उपयुक्त

चवळीचा हिरवा चारा रूचकर व पौष्टिक असतो
चवळीचा हिरवा चारा रूचकर व पौष्टिक असतो

चवळी पिकापासून उत्तम प्रतिचा हिरवा चारा मिळवता येतो. चवळीचा हिरवा चारा रूचकर व पौष्टिक असतो. त्यामुळे जमीन, हवामान व पाण्याच्या उपलब्धतेनुसार वाणांची निवड करून चवळीची पेरणी करावी.   चवळी हे द्विदलवर्गीय हिरवा चाऱ्याचे पीक असून पिकाचे शास्त्रीय नाव ‘व्हीगना सिनॅनसिस’ (Vigna Sinensis) असे आहे. हे पीक उन्हाळी अथवा पावसाळी हंगामात घेतले जाते. चवळी पिकाला उबदार व दमट हवामान मानवते. पेरणी उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात करावी तर खरीप हंगामात जून ते ऑगस्ट महिन्यात पाऊस सुरू होताच करावी. कमी पावसातदेखील हे पीक चांगले येते. परंतु हिवाळी हंगामातील थंड हवामानामुळे पिकाची जोमदार वाढ होत नाही. पिकाच्या वाढीसाठी २१ ते ३७ अंश सेल्सिअस तापमान पोषक ठरते. चवळी पिक द्विदलवर्गीय असल्यामुळे पिकाच्या मुळावरील ‘रायझोबियम’ जिवाणूंच्या गाठी हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीत साठवतात यामुळे जमिनीचा पोत व सुपीकता सुधारते.

या जिवाणूंच्या गाठींचे नत्र स्थिरीकरणाचे प्रमाण हेक्टरी २५ ते ३० किलोपर्यंत असते. दुभत्या जनावरांच्या समतोल आहाराच्या दृष्टीने एकदल आणि द्विदल चाऱ्याचे प्रमाण निम्मे-निम्मे म्हणजे एकूण २५ किलो हिरव्या चाऱ्यात १२ ते १३ किलो एकदल वर्गीय हिरवा चारा उदा.- संकरित नेपियर, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी तर १२ ते १३ किलो द्विदल वर्गीय हिरवा चारा उदा. चवळी, लसूणघास, बरसीम, स्टायलो इत्यादी यांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. एकदल चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाण कमी असते मात्र शर्करा व काष्ठ जास्त असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते. व्दिदल चाऱ्यात प्रथिने, कॅल्शियम, स्निग्ध व इतर खनिजे जास्त प्रमाणात असतात तर शर्करा व काष्ठ पदार्थ कमी असतात. या दोन्ही प्रकारच्या चाऱ्याबरोबर कोरडा चारा म्हणजेच कडबा, भूसा यांचा समावेश असावा. पूर्ण वाढलेल्या एका दुभत्या जनावरास वर्षभर एकदल व द्विदल हिरवा चारा दिवसाला २५ किलो पुरविण्यासाठी एकूण ९ ते १० गुंठे क्षेत्र तर ५ ते ६ किलो कोरडा चारा पुरविण्यासाठी ८ ते ९ गुंठे क्षेत्र लागते. पूर्वमशागत व जमिनीची निवड पेरणीपूर्वी जमिनीची नांगरणी करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. हेक्टरी ५ टन कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत मिसळावे. चवळी पिकाच्या उत्तम वाढीकरिता मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असणे गरजेचे असते. खतांचा योग्य वापर केल्यास हलक्या जमिनीतही पिकाची वाढ समाधानकारक होते. सुधारित वाण व पेरणी चवळी पिकाच्या सुधारित वाणांमध्ये श्वेता, यु.पी.सी.९२०२, यू.पी.सी. ५२८६, बुंदेल लोबिया -१ व ईसी ४२१६ या वाणांचा समावेश होतो. जमीन, हवामान व पाण्याच्या उपलब्धतेनुसार वाणांची निवड करुन पेरणी करावी. पेरणी दोन ओळीत ३० सें.मी. अंतर सोडून पाभरीने करावी, त्यामुळे आंतरमशागत करणे सोईस्कर होते. चवळी चारा पिकाच्या सुधारित वाणांमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय चारा पिके संशोधन प्रकल्पाने ‘श्वेता’ या वाणाची शिफारस राज्यस्तरावर केलेली आहे. श्वेता या सुधारित वाणास भरपूर हिरवी रूंद पाने असून पानांची हिरव्या चाऱ्याची प्रत फूलधारणेपासून शेंगा पक्व होईपर्यंत टिकून राहते. श्वेता या वाणापासून उत्तम प्रतिचा हिरवा चारा मिळवता येतो. बियाणे व प्रक्रिया पेरणीकरिता हेक्टरी ४० - ४५ किलो भेसळ विरहीत न फुटलेले, टपोरे व शुध्द बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ‘रायझोबियम’ चोळावे. खत व्यवस्थापन बियाणे पेरणीपूर्वी हेक्टरी २० किलो नत्र (४३ किलो युरिया) व ४० किलो स्फुरद (२५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) यांचे मिश्रण करून द्यावे. पाणी व्यवस्थापन चवळी बियाणे पेरणीनंतर लगेच एक पाणी द्यावे. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी दुसरे आंबवणीचे पाणी दयावे. उन्हाळी हंगामात ७ ते ९ तर खरीप हंगामात १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आंतर मशागत पिकांच्या दोन ओळींमधील जमीन हातकोळप्याने कोळपून घ्यावी. बियाणे पेरणीनंतर २१ - २५ दिवसांनी एक खुरपणी करून पीक तणविरहीत ठेवावे. चवळीचे वेल उंच व दाट वाढत असल्याने पीक वाढीच्या काळात जमीन झाकली जाऊन तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. आंतरपिके पेरणी करताना एकदल पिकाच्या दोन ओळीनंतर एक किंवा दोन ओळी चवळी पिकाची पेरणी करावी. म्हणजेच पेरणीचे प्रमाण २:१ किंवा २:२ घेतल्याने एकदल व द्विदल वर्गीय चारा एकाच वेळी मिळवता येतो. चवळी हे द्विदल वर्गीय चारा पीक प्रामुख्याने मका, ज्वारी व बाजरी या एकदल चारा पिकांमध्ये आंतरपिक म्हणून घेता येते. कापणी चवळी पिकाची कापणी पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी पीक ५० टक्के फुलोऱ्यात असतांना केल्यास सकस हिरव्या चाऱ्याचे भरपूर उत्पादन मिळते. उत्पादन सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन प्रति हेक्टरी २५० ते ३२० क्विंटल मिळते. चवळी पिकांचे बीजोत्पादन घ्यावयाचे असल्यास वाणांपरत्वे पेरणीपासून १०० ते १२० दिवसांचा कालावधी लागतो. संपर्क ः तुषार राजेंद्र भोसले,  ८८३०११७६९१ (पशू संवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com