अडीच हजार बांबूलागवडीतून समृद्धी 

 खोत यांनी सहा एकरांत केलेली बांबू लागवड
खोत यांनी सहा एकरांत केलेली बांबू लागवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबुळी येथील प्रयोगशील, अभ्यासूवृत्तीच्या दत्ताराम आणि संतोष या खोत पितापुत्रांनी सहा एकरांत अडीच हजार बांबू झाडांची नियोजनबद्ध लागवड केली आहे. व्यापाऱ्यांकडून या बांबूला चांगली मागणी मिळवण्यात ते यशस्वी झालेच. शिवाय शेतकरीही लागवडीसाठी बांबूची खरेदी करीत आहेत. या पिकातून खोत कुटूंबाचे अर्थकारण समृद्ध झाले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात रानबांबुळी हे गाव जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. सिंधूदुर्ग रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर दत्ताराम खोत यांचे छोटेखानी घर आहे. त्यांची आठ एकर जमीन आहे. एक फूट रेताड माती आणि त्याखाली पिवळट रंगाची माती आहे. खोत ३० वर्षांहून अधिक काळ शेतीत राबताहेत. पूर्वी ते पारंपरिक पद्धतीने भातशेती करायचे. परंतु उत्पादन समाधानकारक नव्हते. पुढे संकरीत बियाणे व व्यवस्थापनातून उत्पादनात वाढ झाली. पाण्याचा निचरा होत असलेल्या जमिनीत आंबा, काजू तर सखल भागात नारळ, सुपारीची लागवड केली.  बागांच्या संगोपनासाठी अथक परिश्रम घेतले. पण एखादे वर्ष उत्पन्न मिळाले तर दुसरे वर्ष कोरडेच जायचे. वाढते तापमान, अवकाळी पाऊस, किडी-रोगांमुळे फळबागांमधून जेमतेमच रक्कम हाती यायची.  बांबू लागवडीचा निर्णय  प्रयोगशीलता व अभ्यासूवृत्ती बाळगलेले खोत कृषी विभागाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावायचे. त्यातूनच बांबू लागवडीविषयी मार्गदर्शन मिळाले. हवामानातील बदलाचा फारसा परिणाम या पिकावर होत नाही. त्याला मार्केट चांगले आहे या बाबी लक्षात आल्यानंतर खोत यांनी मुलगा संतोषसोबत बांबू लागवडीविषयी चर्चा केली. मग कमी जागेत सुरवातीला प्रयोग करण्याविषयी एकमत झाले.  तीन गुंठ्यांत प्रयोग  आठ एकरांपैकी सुरवातीला तीन गुंठ्यांत ७० रोपांची लागवड झाली. यात निम्मी झाडे माणगा तर उर्वरित भोवर वाणाची आहेत. ठिबक सिंचन केले. चांगल्या देखभालीतून वर्षभराने प्रति बांबूला २० ते २८ फुटवे (कोंब) आले.  टप्प्याटप्प्याने लागवड विस्तार  आज आठ एकरांपैकी सहा एकरांत बांबू लागवड आहे. सन २०१३ ते २०१८ या पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल अडीच हजार बांबूंचे बन उभारले. शेणखताचा मुख्य वापर केला. पहिल्या वर्षी कारले, काकडी, दोडके, वाल,भेडी, गवार आदींचे आंतरपीक घेतले. बांबू लागवड व गुंतवणुकीचा बराच खर्च या आंतरपिकांनी कमी केला. एका रांगेत बांबू लावले असून प्रत्येक दोन झाडांत दहा फुटाचे अंतर आहे. काही रांगा सोडल्यानंतर बागेत ट्रक येण्याजाण्यासाठी २० फूट अंतर राखून ठेवले आहे. एक रांग माणगा तर दुसरी भोवर वाणाची अशी पद्धत आहे.  बांबूचे मार्केट व विक्री  एक वर्ष आड विक्रीचे नियोजन होते. खोत यांनी बांबूची चांगली विक्री व्यवस्था तयार केली आहे. अनेक व्यापारी थेट बनात येतात. विविध प्रकारचे फर्निचर, वीणकाम, कागद, मंडप आदी कामांसाठी मागणी असते. मिळणारा दर बांबूची जाडी, लांबी व कोणता उपयोग आहे त्यावर ठरतो. नऊ १० फूट लांबीचा बांबू द्राक्ष बागायतदार घेऊन जातात. पाच ते ६ फूट लांबीचा बांबू लाठी फिरवण्याच्या कामासाठी खरेदी होतो. दापोली, रत्नागिरी, संगमेश्‍वर, नाशिक यासह जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी कंद लागवडीसाठी घेऊन जातात.  दर व उत्पन्न 

  • लागवडीनंतर दोन वर्षांनी- 
  • कमी जाडीची काठी- दर १५ ते २० रुपये. (साधारण ६ ते ९ फुटांची) 
  • पाच सेंटिमीटर जाडीचा व चार फूट लांबीचा बांबू- दर ५० रुपये. 
  •  वरचा शेंडा- १५ ते २० रुपये दर 
  • बांबू प्रति कंद- २०० रुपये, 
  • काळ्या मिरीचा प्रयोग  काळे मिरी लागवडीचा प्रयोग नारळ, सुपारीच्या बागेसह सलग क्षेत्रातही केला आहे. मोईच्या झाडांचा आधार तसेच घरालगत सिमेंट खांबाभोवती जाळ्यांचा वापर करून लागवड साधली आहे. वर्षभरापूर्वी लावलेल्या मिरीला फुलोरा आला आहे. या पिकातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.  टिकेला प्रयोगातून उत्तर  सुरवातीच्या काळात बांबूची अतिशय लहान आकाराची काठी तयार झाली. त्याला काय व्यावसायिक मागणी येणार अशा शब्दांत काहींनी टिकाही केली. पण खोत पितापुत्रांनी त्याकडे लक्ष न देता बांबू लागवड व त्यात वाढ सुरूच ठेवली.  पहिली चप्पल पंधराव्या वर्षी  दत्ताराम यांचे वडीलही शेतीच करायचे. त्यांची आर्थिक स्थिती अतिशय हालाखीची होती. चिकाटी, परिश्रम यातून खोत यांनी आपल्या शेतीला आकार दिला. आर्थिक स्थिती सुधारली असली तरी संघर्ष ते विसरलेले नाहीत. आपल्या पायात पहिली चप्पल पंधराव्या वर्षी आली, असे त्यांनी आवर्जून सांगितले. अलीकडे शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे बोलणे कठीण जात आहे. मात्र वहीत बांबू लागवडीचे सारे अनुभव नोंदवून ठेवले आहेत.  आधी जमीन मग घर  खोत यांचे छोटेसे घर आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी घर बांधण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी शेजारील  मालकाने जमीन विक्रीस काढली. मग खोत पितापुत्रांनी आपापसात चर्चा करीत घराचे काम थांबवित जमीन खरेदी केली. त्यातून प्रयोगशीलतेला अजून वाव देण्याचा त्यांचा मानस आहे.  टायरमध्ये मिरची लागवड  गाड्यांचा टायर्सचा वापर करून त्यात मिरची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवले आहे. सुपारीची ८०० झाडे तर नारळ दोन एकरांत आहे. या प्रत्येक पिकातून वर्षाला ६० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतात.  संपर्क - संतोष खोत - ९४२१२३५९१६   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com