agriculture story in marathi, direct selling concept is giving economic boost to farmers in Aurangabad Dist. | Agrowon

शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीतून वाढली उलाढाल

संतोष मुंढे
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

मध्यस्थांचा अडथळा दूर होऊन शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री होण्यासाठी शासनाच्या संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना पुढे आली. त्यातून शेतकरी व ग्राहक अशा दोघांनाही ना फायदा होण्याची त्यातून संधी आहे. औरंगाबाद शहरात शेतकरी आठवडे बाजाराचे सातत्य तीन वर्षांपासून कायम आहे. या कालावधीत या विक्री व्यवस्थेतून सुमारे सव्वातीन कोटींवर उलाढाल झाली. हे आकडे सहभागी शेतकरी गटांना बाजारातील सहभाग वाढविण्यासह व्यापाराच्या थेट संधीविषयीही खुणावत असल्याचे चित्र आहे.
 

मध्यस्थांचा अडथळा दूर होऊन शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री होण्यासाठी शासनाच्या संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना पुढे आली. त्यातून शेतकरी व ग्राहक अशा दोघांनाही ना फायदा होण्याची त्यातून संधी आहे. औरंगाबाद शहरात शेतकरी आठवडे बाजाराचे सातत्य तीन वर्षांपासून कायम आहे. या कालावधीत या विक्री व्यवस्थेतून सुमारे सव्वातीन कोटींवर उलाढाल झाली. हे आकडे सहभागी शेतकरी गटांना बाजारातील सहभाग वाढविण्यासह व्यापाराच्या थेट संधीविषयीही खुणावत असल्याचे चित्र आहे.
 
औरंगाबाद शहर झपाट्याने विस्तारते आहे. साहजिकच शहराच्या शेतीमालाच्या गरजाही वाढल्या आहेत. हीच संधी राज्याचा पणन विभाग व काही शेतकरी गटांनी हेरली. शेतकरी ते ग्राहक असा थेट समन्वय साधण्याचे प्रयत्न त्यातून सुरू झाले. सुमारे दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर २०१७ मध्ये त्यास दिशा मिळाली.
जिल्ह्यातील जवळपास बावीस शेतकरी गटांनी तयारी दर्शविली. त्यामध्ये देवगिरी शेतकरी पुरुष बचत गट व रेणुकामाता महिला शेतकरी बचत गट दोन्ही अब्दीमंडी, ता. औरंगाबाद, जय किसान, गेवराई, ता. पैठण, संस्कृती कृषी प्रक्रिया उद्योग गेवराई (बार्शी), ता. पैठण, माता चंडिका, सीतामाता व ओमसाई तीनही मांडणा, ता. सिल्लोड, निसर्ग राजा शेतकरी मंडळ, कोनेवाडी, ता. औरंगाबाद, युवा माउली, लाखेगाव, ता. पैठण, पांडुरंग शेतकरी गट, कातपूर, ता. पैठण, समृद्ध शेतकरी बचत गट, जळगाव फेरण ता. औरंगाबाद, बळिराजा शेतकरी गट मांडणा, ता. सिल्लोड, शिवशक्‍ती, गोलटगाव, ता. औरंगाबाद ही गटांची प्रातिनिधीक नावे सांगता येतील.

जागेची निवड
बाजार सुरू करण्यासाठी जागेचा प्रश्‍न सर्वांत महत्त्वाचा होता. या प्रयत्नांत प्रचंड अडथळे आले. सार्वजनिक ठिकाणी जागा मिळविण्यात यश येत नसल्याचे पाहून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात प्रवेशद्वारासमोरील रिकाम्या जागेची निवड करण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. त्यानंतर मग महापालिका व संबंधित प्रतिनिधींनी अन्य ठिकाणी जागा मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू केले. आता एका जागेपासून सुरू झालेला आठवडे बाजार आता तीन जागांवर भरतो आहे.या संकल्पनेने शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळालेच. शिवाय, ग्राहकांनाही किफायतशीर दरांत माल मिळू लागला. सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांवर मर्यादा घालताहेत. परंतु संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे शेतकरी गट या बाजाराचे सातत्य टिकवून आहेत. आता जागांची संख्या अजून वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे. काही काळ हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्या मैदानावरही बाजार भरविण्यात आला. मात्र त्यात सातत्य राहिले नाही.

ग्राहकांच्या सोयीनुसार वेळ
रविवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर सकाळी ९ ते दुपारी १२, प्रत्येक शुक्रवारी ज्योती नगर महापालिका वाचनालयासमोर सकाळी ८ ते दुपारी एक तर प्रत्येक बुधवारी सकाळी ८ ते २ या वेळेत दशमेश नगर येथे बाजार भरतो. बाजाराच्या आयोजनात ग्राहकांकडून मिळणाऱ्या सूचना विचारात घेऊन प्रसंगी वेळही बदलण्यात येते. त्यानुसार ज्योती नगरमधील शुक्रवारचा बाजार काही काळ दुपारनंतर व पुन्हा सकाळीही भरविण्यात आला. ग्राहकांचा केव्हा व कसा मिळतो यावरही वेळेचे नियोजन करावं लागतं असं शेतकरी गटाचे प्रतिनिधी व आयोजक विलास भेरे सांगतात.

मोठी विक्री, समाधानकारक उलाढाल
औरंगाबाद शहरात आजवर चार व प्रत्यक्षात तीन ठिकाणी तीन वर्षांपासून कायम सुरू असलेल्या बाजारातून यंदाच्या सप्टेंबरच्या मध्यावधीपर्यंत सुमारे ११३५. ५६ टन भाजीपाला तर ३१०. ४७ टन फळांची विक्री झाली. त्यातून सुमारे सव्वातीन कोटी रुपयांची उल्लेखनीय उलाढाल झाली. ऋतुमानानुसार फळांची उपलब्धता होण्याकडे शेतकऱ्यांचा कटाक्ष राहिला. केशर आंबा, द्राक्षे, पपई, मोसंबी, पेरू, जांभूळ, सीताफळ आदी फळे सातत्याने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहिला.

औरंगाबाद- शेतकरी आठवडी बाजार- वैशिष्ट्ये

 • मोठ्या शहरात कमी गुंतवणुकीत व्यापाराची संधी
 • जुळले शेकडो ग्राहक
 • बाजाराच्या आदल्या दिवशीच होतं आगाऊ नियोजन
 • भागातील नागरिकांचा कल पाहूनच मालाची उपलब्धता
 • बाजार आयोजकांकडे शेतकरी गट प्रतिनिधी मालाची उपलब्धता आगाऊ नोंदवितात.
 • माल शक्यतो शिल्लक राहणार नाही असा प्रयत्न
 • पाच ते सहा खानावळ व्यावसायिकही या बाजाराशी जोडले
 • फळे भाजीपाल्याबरोबरच धान्य, डाळी विक्रींचीही संधी
 • गहू, ज्वारी, बाजरीची ग्राहकांकडून होते आगाऊ नोंदणी
 • जात्यावरील डाळी तसेच मटकी, हुलगा, जवस, तीळ, वाळलेल्या मिरच्यांना मागणी
 • प्रसंगी धान्य, भाजीपाला, फळांचा घरपोचही पुरवठा.
 • टप्प्याटप्याने शेतकरी गट मालाच्या उपलब्धतेनुसार होतात सहभागी
 • प्रत्येक गटातील सदस्यांची आयोजकांसोबत विचारांची देवाणघेवाण
 • प्रत्येक बाजारात अडीच ते चार टनांपर्यंत भाजीपाला व फळांची आवक
 • प्रत्येक गटाचे एक किंवा दोन प्रतिनिधी विक्री जबाबदारी सांभाळतात.

प्रतिक्रिया

शेतकरी बाजारातील भाजीपाला दर्जेदार असतो. तो टिकतोही चांगला. अन्य बाजारांच्या तुलनेत येथे व्यवस्थित दरांत आम्हा ग्राहकांना माल मिळतो.
- सिंधूताई कुलकर्णी

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाला परवडणारा दर व ग्राहकांना वाजवी दरात शुद्ध, स्वच्छ भाजीपाला, फळे, धान्य मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी गटांचाही सहभाग वाढविण्याचा प्रयत्न आहे.
-जी. सी. वाघ - ९४२२३४६९७१
उपसरव्यवस्थापक, कृषी पणन मंडळ औरंगाबाद विभाग

तीन वर्षांच्या बाजार भरविण्याच्या अनुभवानं बरंच काही शिकविलं. दुष्काळानं प्रयत्नांत अनेक वेळा खोडा घातला. परंतु माल ग्राहकांपर्यंत पोचविण्याचं सातत्य आजपर्यंत आठ शेतकरी गटांच्या माध्यमातून कायम ठेवलं. ग्राहकांशी नाळ जुळल्यानं आता माल कसा विकावा हा प्रश्‍न समोर उभा ठाकत नाही.
- विलास भेरे - ९४०४४७८९३८
प्रमुख, निसर्ग राजा शेतकरी गट, कोनेवाडी व शेतकरी बाजाराचे आयोजक

तीन वर्षांपासून या बाजारात येतो. आधी जळगावला भाजीपाला न्यायचो. त्या वेळी थेट विक्री करीत नव्हतो. स्वत: विक्री केल्यास दर चांगले मिळू शकतात हे या बाजारात अनुभवण्यास मिळालं. आता ग्राहकांशी नाळ जुळली आहे. काही वेळा विक्रीत तारांबळ उडाली तर ग्राहक आम्हाला मदत व सहकार्य करतात. ताजा माल असल्याने ग्राहकाला संतोष वाटतो.
- लक्ष्मण हाडोळे, माता चंडिका शेतकरी उत्पादक गट, मांडणा

अन्य बाजारांपेक्षा येथे दीडपट ते दुप्पटीने पैसे मिळू लागले. मालाची प्रतवारी करण्याची सवय लागली. चांगल्या प्रतीचा माल पुरविल्याने ग्राहकही आमच्याकडून आनंदाने खरेदी करू लागले. आमच्या गटात १४ सदस्य आहेत. मोसंबी डाळिंब, पपई, चिकू आंबा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वाल, मिरची, गवार, वांगे, काकडी, आदींची विक्री करतो. इथे व्यापारी नव्हे तर आम्हीच आमच्या मालाचा दर ठरवतो.
- भागवत बोडखे, ओम साई पुरुष बचत गट, मांडणा
 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
बेशिस्त म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध...मुंबई : राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३०२; २३...मुंबई : मंगळवारी (ता.३१) एकाच दिवशी तब्बल ८२ नवीन...
मुंबई बाजार समितीत पोलिसांच्या मदतीने ‘...मुंबई: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार...
पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना ...पुणे : ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर...
समन्वय साधत नगर बाजार समिती सुरूनगर ः प्रयत्न करुनही गर्दी कमी होत नसल्याने...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे: उन्हाच्या झळा वाढू लागल्याने राज्याच्या...
सीसीआयला केंद्राकडून १०५९ कोटींचा...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक...
अवजारे उद्योगाला लॉकडाऊनमधून सूट नाही पुणे: कृषी क्षेत्रातील खते, बियाणे, कीटकनाशके...
‘कोरोना’च्या राज्यात दिवसाला ५५००...मुंबई : राज्यात ‘कोरोना’ चाचण्यांची सुविधा देशात...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमीच्या सरी पुणे: राज्यात पुर्वमोसमी पाऊस आणि गारपीटीचे सत्र...
थेट विक्रीसाठी शेतकरी, गटांचा सहभाग...औरंगाबाद: शहरातील ग्राहकांकडून संचार बंदीच्या...
अतिरिक्त दूध शासन खरेदी करणार पुणे: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...