वैशाखी मूग लागवडीसाठी सुधारित जाती

उन्हाळ्यातील स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामान वैशाखी मुगासाठी फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यातील स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामान वैशाखी मुगासाठी फायदेशीर ठरते.

बाजारातील मुगाची मागणी व दर पाहता खरिपासोबत वैशाखी मुगाची लागवड फायदेशीर ठरते. मुगाची लागवड मुख्य व आंतरपीक म्हणून करण्यात येते. सुधारित लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास निश्चित उत्पादनात फायदा दिसून येईल.   उन्हाळ्यातील स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम आहे. या काळात मुगाचे चांगले उत्पादन मिळू शकते. साधारणपणे मुगाचा कालावधी ६० ते ६५ दिवसांचा असून, कमी कालावधीच्या या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. जमिनीची निवड ः मूग पिकाला मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. क्षारयुक्त, पाणथळ तसेच उतारावरील हलक्या जमिनीवर मुगाची लागवड करू नये. पूर्वमशागत ः या पिकाला जास्त मशागतीची आवश्यकता लागत नाही. रब्बी पिकाची काढणी झाल्यानंतर एक हलकी नांगरट व वखराच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. तिफनीने किंवा पाभरीने पेरणी करावी. वाणांची निवड :

वाण कालावधी (दिवस) उत्पन्न (क्वि/हे.) प्रमुख वैशिष्टे
पुसा वैशाखी ६० ते ६५ ७ - ८ उन्हाळी हंगामासाठी योग्य
पीकेव्ही ग्रीनगोल्ड (ऐकेएम ९९११) ६५ ते ७० १०-१२ मध्यम जाड दाणे,भुरी रोगास प्रतिकारक्षम
ऐ.के.एम ८८०२ ६० ते ६५ १० -११ लवकर व एकाच वेळी परिपक्व होणारा भुरी रोगास प्रतिकारक्षम
कोपरगाव ६० ते ६५ ८ - १० टपोरे हिरवे चमकदार दाणे
एस-८ ६० ते ६५ ९ - १० हिरवे चमकदार दाणे , खरीप व रब्बी हंगामासाठी योग्य
फुले एम-२ ६० ते ६५ ११ - १२ मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी
बी.एम-४ ६० ते ६५ १० - १२ मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी
बीएम २००३-०२ ६५ ते ७० १० - १२ मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी
बीएम २००२-०१ ६५ ते ७० १० - १२ मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी

बीजप्रक्रिया बी पेरणीपूर्वी बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी बियाण्यास शिफारशीप्रमाणे बुरशीनाशकाची  बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबिअम व स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाण्यास चोळावे. पेरणी वैशाखी मुगाची पेरणी १५ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान करावी. दोन ओळीतील अंतर ३० से.मी. व दोन रोपातील अंतर १० सें.मी. असावे. प्रतिहेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. खत व्यवस्थापन मुगासाठी शेवटच्या वखरणी अगोदर ६ ते ८ टन प्रतिहेक्टरी शेणखत किंवा कंपोस्ट द्यावे. पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद प्रतिहेक्टरी द्यावे. आंतरमशागत व तण नियंत्रण हे पीक कमी कालावधीचे आहे. उभ्या पिकामध्ये वेळीच आंतर मशागत करणे गरजेचे आहे. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी वा एक खुरपणी करून घ्यावी. गरज भासल्यास परत एक निंदण करावे. आंतरमशागतीसोबतच तणाचे नियंत्रण होण्यास मदत होते. पाणी व्यवस्थापन उन्हाळी मुगासाठी पेरणीनंतर ३ ते ४ दिवसांनी एक हलके पाणी द्यावे. त्यानंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या एकूण ४ ते ५ पाळ्या द्याव्यात. पीक फुलावर येण्याच्या वेळी तसेच दाणे भरण्याच्या वेळी पाणी देणे आवश्यक असते. फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडला तर उत्पादनात मोठी घट येते. जेव्हा फक्त एकच पाणी उपलब्ध असेल. त्या वेळी मात्र मुगास पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी पाणी द्यावे. डॉ. हनुमान गरुड, ७५८८६७७५८३ (विषय विशेषज्ञ - कृषिविद्या, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com