agriculture story in marathi, Dhondkar Family from Liha, Dist. Auranagabad has turned to sustainable farming through crop pattern change & precise crop management. | Page 2 ||| Agrowon

पीकबदल, नियोजनातून शाश्‍वत शेतीची कास

संतोष मुंढे
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

केवळ शेती व्यवस्थापनासाठीच अधिकाधिक वेळ देणे, काटेकोर नियोजन, पीकपद्धतीत परिस्थितीनुसार शेतीपिकात केलेला बदल, शेती उत्पन्नातूनच क्षेत्रविस्तार या धोंडकर कुटुंबाच्या (लिहा शिवार, जि. औरंगाबाद) जमेच्या बाजू आहेत. त्याच जोरावर साडेबारा एकर शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रतिकूलतेला अनुकूल करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, त्याला संरक्षित शेतीची दिलेली जोड कुटुंबाला शाश्‍वत शेतीकडे घेऊन चालली आहे.
 

केवळ शेती व्यवस्थापनासाठीच अधिकाधिक वेळ देणे, काटेकोर नियोजन, पीकपद्धतीत परिस्थितीनुसार शेतीपिकात केलेला बदल, शेती उत्पन्नातूनच क्षेत्रविस्तार या धोंडकर कुटुंबाच्या (लिहा शिवार, जि. औरंगाबाद) जमेच्या बाजू आहेत. त्याच जोरावर साडेबारा एकर शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रतिकूलतेला अनुकूल करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, त्याला संरक्षित शेतीची दिलेली जोड कुटुंबाला शाश्‍वत शेतीकडे घेऊन चालली आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील मूळचे पाल येथील लहानू तुकाराम धोंडकर यांची लिहा शिवारातील शेतानजीकच्या वघाडी वस्ती परिसरात शेती आहे. सोमीनाथ व साईनाथ ही त्यांची दोन मुले वडिलांच्या मार्गदर्शनात २००८-०९ पासून शेतीची जबाबदारी सांभाळतात. वडिलोपार्जित आठ एकर शेतीला साडेचार एकर शेतीची जोड त्यांनी अलीकडील सहा वर्षांत दिली. तीही मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत असताना. त्यासाठी शेतीचे नियोजन महत्त्वाचे ठरले आहे.
धोंडकर यांची कपाशी, मका, बाजरी व बऱ्यापैकी पाऊसपाणी असल्याने काही काळ घेतलेला ऊस ही मुख्य पिके होती. २०१२ पर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती सुरू होती. २०१३ मध्ये त्यांनी पीकबदल करण्यास सुरवात केली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागले.

घडला पीक बदल
धोंडकर यांनी पीकबदल करताना २० गुंठ्यांत टोमॅटो, तर ५० गुंठ्यांत आले घेतले. त्या वेळी उत्पादन समाधानकारक मिळालेच. शिवाय, दर चांगला मिळाल्याने उत्पन्नही चांगले मिळाले. शंभर क्‍विंटल बेणे सुमारे पाच हजार ते आठ हजार रुपये प्रतिक्‍विंटल दराने खपले. त्यातून शेतीतला उत्साह वाढला. त्यातील उत्पन्नातूनच २०१४ मध्ये दोन एकर व नोटाबंदीच्या काळात घेतलेल्या अडीच एकरांमुळे शेतीक्षेत्र साडेबारा एकरांवर पोचले.

दुग्ध व्यवसायाची जोड
पीक पद्धतीत बदल करण्यासोबतच तीन संकरित दुभत्या गायी घेत दुग्ध व्यवसायाची जोड दिली. त्यामुळे खेळता पैसा हाती राहणे सुरू झाले. शेतीचा वाढता व्याप पाहता गायींची संख्या पाचपर्यंत कायम ठेवली आहे. गायींपासून दिवसाला सुमारे ४० लिटर दूध डेअरीला जायचे. खर्च वजा जाता किमान लाख ते सव्वा लाख रुपये उत्पन्न वर्षाकाठी मिळे. शिवाय १५ ट्रॉलीपर्यंत किमान ५० हजार रुपये किमतीचे शेणखत उपलब्ध झाले.

भाजीपाला व्यवस्थापन
आज नगदी भाजीपालावर्गीय पिकांवर धोंडकर बंधूंनी भर दिला आहे. पुढे आले पिकाचे क्षेत्र तीन एकरांपर्यंत, तर टोमॅटोचे क्षेत्र तीस गुंठे केले. सोबत एक एकर फ्लॉवरची जोड दिली. मिरची एक एकर, कारले, दोडके प्रत्येकी १० गुंठे, मेथी २० गुंठे, कोथिंबीर १५ ते २० गुंठे अशी पीकपद्धती सुरू केली. त्यातून खेळता पैसा येणे सुरू झाले. आजच्या घडीला साडेतीन एकरांत कपाशी, दोन एकरांत मका, तीन एकर आले, एक एकर मिरची, ३० गुंठे टोमॅटो आहे. वीस गुंठ्यांत शेडनेटमध्ये काकडी व २० गुंठे जनावरांच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवले आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सुरवातील ५० गुंठे क्षेत्र ठिबकवर आणले. त्यानंतर थेट पाच एकरांसाठी कर्ज काढून ठिबक केले. आज संपूर्ण साडेबारा एकर क्षेत्र ठिबकखाली आहे.

संरक्षित शेतीची कास
२०१८ मध्ये संरक्षित शेतीची कास धरली. शासकीय योजनेतून शेततळे घेऊन संरक्षित सिंचन सुविधा तयार केली. तंत्रज्ञानाचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून करण्यात येतो. शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत २० गुंठ्यांत शेडनेटची उभारणी केली. विहिरीतील पाणी शेततळ्यात साठवून ठेवले असल्याने त्या भरवशावर शेडनेटमध्ये काकडी घेतली. त्यातून साडेतीनशे क्‍विंटल उत्पादन मिळाले.
किलोला १५ ते १८ रुपये दर मिळाला. उत्पन्नही चांगले मिळाले. पुन्हा काकडीची नव्याने लागवड केली आहे.

शेतीची वैशिष्ट्ये

  • पाण्यासाठी स्वतःच्या चार व सामाईक दोन विहिरींतून पाणी
  • कुटुंबातील सहा सदस्य राबतात शेतीत.
  • कुटुंबातील सर्वांच्या सहमतीने निर्णय.
  • पूर्वी शंभर टक्‍के शेती रासायनिक होती. शेणखताची उपलब्धता झाल्याने आता
  • ४० टक्क्याने रासायनिक खतांचा वापर घटविला आहे.
  • विहिरीतील पाणी शेततळ्यात साठवण्यात येते.
  • सहा ते सात मजुरांना वर्षभर कायम रोजगार
  • यंदा कपाशीतील आंतरपीक फ्लॉवरमधून ५० ते ६० हजारांचे उत्पन्न.

आंतरपीक पद्धतीचा वापर
धोंडकर यांनी आंतरपिकांचीही कास धरली आहे. कपाशीत मूग व फ्लॉवर, आले पिकात मका घेण्याचे तंत्र अवलंबिले आहे. कपाशीची लागवड पाच बाय दोन फुटांवर होते. एकरी १५ ते १८ क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळते. आंतरपिके मुख्य पिकाचा खर्च कमी करतात. यंदा कपाशीतील मुगातून चार क्‍विंटल उत्पादन मिळाले.

पाण्याचा विहिरींना आधार
धोंडकर बंधूंच्या शेतीतून पावसाचे पाणी वाहून जाणारा नाला आहे. वरच्या भागातील ३० ते ४० एकरांतील पाणी नागमोडी आकाराच्या या नाल्यातून वाहते. त्यालगतच धोंडकर यांच्या शेतातील जवळपास सर्व विहिरी येतात. या विहिरींना नाल्यातून वाहणारे पाणी पाझरून मिळावे, यासाठी एका विहिरीत काही खोलीवर पाइप टाकून नाल्याचे पाणी विहिरीत वळविण्याची सोय केली आहे. अशाच प्रकारे नाल्यालगतच्या प्रत्येक विहिरीजवळ पुनर्भरणाचा प्रयोग राबविण्याचा संकल्पही केला आहे. पाण्याशिवाय शेती नाही, निसर्गाची साथ मिळत नाही, अशा स्थितीत शेतीला पाण्याची सोय करून ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे सोमीनाथ सांगतात.
 
संपर्क- लहानू तुकाराम धोंडकर - ७५८८५२९०३९
सोमीनाथ लहानू धोंडकर - ७५८८५२९०३८


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
जैवविविधतेचे करून संवर्धन उभारले कृषी...बांधकाम व्यावसायिक असलेल्या आनंद बोरसे यांनी...
थेट ग्राहकांना विकली २० टन द्राक्ष   बागेत द्राक्ष घड काढणीला आले आणि कोरोनाचे...
आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात झाला बदलटाटा ट्रस्ट `सेंट्रल इंडिया`च्या माध्यमातून...
‘हापूस'च्या नऊ हजार पेट्यांची ...हंगाम तोंडावर आला असतानाच कोरोनाने देशभरात पाय...
सबसरफेस ठिबक तंत्राच्या वापरातून यशस्वी...अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, प्रयत्नवाद, बागेतील...
बचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...
विक्री कौशल्य, हुशारी पणास लावून ३४ टन...पातूर तालुक्यातील विवरा (जि. अकोला) येथील हरीष व...
दुर्गम खैरगावात शोधला कलिंगड विक्रीचा...यवतमाळ जिल्ह्यात खैरगाव देशमुख (ता. पांढरकवडा)...
‘ई-कॉमर्स' तंत्राद्वारे शेतीमालाची...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी (ता.दिंडोरी) येथील...
मंदीतही शंभर टन गव्हाची थेट ग्राहकांना...कोरोना लॉकडाऊन काळ हा काहींसाठी अडचणीचा ठरत असला...
तब्बल २३०० टन ताज्या शेतमालाची विक्रीकोरेगाव कृषी विभागाचा उपक्रम कोरोना संकटाच्या...
बारामतीतील भेंडीची थेट युरोपात निर्यातपुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या...
ताजा शेतमाल, कांदा विक्रीतून...पुणे शहरातून जवळ असलेल्या केंदूर (ता. शिरूर, जि....
पाच जिल्ह्यांत विकली तब्बल ३०० टन...ओझर मिग (जि. नाशिक) येथील जय बाबाजी भक्त...
नवले यांनी जोपासलेली सेंद्रिय...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील इंदोरी येथील...
आरोग्यवर्धक उत्पादनांची वाढवली बाजारपेठ...सांगली कायम दुष्काळ असलेल्या प्रतिकूल परिस्थितीत...
सीताफळातून लाभले आर्थिक स्थैर्यपांगारे (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील प्रयोगशील...
नारायणगावची कलिंगडे पोहोचली काश्‍मीर...कोरोना टाळेबंदीत शेतीमालाची पुरवठा साखळी खंडीत...
"कृषीसमर्पण’ कडून लॉकडाऊनमध्ये १२१ टन...कोरोना व लॉकडाऊनच्या संकटात औरंगाबाद स्थित ‘...
संकटातही हापूस आंब्याच्या सातशे...ऐन हापूस हंगाम सुरू होतानाच कोरोनामुळे देशात...