दुष्काळातही दुग्ध व्यवसाय टिकवण्याची युवकाची जिद्द

दूध विक्रीसाठी घेऊन जाताना रामेश्वर.
दूध विक्रीसाठी घेऊन जाताना रामेश्वर.

अलीकडील वर्षांत कायम दुष्काळी स्थिती अनुभवणाऱ्या रेपाळा (जि. जालना)  येथील रामेश्‍वर सपकाळ या उमद्या तरुणाने न खचता, जिद्दीने बारा वर्षांपासून दुग्धव्यसाय टिकवून धरला आहे. अलीकडील काळात भले नुकसान सहन करावे लागत आहे, मात्र प्रतिकूलतेतही नऊ जनावरांचा सांभाळ, दररोज ४५ ते ५० लिटर दूध संकलन व थेट ग्राहकांस विक्री या माध्यमातून सपकाळ यांनी व्यवसाय स्थिरतेकडे वा फायद्यात आणण्यासाठी केलेले कष्ट व प्रयत्न प्रशंसनीय आहेत. 

जालना जिल्ह्यातील रेपाळे (ता. जाफराबाद) येथील रामेश्‍वर सपकाळ हा उमदा तरुण वडिलोपार्जित असलेला दुग्ध व्यवसाय सुमारे बारा वर्षांपासून सांभाळत आहे. पूर्वी चार गावरान म्हशी होत्या. रामेश्‍वर यांनी व्यवसाय सांभाळायला घेतल्यानंतर जातिवंत म्हशी घेतल्या. व्यवसायाचा अभ्यास केला. व्यवस्थापनात सुधारणा केली. त्याद्वारे आज सात जाफराबादी म्हशी आणि दोन संकरित गायी (एचएफ) अशा नऊ जनावरांचा सांभाळ ते नेटाने करताहेत.  प्रतिकूलतेतून वाटचाल  अलीकडील काळात दुग्ध व्यवसाय परवडणारा राहिलेला नाही. रामेश्‍वर सांगतात की पेंडीचे २० ते २२ रुपये असलेले दर ३८ रुपयांवर गेले आहेत. काही कालावधीपूर्वी व्यवसायात वार्षिक चार लाख रुपयांपर्यंतही नफा मिळवला; पण सध्या महिन्याला तोटा सहन करून व्यवसाय चालवावा लागत आहे. तरीही हा व्‍यवसाय थांबवणार नाही, अशी रामेश्‍वर यांची जिद्द व चिकाटी आहे.स्वतःला सिद्ध करण्याची तयारी ठेवली की यश मिळत जातं. अनेकदा वाटलं की नको हा दुग्ध व्यवसाय; पण शेतीला पूरक म्हणून भावला. दुधाची गुणवत्ता जपली आहे, त्यामुळे स्पर्धेचं ‘टेन्शन’ येत नाही, त्यामुळेच व्यवसायात टिकून राहिलो असल्याचे ते सांगतात.  दुग्ध व्यवसायातील ठळक बाबी 

  • प्रतिकूल, दुष्काळी स्थितीतही जनावरांचे व्यवस्थापन अत्यंत चांगले.  
  • रामेश्‍वर सांगतात की गोठा जितका स्वच्छ, तितके जनावरांना आजार कमी होतात, त्यांना मोकळे वावरताही येते. 
  • ४० बाय २५ फूट जागेत गोठ्याचे ‘आरसीसी’ बांधकाम. हवा खेळती राहावी यासाठी चारही बाजूंनी चार फुटांपर्यंत मोकळा भाग
  • टेल टू टेल पद्धत 
  • जनावरांना धुण्यासाठी पाण्याचे फोर व्हीलरसाठी वापरतात त्या धर्तीवर १५ हजार रुपयांचे यंत्र, तर दहा हजार रुपयांची मोटर घेतली आहे. याद्वारे गोठाही स्वच्छ राहण्यास मदत होते. 
  •  दिवसातून दोन वेळेस जनावरे धुण्यात येतात. 
  •  शेण व मूत्र गोठ्यातून बाहेर जाण्यासाठी आउटलेट. बारा बाय ६ फूट व दहा फूट खोल आकाराच्या टॅंकमध्ये त्याचे संकलन. विद्युतपंप व ड्रीपद्वारे कपाशी, मिरची व चारा पिकांना त्याचा वापर.  
  • दोन एकरांत चारा
  •  पाच एकर शेतीपैकी दोन एकर चाऱ्यासाठी राखीव
  • लसूणघास, मका, कडवळ, फुले, यशवंत, जयवंत आदींची लागवड 
  • सुमारे आठ वर्षांपूर्वी एक हजार डोळे बेणे आणून उत्पादन व बेणे तयार करण्यास सुरवात. 
  • सोयाबीन भुस्सा, मक्‍याच्या वाळलेल्या चाराकुट्टीचाही वापर 
  • वर्षाकाठी साधारण २५ ब्रास शेणखत उपलब्ध, ते साठवण्यासाठी हौद. 
  • एखादे वर्ष संपूर्ण खत स्वतःच्या शेतासाठी वापरले जाते. एखाद्या वर्षी त्याची विक्री. त्यातून चांगले अतिरिक्त उत्पन्न. 
  • उपचारांचे शिक्षण   जनावर आजारी पडल्यास पूर्वी बऱ्याच अडचणी आल्या. पशुवैद्यक वेळेवर उपलब्ध होत नसत. दरम्यानच्या काळात डॉ. बाळासाहेब बनसोडे यांच्याशी भेट झाली. वर्षभर त्यांच्याकडे कामाचा अनुभव घेत जनावरांचा आजार ओळखणे, त्यावरील इलाज, नस पकडून इंजेक्‍शन देणे या बाबी शिकून घेतल्या. सध्या किरकोळ आजारांसाठी लागणारी औषधे तयार ठेवली आहेत. जनावर आजारी पडले, की डॉक्‍टरांच्या सल्ल्याने ती दिली जातात. दुधाळ जनावरांना सलाइनद्वारे कॅल्शियम देण्यातही रामेश्‍वर यांची हातोटी आहे. परिसरातील पशुपालकांच्या मदतीलाही ते धावून जातात. कृत्रिम रेतन मात्र पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखालीच होते. 

    दुधाला मिळवले मार्केट मार्केट मिळवण्यासाठी घरोघरी फिरून दुधाच्या गुणवत्तेबाबत रामेश्‍वर यांनी माहिती देण्यास सुरवात केली. दुधाची स्वच्छता, गुणवत्ता पाहून ग्राहक मिळत गेले. आज घडीला प्रतिदिन ४५ ते ५० लिटर दूध संकलन होते. वर्षभर ही सरासरी टिकवण्यात येते. सध्या जाफराबाद येथे सुमारे ३० ग्राहकांना अर्धा, एक, अडीच आणि तीन लिटरपर्यंत म्हशीच्या दुधाचे रतीब दिले जाते. थेट विक्री केल्याने लिटरला ५० रुपये दर मिळतो. यातून दिवसाकाठी अडीच हजारांवर उत्पन्न मिळते. गायीच्या दुधाची विक्री डेअरीला २० ते २२ रुपये प्रतिलिटर दराने होते.   

    मनोरंजन बनले जनावरांची आवड रामेश्‍वर म्हणतात, की माझे मनोरंजन म्हणून पूर्वी गोठ्यात गाणी लावायचो; पण नंतर लक्षात की हे संगीत जनावरांनाही आवडते. संगीत एखादे वेळेस बंद असले तर म्हशी दूध काढू द्यायच्या नाहीत. ही सवय व आवड लक्षात घेऊन यांत्रिक पद्धतीने दूध काढताना गोठ्यात सकाळ व संध्याकाळी ठरावीक वेळेत गाणी लावण्यात येतात. गोठ्यात फॅनचीही सोय केली आहे.

    जनावरांचा विमा जनावरांचा सुदृढपणा, त्यांचे वय, बाजारभावाच्या किमतीनुसार तीन वर्षांसाठी प्रतिजनावर सुमारे २७०० रुपये विमा भरला आहे. जनावर दगावल्यास प्रतिजनावर ६० हजार रुपये रक्कम मिळण्याची तरतूद आहे.

    साथ देणं आपलं कर्तव्यच ना? कामाची विभागणी करताना सपकाळ कुटुंबाने आदर्श नियोजन केले आहे. रामेश्‍वर आणि गणेश हे दोघे भाऊ. रामेश्‍वर यांच्या पत्नी सौ. मीरा सकाळी मुलाच्या शाळेची तयारी करून सासू कमलबाई यांना मदत करतात. रामेश्‍वर दूध विक्री करून घरी येईपर्यंत वडील नाना पिठाची गिरणी चालवितात. गणेश शाळेत शिक्षक आहे. दुग्ध व्यवसायाबद्दल सौ. मीरा म्हणतात, की पतीला साथं देणं हे आपलं कर्तव्यच असतं. आम्ही सर्व सदस्य दुग्ध व्यवसायात आपल्यापरीने हातभार लावतो, त्यामुळेच सर्व कामं सुरळीत पार पडतात. 

    - रामेश्‍वर सपकाळ, ९९६०१७४१०६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com