तपासा मातीच्या कणांची घनता, सच्छिद्रता

सच्छिद्रतेनुसार मातीची गुणवत्ता
सच्छिद्रतेनुसार मातीची गुणवत्ता

गेल्या काही वर्षांमध्ये जमिनीची सुपीकता वेगाने कमी होत आहे. पीक उत्पादन आणि गुणवत्तेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन अॅग्रोवनने २०१८ हे वर्ष जमीन सुपीकता वर्ष म्हणून जाहीर केले आहे. आजपासून दर शनिवारी विशेष लेखमालेच्या माध्यमातून मातीच्या कणांची मूलभूत रचना आणि त्यांची वनस्पती, पाणी, अन्य घटकांशी असलेले संबंध आणि सेंद्रिय कर्ब वाढविण्याच्या उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती देत आहोत. पिकाची उत्पादकता वाढ या उद्देशाने १९६० पासून विविध योजना राबविण्यात आल्या. त्यामध्ये नव्या पीक जाती आणि रासायनिक खतांचा वापर याला प्राधान्य देण्यात आले. त्यातून काही काळ उत्पादकता मिळाली असली तरी पुढे त्यात घट होत गेली. तुलनेने उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली. कारणांचा शोध घेताना मातीचे आरोग्य जपण्यामध्ये दुर्लक्ष झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. भारतात हरितक्रांतीचे मुख्य केंद्र राहिलेल्या पंजाबमध्ये हे मोठ्या तीव्रतेने दिसून आले. जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेमुळे मोठ्या क्षेत्रावरील जमिनीची सुपिकता खालावली आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मातीची जडणघडण प्रत्येक शेतकऱ्याने अत्यंत बारकाईने जाणून घेण्याची आवश्यकता आहे. या जडणघडणीतूनच जमिनीचा पोत, सुपीकता आणि शाश्वता जपणे शक्य होईल.

सच्छिद्रता मातीच्या दोन कणांमध्ये मोकळ्या असलेल्या जागा म्हणजे मातीची सच्छिद्रता होय. हा भाग प्रामुख्याने हवा व पाणी यांनी व्यापला जातो. ५० टक्के सच्छिद्रता, ४५ टक्के खनिज कणांची संख्या व ५ टक्के सेंद्रिय पदार्थ असे वितरण असल्यास, ती माती किंवा जमीन आदर्श म्हणून गणली जाते. मातीची सच्छिद्रता ही रचना, पोत, खोली, मशागत, पीक पद्धती, जमिनीवरील दबाव व व्यवस्थापन अशा अनेक बाबींशी जोडलेली असते. जमिनीच्या कणांच्या प्रमाणानुसार त्यामध्ये पाण्याचा प्रवेश होतो. म्हणजेच मातीच्या सच्छिद्रतेवर पाण्याची धारणक्षमता ठरते. मातीमध्ये जेवढी मोठी पोकळी किंवा सच्छिद्रता तेवढी पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता अधिक होते. कारण या मोकळ्या वातावरणातच जिवाणूंच्या प्रक्रिया, मुळांची श्‍वसनक्रिया यासारख्या सकारात्मक बाबी घडतात. त्या पिकाच्या उत्पादकतेसाठी पर्यायाने जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्‍यक ठरतात. जमिनीची स्थूल घनता आणि मातीतील सच्छिद्रता या दोन भौतिक बाबी मातीच्या एकूण जडणघडणीशी संबंधीत आहेत. त्यावरच पिकांचे व्यवस्थापन, सेंद्रिय पदार्थ, मातीवरील अधिभार, मशागत असे घटक अवलंबून असतात.

घनता मुख्य घनता/स्थूल घनता (Parent density/Bulk density) ः मातीचे कण आणि त्यामध्ये उपलब्ध असलेल्या पोकळ्या किंवा मोकळ्या छिद्रांनी व्यापलेल्या एकूण भागाला मुख्य घनता असे म्हणतात. या पोकळीमध्ये हवा व पाणी सामावले जाते. थोडक्यात, प्रति घनफळ मातीच्या प्रमाणात बसणाऱ्या मातीचे वजन म्हणजे स्थूल घनता (बल्क डेन्सिटी) होय. त्याचे एकक ग्रॅम प्रति घन सें.मी. असे असते. मातीतील पोकळीच्या प्रमाणानुसार सामान्यतः मातीचे तीन प्रकार पडतात.

रचना

  • मातीच्या कणांची रचना, भौतिक प्रकार (Texture), सेंद्रिय पदार्थाची उपलब्धता, जमिनीतील दबाव, मशागतीचे प्रकार यासारख्या बाबी मातीच्या घनता ठरविण्यासाठी कारणीभूत ठरतात.
  • मातीच्या कणाची घनता (Particle density) ही साधारणतः २.६ ते २.६५ ग्रॅम प्रति घन सेंमी समजली जाते. यापेक्षा जास्त घनता येत असल्यास हॉर्नब्लेड व झीरकॉन सारख्या खनिजाचे प्रमाण जास्त असते.
  • मातीची मुख्य घनता १.१ ते १.३ च्या दरम्यान असल्यास अत्यंत उत्तम मानली जाते. (तक्ता पहा) मुख्य घनता जेवढी कमी तेवढी जमीन ही कसण्यासाठी, पिकासाठी, उत्पादकतेसाठी अतिशय उत्तम असते.
  • मातीची मुख्य घनता ही कणाच्या घनतेसमान म्हणजेच २.० च्या वर २.६५ पर्यंत जात असल्यास या जमिनीमध्ये मशागतीची आवश्यकता असते. ही मशागत आपण घेत असलेल्या मुळांची विस्तार लक्षात घेऊन, तेवढ्याचे प्रमाणात वरील सुपीक मातीचा थर बिघडणार नाही, अशा प्रकारे करावी.
  • मुख्य घनता, घनीकरण व सच्छिद्रता यातील सहसंबंध

    मातीच्या घनीकरणाचे परिमाण मुख्य घनता (gcc-3)   एकूण सच्छिद्रता संख्या (टक्के) मोठ्या छिद्राची संख्या (टक्के) छिद्राची संख्या (टक्के)
    कमी    १.३१    ५०.४  २१.५ २९.०
    मध्यम १-४९  ४३.७ १५.८ २७.९
    जास्त      १.६४  ३८.१ १०.९   २७.२

    संपर्क : डॉ. मेहराज अजीज शेख, ९९७०३८७२०४, (मृदाशास्त्रज्ञ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com