दापोलीतील नारगोली धरण झाले लोकसहभागातून गाळमुक्त 

दापोली शहराच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे, धरण व व पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नाचा आर्थिक स्रोत निर्माण करून करणे, नागरी व ग्रामीण भागातील लोकसहभागातून नावीन्यपूर्ण दापोली पॅटर्न राबविणे अशा विविध उद्देशांतून आम्ही नारगोली धरण पुनर्जीवन मोहीम हाती घेतली. त्याचे परिणाम भविष्यात निश्‍चित चांगलेच दिसतील. -स्वप्नील महाकाळ-९४२११३६१०६ पाणीपुरवठा अधिकारी दापोली नगरपंचायत
पाऊस लांबला असताना धरणात सद्य:स्थितीतील पाणीसाठा.
पाऊस लांबला असताना धरणात सद्य:स्थितीतील पाणीसाठा.

‘एकीचे बळ मिळते फळ’ या म्हणीचा प्रत्यय दापोली (जि. रत्नागिरी) या शहरात आला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दापोली नगरपंचायतीने लोकसहभागातून ५३ लाख रुपये उभे केले. सुमारे ९०० ग्रामस्थांनी गाळ काढण्याच्या कामात योगदान देत नारगोली धरण गाळमुक्त केले. शासनाचे विविध विभाग, सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्या सहकार्यातून नावीन्यपूर्ण नागरी- ग्रामीण लोकसहभागाचा दापोली पॅटर्न राबविण्यात आला. या उपक्रमातून नगर पंचायतीने जल व्यवस्थापनाचा नवा आदर्श घालून दिला आहे.  कोकणातील दापोली (जि. रत्नागिरी) हे महत्त्वाचे निसर्गरम्य पर्यटन ठिकाण आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची हीच मुख्य कार्यभूमी आहे. वाढते शहरीकरण, वाढते पर्यटक, वाढती लोकसंख्या यामुळे शहरातील पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. नगर पंचायतीकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांना दिवसेंदिवस भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. एप्रिल ते जूनचा पाऊस पडेपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी उलपब्ध होत नाही. त्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. शहर व परिसरात सरासरी वार्षिक पर्जन्यमान २७०० मिमी आहे.  शहराला कोजाई बंधारा, नारंगोली बंधारा आणि नारगोली धरण येथून पाणीपुरवठा केला जातो. कोडजाई बंधाऱ्याची साठवण क्षमता कमी आहे. मार्चमध्ये बंधारा कोरडा पडतो. अन्य ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना या बंधाऱ्यावर आधारित आहेत. त्यामुळे शहराला बंधाऱ्यातून मुबलक पाणीपुरवठा होत नाही. बंधाऱ्यावरील शहरासाठीची पाणीपुरवठा योजना जुनी आहे. पाइपलाइन जुनी, जीर्ण व नादुरूस्त झाली आहे. नारगोली बंधाराही नादुरूस्त आहे. त्यालाही अनेक ठिकाणी ‘लिकेजिस’ आहेत. त्याची साठवण क्षमताही कमी आहे. एप्रिल, मेमध्ये हा बंधारा कोरडा पडतो. नारगोली धरणातील साठवण क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही. साठवण क्षेत्रात अनेक उंच टेकड्या आहेत. साठवण क्षेत्र कमी आहे. सांडवा व भिंत नादुरूस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणत पाणी गळती आहे. पाणी झिरपण्याचे प्रमाण जास्त आहे. मार्च, एप्रिल, मेमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा उपलब्ध होतो.  पाणीटंचाईवर शाश्‍वत उपाय  सन २०१८ मध्ये मॉन्सूनचा पाऊस ऑगस्टनंतर पडलाच नाही. त्यामुळे दापोली तालुक्‍यात पाण्याचे संकट उभे राहिले. विहिरींची पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली. शहरात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला.  पाणीटंचाईवर शाश्वत मात करण्यासाठी नगर पंचायतीने दापोली संवर्धन कार्यक्रमांतर्गत नारगोली धरण पुनरूज्जीवन मोहीम हाती घेतली. यंदाच्या सात मार्च, २०१९ मध्ये गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. साधारण पाच जूनपर्यंत हे काम पूर्ण झाले.  पाणीपुरवठा योजनेची माहिती  नगर पंचायतीच्या नऊ पाणी टाक्‍या आहेत. त्यामध्ये १८ लाख लिटर पाणी साठवले जाते. पालिकेच्या मालकीचा जलशुध्दीकरण प्रकल्प आहे. त्याची क्षमता ४.८८ एमएलडी आहे. दररोज दोन एमएलडी पाणी शहराला पुरवले जाते. एप्रिल ते पाऊस पडेपर्यत तीन ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येतो.  नारगोली धरण 

  • सन १९७४ मध्ये धरणाचे बांधकाम पूर्ण 
  • सन १९७८ मध्ये धरण ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित 
  • धरणाच्या भिंतीची लांबी- १८५ मीटर 
  •  धरणाची उंची - १४.८५ मी. 
  • पाणलोट क्षेत्र - २.५६ चौ. किमी 
  • कामातील महत्त्वाचे टप्पे 

  • मोहिमेंतर्गत लोकसहभागातून नारगोली धरणाची साठवण क्षमता वाढविण्यात आली. गाळ काढून धरणाचे खोली- रुंदीकरण करण्यात आले. धरणाची पाणी गळती रोखण्यात आली. भिंत दुरुस्त करण्यात आली. सांडवा दुरुस्त करण्यात आला. 
  • प्रस्तावित कामातून उपलब्ध झालेले पाणी- १३३ एमएलडी 
  • श्रमदानामध्ये सहभागी झालेल्यांची संख्या- सुमारे ९०० - 
  •  लोकसहभागातून जेसीबी, पोकलेन, डंपर आदी यंत्रसामग्री ३० दिवसांपासून ते २३० दिवसांपर्यंत पुरवण्यात आली. त्यासाठी सुमारे ५३ लाख रुपये खर्च आला. 
  • दापोलीत पाऊल लांबला असला तरी धरणातील नैसर्गिक झरे या कामांमुळे जिवंत झाले आहेत. त्यामुळे 
  • दोन फुटांपर्यंत पाणी साठले आहे. 
  • भविष्यात धरण परिक्षेत्रात पर्यटनाच्या माध्यमातून उत्पनाचे स्रोत वाढवणे, उद्यान विकसित करणे, जलतरण तलाव बांधणे, सांडव्यावर कृत्रीम धबधबे निर्माण करणे, शांत निसर्गरम्य निवारे उभे करणे, पक्षी मित्र, प्राणी मित्र, निसर्गप्रेमी यांना निसर्ग निरीक्षणासाठी प्रक्षेत्र विकसित करणे ही कामे प्रामुख्याने हाती घेण्यात आली.  महादेव रोडगे-  मुख्याधिकारी दापोली नगरपंचायत  ९५४५४००८८९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com