agriculture story in marathi, Daji Kale with the use of technology has raised the yield of sunflower. | Page 2 ||| Agrowon

तंत्रज्ञान वापरातून सूर्यफुलात उत्पादनवाढ

सुदर्शन सुतार
शनिवार, 3 जुलै 2021

नरोटेवाडी (जि. सोलापूर) येथील दाजी चंदू काळे यांनी अनेक वर्षांपासून सूर्यफुल शेती नेटाने टिकवली आहे. सोलापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रयोग व तंत्रज्ञानाचा वापर करून सूर्यफुलाचे एकरी उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

सूर्यफुलाचे राज्यातील क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. या पार्श्‍वभूमीवर नरोटेवाडी (जि. सोलापूर) येथील दाजी चंदू काळे यांनी मात्र अनेक वर्षांपासून ही शेती नेटाने टिकवली आहे. सोलापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रयोग व तंत्रज्ञानाचा वापर करून सूर्यफुलाचे एकरी उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
 
सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्यात नरोटेवाडी येथे दाजी काळे यांची १५ एकर शेती आहे. त्यांचे अकरा भावांचे एकत्र कुटुंब आहे. त्यापैकी सहा जण नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी आहेत. उर्वरित चौघे शेतीच करतात. दहावीनंतर ‘इलेक्ट्रॅानिक्स’ शाखेतून ‘आयटीआय’ अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर दाजी यांनी नोकरी व काही वर्षे पोलिस भरतीसाठी प्रयत्न केले. पण नोकरी हाती लागली नाही. व्यवसायाचा विचार केला. पण तेही जुळून आले नाही. अखेर सन दोन हजारच्या सुमारास वडिलोपार्जित शेतीत लक्ष घालून ज्वारी, बाजरी, तूर, सूर्यफूल, भाजीपाला पिके ते घेऊ लागले.

तंत्रज्ञानाने शेतीला दिशा
सन २०१३ च्या सुमारास सोलापूर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. त्या निमित्ताने दाजी केंद्राच्या संपर्कात आले. तेथील शिफारशी आणि तंत्रज्ञानाचा वापर सूर्यफूल, तूर, बाजरी, ज्वारी यांसारख्या कोरडवाहू पिकांत करू लागले. उत्पादनवाढ मिळू लागली. विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ व सहयोगी संचालक डॉ. विजय अमृतसागर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एम. गेठे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुहास उपाध्ये, ‘निक्रा’ प्रकल्पाचे धीरज साठे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभते.

पीकपद्धती
सूर्यफूल हे दाजी यांचे मुख्य पीक झाले आहे. आत्तापर्यंत चार एकरांपासून ते आठ एकरांपर्यंत त्यांनी खरिपात हे पीक घेतले. यंदा काढणीवेळी मजूरटंचाई व अन्य तांत्रिक कारणांमुळे हे क्षेत्र सव्वादोन एकर ठेवले आहे. अर्थात, क्षेत्र घटविले तरी हे पीक घेणे थांबवणार नसल्याचे दाजी सांगतात. सोयाबीनपेक्षा त्याचा कालावधी कमी आहे. त्यामुळे रब्बीत ज्वारीकडे जाता येते. लावणी लांबली तरी या पिकाला चालते. पाण्याचा ताणही हे पीक चांगला सहन करते असे दाजी सांगतात. सूर्यफुलाचे तुरीचे आंतरपीक, स्वतंत्रपणे तुरीसह ज्वारी, बाजरीही ते घेतात. या तंत्रज्ञानामुळेच खऱ्या अर्थाने आपल्या शेतीला दिशा मिळाल्याचे काळे यांनी आवर्जून सांगितले.

निक्रा प्रकल्पाचा फायदा
केंद्र शासनाच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत राष्ट्रीय संवेदनक्षम हवामान बदल आधारित प्रकल्पासाठी (निक्रा) सोलापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राची निवड झाली. त्यामध्ये नरोटेवाडीची निवड केली. त्याद्वारे बदलत्या हवामानानुसार कोरडवाहू पीकपद्धतीत करावयाच्या बदलांविषयी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येते. त्यासाठी गावात पर्जन्यमापक यंत्रही बसवण्यात आले आहे. त्याचा फायदा दाजी यांनाही होतो.

सूर्यफूल व्यवस्थापनातील बाबी

 • मागील वर्षाचे प्रातिनिधीक उदाहरण द्यायचे तर सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन निवडली. पूर्वमशागतीत उन्हाळ्यात २० ते २५ गाड्या कुजलेले शेणखत टाकले. त्यानंतर खोल नांगरट करून दोन-तीन उभ्या आडव्या कुळवाच्या पाळ्या दिल्या.
 • दाजी संकरित वाणही वापरतात. त्यात फुले भास्कर हे विद्यापीठाचे सुधारित वाणही वापरले.
 • जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणीचे नियोजन केले.
 • तत्पूर्वी बीजप्रक्रिया केली. दोन ओळींत अठरा इंच अंतर ठेवून ट्रॅक्टरचलित क्रीडा यंत्राद्वारे पेरणी केली. पेरणी केली.
 • एकरी साधारण तीन ते सव्वातीन किलो बियाणे लागले.
 • पेरणीबरोबर हेक्टरी ५० किलो नत्र आणि प्रत्येकी २५ किलो स्फुरद आणि पालाश दिले.
 • पेरणीनंतर २० दिवसांनी खुरपणी, पुढील वीस दिवसांनी कोळपणी, तर पुन्हा ३५ ते ४० दिवसांनी एक कोळपणी केली.
 • दाजी सांगतात की सूर्यफुलाला पाणी अत्यंत कमी दिले तरी चालते. शक्यतो ते स्प्रिंकलरद्वारेच दिले जाते. मागील वर्षी फूलकळी आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत केवळ दोनदा पाणी दिले.
 • फुलकिडे आणि केसाळ अळीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पेरणीनंतर पंधरा दिवसांनी परिस्थिती पाहून दोन ते तीन वेळा फवारण्या होतात.
 • सुमारे तीन महिन्यांनी काढणी केली. 

पेरणी यंत्र वापराचे हे झाले फायदे 

 • बियाणे, खताची पेरणी आणि रासणी एकाचवेळी तसेच सोपी झाली.
 • या यंत्राद्वारे एकावेळी नऊ ओळी पेरल्या गेल्या.
 • साहजिकच वेळेची मोठी बचत झाली.
 • पारंपरिक पद्धतीच्या पेरणीसाठी एकरी किमान ४ किलो बियाणे लागते. पण यंत्राद्वारे तीन ते सव्वा तीन किलो बियाणे लागले. सुमारे २० टक्के बियाणे बचत झाली.
 • या पेरणीमुळे खतांची कार्यक्षमता वाढली.
 • आंतरपीक आणि पट्टा पद्धतीसाठी या यंत्राचा उपयोग होऊ शकतो.
 • एकूणच पेरणी ते काढणी या कालावधीतील खर्चात मोठी बचत झाली.
 • कमी वेळेत अधिक क्षेत्र पेरले गेले. एक कोळपणी म्हणजे अर्धे पाणी यानुसार सूर्यफुलात दोनदा कोळपणी केल्यामुळे पाण्याची बचत झालीच, पण खुरपणीचा खर्चही वाचला.

 तंत्रज्ञान वापरण्याचे फायदे

 • ट्रॅक्टरचलित क्रिडा पेरणी यंत्राद्वारे पेरणी फायदेशीर ठरली.
 • सुधारित बियाण्याच्या वापरामुळे उत्पादनवाढ मिळाली.
 • बीजप्रक्रिया केल्यामुळे किडी-रोगाचे प्रमाण कमी करता आले.
 • माती-पाणी परीक्षण करून नेमकी खते वापरली गेली.

उत्पादनवाढ
पारंपरिक पद्धतीत पूर्वी एकरी चार ते साडेचार क्विंटल उत्पादन मिळायचे. आता सुधारित तंत्रज्ञानाच्या वापरातून एकरी साडेसात ते आठ क्विंटल उत्पादनापर्यंत मजल मारणे शक्य झाल्याचे दाजी म्हणाले. मागील वर्षी ११ एकरांत सुमारे ७२ क्विंटल उत्पादन मिळाले होते. एकरी ३४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तसा दरवर्षी हा दर २८०० रुपयांपर्यंत असतो. सूर्यफूल उत्पादन खर्चात काढणी व मळणीचाच खर्च पाच हजार रुपयांपर्यंत जात असल्याचे दाजी सांगतात.

यंदा सूर्यफुलासह सोयाबीन
गेल्या काही वर्षांपासून कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून दिले जाणारे सूर्यफूल, तूर, बाजरी, ज्वारी आदी पिकांसाठीचे तंत्रज्ञान वापरून दाजी शेती करीत आहेतच. यंदा त्यांनी सूर्यफुलासोबत सोयाबीनही केले आहे. सव्वा एकरांत सूर्यफुलासह आठवड्यापूर्वीच सोयाबीनची साडेपाच एकरांत क्रिडा पेरणीयंत्राद्वारे पेरणी केली. उगवणही चांगली झाली आहे. त्यातही तुषार संचाचा वापरही केला आहे.

संपर्क- दाजी काळे, ९८९०८०८२८४


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
खोडवा उसाची अधिक उत्पादनक्षम शेती.महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सिदनाळ (...
कृषीसह पिंपळगावाने केले वसुंधरेलाही...नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावाचा कृषी...
वर्षभर वांगी उत्पादनाचे गवसले तंत्रपुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील योगेश तोडकरी...
बोलके यांचे दर्जेदार संत्रा उत्पादनकचारी सावंगा (ता. काटोल, जि. नागपूर) येथील आशिष...
पोल्ट्री व्यवसायातून कुटुंब झाले आर्थिक...फळबागायती आणि भातशेती सामायीक. त्यामुळे मालगुंड (...
श्रीराम गटाचे पावडरीद्वारे हळदीचे...लाख (रयाजी) (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) येथील...
पीक नियोजनातून बसविले आर्थिक गणितपुणे जिल्ह्यातील केंदूर (ता. शिरूर) येथील संदीप...
प्रतिकूल परिस्थितीवर सुनंदाताईंनी केली...माणूस संकटाच्या काळात धीर सोडत असला तरी त्या...
औषधी वनस्पती प्रयोगासाठी ‘शेवंतामाता’...नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील निवघा बाजार...
पदवीधर तरूणाचा ‘काकतकर’ ब्रँडसिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्हावेली रेवटेवाडी येथील...
पोल्ट्री उद्योगात विट्याची दमदार ओळखसांगली जिल्ह्यातील विटा शहराची ओळख...
कमी खर्चिक किफायतशीर कापूस पीक...घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील देवेंद्र...
तंत्रज्ञान, व्यवस्थापनासह टोमॅटो...नाशिक जिल्ह्यातील दरी येथील सतीश, सचिन व नितीन या...