सकस, हिरव्या चाऱ्यासाठी बाजरी फायदेशीर

बाजरी हे जलद वाढणारे पीक असल्यामुळे अल्पकाळात भरपूर हिरवा चारा मिळतो
बाजरी हे जलद वाढणारे पीक असल्यामुळे अल्पकाळात भरपूर हिरवा चारा मिळतो

हिरव्या चाऱ्यासाठी बाजरी उन्हाळी व खरीप हंगामात पेरावी. चाऱ्यासाठी बाजरीचे पीक चवळीबरोबर आंतरपीक (२:२) म्हणूनही घेतले जाते. बाजरीपासून हिरवा चारा, वाळलेली वैरण अथवा मूरघासदेखील तयार करता येतो.   बाजरी हे उंच वाढणारे तृणधान्य वर्गातील महत्त्वाचे चारा पीक आहे. बाजरीच्या एका रोपास सरासरी ४ ते ५ कार्यक्षम फुटवे (ज्यांना कणसे येतात) आणि ३ ते ५ अकार्यक्षम फुटवे (ज्यांना कणसे येत नाहीत असे) असतात. पहिल्या कापणीनंतर विशेषतः खरीप हंगामात ओलिताची सोय असल्यास दोन ते तीन खोडवे सहज घेता येतात. बियाणे व पेरणी हिरव्या चाऱ्यासाठी बाजरी उन्हाळी व खरीप हंगामात पेरावी. उन्हाळी हंगामातील पेरणी फेब्रुवारी-मार्च आणि खरीप हंगामातील पेरणी जून ते जुलै महिन्यात करावी. हिरव्या चाऱ्यासाठी हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे वापरून पेरणी पाभरीने २५ ते ३० सें.मी. अंतरावर करावी. जमीन व हवामान बाजरीस उबदार ते उष्ण हवामान चांगले मानवते. बाजरीचे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. तथापि हलकी ते मध्यम मगदुराची व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या पिकाच्या उत्तम वाढीस उपयुक्त ठरते. बेताचा पाऊस पडणाऱ्या भागात देखील हे चारा पीक चांगले येते. पूर्व मशागत पूर्व मशागत करताना पिकाची धसकटे, काड्या, पालापाचोळा वेचून जमीन पेरणीसाठी तयार करून ठेवावी. पेरणीपूर्वी एक खोल नांगरट व कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. त्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. बीज प्रक्रिया अॅझेटोबॅक्टर जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे. सुधारित वाण भरपूर हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनासाठी प्रसारित झालेले सुधारित वाण : ‘जायंट बाजरा’, ‘बायफ बाजरा’ व ‘राजको बाजरा’ इ. पेरणीसाठी निवडावेत. आंतर मशागत पिकाची वाढ जलद होत असल्याने अगदी सुरुवातीच्या काळात वाफसा असताना साधारणतः पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी एक हात कोळपणी करावी व पुढील २५ ते ३० दिवसांनी एक खुरपणी करून शेत तणविरहीत करावे. बाजरी पिकाची उत्तम मशागत व योग्य लागवड तंत्र यांचा अवलंब केल्यास शेतात तण माजत नाही. पुढे पिकाच्या जलद वाढीमुळे तणांचा जोर कमी होतो. खत व्यवस्थापन भर खतामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो, हवा खेळती राहते. शिवाय पोषणमूल्यांचा पुरवठा चांगला होतो. पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करताना हेक्टरी ५ ते ६ टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. बाजरी हे पीक तृण धान्य वर्गातील असल्याने नत्र खतास चांगला प्रतिसाद देते. या चारा पिकाद्वारे अल्पावधीत भरपूर उत्पादन अपेक्षित असल्याने पेरणीच्या वेळी पिकास हेक्टरी ४५ किलो नत्र (९८ किलो युरिया), ४० किलो स्फुरद (२५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ३० किलो पालाश (५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी नत्राचा ४५ किलोचा दुसरा हप्ता (९८ किलो युरिया) द्यावा. तसेच जिरायती चारा पिकास पेरणीच्या वेळी हेक्टरी ३० किलो नत्र (६५ किलो युरिया), ३० किलो स्फुरद (१८८ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ३० किलो पालाश (५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे व पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी नत्राचा ३० किलोचा दुसरा हप्ता (६५ किलो युरिया) द्यावा. पाणी व्यवस्थापन बाजरी पिकास उन्हाळी हंगामात आवश्यकतेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तर खरीप हंगामात साधारणतः १५ ते २० दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देणे गरजेचे आहे. उन्हाळी बाजरीची पाण्याची एकूण गरज ४५ ते ५० सें.मी. प्रति हेक्टरी असते. कापणी बाजरी हे जलद वाढणारे पीक असल्यामुळे अल्पकाळात भरपूर हिरवा चारा मिळतो. हिरव्या चाऱ्याचे भरपूर उत्पादन व अधिक पोषणमूल्ये मिळण्याच्या दृष्टीने बाजरीचे कणीस बाहेर पडल्यानंतर कापणी करणे अधिक फायद्याचे ठरते. परंतु कापणीचे काम, पिक ५०% फुलोरा या अवस्थेपलीकडे लांबणीवर टाकू नये. ही अवस्था साधारणपणे पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी येते. दुसरी कापणी घ्यावयाची असल्यास प्रथम कापणी नंतर बाजरी खोडव्याची वाढ जमिनीत उपलब्ध ओलाव्यावर अवलंबून असते व त्यानुसार दोन ते तीन खोडवे घेता येतात. पोषणमूल्ये ५० टक्के पीक फुलोऱ्यात असताना बाजरीच्या हिरव्या चाऱ्यात शुष्कांशावर आधारीत ५७.९ टक्के कार्बोदके (पिष्टमय पदार्थ), ७ ते ९ टक्के प्रथिने, २४.९ टक्के काष्टमय तंतु, १.९ टक्के स्निग्ध पदार्थ व ८.२ टक्के खनिज पदार्थ असतात. उत्पादन बाजरीपासून हेक्टरी ४५० ते ५०० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन ५५ ते ६५ दिवसांत मिळते.   संपर्क ः तुषार भोसले, ८००७६५६३२४, ८८३०११७६९१ (पशू संवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com