लोकसहभागातून धामणगावने साधला कायापालट 

गावाचा विकास हाच मुख्य उद्देश ठेवून कार्यरत आहोत. प्रत्येक ग्रामस्थाची मोलाची साथ मिळते. अधिकाधिक लोकसहभाग वाढवून गावाने मिळवलेला लौकिक कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे.पुढील काळात धामणगाव हे पर्यटनस्थळ बनवण्याच्या दृष्टीने कामे सुरू आहेत. -धनराज पाटील,सरपंच, धामणगाव
गावात झालेले वृक्षारोपण तसेच विजेसाठी सौर पॅनेलची सुविधा
गावात झालेले वृक्षारोपण तसेच विजेसाठी सौर पॅनेलची सुविधा

लातूर जिल्ह्यातील धामणगाव या छोट्याशा गावाने लोकसहभागातून गावाचा कायापालट केला आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीतून स्वच्छ परिसर, सुंदर, पर्यावरण संतुलित गावाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. बिनविरोध सरपंचाची परंपराही कायम ठेवण्याबरोबरच पंचायत समिती स्तरापासून ते राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव अशी भरारी घेतली आहे.  लातूर जिल्ह्यात धामणगाव (ता. शिरूर, अनंतपाळ) हे घरणी मध्यम प्रकल्पाच्या शेजारी वसलेले गाव आहे. त्यामुळे परिसरातील शिवाराला बारा महिने पाणी मिळते. ग्रामस्थांनी एकत्र येत आपल्या गावाची प्रगती करण्याचा ध्यास घेतला. एकदा निश्‍चय झाला व सर्वांची साथ मिळाली की कायापालट होण्यास असा किती उशीर लागतो? धामणगावबाबत हेच झाले.  वृक्ष लागवड व संवर्धन  पर्यावरण संतुलनाचे महत्त्व समजलेले धामणगावचे ग्रामस्थ केवळ वृक्ष लागवड करून थांबले नाहीत. लोकसंखेच्या दुप्पट त्यांनी वृक्षांची लागवड केली. सध्या रस्त्यांच्या दुतर्फा, रिक्त जागेत साडेतीन  हजारांपेक्षा जास्त झाडे आहेत. त्यात नारळाच्या झाडांची संख्या अधिक आहे. प्रत्येक कुटुंबाकडे झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण गाव हिरवाईने नटलेले दिसते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते नुकतीच स्मशानभूमीत मियावाक तंत्रज्ञानाच्या साह्याने वृक्ष लागवड करण्यात आली.  सरपंच बिनविरोध  धामणगावची ग्रामपंचायत १९७१ मध्ये अस्तित्वात आली. तेव्हापासून आजपर्यंत ग्रामपंचायतीची निवडणूक झालीच नाही. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आरक्षणनिहाय बिनविरोध सरपंच व सदस्य निवडतात. त्यामुळे गावात गटातटाचे राजकारण नाही.  सौर पॅनलमुळे कायम वीज  वीज भारनियमनावर कायमचा उपाय म्हणून म्हणून ग्रामपंचायतीने हनुमान मंदिराच्या छतावर  सौर पॅनल यंत्रणा बसवली असून, त्यापासून दिवसाला १७ किलोवॉट वीजनिर्मिती होते. त्याआधारे  ग्रामपंचायतीसह अंगणवाडी, पिठाची गिरणी, आरओ फिल्टर व तलाठी कार्यालयांना अखंड विद्युत पुरवठा होत आहे.  एक गाव एक स्मशानभूमी  सर्व जाती-धर्मांत एकोपा राहावा, यासाठी साडेचार एकरांवर एकच स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. फुले, नारळ, आंब्याच्या झाडांची लागवड करण्यात आली असून, परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. एक कूपनलिका व शेततळे घेतले असून, त्यातील पाण्यावर झाडांचे संगोपन केले जाते.  गावातील तंटे गावातच मिटवण्यावर भर  गावात पूर्वीपासूनच एकोप्याचे वातावरण आहे. त्यामुळे फारसे तंटे होत नाहीत. गावाने ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियाना’तही चांगले काम केले आहे. सन २००८ मध्ये त्यातील कामांसाठी अडीच लाख रुपयांचे बक्षीसही पटकावले आहे.  डिजिटल शिक्षणाची दारे उघडली  पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या इथल्या जिल्हा परिषद शाळेने विविध उपक्रमांद्वारे आपली ओळख निर्माण केली. शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्यांच्या पाल्यांना डिजिटल शिक्षणाची दारे उघडण्याचे काम या शाळेने केले. स्वच्छ परिसर, विद्यार्थ्यांना शुद्ध पाणीव्यवस्था, सुसज्ज संगणक कक्ष, अद्ययावत इमारत आदी सोयी आहेत. सन २०१२-१३ मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत साने गुरुजी स्वच्छ प्राथमिक शाळा स्पर्धेत सर्वोकृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक शाळेने पटकावले आहे.  जलसंधारण व शेतीविकास  शेतीच्या विकासासाठी ग्रामपंचायत सातत्याने पुढाकार घेते. या भागात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने २०१८ मध्ये ऊस परिषदेचे आयोजन करून शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात आले.  कृषी विभागाच्या मदतीनेही अन्य पिकांविषयी मार्गदर्शन देण्यात येते. गावाशेजारील दोन नद्यांचे जलयुक्त शिवार अंतर्गत तीन किलोमीटरचे नाला रुंदी-खोलीकरण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून पाणीपातळीत वाढ झाली आहे.  सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर  गावात स्वच्छता टिकून राहावी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, चोरी होऊ नये यासाठी आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्वरित समज दिली जाते.  राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव  धामणगावाने स्वच्छता अभियानात लागोपाठ पुरस्कार मिळवले. सन २०१६-१७ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सरपंच धनराज पाटील, ग्रामसेवक चंद्रकांत हुडगे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री, राज्यपाल, ग्रामविकास मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते. या सन्मानामुळे अधिक काम करण्याची ऊर्जा आम्हाला मिळाल्याचे सरपंच सांगतात.  गावाला मिळालेले पुरस्कार 

  • तंटामुक्त ग्राम 
  • निर्मल ग्राम पुरस्कार 
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय पुरस्कार. 
  • स्मार्ट ग्राम पुरस्कार 
  • -शाहू-फुले स्वच्छ सुंदर दलित वस्ती जिल्ह्यात प्रथम पुरस्कार. 
  • धामणगाव दृष्टिक्षेपात 

  • एकूण क्षेत्र- ४९५ हेक्टर 
  • लागवड क्षेत्र- ३१० हेक्टर 
  • प्रमुख पिके- ऊस, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू. 
  • ठिबकखालील क्षेत्र- २७० हेक्टर 
  • लोकसंख्या- १५३४ 
  • शौचालय असलेली कुटुंब संख्या - २६७ 
  • शोषखड्डे- २०१ 
  • विकास कामे- ठळक बाबी 

  • संपूर्ण गाव हागणदारीमुक्त 
  • अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण. 
  • रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड. 
  • संपूर्ण बंदिस्त गटारी. 
  • विजेची सोय. हायमास्ट दिवे दोन, ४५ एलईडी बल्ब व १५ सौरदिवे. 
  • ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकनाचा दर्जा. 
  • दररोज सकाळी घंटागाडीने गावातील कचरासंकलन. 
  • सन २००७ पासून स्वच्छता व वृक्षारोपणाची कामे आजगायत सुरू. 
  • नावीन्यपूर्ण उपक्रम 

  • कुटुंबातील मुलीच्या लग्नाला ग्रामपंचायतीकडून दहा हजार रुपये दिले जातात. 
  • दररोज सकाळी साडेआठ वाजता सार्वजनिक राष्ट्रगीत. 
  • शंभर टक्के कर भरणाऱ्याला मोफत शुद्ध पाणी व दळण 
  • संगणकीकृत ग्रामपंचायत. सर्व १८ प्रकारचे दाखले संगणकीकृत दिले जातात. 
  • सरपंच धनराज पाटील यांनी देहदानाचा संकल्प करून आदर्श निर्माण केला. 
  • जलपुर्भरणातून दुष्काळातही पाणीटंचाईवर मात 
  • ग्रामस्थांची एकी हाच विकासाचा मूलमंत्र 
  • प्रतिक्रिया  ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेमुळे गावाचा विकास होऊ शकला. ग्रामपंचायतीची सर्व कामे पारदर्शक होत असल्याने विकासकामांत कुठलाच अडथळा येत नाही. सर्व शासकीय योजना आम्ही प्रभावीपणे राबवित असतो.  -चंद्रकांत हुडगे- ९७६५८८८४०२  ग्रामविकास अधिकारी. 

    संपर्क- धनराज पाटील- ९८५१९९७७७७  सरपंच, धामणगाव   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com