उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे अर्थकारण

बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि. पुणे) येथील शेतकऱ्यांनी काकडीच्या लागवड कालावधीमध्ये बदल केला. ऐन उन्हाळ्यात मुंबई बाजार समितीत पुरवठ्याचे नियोजन करून त्यांनी चांगला दर मिळविण्यास सुरुवात केली. अलीकडील वर्षांतील सातत्यपूर्ण प्रयोगातून गावात सुमारे ७० एकर क्षेत्रावर लागवड तर दररोज सुमारे १० टन काकडीचा पुरवठा होत गावचे अर्थकारण समृद्ध होण्यास मदत झाली आहे.
धामणखेल गाव दर्जेदार काकडीसाठी प्रसिध्द आहे.
धामणखेल गाव दर्जेदार काकडीसाठी प्रसिध्द आहे.

बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि. पुणे) येथील शेतकऱ्यांनी काकडीच्या लागवड कालावधीमध्ये बदल केला. ऐन उन्हाळ्यात मुंबई बाजार समितीत पुरवठ्याचे नियोजन करून त्यांनी चांगला दर मिळविण्यास सुरुवात केली. अलीकडील वर्षांतील सातत्यपूर्ण प्रयोगातून गावात सुमारे ७० एकर क्षेत्रावर लागवड तर दररोज सुमारे १० टन काकडीचा पुरवठा होत गावचे अर्थकारण समृद्ध होण्यास मदत झाली आहे.    पुणे जिल्ह्यात धामणखेल (ता. जुन्नर) हे प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव आहे. विविध फुले आणि भाजीपाला पिकांसह डाळिंब देखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बाजारपेठांच्या मागणीनुसार नवे प्रयोग आणि पीक पद्धतींमध्ये बदल करण्यात इथले शेतकरी कुशल आहेत. याबाबत बोलताना गावातील शेतकरी बाळकृष्ण वर्पे म्हणाले, की ‘वडज धरणातून जलउपसा योजना राबविल्यामुळे गावातील शेती बागायती झाली आहे. दहा वर्षांपूर्वीपर्यंत फेब्रुवारीत लागवड करून एप्रिल मेमध्ये काकडी काढणीला येत असे. नेमक्या याच दरम्यान राज्याच्या विविध भागांतून विशेषतः सोलापूर जिल्ह्यातून काकडीची वाशी (मुंबई) बाजार समितीमध्ये आवक व्हायची. यामुळे दर चांगले मिळत नसत. यावर उपाय शोधताना काकडी फेब्रुवारी- मार्च आणि एप्रिलच्या मध्यान्हापर्यंत कशी सुरू होईल यावर विचार सुरू केला. वर्पे म्हणाले, की दहा वर्षांपूर्वी लौकी (मंचर) येथील एका कंपनीच्या काकडीच्या प्रक्षेत्राला भेट देण्याचा योग आला. डिसेंबरला लागवड होऊन या काकडीचे फेब्रुवारीत उत्पादन सुरू व्हायचे. थंडीत काकडीची रोपे चांगली उगवत नाहीत, मुळांची वाढ होत नाही. रोपांची मरतुक आणि वाढ व्यवस्थित न झाल्याने उत्पादन चांगले मिळत नसल्याचा आमचा समज या प्रक्षेत्राला भेट दिल्याने दूर झाला. असाच प्रयोग राबविण्याचे ठरवले. पहिला प्रयोग नियमित काकडी घेणाऱ्या खंडू भोर, रवींद्र जाधव, राजू कोंडे व वर्पे अशा चौघांनी प्रत्येकी दीड- दोन एकरांत प्रयोग करण्याचे ठरवले. बी लावले तर थंडीमुळे लवकर उगवणार नाही आणि मरतुक देखील जास्त होईल. हे टाळण्यासाठी १५ जानेवारी दरम्यान पॉलिहाउसमधील रोपवाटिकांमध्ये रोपे करण्यासाठी नियोजन केले. त्यानुसार १५ दिवसांची रोपे बेड व मल्चिंग पेपर यांचा वापर करून लावली. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार निविष्ठांचा वापर केला. फेब्रुवारीच्या अखेरीस उत्पादन सुरू झाले. याच कालावधीत बाजारपेठेत काकडीची टंचाई जाणवू लागल्याने प्रयोगातील शेतकऱ्यांचा फायदा झाला. दर चांगले मिळत गेले. क्षेत्र पोचले ७० एकरांवर बघता बघता गावातील उन्हाळी काकडीचे हे क्षेत्र आता ७० एकरांपर्यंत पोहोचले आहे. एकमेकांशी चर्चा करून क्षेत्र उपलब्ध होईल त्याप्रमाणे लागवडी होतात. जानेवारी- फेब्रुवारीत लागवड होऊन एप्रिल अखेरपर्यंत काकडीचा पुरवठा सुरू असतो. ही पीक पद्धती सुरू झाल्यापासून कोणत्याच वर्षीच्या हंगामात अपयश शक्यतो आले नसल्याचे शेतकरी सांगतात. सरासरी प्रति किलो २० ते २२ रुपये दर मिळतो. तर सर्वाधिक ३२ रुपये दर मिळाला. धामणखेल काकडीची शेती दृष्टिक्षेपात

  • उत्पादन सुरू झाल्यावर साधारण दिवसाआड तोडणी. प्रति तोडणीला ५०० किलो, एक ते दीड टन माल मिळतो. साधारण एकूण २० तोडे होऊन एकरी २० टनांपर्यंत उत्पादन मिळते.
  • एकरी उत्पादन खर्च किमान ७० हजार रुपये असतो.
  • मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन व दर्जेदार रोपांची लागवड
  • पूर्वी मांडवाशिवाय जमिनीवरच काकडी सोडली जात असे. आता मांडवावर वेल चढविले जातात. यामुळे काकडीचा दर्जा राखला जातो.
  • क्षेत्र वाढल्याने हंगामात दररोज १० टन काकडीचा पुरवठा मुंबई बाजार समितीमध्ये करणे गावाने शक्य करून दाखवले आहे. दोन
  • महिन्यांच्या काळात साधारण १० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होते.
  • काही शेतकरी काकडीनंतर उन्हाळी टोमॅटोची लागवड गुढीपाडव्याला करतात. जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात खुल्या बाजारामुळे गावातील टोमॅटोचे क्षेत्रही १०० एकरांपर्यंत पोहोचले आहे.
  • काही शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीचा प्रयोग केला आहे. त्याचे चांगले परिणाम दिसत असून, उत्पादन आल्यानंतरच त्याची यशस्विता सिद्ध होईल.
  • व्यावसायिक पिकांची विविधता देखील गावात दिसू लागल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे आहे. लहान, मोठे ट्रॅक्टर तसेच स्वयंचलित अवजारांचा वापर वाढला आहे.
  • चारचाकी वाहने, बंगले शेत शिवारात बांधले जात आहेत.
  • -शेतकऱ्यांची मुले अभियांत्रिकीबरोबरच शेतीतील उच्च शिक्षण घेत आहेत.
  • प्रतिक्रिया गावात वडज धरणावरून १५ वर्षांपूर्वी केलेल्या सहकारी उपसा सिंचन योजनेमुळे वर्षभर सिंचनाची सोय झाली आहे. यामुळे बारमाही भाजीपाल्यासह डाळिंब शेती वाढली आहे. मी मनुष्यबळाअभावी केवळ कांदा घेतो. मात्र गावातील शेतकऱ्यांनी थंडीत काकडी लावून मार्च- एप्रिलमध्ये उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. मुंबई बाजार समितीत टंचाईच्या काळात आमच्या गावच्या काकडीचा पुरवठा असतो. -संतोष जाधव सरपंच, धामणखेल गावातील शेतकऱ्यांचे नियोजन पाहून दोन वर्षांपासून उन्हाळी काकडी घेण्यास सुरुवात केली आहे. यंदा बोअरवेल घेत पाण्याची उपलब्धता झाल्याने दीड एकरांत लागवड आहे. -अनिकेत वर्पे, युवा शेतकरी मार्च-एप्रिलमध्ये वाशी बाजार समितीत काकडीची आवक तुलनेने कमी असते. याच दरम्यान धामणखेल गावातून आवक सुरू होते. त्यास किलोला २० ते २२ रुपये दर मिळतो. यानंतर एप्रिल- मे मध्ये नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आणि मुरबाड येथून आवक सुरू होते. मोठी आवक झाल्याने या वेळी दर १२ ते १६ रुपयांपर्यंत मिळतो. -राजेश डोके अडतदार, वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती संपर्क-बाळकृष्ण वर्पे ९५६१८३२२४२ सचिन भोर- ९१७५५०१४२६ रवींद्र जाधव- ९९६७४३२५९६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com