उत्कृष्ठ कापूस व्यवस्थापनाचा पाटील यांचा आदर्श

कपाशीच फायदेशीर पाटील सांगतात की आमच्या भागात क्षारवट जमिनी आहेत. माती व पाण्याचा पीएच सातच्या पुढे म्हणजे साडेसात ते आठपर्यंत आहे. या भागात अन्य पिकांच्या पर्यायापेक्षा कापूसच फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव आहे. दरवर्षी माती परीक्षण, तर तीन वर्षांनी पाणी परीक्षण करतो. कपाशीनंतर दादर ज्वारीचे हुकमी पीक घेतो. गव्हाचाही पर्याय घेतो. गव्हाचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन घेतो.
देवेंद्र पाटील यांचा बहरलेला कापूस
देवेंद्र पाटील यांचा बहरलेला कापूस

जळगाव जिल्ह्यातील घाडवेल येथील देवेंद्र पाटील हे उत्कृष्ट व्यवस्थापन व तंत्रशुद्ध पद्धतीने पूर्वहंगामी बीटी कपाशी पिकाचे उत्पादन घेण्यात माहीर समजले जातात. दरवर्षी सुमारे ३० ते ३५ एकरांत त्यांची कपाशी असते. गुलाबी बोंड अळीचे संकट ओळखून त्यांनी व्यवस्थापनात नवे बदल करून आपली उत्पादकता कायम ठेवली आहे. खत व्यवस्थापन, कीडनियंत्रण यावर त्यांचा विशेष कटाक्ष असतो. अवर्षणप्रवण स्थिती व अतिवृष्टीसंबंधी उपयोगी ठरणारे गादीवाफा व घनदाट लागवड तंत्रही त्यांनी कौशल्याने राबविले आहे.  जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका कापूस उत्पादनासाठी आघाडीवर आहे. याच तालुक्‍यात तापी नदीकाठच्या पाण्याचा लाभ पोचलेल्या घाडवेल येथे देवेंद्र पाटील यांची सुमारे ५० एकर शेती आहे.  वडील खेमराज पारंपरिक पद्धतीने कापसाचे उत्पादन घ्यायचे. देवेंद्र यांनी मुक्त विद्यापाठीतून कृषी पदवी घेतली, त्यामुळे शेतीतील तांत्रिक विचारांची बैठक पक्की होण्यास मदत झाली. त्यानुसार पीक व्यवस्थापनात किफायतशीर बदल करण्यास सुरवात केली.  पाटील यांची शेती - (ठळक बाबी) 

  • काळी कसदार जमीन. दरवर्षी सुमारे ३० ते ३५ एकरांत बीटी कापसाची लागवड. 
  • भाडेतत्त्वावर सुमारे १५ एकर शेती. त्यात मूग, उडीद 
  • सुमारे २० एकर कोरडवाहू. पूर्वहंगामी २५ मे ते १५ जूनपर्यंत लागवड. 
  • अलीकडे सघन लागवडीवर भर देण्याचा प्रयत्न आहे. 
  • जमीन नांगरणी व भुसभुशीत करण्यावर भर. 
  • पाणी  पाच बोअर्स, तसेच १५ ते २० एकरांत ठिबक सिंचनाचा वापर. काही क्षेत्रात पाट पद्धतीने सिंचन.  सिंचनासाठी जादा पाण्याचा वापर टाळण्यावर कटाक्ष, त्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक. ठिबकमधून दररोज फक्त तासभर देतात पाणी. पाट पद्धतीने सिंचनाच्या पिकात लागवडीपूर्वी क्षेत्र भिजवून घेतात.  लागवड 

  • चार बाय एक किंवा चार बाय दीड फूट अंतरावर लागवड 
  • एकरी सुमारे दीड पॅकेट बियाण्याचा वापर. 
  • बियाणे प्रक्रियेवर भर देतात, तणनाशकाचाही वापर, त्यामुळे सुरवातीच्या २५ ते ३० दिवसांत तणांच्या समस्येशिवाय कापसाची जोमदार वाढ साध्य करण्यात यश. 
  • काळ्या कसदार व पाण्याचा निचरा कमी होणाऱ्या क्षेत्रात गादीवाफ्यावर लागवड. 
  • यंदाच्या अतिवृष्टीत कापसाचे नुकसान कमी. पाण्याचा ताण असल्यास वाफसा स्थिती बऱ्यापैकी राखण्यास मदत. काळ्या कसदार जमिनीत पिकाची अनावश्‍यक वाढ रोखण्यासह फांद्यांची संख्या वाढविण्यासाठी वाढ नियंत्रकांचा वापर. 
  • जमिनीची गरज व पिकांची स्थिती लक्षात घेऊन खतांच्या मात्रांची निश्‍चिती. सुरवातीला एकरी एक गोणी १--२६-२६ व एक गोणी युरियाचा वापर. दुसरा डोस ३५ दिवसांत पिकांची स्थिती लक्षात घेऊन. 
  • द्रवरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबकमधून व ड्रेंचिंगद्वारे. कैऱ्या लगडल्यानंतर तिसरा डोस. 
  • पीक संरक्षण 

  • आपल्या तांत्रिक ज्ञानाचा, अभ्यासाचा उपयोग कीड नियंत्रणात करून घेतला आहे. शिवाय कृषी विभागाच्या आत्मा व कीड-रोग सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. शत्रू व मित्रकीटक यांची ओळख असल्याने कीडनाशकांचा उपयोग करताना खबरदारी घेतात. 
  • म्हणूनच त्यांच्या शेतात लेडीबर्ड बिटल, क्रायसोपर्ला आदी मित्रकीटक दिसून येतात. 
  • कीडनाशकांच्या नियंत्रित व कार्यक्षम वापरावर भर. 
  • गुलाबी बोंड अळीचा धोका लक्षात यावा यासाठी लागवडीनंतर ६५ दिवसांत कामगंध सापळ्यांचा एकरी चार ते पाच यानुसार वापर. सापळ्यात चार ते पाच पतंग आढळले तर अंडीनाशक, कीटकनाशक किंवा निंबोळी अर्काची निश्‍चित मात्रेनुसार फवारणी. हा अर्क ते स्वतः घरी तयारही करतात. 
  • पिकाच्या विविध स्थिती लक्षात घेऊन एकूण चारपर्यंतच फवारण्या घेतात. प्रत्येक फवारणीत 
  • कडुनिंब अर्काचा वापर. सप्टेंबरअखेरपर्यंत फवारण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न. 
  • किडींना रोखण्यासाठी नैसर्गिक पक्षिथांबे म्हणून मक्‍याची ठिकठिकाणी लागवड. अमेरिकन लष्करी अळी आढळल्यास ती मजुरांकरवी वेचून नष्ट करतात. 
  •  किडींचे धोके लक्षात घेण्यासाठी पिकात चवळी, झेंडू व अंबाडीची काही प्रमाणात लागवड. 
  • पिवळ्या झेंडूवर किडीचा पतंग अंडी घालतो, त्यावरून किडीचा अंदाज व नुकसानीची पातळी समजते. 
  •  पांढरी माशी ऑक्‍टोबरमध्ये येते असे निरीक्षण, त्या काळात चिकट सापळ्यांचा वापर. 
  • दरवर्षी बीटी कपाशीभोवती रेफ्युजी नॉनबीटी बियाणे लावण्याचा कटाक्ष असे. यंदा बीटी बियाण्यांसोबत हे बियाणे मिक्स करून देण्यात येत आहे. 
  • कापसात फेरपालट आवर्जून करतात. ज्वारी, हरभरा, गहू, बाजरी या पिकांच्या बेवडला प्राधान्य. 
  •  पीक अवशेषांचा खत म्हणून वापर. गुलाबी बोंड अळीचा धोका लक्षात घेऊन डिसेंबरच्या मध्यात किंवा अखेरीस कापूस पीक काढून पऱ्हाटी नष्ट करतात. 
  • आश्‍वासक उत्पादन  दरवर्षी देवेंद्र यांना कोरडवाहू कापसाचे एकरी ८ क्विंटल, तर बागायती कापसाचे १२ क्विंटल उत्पादन मिळते. दरवर्षी खर्च वजा जाता एकरी १५ हजार रुपये हाती येतात. क्षेत्र ३० एकरांपेक्षा अधिक असल्याने  उत्पन्नाचा ताळमेळ जुळतो.  दहा एकरांत मूग  पाटील दरवर्षी सुमारे १० एकरांत मूग घेतात, त्याचे एकरी २.५ ते ३ क्विंटल उत्पादन मिळते.  जसे दर असतील त्याप्रमाणे बाजार समितीत किंवा बियाणे म्हणून विक्री होते. बियाण्याची विक्री क्विंटलला पाच हजार रुपये दराने होते. हाच मूग बाजार समितीत विकला तर ३५०० ते ४००० रुपये दर मिळतो. पाटील जय गुरुदेव कृषी विकास गटाद्वारे कार्यरत आहेत. कपाशी पिकातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही ते सक्रिय सहभागी असतात.  संपर्क - देवेंद्र पाटील - ७३५०९९४८१५ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com