वनझाडांच्या तोडीमुळे मातीतून स्फुरदाचे प्रमाण होते कमी

जंगलातील झाडांच्या तोडीमुळे मातीतून स्फुरदाचे प्रमाण होते कमी
जंगलातील झाडांच्या तोडीमुळे मातीतून स्फुरदाचे प्रमाण होते कमी

उत्तम लाकडाच्या अपेक्षेने सातत्याने होत असलेल्या तोडीमुळे उष्ण कटिबंधीय जंगलातील मातीमध्ये अन्नद्रव्यांचे, विशेषतः स्फुरदाचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. भविष्यामध्ये या कमतरतेचा फटका जंगलांतील झाडांच्या वाढीला बसणार आहे. दीर्घकालीन शाश्वत प्रकारे लाकडांच्या उपलब्धतेसाठी योग्य ते धोरण आखण्याची आवश्यकता केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केली आहे. हे संशोधन जर्नल ग्लोबल चेंज बायोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. उष्ण कटिबंधीय जंगलामध्ये लाकडांसाठी झाडांची तोड आणि पुन्हा त्यांची वाढ करणे ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. मात्र, या झाडांची पाने कडक होत असून, झाडांच्या वाढीसाठी आवश्यक स्फुरद आणि नत्राची कमतरता पूर्वीच्या झाडांच्या तुलनेमध्ये या नव्या झाडांना अधिक जाणवत आहे. सातत्याने होणाऱ्या तोडीमुळे जंगलाच्या परिस्थितिकीमधील स्फुरदाचे प्रमाण प्रचंड वेगाने कमी झाले आहे. अन्नद्रव्यांचे प्रमाण हे पर्यावरणातील अत्यल्प पातळीवर पोचले आहे. त्याविषयी माहिती देताना केम्ब्रिज विद्यापीठातील संवर्धन संशोधन संस्थेतील वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. टॉम स्विनफिल्ड यांनी सांगितले, की लक्षावधी वर्षांपासून वाढत आलेल्या जंगलातील मोठमोठ्या झाडांची लाकडासाठी तोड होत आली आहे. सातत्याने होणाऱ्या तोडीमुळे सध्या अपरिवर्तनीय बदल जाणवत आहेत. झाडांच्या मुळांद्वारे शोषल्या जाणाऱ्या मुख्य अन्नद्रव्यांतील स्फुरद हा प्रामुख्याने जमिनीतील दगडामधून (रॉक फॉस्फेट) घेतला जातो. झाडे तोडल्यानंतर त्यांच्या लाकडाद्वारे, वायूंच्या उत्सर्जनाद्वारे आणि मातीचा ऱ्हास याद्वारे अन्नद्रव्यांचाही ऱ्हास होतो. केवळ सातत्याने झाडे तोडल्यामुळे उपलब्ध स्फुरदाच्या ऱ्हासाचे प्रमाण ३० टक्क्यांइतके असल्याचा अंदाज आहे.

जंगलाच्या तोडीनंतर पुन्हा झाडे वाढण्याच्या काळामध्ये आम्ही पानांतील रासायनिक घटकांमध्ये पडणारा फरक तपासला. त्यामध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण खाली जात असल्याचे दिसून आले. काही प्रमाणात या झाडांच्या प्रजातींनी कमी अन्नद्रव्यांच्या स्थितीली जुळवून घेतले असले तरी त्यातून जमिनीतील घसरत्या स्फुरदाकडे आपले लक्ष वेधले आहे. भविष्यामध्ये जंगलाच्या पुनर्वाढीमध्ये अनेक अडचणी उद्‍भवू शकतील, याचीच चिन्हे दिसत आहेत. असा केला अभ्यास

  • अभ्यासासाठी संशोधकांनी छोट्या विमानातून लिडार संचलित इमेजिंग स्पेक्टोग्राफी या तंत्राचा वापर करून आग्नेय बोर्नेय येथील जंगलांची छायाचित्रे काढली. या पद्धतीमध्ये रिमोट सेन्सिंग, लेसर स्कॅनर आणि उच्च दर्जाचा विश्वासार्ह कॅमेरा यांचा समावेश होता. त्याद्वारे प्रकाशाच्या तरंगांची हजारो मोजमापे घेता येतात.
  • पहिल्या टप्प्यामध्ये जंगलातील ७०० झाडांतील अन्नद्रव्यांचे प्रमाण मिळवण्यात आले, त्याद्वारे त्याचा नकाशा बनवण्यात आला.
  • विशेषतः ज्या भागामध्ये सातत्याने तोड होत आहे आणि जिथे अद्यापही जुनी झाडे आहेत, अशा भागातील अन्नद्रव्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
  • भविष्यासाठी धोक्याची घंटा... उष्ण कटिबंधीय जंगलामध्ये निवडक तोड ही सातत्याने सुरू असते. मात्र, त्यामुळे मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण हे वेगाने कमी होत आहे, या बाबीकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. नव्याने वाढत असलेल्या झाडांनी काही प्रमाणात या स्थितीशी जुळवून घेतले असले, तरी भविष्यामध्ये याच दराने अन्नद्रव्ये कमी होत राहिल्यास जंगलासाठी धोक्याची घंटा वाजणार आहे. प्रो. डेव्हिड कुम्स यांनी सांगितले, की स्फुरदाची कमतरता ही जागतिक पातळीवरील महत्त्वाची समस्या ठरणार आहे. कारण त्याचा परिणाम माणसांच्या आरोग्यावरही पडणार आहे. जंगलांचे संवर्धन या विषयासोबतच अन्नद्रव्यांचा विचारही गांभीर्याने केला पाहिजे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com