जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
ग्रामविकास
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह विकासकामांतून ढोरोशीची आघाडी
ढोरोशी ग्रामस्थ विधायक कामांसाठी; तसेच समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यामुळेच गावाचा सर्वांगीण विकास सुरू आहे. वृक्षारोपण योजनेचे हे पहिले वर्ष असून यातून ११ हजार झाडांच्या संगोपनाचे उद्दिष्ट आहे.
-नलिनी मगर, सरपंच, ढोरोशी
सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील ढोरोशी हे तारळी धरणक्षेत्रात वसलेले दुर्गम गाव आहे. येथील ग्रामस्थांच्या एकीमुळे गावाने विविध उपक्रम यशस्वी राबवले. तंटामुक्ती व निर्मलग्राम पुरस्कार पटकाविले. ‘शेती तिथे रस्ता’ ही संकल्पना यशस्वीपणे राबवून
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या आहेत.
पाटण तालुक्याची भौगोलिक स्थिती व शेतीपद्धती पाहता सातारा जिल्ह्याचे कोकण म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. डोंगररांगांमध्ये हा तालुका वसला आहे. याच तालुक्यात राज्याला वीजपुरवठा करणारे प्रसिद्ध कोयना धरण आहे. याच तालुक्यातील तारळे खोऱ्यात काही वर्षांपूर्वी तारळी धरणाची उभारणी झाली. याच तारळे खोऱ्यातील ढोरोशी हे सुमारे २२०० लोकसंख्या असलेले गाव आहे. पावसाळ्यात या भागात प्रचंड पाऊस होतो. मात्र हे पाणी अडवण्याचे स्रोत नसल्याने उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासायची. शेती किफायतशीर व्हायची नाही. धरण झाल्याने खोऱ्यातील अनेक गावे बागायत होण्यास मदत झाली खरीप ज्वारी, रब्बी ज्वारी, भात या पिकांसह ऊस हे नगदी पीकदेखील घेतले जात आहे.
गावाच्या हितासाठी सर्वजण एकत्र
गावाच्या विकासाचा मुद्दा मुख्य मानून गावातील लोक गट-तट विसरून एकत्र येतात. शासनाची गाव स्तरावर कोणीतीही स्पर्धा असो त्यात हे गाव सहभागी होते. निर्मलग्राम स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी पंचायतीच्या माध्यमातून गवंडी प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला. यातून गावात एका दिवसात ७४ शौचालये उभारली गेली. सन २००९ मध्ये गावाला निर्मलग्राम पुरस्कार मिळाला. यामुळे गावाच्या संघटितपणाला तसेच विकासाला चालना मिळाली. गावातील तंटे गावातच तंटामुक्त समितीच्या माध्यमातून मिटवण्यात येतात. गावाने शासनाचा २०१० मध्ये तंटामुक्त गाव हा पुरस्कारही मिळवला आहे.
शिवार तिथे रस्ता
रस्ता म्हणजे शेतीच्या रक्तवाहिन्या असतात. रस्त्यांची सोय नसलेल्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही गोष्ट ओळखून ढोरोशीच्या ग्रामस्थांनी शिवार तेथे रस्ता ही संकल्पना हाती घेतली. गावातील प्रमुख लोकांनी बैठक घेत सर्व शेतशिवारासाठी रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी समिती स्थापन करत प्रत्येक गटाचा नकाशा तयार केला. कमीतकमी नुकसान होऊन रस्ता कसा करता येईल यावर भर देण्यात आला. शेतकऱ्यांचे प्रबोधन करून रस्त्यांचे महत्त्व पटवून दिले. तहसीलदार रामहरी भोसले व मंडल अधिकारी प्रशांत कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कामास सुरवात झाली. रस्त्यांची मोजणी करण्यात आली. क्षेत्र कमी होत असतानाही आपल्याच सहकाऱ्यांना रस्त्याची उपलब्धता होणार आहे या भावनेतून जागा देण्यात आली. या उपक्रमातून गावातील ८० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीसाठी कायमस्वरूपी रस्ता मिळाला. ऊस तसेच अन्य वाहतूक सहजपणे करता यावी यासाठी रस्त्यांची रुंदी १० ते १२ फूट ठेवण्यात आली. शेतशिवार आता तीन गावांना जोडले असल्याने गावात व्यवसायवृद्धी होण्यास मदत झाली आहे. गावाच्या विकासात ग्रामस्थांसह निवृत्त शिक्षण संचालक डॅा. सुनील मगर, अन्न व औषध विभागाचे सहायक उपायुक्त संपतराव देशमुख यांचीही मोलाची साथ व मार्गदर्शन मिळाले आहे.
लोकवर्गणीतून ज्युनिअर कॉलेज
ढोरोशी डोंगराळ भागात असल्याने शिक्षणाची साधने कमी होती. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाल्यावर उर्वरित शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गाव सोडून अन्यत्र शिक्षणासाठी जावे लागे. आपल्याच गावात शिक्षणाची सुविधा असली पाहिजे, असा विचार पुढे आला. शाळेसाठी इमारत असणे आवश्यक असल्याने लोकवर्गणी गोळा करण्यास सुरवात केली. गावचे सुपुत्र निवृत्त शिक्षण संचालक डॅा. सुनील मगर यांनी ज्युनिअर कॉलेज मान्यतेसाठी विशेष प्रयत्न केले. शिक्षणाचे महत्त्व माहीत असल्याने सर्वांनी सढळ हाताने मदत केली. यातून इमारत उभी राहिली. या विद्यालयात आर्ट, कॅामर्स व सायन्स हे तीनही विभाग असलेले ज्युनिअर कॉलेज सुरू झाले आहे. सर्व वर्गांना डिजिटल सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे विद्यालय तसेच सभोवताली परिसराचे लक्ष ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठेवण्यात येते. या उपक्रमामुळे परिसरातील दहा ते १५ गावे व वाड्यावस्त्यांवरील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे. ग्रामपंचायत इमारतीचे काम सुरू असून यामध्ये सर्व प्रकारची कार्यालये तसेच दाखले संगणक चलित मिळण्यासाठी सोय केली जाणार आहे. तसेच शासकीय योजनांची माहिती मिळावी यासाठी यंत्रणा उभी करणार आहे.
वृक्षारोपण
सरपंच नलिनी मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ढोरोशी ग्रामपंचायतीअंतर्गत वाघळवाडी, शिवपुरी, भैरेवाडी व ढोरोश या गावांतील खातेदारास प्रत्येकी पाच फळझाडे दिली जाणार आहेत. ही झाडे एक वर्ष जगविल्यावर प्रत्येकी शंभर रुपये याप्रमाणे ५०० रुपये अनुदान जमा करण्यात येणार आहे. झाडे जगविल्यास घरपट्टीवर सवलत दिली जाणार आहे.
जीपीएस यंत्रणेद्वारे शेतकरी खातेदारास कोणती झाडे पाहिजेत, ती कोणत्या गट क्रमांक असलेल्या क्षेत्रात लावण्यात येणार आहेत याची माहिती ग्रामपंचायतीकडे कळवायची. योजनेचे पहिले वर्ष असून शेतकऱ्यांकडून प्रतिसाद चांगला आहे. पुढील तीन वर्षांत ११ हजार झाडे लावण्याचे व जगविण्याचे
शिवधनुष्य उचलण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
गावाच्या एकीमुळे सर्व प्रश्न मार्गी लागत आहेत. शिवार तेथे रस्ता यामुळे गावात बारमाही शेतीला चालना मिळाली आहे.
-महेंद्र मगर, माजी सरपंच-
९४२१२६१८७६
ढोरोशीसारख्या दुर्गम गावात तीनही शाखांचे महाविद्यालय झाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा यात बचत झाली आहे. किमान दहा गावांतील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
-रमेश मगर, सेवानिवृत्त शिक्षक
फोटो गॅलरी
- 1 of 16
- ››