टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून पाणीदार

सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी आर्थिक व श्रमदानाच्या जोरावर पिण्याच्या तसेच शेतीसाठीच्या पाण्याची टंचाई दूर करण्यात यश मिळवले आहे. वसना नदीसह विविध ओढ्यांवर सुमारे १७ बंधाऱ्यांची खोली- रुंदीकरण करण्यात आले आहे. माथा ते पायथा जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणात झाली. दहीगाव आता पाणीदार झाले आहे.
तेलवड ओढ्यावरील बंधाऱ्यात जमा झालेला पाणीसाठा
तेलवड ओढ्यावरील बंधाऱ्यात जमा झालेला पाणीसाठा

सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी आर्थिक व श्रमदानाच्या जोरावर पिण्याच्या तसेच शेतीसाठीच्या पाण्याची टंचाई दूर करण्यात यश मिळवले आहे. वसना नदीसह विविध ओढ्यांवर सुमारे १७ बंधाऱ्यांची खोली- रुंदीकरण करण्यात आले आहे. माथा ते पायथा जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणात झाली. दहीगाव आता पाणीदार झाले आहे. सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी समजला जातो. यात कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाचा समावेश आहे. भागातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. साडेतीन हजार लोकसंख्येचे व सुमारे साडेनऊशे एकर क्षेत्र असलेले दहीगाव त्यापैकीच एक आहे. गावातून वाहणारी वसना नदी बहुतांशी वेळा कोरडीच असायची. डिसेंबरपासून टंचाईच्या झळा सुरू व्हायच्या. एप्रिलपासून भीषणता वाढत जाऊन पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घेण्याची वेळ यायची. सन २०१७-१८ पर्यंत अशीच परिस्थिती होती. हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने गट-तट मजबूत होते. फाउंडेशनची स्थापना परिस्थिती बदलण्यासाठी तसेच सर्वागीण विकास करण्याच्या दृष्टीने गावातील तसेच नोकरी-व्यवसाया निमित्ताने बाहेर असलेले जलमित्र योगेश चव्हाण, अशोक चव्हाण, प्रमोद धुमाळ यांनी लोकगौरव विकास फाउंडेशनची स्थापना केली. त्यांचा उत्साह पाहून ग्रामपंचायत, विकास सोसायटीचे पदाधिकारीही या चळवळीत सहभागी झाले. स्मशानभूमीत रेन वॉटर हार्वेस्टिंग गावात स्मशानभूमी उभारण्याचे काम फाउंडेशनने सर्वप्रथम हाती घेतले. वसना नदीकाठी लोकसहभागातून ते पूर्ण झाले. दोन शेडची उभारणी करून वृक्षारोपण करण्यात आले. पावसाचे पाणी अडवले पाहिजे या हेतूने तरुणांनी स्मशानभूमीत ‘रेन हार्वेस्टिंग’ करण्याचे ठरवले. स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या बोअरवेलमध्ये पाणी एकत्र करून सोडले. यातून पाण्याची पातळी वाढली. पाइनलाइनद्वारे हे पाणी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत सोडले. बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने टंचाई दूर झाली. गावात आता पाच ठिकाणी ‘रेन हार्वेस्टिंग’ करण्यात आले आहे. जलसंधारणाच्या कामांना सुरुवात अद्याप शेतीसाठी पाण्याची टंचाई कायम होती. शेतजमिनी बोअरवेल घेऊन खिळखिळ्या होत होत्या. पाणी लागत नसल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करण्यापलीकडे काहीच हाती लागत नव्हते. यावरही मात करण्याचे ठरवले. देऊर येथील संभाजीराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एनएसएस कँपचे आयोजन सलग तीन वर्षे केले. यातून ग्रामस्थांमध्ये प्रबोधन झाले. श्रमदान, लोकवर्गणी संकलन सुरू झाले. जलसंधारणाच्या कामांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सहा लाख रुपये देण्यात आले. एकूण १८ लाख रुपयांचा निधी जमा झाला. योगेश चव्हाण मनुष्यबळ विभागात कार्यरत असल्याने त्यांनी कामांचा आराखडा तयार केला. वज्रमूठ बांधली वसना नदीपलीकडे गावाची सुमारे दोनशे एकर शेतजमीन होती. यामुळे पहिल्या पुलासह बंधाऱ्याचे काम सुरू केले. त्यास खालून भिंत घेतली. त्यावर मोठ्या आकाराच्या पाइप बसवल्या. पुलाच्या वरच्या बाजूच्या नदीपात्राचे खोली- रुंदीकरण केले. यामुळे नदीपलीकडील शेती व आसनगावात जाण्याचा रस्ता तयार झाला. प्रकल्पामुळे ३५ फूट खोल व एक किलोमीटर लांब क्षेत्रावर पाणीसाठा झाला. ग्रामस्थांचा उत्साह अजून वाढला. मग वज्रमूठ भक्कम बांधण्यात आली. पुढील कामासांठी निधीची गरज होती. मग ग्रामगौरव प्रतिष्ठान खळद (सासवड) यांच्या माध्यमातून तंत्रज्ञान व पुण्यातील विविध कंपन्यांच्या ‘सीआरएस' निधीतून एकूण २९ लाख रुपयांचा निधी संकलित केला. त्यातून नदीवर चार, तर चार ओढ्यांवर १३ बंधारे बांधले. सर्व कामांचे खोली- रुंदीकरण केले. मागील दोन वर्षांत जोमदार पाऊस पडल्याने सर्व कामांत मिळून अंदाजे २९ कोटी लिटर पाणीसाठा झाला. बांधबंदिस्तीसारखी कामेही झाली. पाण्याचा थेंब न् थेंब मुरला. पाणीपातळीत कमालीची सुधारणा झाली. बंद पडलेल्या बोअर्सना पाणी येऊ लागले. झालेले फायदे

  • गाव बागायत झाल्याने अन्य पिकांसोबत ऊस, आले आदी नगदी पिकांचे क्षेत्र वाढले.
  • दुभत्या जनावरांची संख्या वाढली. प्रतिदिन तीन हजार लिटर दूधसंकलन होऊ लागले.
  • तरुणांचा शेतीकडे कल वाढला. पोल्ट्री, रेशीम, गांडूळ खत युनिट्‌स सुरू झाली.
  • बांधावर फळझाडांची लागवड वाढली.
  • शेती तेथे रस्ता संकल्पनेचे काम सुरू झाले.
  • मदत व भेट लोकगौरव प्रतिष्ठान, तरुण मंडळे, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान मिळाले. ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्पनाताई साळुंखे, त्यांचे सहकारी प्रशांत बोरावके, संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर यांचे सहकार्य लाभले. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, इंद्रजित देशमुख, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी पाहणी करून कौतूक केले.

    प्रतिक्रिया

    जलसंधारणाच्या कामांमुळे गाव बागायत झाले आहे. पुढील काळात पीक पद्धतींचे नियोजन करताना सेंद्रिय शेतीवर भर देणार आहोत. -तानाजी चव्हाण (सरंपच) माझी दहा एकर कोरडवाहू शेती बागायत करण्यासाठी चार विहिरी व २५ बोअरवेल्स घेतल्या. दोन विहिरींतून एखादे पीक मिळायचे. आता शेती बागायत झाली असून आले, ऊस आदी पिके घेत आहे. - योगेश चव्हाण, युवा शेतकरी   पाणी लागेल या आशेवर नदीकाठाला विहरी घेतली होती. मात्र पाणी न लागल्याने ती कोरडी होती. आता शेती बागायत होण्याबरोबर शुद्ध पाण्याचा प्रकल्प सुरू करणेही शक्य झाले आहे. -विनोद चव्हाण, शेतकरी   संपर्क - योगेश चव्हाण (जलमित्र)- ९७६५४०५००३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com