शेवडीच्या शिवारात दुष्काळात बहरल्या द्राक्षबागा 

तीन भावांनी मिळून सामूहिक शेततळे खोदले आहे. अस्तरीकरणामुळे त्यात पाणीसाठा होत आहे. यंदा जानेवारीत विहीर आटली. तेव्हापासून शेततळ्यातील पाण्यावर हळद उत्पादन घेतले. प्रत्येकाचे दीड एकर याप्रमाणे एकूण साडेचार एकर द्राक्षबागेला पाणी देता आले. अशोक काळे, शेवडी.
शेवडी येथील सुरेश काळे यांची द्राक्ष बाग
शेवडी येथील सुरेश काळे यांची द्राक्ष बाग

परभणी जिल्ह्यातील सततच्या दुष्काळामुळे सिंचनासाठी पाण्याची वानवा निर्माण होत आहे. परंतु शेवडी (ता. जिंतूर) येथील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी शेततळेनिर्मितीला प्राधान्य दिले. प्लॅस्टिकचे अस्तरीकरण करून शेततळ्यांमध्ये संरक्षित पाणीसाठा जमा करण्याची सुविधा निर्माण केली. यंदाच्या गंभीर दुष्काळी स्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर द्राक्ष बागा तरल्या आहेत. गावशिवारात बहरलेल्या या बागा लक्ष वेधून घेत आहेत .    परभणी जिल्ह्यात अवर्षणप्रवण जिंतूर तालुक्याच्या डोंगराळ भागातील शेवडी गावाची जलयुक्त शिवार अभियानात पहिल्या वर्षी (२०१५-१६) निवड झाली. त्यानंतर शिवारात माथा ते पायथा जलसंधारणाचे उपचार करण्यात आले. त्यातून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण वाढले. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढली. शेतकरी एक पध्दतीतून बहुपीक पध्दतीकडे वळले.  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेवडी येथील शेतकऱ्यांच्या शिवारात आजवर ६८ शेततळ्यांच्या खोदाईची कामे पूर्ण झाली आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेंतर्गत गावातील १२ शेतकऱ्यांनी शेततळ्याला प्लॅस्टिक अस्तरीकरण केले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून संरक्षित पाणीसाठा उपलब्ध होत आहे. यामुळे पावसाच्या खंडकाळात पिकांना संरक्षित सिंचन देता येत आहे. यंदा भीषण दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यातील फळबागा होरपळून गेल्या. परंतु, शेवडी येथील द्राक्षबागा केवळ शेततळ्यातील पाणीसाठ्यावर तरल्या.  विद्युतपंपाशिवाय पाणीउपसा  गावातील विश्वनाथ काळे यांनी दीड कोटी लिटर पाणीसाठवण क्षमतेचे शेततळे उभारले आहे. त्यांनी शेततळ्यावर सौर कृषिपंप बसविला आहे. खुशाल काळे, शंकर काळे, सुधाकर काळे यांनी डोंगराच्या पायथ्याशी सामूहिक शेततळे खोदल्यानंतर त्याला प्लॅस्टिकचे अस्तरीकरण केले. विहिरीत पाण्याची आवक सुरू असताना शेततळे पाण्याने भरून घेतले जाते. शेततळ्याच्या खालील बाजूस ३० ते ३५ फूट खोल जिंतूर- येलदरी राज्य रस्त्याच्या बाजूला काळे यांची जमीन आहे. शेततळ्यात चार इंच आकाराचा पीव्हीसी पाइप टाकून पाणी बाहेर काढण्यात आले. पाइपच्यापुढे प्रत्येकी अडीच इंच आकाराच्या तीन पाइपलाइन्स जोडण्यात आल्या. त्यांना ठिबक संच बसविण्यात आले आहेत. गुरुत्वाकर्षण बलाव्दारे ठिबक संचामध्ये पाणी जाते. सौर ऊर्जा आणि गुरुत्वाकर्षण बलाच्या माध्यामतून या शेतकऱ्यांना विद्युतपंपाशिवाय पिकांना पाणी देणे शक्य झाले आहे.  शेततळ्यातील पाण्यावर बहरल्या द्राक्षबागा  जालना जिल्ह्यातील कडवंची हे द्राक्ष उत्पादक गाव आणि शेवडी यांच्यात भौगोलिकदृष्ट्या साधर्म्य आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे कडवंचीप्रमाणे शेवडीच्या शेतकऱ्यांनीही द्राक्षशेतीवर भर दिला. कडवंचीला भेटी देऊन लागवड ते काढणीपर्यंत अनुभव जाणून घेतले. गेल्यावर्षी शेवडीतील शेतकऱ्यांनी १२ एकरांवर द्राक्ष लागवड केली आहे. कडवंची येथील अनुभवी व्यक्तीची मार्गदर्शक म्हणून नेमणूक केली. येथील शेतकरी आता बाग व्यवस्थापनातील बारकावे अवगत करू लागले आहेत. डॅागरिज खुंटावर माणिक चमन जातीची लागवड झाली आहे. ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन होत आहे. बोदावर पीक अवशेषांचे मल्चिंग केले जात आहे. गेल्यावर्षी ऑगस्टपर्यंतच पाऊस झाला. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. तरीही विहिरीत पाण्याची आवक सुरू असताना शेततळी भरून घेण्यात आली. डिसेंबर- जानेवारीपासून केवळ शेततळ्यातील पाणी वापरले जात आहे. दुष्काळी स्थितीत बहरलेल्या द्राक्षबागा या भागातून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अजूनही शेततळ्यांमध्ये पाणी उपलब्ध आहे.  ॲग्रोवनमधील यशोगाथामुळे झाले कर्जमंजूर  द्राक्षबागेसाठी मंडप, कुंपण उभारणीसाठी अर्थसाह्याची गरज होती. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी जिंतूर येथील भारतीय स्टेट बॅंकेकडे कर्जाची मागणी केली. परंतु, या भागात द्राक्षपीक नसल्याचे कारण सांगत बॅंक व्यवस्थापकांनी कर्ज देण्यास असमर्थता दाखविली. परंतु, शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी फेब्रुवारीत ॲग्रोवनमध्ये प्रसिध्द झालेली शेवडी गावाची जलसंधारणाची यशोगाथा बॅंक व्यवस्थापकांना दाखविली. त्यानंतर व्यवस्थापकांनी शेवडी येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. गावातील सात शेतकऱ्यांना साडेपाच ते सहा लाख रुपये रकमेपर्यंत कर्ज मंजूर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी केलेली गुतंवणूक आणि घेतलेल्या कष्टाचे आता चीज होईल. द्राक्ष उत्पादनातून उत्पन्नाचा नवा पर्याय त्यांना मिळणार आहे.  शेवडी गाव दृष्टिक्षेपात 

  • *भौगोलिक क्षेत्रफळ- ७७२.७५ हेक्टर 
  • *लागवडीलायक क्षेत्र- ६०२ हेक्टर 
  • *द्राक्ष लागवड क्षेत्र- १२ एकर 
  • *फुलशेती- ५० ते ६० एकर 
  • *जिल्ह्यातील प्रमुख झेंडू उत्पादक गाव 
  • जलसंधारण, पाणीसाठवण, पाणीवापर 

  • जलयुक्त शिवार अभियानात निवड- २०१५ 
  • खोल सलग समतळ चर- १४२ हेक्टर 
  • मागेल त्याला शेततळे योजनेतील शेततळी- ६८ 
  • अस्तरीकरण केलेली शेततळी- १५ 
  • ठिबक सिंचनाखाली क्षेत्र- ६० एकर 
  • प्रतिक्रिया द्राक्षे बाग उभारण्यासाठी अर्थसाह्याची गरज होती. ॲग्रोवनमध्ये यापूर्वी प्रसिध्द यशकथा वाचून बॅंक व्यवस्थापकांनी कर्ज मंजूर केले. अन्यथा शेतकऱ्यांचे कष्ट आणि गुंतवणूक वाया गेली असती.  शिवाजी सानप,  ९८२२०५८५८७ 

    .दुष्काळामुळे गेल्या सहा महिन्यांपासून दीड कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यातील संरक्षित पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे दोन एकर द्राक्षबाग जोपासता आली. पेरू, सीताफळ बागांना पाणी देता आले. टरबूज, खरबूजाचे उत्पादन घेतले. अजून पाणी उपलब्ध असल्याने मल्चिंगवर मधुमका, काकडी, दोडक्याची लागवड केली आहे. सीताफळ, पेरू फळबागेत गवार, भेंडी या आंतरपिकांचे उत्पादन घेत आहोत. पाणी उपसण्यासाठी शेततळ्यावर सौरपंप बसविला आहे .त्यामुळे वीज भारनियमनाच्या काळात पाणी देता येत आहे.  विश्वनाथ काळे,  ८३२९७४३८३२   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com