सोयाबीनमध्ये तूर शाश्‍वत पद्धतीचा प्रयोग

‘कॉटन सिटी’ अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील धरमचंद जैन अनेक वर्षांपासून सोयाबीन सहा ओळी व तूर एक ओळ या पद्धतीने खरीप हंगाम यशस्वी घेत आहेत.
धरमचंद जैन यांनी यंदा सलग तूर अशी पद्धत वापरली आहे
धरमचंद जैन यांनी यंदा सलग तूर अशी पद्धत वापरली आहे

‘कॉटन सिटी’ अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील धरमचंद जैन अनेक वर्षांपासून सोयाबीन सहा ओळी व तूर एक ओळ या पद्धतीने खरीप हंगाम यशस्वी घेत आहेत. सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर देत सोयाबीनचे एकरी सहा क्विंटल व तुरीचे पाच ते नऊ क्विंटल उत्पादन त्यांनी याद्वारे साध्य केले आहे. यंदा मात्र मजूरटंचाई लक्षात घेता सलग तूर पद्धतीचा वापर त्यांनी केला आहे. कापूस, सोयाबीन आदी पिकांसाठी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील धरमचंद जैन यांच्या एकत्रित कुटुंबीयांची सुमारे ५२ एकर शेती आहे. यातील सुमारे ४५ ते ४८ एकरांवर ते सोयाबीन व तूर अशी पीक पद्धत वापरतात. यात सहा ओळी सोयाबीनच्या, तर एक ओळ तुरीची असते. तुरीत दोन ओळींतील अंतर आठ फूट तर दोन रोपांमध्ये सव्वा फूट अंतर राखले जाते. व्यवस्थापनातील बाबी धरमचंद यांचे वडील कापड व्यावसायीक होते. गावातच त्यांचे दुकान होते. परंतु शेतीची आवड असल्याने धरमचंद यांनी शेतीत अधिक लक्ष घातले. सांगवी रेल्वे (जि. यवतमाळ) येथील कृषी विज्ञान केंद्राचे ते संपर्क शेतकरी आहेत. केंद्राचे मार्गदर्शन त्यांना लाभते. त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित आहेत. ते सांगतात की लाल तुरीच्या वाणाच्या लावणीवर भर असतो. शक्यतो सेंद्रिय पद्धतीवर भर असतो. जमिनीतून शक्यतो रासायनिक खतांचा वापर करीत नाही. गरजेएवढीच फवारणी करण्यात येते. जिवाणू संवर्धक, ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया केली जाते. ह्युमिक अ‍ॅसिडचाही वापर होतो. शेंडे खुडणीचे काम चार ते पाच वेळा केले जाते. यामुळे फुटवे व परिणामी शेंगधारणा अधिक होण्यास मदत मिळते असे जैन सांगतात. एकरी दीड किलो बियाणे वापर होतो. टोकण पद्धतीचा वापर होतो. एके ठिकाणी तीन ते चार बिया टोकल्या जातात. उगवण झाल्यावर त्यातील दोन सुदृढ झाडे ठेवून उर्वरित झाडांची विरळणी केली जाते. पीक कालावधी वाणनिहाय सुमारे १५० ते १७० दिवसांचा राहतो. यंदा सलग तूर लागवड जैन यांनी मागील वर्षी इक्रिसॅट येथून पांढऱ्या तुरीचे वाण आणले. त्या वेळी त्यांना सुमारे दोन क्विंटल ३० किलो बियाणे आणले. त्यापासून यंदा बियाणे वृद्धिंगत करून यंदा खरिपात सलग ४५ एकरांत त्याचे लावणीचे नियोजन केले आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात २० एकरांवर लावण पूर्णत्वास नेली आहे. सध्या मजूरटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने सलग लावणीचा निर्णय घेतल्याचे जैन यांनी सांगितले. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे थेट मशागत करता येणार आहे. क्विंटलला १३ हजार रुपये दराचा अपवाद वगळल्यास अलीकडील काळात तुरीला सहा हजार ते सात हजार रुपये दर असल्याचे जैन यांनी सांगितले. पीक अवशेषांचा वापर रब्बी हंगामात गहू, हरभरा यांसारखी पिके घेतली जातात. त्यांच्या काढणीनंतर अवशेष न जाळता ते जमिनीतच गाडण्यात अनेक वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत मिळाली आहे. जैन सांगतात की सन २००६ पर्यंत ऊस घेत होतो. त्याचे पाचट देखील जमिनीतच गाडले जात होते. पुढे अवर्षणजन्य परिस्थितीमुळे ऊस घेणे सोडले. मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर जैन यांच्याकडे बैलजोडी होती. त्यांनी ती गौरक्षणला संस्थेला दिली. आता काळानुरूप ट्रॅक्टरचा वापर होतो. सन १९८६ मध्ये त्यांनी ट्रॅक्टरची खरेदी सुमारे एक लाख ४४ हजार रुपयांत केली होती. या भागातील हा बहुतेक पहिला वहिला ट्रॅक्टर असावा. आजही त्याचाच वापर मशागतीसाठी होतो. त्याची नियमित देखभाल ठेवल्यानेच हे शक्य झाल्याचे ते सांगतात. सोयाबीनमधील प्रयत्न सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पद्धतीप्रमाणे सरी पाडून सोयाबीन घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एकूण व्यवस्थापनातून एकरी १३ क्विंटलपर्यंत उत्पादनही त्यांनी घेतले. पारंपरिक पद्धतीत ट्रॅक्टरने पेरणी केल्यास दोन तासांत १५ इंच अंतर राखले जाते. यामध्ये एकरी ३० किलो बियाणे दर राहतो. सांगली पॅटर्नमध्ये टोबणीसाठी मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्‍न निर्माण होत असल्याने अनेक शेतकरी ट्रॅक्टरचाच पर्याय वापरतात असे जैन यांनी सांगितले. सध्या सोयाबीन- तूर पद्धतीत एकरी सहा क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पादन त्यांना मिळते. कापसावर गेल्या हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे एकरी अवघ्या साडेपाच क्विंटलवर उत्पादन आले. परिणामी हे पीक घेणेही बंद केले आहे. शास्त्रज्ञांचा सल्ला सहास एक सोयाबीन- तूर फायदेशीर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक पुंडलिक वाघमारे म्हणाले, की सोयाबीनच्या सहा ओळी व तुरीची एक ओळ ही फायदेशीर विशेषतः विदर्भातील काळ्या कसदार जमिनींसाठी चांगली पीक पद्धती आहे. यामध्ये जो ओलावा संवर्धित होतो त्याचा रब्बी पिकांसाठी फायदा होतो. रब्बीच्या काळात तुरीची वाढ विस्ताराने होत असते. त्यामुळे अशा क्षेत्रात हरभरा लावणी करताना त्याच्या सहा ओळींऐवजी चार ओळी अधिक फायदेशीर होऊ शकतात. शिवाय सोयाबीन, तूर व हरभरा अशी तीन पिके यात समाविष्ट होत असल्याने जोखीम कमी होऊ शकते. आर्थिक स्थिरता मिळवणे शक्य होते. आमच्या विद्यापीठातही फायदेशीर आंतरपीक पद्धतीचे प्रयोग झाले आहेत. कोरडवाहूसाठी चारास दोन फायदेशीर बदनापूर (जि. जालना) येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दीपक पाटील म्हणाले, की लाल व पांढरी तूर हे विभागनिहाय प्राधान्य आहे. मराठवाड्यात लाल तर विदर्भात पांढऱ्या तुरीचा पॅटर्न आहे. वास्तविक डाळीच्या वरच्या सालीनुसार हे रंग आहेत. बागायती भागात सहास एक तर कोरडवाहू भागात सोयाबीनच्या चार व तुरीच्या दोन ओळी अशी पद्धत अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण शाश्‍वत उत्पादनासाठी तुरीची एकरी झाडांची संख्या (प्लॅंट पॉप्युलेशन) देखील महत्त्वाची आहे. एका पिकात नुकसान झाल्यास दुसरे भरून काढू शकते. संपर्क-  धरमचंद जैन, ७५१७५१०६७५  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com