Agriculture story in marathi diet management of livestock | Agrowon

संतुलित खाद्य व्यवस्थापनातून दूध उत्पादनवाढ शक्य

सचिन रामटेके, डॉ. धीरज कंखरे, डॉ. राहुल देसले 
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने जनावरांच्या जाती, प्रजाती, आनुवांशिकता, वेत व वय यावर अवलंबून असते, तर काही अंशी नैसर्गिक ऋतुचक्रावर अवलंबून असते. त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात चढ-उतार होत असला तरीही आवश्यक समतोल आहार, पालन-पोषण, काळजी, निगा, आरोग्य व योग्य व्यवस्थापन केल्यास दूध  उत्पादनामध्ये वाढ करता येऊ शकते. 

जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने जनावरांच्या जाती, प्रजाती, आनुवांशिकता, वेत व वय यावर अवलंबून असते, तर काही अंशी नैसर्गिक ऋतुचक्रावर अवलंबून असते. त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात चढ-उतार होत असला तरीही आवश्यक समतोल आहार, पालन-पोषण, काळजी, निगा, आरोग्य व योग्य व्यवस्थापन केल्यास दूध  उत्पादनामध्ये वाढ करता येऊ शकते. 

प्रत्येक वेगवेगळ्या जनावरांमध्ये (उदा. गाय, म्हैस, बकरी इ.), एकाच प्रकारच्या जनावरांमध्ये परंतु वेगवेगळ्या जातींनुसार (उदा. गवळाऊ, जर्सी गाय इ.), तसेच एकाच गायीच्या वेगवेगळ्या वासरांमध्ये दुधाचे व दुधातील स्निग्धांशांचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे एकाच जातीच्या दोन गायी-म्हशींनी सारखेच दूध व स्निग्धांशांचे प्रमाण द्यावे, असा अट्टाहास करू नये. उन्हाळ्यात दूध उत्पादन व दुधातील स्निग्धांश थोडे कमी, तर हिवाळ्यात थोडे अधिक असते. विदेशी वंशाच्या गायीच्या तुलनेत देशी गायींचे दूध उत्पादन कमी असते, कारण त्यांचा विकास व जडणघडण येथील उष्ण वातावरणाशी जुळवून घेत होत असते. 

दुधाळ गायी-म्हशींचे सरासरी दुग्ध उत्पादन (किलो प्रतिवेत) 
देशी वंशाच्या गायी 

 • साहिवाल ः २२७० 
 • गीर ः १५९० 
 • रेड सिंधी ः १५००-१८०० 
 • थारपारकर ः ११३६ 

विदेशी वंशाच्या गायी 

 • होलेस्टन फ्रिजियन ः ६५०० 
 • जर्सी ः ४५०० 
 • ब्राउन स्विस ः ५२५० 

संकरित गायी 

 • फुले त्रिवेणी ः ३०००-३५०० 
 • करण स्विस ः ३३५५ 
 • करण फ्रिझ ः ३७०० 

म्हशी 

 • मुऱ्हा ः २००० 
 • सुरती ः १६०० 
 • मेहसाना ः १५००-१९०० 
 • जाफराबादी ः १५०० 
 • नागपुरी ः १४००-२००० 
 • पंढरपुरी ः १५०० 

गाभण काळात व नंतर घ्यावयाची काळजी.. 

 • गाभण काळात शेवटचे तीन महिने वासरांची सुदृढता व मुबलक दूध उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. 
 • गाभण जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा व सूर्यप्रकाश पडेल असा ठेवावा. गोठ्याचे जंतुनाशकाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे. 
 • जनावराची हालचाल होईल अशा प्रकारे गोठ्याची रचना असावी. यामुळे जनावरांना पुरेसा व्यायाम मिळेल. 
 • गाभण जनावरांना उंचावर किंवा डोंगराळ भागात चरायला नेऊ नये, कारण उंचावरून घसरून गर्भाशयाला इजा होऊ शकते. 
 • गाभण जनावरांच्या शेवटच्या ४०-५० दिवसांत दूध काढणे बंद करावे. 
 • एक ते दीड किलो अतिरिक्त चारा द्यावा, ज्यामध्ये १२ ते १३ टक्के प्रथिने असावीत. 
 • व्याल्यानंतर दूध उत्पादनासाठी गाय/म्हशीला पुरेसा आहार द्यावा. 

आहाराचे व्यवस्थापन.. 

 • दुधाळ जनावरांच्या चारा खाद्यावर एकूण उत्पन्नाच्या जवळजवळ ६० टक्के खर्च होतो व तो यापेक्षा जास्त असू नये. म्हणून दूध व्यवसायामध्ये आहाराच्या व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
 • ज्या संतुलित आहारामुळे चाऱ्याचे रूपांतर जास्तीत जास्त दूध घटकामध्ये होईल, तो आहार किफायतशीर मानला पाहिजे. 
 • दुभत्या जनावराला देण्यात येणारा चारा हा त्याचे वय, जात, लिंग, शरीरक्रिया, गाभणकाळ व दूध उत्पादन यावर अवलंबून असतो. 
 • दुधाळ जनावरांना खुराक हा शरीर पोषणासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी, गर्भाची वाढ होण्यासाठी व दूध उत्पादनासाठी दिला जातो, त्यास सर्वसमावेशक असा संतुलित आहार म्हणतात. 

दुधाळ जनावरांच्या चाऱ्याचे पुढील पाच भागांत वर्गीकरण करता येईल. 

चाऱ्याचे वर्गीकरण 

 • खुराक ः ढेप, चुरी, भुसा, भरडा, टरफले, कोंडा 
 • हिरवा चारा ः बरसीम, लुसर्ण, ज्वारी, मका, गजराज, पॅराग्रास, नेपियर, चवळी 
 • सुका चारा ः कडबा, कुट्टी, गव्हांडा, धानाचे तनीस 
 • मुरघास ः मुरघास चारा 
 • इतर ः मीठ, खनिज, जीवनसत्त्वे 

दुधाळ जनावरांसाठी आहार 

 • जनावर व्याल्यानंतर पहिले चार दिवस जवळपास २ किलो गव्हाडा, १.५ किलो गूळ, २ चमचे मीठ व क्षारयुक्त मिश्रण द्यावे. 
 • पहिले तीन महिने दिवसातील संपूर्ण २८ ते ३० किलो आहार तीन वेळा विभागून दिल्यास दूध उत्पादन चांगल्या प्रकारे मिळते. 
 • रोजच्या शरीर पोषणासाठी जवळजवळ १ ते १.५ किलो देशी गायींसाठी, तर २ किलो खुराक संकरित गाय/  म्हशीसाठी द्यायला हवा. 
 • दुधाळ जनावराला वजनाच्या २ ते ३.५ टक्के सुका चारा द्यावा, त्यापैकी २/३ भाग वैरण व १/३ भाग आंबोण देणे  फायद्याचे ठरते. 
 • प्रती तीन लिटर दुधामागे प्रत्येक दिवशी एक ते दीड किलो अतिरिक्त खुराक द्यावा. 
 • दुधाळ गायी व म्हशीला प्रतिदिन १५ ते २० किलो हिरवा चारा बारीक तुकडे करून, तसेच ४ ते ८ किलो सुका चारा दिल्यास दुग्ध उत्पादनात फायदा मिळू शकतो. 
 • आहारामध्ये जास्त प्रथिने, खनिज मिश्रण असलेले खाद्य द्यावे. 
 • शेवग्याच्या झाडाचा पाला खनिज गुणधर्मासाठी उत्तम आहे. 
 • दुधाळ जनावरांना दररोज २० ग्रॅम खनिज मिश्रण खाद्यातून दिल्यास दुग्ध उत्पादनात वाढ होते. 
 • मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी पाजावे. 

इतर व्यवस्थापन 

 • काही महत्त्वाच्या बाबींची काळजी व व्यवस्थापन केल्यास दुधाच्या व स्निग्धांशांच्या प्रमाणात फरक जाणवतो. 
 • दूध एकाच माणसाच्या हाताने ठरावीक वेळेतच व समान अंतराने काढावे. 
 • शेवटची धार पूर्णपणे काढावी, त्यात स्निग्धांशांचे प्रमाण वाढते. 
 • जनावरे स्वच्छ ठेवावीत व आरोग्याची काळजी घ्यावी. 
 • जास्त दूध देणाऱ्या जनावरांच्या पुढील पिढीचे संगोपन करावे. 

संपर्क ः सचिन रामटेके, ९५४५८७२२१२ 
(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) 

 


इतर कृषिपूरक
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...
थंडीमध्ये जपा जनावरांचे आरोग्य वातावरणातील अनपेक्षित बदल जनावरांच्या आरोग्यास...
मत्स्यशेतीमध्ये बायोफ्लाक तंत्रज्ञानाचे...टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून...सध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
कोंबड्यांच्या योग्य व्यवस्थापनाकडे द्या... कुक्कुटपालन प्रक्षेत्राची जागा उंचावर असावी....
मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञानजैवपूंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत...
जनावरांच्या आहारात करा योग्य वेळी बदलजनावरांच्या आहारात अचानक बदल केल्यामुळे पोटफुगी,...
शेळ्या-मेंढ्यांतील पीपीआर आजाराकडे...पीपीआर हा शेळ्या-मेंढ्यांतील अतिसंसर्गजन्य आजार...
जातीवंत मेंढ्याची निवड महत्त्वाचीमेंढीपासून मिळणाऱ्या मांस, दूध, लोकर आणि लेंडीखत...
लसीकरणाबाबत जागरूक राहा...आजारी जनावरे रोगवाहक म्हणूनही काम करू शकतात,...
जनावरांतील लसीकरणाचे महत्त्वजनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय...
बैलातील आतडे बंद होण्याची समस्याउन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसात जनावरांना...
पीक अवशेषातून अन्नद्रव्यांची उपलब्धता पीक अवशेषांमध्ये नत्राचे १.२५ ते ०.४० टक्के,...
लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधात्मक...‘लाळ्या-खुरकुत’ हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर...