झोपडीत राहणाऱ्या बापूसाहेबांचे दररोज १३ हजार लिटर दूधसंकलन ! दुधाचा 'पाझर ब्रॅण्ड, दही, तुपाचीही विक्री

आजही राहतात झोपडीत बापूसाहेबांनी स्वतःच्या हिंमतीवर झपाट्याने प्रगती केली. आज त्यांच्या व्यवसायातील वार्षिक उलाढाल लाखांच्या घरात पोचली आहे. चारचाकी गाडी, घर या बाबी ते सहज साध्य करू शकले असते. पण सुमारे सात वर्षे त्यांनी खुषी-आरामाच्या अनेक बाबींचा त्याग करून उद्योगवृद्धीकडेचलक्ष दिले. आजही आई व पत्नी यांच्यासह शेतातील झोपडीतच त्यांचे वास्तव्य असते. त्यात ते समाधानीदेखील आहेत.
गायींचे व्यवस्थापन काटेकोर ठेवण्यात येते. दररोज हंगामात १३ हजार लिटरपर्यंत दूध संकलन होते.
गायींचे व्यवस्थापन काटेकोर ठेवण्यात येते. दररोज हंगामात १३ हजार लिटरपर्यंत दूध संकलन होते.

कोठेही अनाठायी वेळ घालवणे नाही, पूर्ण लक्ष देऊन व्यवसायाचा विस्तार करण्याचे प्रयत्न, अविरत मेहनत, जिद्द व निश्‍चय. याच गुणांच्या जोरावर सावळेश्‍वर (जि. सोलापूर) येथील बापूसाहेब तरटे यांनी शेतातच सुमारे ५० लाख रुपयांच्या गुंतवण्कीतून प्रति दिन १० ते १३ हजार लिटर दूध संकलन असलेला व्यवसाय भरभराटीस आणला आहे. ‘पाझर' या ब्रॅण्डखाली दूधविक्री होते. आजही शेतातील झोपडीतच त्यांनी आपले वास्तव्य ठेवले आहे.    सोलापूर- पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यात सावळेश्‍वर टोलनाक्‍याच्या डाव्या बाजूला अर्धा किलोमीटरवर बापूसाहेब तरटे यांची ११ एकर शेती आहे. त्यात ऊस आणि चारा अशी पिके आहेत. त्यांचे वडील केरबा शेती पाहातच पूर्वी दुग्धव्यवसाय करीत. स्वतःकडील गायींच्या दुधाबरोबर गावातील अन्य शेतकऱ्यांकडील दूध घेऊन ते विक्री करीत. त्यासाठी सोलापूरला तब्बल २२ किलोमीटरची रोजची सायकलवरील पायपीट करीत. तब्बल २० वर्षे हा व्यवसाय केला. बापूसाहेब हे त्यांचे एकुलते एक चिरंजीव. त्यांनाही या व्यवसायात गोडी लागली. पण घरच्यांनी आधी शिकून नोकरी कर असाच सल्ला दिला. पण बापूसाहेबांचे मन काही शाळेत रमेना. अखेर नववी इयत्तेनंतर शाळा सोडून त्यांनी हा व्यवसाय पत्करला.  खडतर वाट  बापूसाहेबांनी दोन वर्षे दूध घातले खरे. पण स्वप्न मोठे होते. दूध संकलन करून शीतकरण केंद्र, पॅकिंग आणि प्रक्रिया उद्योग त्यांना उभारायचा होता. बोलण्यासाठी या गोष्टी सोप्या होत्या, पण वाट खडतर होती. हाती रुपयाही नव्हता. पण इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी होती. त्याच बळावर स्वतःकडील कमाई व मित्रमंडळीकडील उसनवारीच्या आधारे २०१५ मध्ये प्रत्यक्ष सुरवात केली. सुमारे ५० ते ६० लाख रुपयांची गुंतवणूक होती. त्यासाठी बॅंकेचे दरवाजे ठोठावले. पण पदरी निराशाच पडली. पण धडपड पाहून काही मित्र, तसेच हाॅटेल व्यावसायिकांनी मदत केली. पैसे येतील तशी एकेक मशिनरी घेण्यास सुरवात केली.  दुधाचा 'पाझर' ब्रॅण्ड  मध्यंतरीच्या काळापर्यंत गायींची संख्या ५० पर्यंत होती. पण अलीकडील सततची दुष्काळी परिस्थिती व अर्थकारण पाहाता ही संख्या घटली आहे. सध्या १५ ते १६ गायी, सात म्हशी अशी सुमारे २२ जनावरे गोठ्यात आहेत.  जिद्दीने तयार केला ब्रॅंड  दुग्धव्यवसाय जिकिरीचा आहे. यात नुकसानीची झळ मोठी बसू शकते याची जाणीव होतीच. पण ध्येयाने पछाडलेल्या बापूसाहेबांना त्याची फिकिर नव्हती. अनेकांनी त्यांना वेड्यात काढले. पण लोक काय म्हणतील याचा विचार न करता २०१६ मध्ये शेतातच ५० बाय ५० फूट आकाराचे पत्र्याचा सुसज्ज शेड उभारले. होमोनाईज्ड आणि पाश्‍चराईज्ड मिल्क पिशव्यांमधून विकण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा उभारली. या संपूर्ण व्यवसायात ब्रॅण्डला महत्त्व आहे हे ओळखले. त्यासाठी 'पाझर' हे ब्रॅण्डनेम निश्‍चित केले. त्या व्यतिरिक्त खुल्या स्वरूपातही दूध, दही, तूप यांची विक्री सुरू केली. प्रत्येक अडचणीवर त्याच हिंमतीने मात केली. गुणवत्ता, सातत्य टिकवल्यामुळेच व्यवसायात स्थिरता व नाव मिळवले.  सध्याचा दुग्धव्यवसाय 

  • वळेश्‍वर व परिसरातील अर्जुनसोंड, पोफळी, मुंढेवाडी, विरवडे, बीबीदारफळ, पाकणी या सात गावांतून सध्या दूध संकलन. 
  • सुमारे सातशे शेतकऱ्यांचे त्यासाठी नेटवर्क. 
  • हंगामात प्रतिदिन १३ हजार लिटर तर वार्षिक सरासरी ९ हजार लिटरपर्यंत. सध्या दुष्काळामुळे घट. 
  • पाच छोट्या गाड्या. त्या संंबंधित गावांत फिरून थेट बांधावरून संकलन करतात. 
  • साडेतीन ते साडेआठ एसएनएफ असलेल्या दुधाला २५ रुपये प्रतिलिटर दर दिला जातो. अनेक शेतकऱ्यांची बॅंक खाती नोंदवली आहेत. दर महिन्याच्या पाच, १५ आणि २५ तारखेला असे प्रत्येक दहा दिवसांनी पेमेंट शेतकऱ्यांना बॅंक खात्यात किंवा रोख स्वरूपात दिले जाते. 
  • पॅकिंगमधील दुधाचा प्रतिलिटर ३४ रुपये, दही ४० रुपये प्रतिलिटर तर तुपाचा साडे ५०० रुपये प्रतिकिलो दर. 
  • मशिनरींची हाताळणी, शीतकरण, दूध संकलन, पॅकिंग, वाहनचालक आदी स्वरूपात परिसरातील ११ तरुणांना रोजगार. 
  • कष्टाची तयारी आणि प्रामाणिकपणा या दोन मुख्य अटी नोकरीसाठी पाहिल्या जातात. त्यांना कामाच्या स्वरूपानुसार दोन आकडी पगार. 
  • पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने दुग्धव्यवसाय सांभाळून ऊस व चारा पिके घेतली जातात. 
  • उसाचे एकरी ४५ ते ५० टन उत्पादन घेतले जाते. 
  • संपर्क- बापूसाहेब तरटे-९८२२४६८८३४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com