तंत्र ॲस्टर, गॅलार्डिया लागवडीचे...

ॲस्टर, गॅलार्डिया लागवड
ॲस्टर, गॅलार्डिया लागवड

ॲस्टर, गॅलार्डिया, शेवंती, ग्लॅडिओलस या फुलांना बाजारपेठेत चांगली मागणी असते. येत्या काळातील बाजारपेठ लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने या फुलांची लागवड करावी. फुलझाडांसाठी हलक्या ते मध्यम जमिनीची निवड करावी. या जमिनीत फुलझाडांची चांगली वाढ होते. भारी काळ्या जमिनीत झाडाच्या विस्ताराने फुलांच्या हंगाम लांबतो, याचा उत्पादनावर परिणाम होतो. पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ९० सेंमी. खोल व ६ ते ७ सामू असलेली जमीन लागवडीसाठी निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची उभी आडवी नांगरणी करून शेणखत किंवा गांडूळखत मिसळावे. त्यानंतर जमीन सपाट करून दोन फुटांवर सरी पाडावी. रोपवाटिका ः

  • ॲस्टर, शेवंती, गॅलर्डियाची रोपवाटिका तयार करण्यासाठी ३ मी. बाय ९ मी. बाय २० सेंमी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत.
  • प्रत्येक वाफ्यात १९:१९:१९ हे खत ६० ग्रॅम, ८ ते १० किलो शेणखत चांगले मिसळून घ्यावे.
  • दहा सेंमी. अंतरावर दक्षिण-उत्तर ओळी, खुरप्याच्या साहाय्याने ०.५ सेंमी. खोल करून त्यामध्ये बियाणे पेरावे. पेरणीवेळी दोन बियाणांतील अंतर २.५ सेंमी. ठेवावे.
  • वस्त्रगाळ पोयटा माती, शेणखत व वाळू यांच्या २:१:१ या प्रमाणात मिश्रण करून या मिश्रणाने पेरलेले बियाणे झाकावे. त्यावर रोज सकाळी, सायंकाळी झारीने पाण्याचा हलका फवारा मारावा.
  • बियाणे उगवून येईपर्यंत गादीवाफे, गवत, पालापाचोळा किंवा पोत्याने झाकून ठेवावे.
  • वाफे नेहमी ओलसर म्हणजे वापसा अवस्थेत ठेवावेत. वापसा अवस्थेपेक्षा जास्त पाणी देऊ नये किंवा पाणी कमीदेखील पडू देऊ नये.
  • रोपे साधारणपणे २१ ते २५ दिवसांत तयार होतात. तयार रोपे वाफे वापसा अवस्थेत असतानाच काढावीत. रोपे उपटताना मुळे तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. लागवडीच्या वेळी रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवून पुनर्लागवड करावी.
  • ॲस्टर लागवड ः बियाणे ः

  • कामिनी, पौर्णिमा, शशांक, व्हायलेट कुशन, फुले गणेश पिंक, फुले गणेश परपल, फुले गणेश व्हाईट या जातींची निवड करावी.
  • लागवडीसाठी हेक्टरी ५०० ते १००० ग्रॅम बियाणे लागते.
  • लागवड ३० बाय ३० किंवा ४५ बाय ३० सेंमी. अंतरावर करावी. सरी वरंबा पद्धतीने लागवड करताना वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी.
  • रोपांची लागवड सायंकाळी ४ नंतर व भरपूर पाण्यात करावी, म्हणजे रोपे मरत नाहीत.
  • लागवडीपूर्वी हेक्टरी ८ ते १० टन शेणखत जमिनीत मिसळावे. हेक्टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली खुरपणी करून, हेक्टरी ९० किलो याप्रमाणे नत्र खताचा दुसरा हप्ता द्यावा.
  • खुरपणीसोबतच लागवड केलेल्या क्षेत्राची रानबांधणीदेखील करावी. रानबांधणी करताना सुरुवातीला नत्र सरीमध्ये टाकावे आणि वरंबा अर्धा फोडून दुसऱ्या वरंब्यास रोपांच्या पोटाशी लावावा. यामुळे खत मातीमध्ये बुजविले जाते. झाडालादेखील मातीची भर मिळते. रानबांधणी करताना रोपे वरंब्याच्या मध्यावर येतील याची काळजी घ्यावी. यामुळे खोडाला मातीचा आधार मिळतो आणि फुले लागल्यानंतर रोपे पडत नाहीत.
  • लागवडीनंतर १० ते १२ आठवड्यांनी फुले तोडणीसाठी तयार होतात. फुलांची तोडणी दोन प्रकारे करता येते, पहिल्या प्रकारात पूजेसाठी किंवा सजावटीसाठी पूर्ण उमललेली फुले तोडली जातात. दुसऱ्या प्रकारात काही प्रमाणात फुले उमलल्यानंतर पूर्ण झाड जमिनीवर छाटले जाते. फक्त फुलांची तोडणी करायची झाल्यास, सकाळी लवकर तोडणी करावी. पूर्ण झाड फुलदांड्यासाठी वापरायचे असल्यास, सायंकाळी झाड छाटून ताबडतोब स्वच्छ पाण्यामध्ये ठेवावे.
  • गॅलर्डिया ः

  • एकेरी पाकळ्याच्या जाती इंडियन चीफ, डॅझलर, टेस्टा फिस्टा आणि दुहेरी पाकळ्याच्या रिग्यालीस, ग्रँडीफ्लोरा, सरमुनी, पिक्टा मिक्स या जातींची निवड करावी. रोपे तयार करून लागवड करावी. लागवडीसाठी हेक्टरी ५०० ते ७५० ग्रॅम बियाणे लागते.
  • लागवडीसाठी ६० बाय ४५ सेंमी. अंतर ठेवावे.
  • लागवडीपूर्वी हेक्टरी ८ ते १० टन शेणखत जमिनीत मिसळावे. माती परिक्षणानुसार १०० किलो नत्र,५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. यातील अर्धे नत्र, पूर्ण स्फूरद व पालाश लागवडीच्यावेळी द्यावे. उरलेले अर्धे नत्र दोन वेळेस विभागून द्यावे.
  • लागवडीनंतर दोन महिन्यांनी फुलांची तोडणी करता येते. फुलोरा आल्यानंतर २० ते २५ दिवसात फुले काढणीयोग्य होतात. आणि पुढे अडीच महिन्यापर्यंत फुलांचे उत्पादन सुरू राहते.
  • संपर्क ःडॉ. एस. एस. यदलोड, ७५८८०८१९९० (उद्यानविद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com