तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली तुरीची उत्पादकता

दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक सिंचन पद्धती, झेंडू, अंबाडीचे सापळा पीक वासजीव कुंपण आणि अधिकाधिक फुटव्यांसाठी शेंडा खुडणी. अशा विविध तंत्राचा वापर करून तुरीचे एकरी १७ क्विंटलपर्यंत बीजोत्पादन घेण्यात सुर्डी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील धनाजी शेळके यांनी हातखंडा मिळवला आहे.
धनाजी शेळके बहरलेल्या आपल्या तुरीच्या शेतात.
धनाजी शेळके बहरलेल्या आपल्या तुरीच्या शेतात.

दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक सिंचन पद्धती, झेंडू, अंबाडीचे सापळा पीक वासजीव कुंपण आणि अधिकाधिक फुटव्यांसाठी शेंडा खुडणी. अशा विविध तंत्राचा वापर करून तुरीचे एकरी १७ क्विंटलपर्यंत बीजोत्पादन घेण्यात सुर्डी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील धनाजी शेळके यांनी हातखंडा मिळवला आहे.   सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात वैराग-माढा मार्गावर सुर्डी येथे धनाजी शेळके यांची आठ एकर शेती आहे. त्यात दीड एकर द्राक्ष, प्रत्येकी एक एकर सीताफळ व कांदा, पाऊण एकर सोयाबीन आणि दरवर्षी एकरभर क्षेत्रात तूर अस नियोजन असते. धनाजी एम.ए., बी एड.पर्यंत शिकले आहेत. लहान भाऊ नेताजी यांनीही कृषी पदविका घेतली आहे. पदव्युत्तर पदवीनंतर धनाजींनी परिसरातील खासगी शाळेत वर्षभर अनुभव घेतला. पण ‘डोनेशन’, पगारातील अनियमितता आदी अडचणींमुळे पूर्णवेळ शेतीत उतरण्याचा निर्णय घेत सुरुवातही केली. ‘टर्निंग पॅाइंट’ धनाजी शेतीत उतरेल त्या वेळी २००९-१० चे वर्ष असेल. पुढील वर्षी ते अधिक जोमाने कामाला लागले. एक एकरावर पपई लागवड केली. पहिल्याच प्रयत्नात एकरी ३० ते ३५ टन उत्पादन घेतलं. दरही किलोला १० रुपयांपर्यंत मिळाला. चांगलं उत्पन्न मिळाल्यानं उत्साह चांगलाच वाढला.शेतीच्या करियरमधला हाच ‘टर्निंग पॅाइंट’ ठरला. पुढे २०१२-१३ मध्ये केळीकडे वाट वळवली. तीन खोडव्यांपर्यंत उत्पादन घेतले. ४० किलोपर्यंत घडाचे उत्पादन घेतले. त्यानंतर सलग दोन-तीन वर्षे कलिंगड, खरबूज घेत चांगले उत्पन्न मिळवले. पिकातील ‘मास्टरकी’ विविध प्रयत्नांमुळे धनाजी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले. दरम्यान, २०१५ च्या सुमारास ते सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) संपर्कात आले. तेथील प्रशिक्षणात भाग घेतला. केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनीही त्यांची धडपड पाहिली. दरम्यान, केव्हीकेने सुर्डी गाव दत्तक घेतले. त्या वेळी तूर बीजोत्पादनासाठी धनाजी यांना प्लॅाट देण्यात आला. एखाद्या पिकात लक्ष घातलं, की ‘मास्टरकी’ मिळवावी या गुणाप्रमाणे धनाजी यांनी केव्हीकेच्या माध्यमातून तुरीचाही अभ्यास करण्यास सुरुवात करून त्यात प्रयोग करण्यास सुरुवात केली. गेल्या चार ते पाच वर्षांचा त्यात अनुभव तयार होऊन एकरी चांगली उत्पादकता मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. तूर व्यवस्थापनातील ठळक मुद्दे-

  • उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवताना बीजोत्पादनाच्या दृष्टीनं आवश्यक सर्व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर
  • दरवर्षी १२ जूनच्या सुमारास एक एकरभरात लागवड. यंदा ३५ गुंठ्यांत लावण.
  • दरवर्षी बीडीएन-७११ वाणाचा वापर. यंदा बीडीएन-२०१३-४१ (गोदावरी) वाण निवडले.
  • पूर्वमशागतीमध्ये संपूर्ण जमिनीवर आधी एकरी २० बैलगाड्या शेणखत एकाड एक वर्ष आणि कंपोस्ट खत पसरून घेतात. त्यानंतर नांगरणी. पाठोपाठ कुळवणी व संपूर्ण क्षेत्रावर रोटरचा वापर.
  • तुरीत ठिबकचा वापर सर्वात महत्त्वाचा असल्याचे धनाजी सांगतात.
  • दोन ओळींतील अंतर सात फूट. इनलाइन ठिबकमध्ये प्रत्येक ठिबकच्या शेजारी म्हणजे सव्वा फुटावर एक याप्रमाणे टोकण पद्धतीने बियाणे वापर.
  • सुमारे पाऊण किलो बियाणे वापर. तत्पूर्वी १० ग्रॅम ट्रायकोडर्मा, २५ मिली पीएसबी, २५ ग्रॅम रायझोबियमची बीजप्रक्रिया.
  • प्रत्येक इनलाइनजवळ १२-३२-१६, झिंक व फेरस प्रत्येकी १० किलो, एमओपी २५ किलो, गंधक १० किलो असा माती परीक्षणानुसार वापर.
  • त्यानंतर महिन्यांनी १९-१९-१९ चार किलो, दीड महिन्याने १२-६१-० व दोन महिन्यांनी १३-४०- १३ खताचा प्रत्येकी चार किलो वापर. दाणे भरण्याच्या अवस्थेत १३-०-४५ चार किलो.
  • आंतरमशागतीत पहिल्या पंधरवड्यानंतर कुळवणी. महिनाभरानंतर एक खुरपणी.
  • -जमीन मध्यम आहे. ठिबकद्वारे वाफसा पाहून पाणी नियोजन.
  • साधारण १५० दिवसांत तूर काढणीस येते.
  • शेंडा खुडणे, सापळा पिके फायदेशीर

  • पहिल्या ४५ ते ५० दिवसांनी आणि ६० ते ६५ दिवसांनी अशा दोन टप्प्यांत तुरीचा शेंडा खुडून छाटणी केली जाते. त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढते. पर्यायाने शेंगांची संख्या वाढते. मागील वर्षी प्रति झाड २८ ते ३० शेंगा व प्रत्येक शेंगात चार बिया आढळल्याचे निरीक्षण.
  • किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच परागीभवन चांगले व्हावे यासाठी तुरीच्या संपूर्ण बाजूने झेंडू (तुरीच्या लावणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) आणि अंबाडी यांची सापळा पीक किंवा सजीव कुंपण म्हणून लागवड केली जाते.
  • एकरी पाच ते सात कामगंध सापळे लावतात.
  • फुलोरा व शेंगा भरणे या दोन अवस्था पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या.
  • बियाणे म्हणून विक्री एकूण व्यवस्थापनातून उत्पादन व गुणवत्ता चांगली यावी यासाठी अधिक मेहनत घेण्यात येते. त्यामुळेच धनाजी यांच्याकडील बियाण्याला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी असते. एकरी १७ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. गेल्या वर्षी सुमारे १०० किलो बियाण्याची प्रति किलो १०० रुपये दराने विक्री केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळाले. उत्पादन खर्च एकरी किमान २० हजारांच्या पुढे असतो. प्रतिक्रिया सूक्ष्म व शास्त्रीय दृष्टिकोन, सुधरित वाणाची निवड, टोकण पद्धत, पाणी व अन्नद्रव्यांचा योग्य वापर, शेंडा खुडणी अशा विविध पद्धतींचा वापर केल्यास एकरी निश्‍चित उत्पादनवाढ मिळू शकते. धनाजी यांच्या प्रयोगातून हेच सिद्ध झाले आहे. -अमोल शास्त्री विषय विशेषज्ञ, केव्हीके, सोलापूर संपर्क- धनाजी शेळके, ९९२२२८१२०८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com