जनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्या

संतुलित, संपूर्ण आहार तंत्रामुळे जनावरांची प्रजनन क्षमता सुधारते.
संतुलित, संपूर्ण आहार तंत्रामुळे जनावरांची प्रजनन क्षमता सुधारते.

जनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले, त्यांची योग्य ती काळजी घेतली तर विल्यानंतर अाढळून येणाऱ्या समस्या कमी प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे जनावर गाभण असताना व जनावर विताना त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.   जनावरांमध्ये विल्यानंतर जर प्रजननासंदर्भात समस्या अढळून आल्या तर त्याचा प्रभाव उत्पादनावर होतो. जनावर विल्यानंतर पुढील प्रजननासंबंधीच्या समस्या उद्भवू शकतात. १) वंध्यत्व जनावरांमध्ये तात्पुरते (अस्थाई) आणि कायमचे (स्थाई) असे वंध्यत्वाचे दोन प्रकार अाढळून येतात. अ) तात्पुरते (अस्थाई) वंध्यत्व या प्रकारचे वंधत्व उपचार केले तर दूर होऊ शकते. तात्पुरते वंध्यत्व हे नर आणि मादी दोन्हीमध्ये असू शकते. आहारामध्ये पोषक तत्त्वांची कमतरता असणे, गार्भाशयासंबंधीच्या समस्या, संप्रेरकामध्ये असलेले असंतुलन, परजीवी संबंधीचे आजार, उष्णतामान अधिक असणे आणि व्यवस्थापनातील निष्काळजीपणा इत्यादी घटक वंध्यत्वासाठी कारणीभूत आहेत. जर विल्यानंतर तीनशे दिवसापेक्षा जास्त दिवस जनावर दूध देत असेल तर जनावर माजावर लवकर येत नाही. ब) कायमचे (स्थाई) वंध्यत्व या प्रकारामध्ये जनावर हे कायमस्वरूपी प्रजननास अयोग्य ठरते. या समस्येवर उपचार उपलब्ध नाहीत. उपचार

  • जनावर गाभण असताना त्यांना संतुलित आहार मिळणे गरजेचे आहे. संतुलित आहारामुळे गर्भाची वाढ व्यवस्थित होते, दूध उत्पादन चांगले मिळतेच, याशिवाय विल्यानंतर तात्पुरते वंध्यत्व येण्याच्या समस्येपासून बचाव करता येतो.
  • संतुलित आहार म्हणजे असा आहार ज्यामध्ये जनावरांना आवश्यक असणारे सर्व खाद्य घटक म्हणजे प्रथिने, खनिज पदार्थ आणि जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात असतील.
  • मात्र हा आहार देताना पशुवैद्यकाचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण बऱ्याच वेळा जनावराला गाभण असताना जास्त प्रमाणात आहार दिला जातो. त्यामुळे जनावर जास्त जाड होते आणि जास्त जाड झाल्यामुळेदेखील जनावर माजावर येत नाही (हादेखील तात्पुरत्या वंध्यत्वाचा प्रकार आहे) यासाठी जनावरांना आवश्यकतेनुसारच आहार द्यावा.
  • २) गर्भाशयात गाठी होणे गर्भाशयात गाठी झाल्यामुळे जनावर माजावर येत नाही किंवा माजामध्ये अनियममितता दिसून येते. अशा प्रकारची समस्या ही जास्त वय असणाऱ्या जनावरांमध्ये अाढळून येते. साधारणत: पाचपेक्षा जास्त वेत झालेल्या जनावरांमध्ये अशा समस्या दिसून येतात. कारणे गर्भाशयाचे रोग, संप्रेरकाचे असंतुलन आणि जार न पडणे इ. लक्षणे दूध उत्पादन कमी होणे, जनावर माजावर न येणे. उपचार जनावर विल्यानंतर साधारणत: दोन ते तीन महिन्यात जर माजावर नाही आले तर पशुवैद्यकाकडून तपासून घ्यावे. जर गाठ झालेली असेल तर पशुवैद्यकाकडून योग्य ते उपचार करून आवश्यकतेनुसार संप्रेरकाचे इंजेक्शन द्यावे. ३) जार न पडणे विल्यानंतर साधारणपणे दोन ते बारा तासांत जार पडतो. जर चोवीस तासात जार पडला नाही तर जार सडण्यास सूरवात होते. यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होऊन दूध कमी होते, तसेच जनावरांमध्ये वंध्यत्व येते. कारणे शारीरिक कमजोरी, गर्भाशयात रोगाचे संक्रमण, दिवस भरण्यापूर्वीच वासरू जन्मणे, संतुलित आहार न मिळाल्यामुळे खनिज पदार्थ व जीवनसत्त्वाची कमतरता असणे इत्यादी. लक्षणे विल्यानंतर जार बाहेर लटकणे, दूध उत्पादनात घट होणे, लघवीसोबत घाण येणे, खाणे कमी करणे इ. उपचार विल्यानंतर जर बारा तासांमध्ये जार पडला नाही तर त्यावर तात्काळ उपचार करावेत, उगाचच वाट पाहात बसू नये. जनावराला स्वच्छ ठिकाणी ठेवावे. अन्यथा जिवाणू गर्भाशयात प्रवेश करून रोग निर्माण करू शकतात. स्वत: जार काढण्याचा प्रयत्न करू नये. कारण वार गर्भाशयाला चिकटलेला असतो. ओढून काढण्याचा प्रयत्न केला तर रक्तस्त्राव होतो. ४) जनावर उलटणे काही जनावरांमध्ये ही समस्या अढळून येते. कारणे कुपोषण, संप्रेरकाचे असंतुलन, प्रजनन संस्थेचे आजार, अयोग्य व्यवस्थापन इत्यादी कारणांमुळे जनावर उलटते. उपचार पशुवैद्याद्वारे तपासणी करून त्यांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. ५) प्रजनन संस्थेचे रोग हे रोग जिवाणुजन्य असतात. या जिवाणूंच्या संक्रमणामुळे गाभण जनावरांचा गर्भपात होतो किंवा विल्यानंतर जनावर माजावर येत नाही. यापैकी काही रोग जनावरांपासून मानवालासुद्धा होऊ शकतात उदा. ब्रुसेल्लॉसीस. कारणे जनावरांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे, योग्य प्रकारच्या व्यवस्थापनाचा अभाव इत्यादी. लक्षणे दूध उत्पादन कमी होणे, गर्भपात होणे, जनावराचे खाणे कमी होणे, लघवीवाटे घाण बाहेर पडणे इत्यादी. उपचार वरील लक्षणे अाढळल्यास पशुवैद्यकाकडून उपचार करावेत. यावर प्रतिजैवकाचा वापर व गर्भाशयात १ ते ५ टक्के ल्युगॉल्स आयोडीन २५० ते ४०० मिली सोडणे हे प्रभावी उपचार आहेत. ६) मायांग बाहेर पडणे बोलीभाषेत याला भांडे पडणे असे म्हणतात. योनी मुखातून गर्भाशय बाहेर येते. कारणे गर्भाशाय मोठे असणे, गर्भाशय कमजोर असणे, जार पूर्णपणे बाहेर न पडणे, जननांगाला जखम होणे वा सूज येणे, कॅल्शिअमची कमतरता असणे, कुपोषण इत्यादी. लक्षणे गर्भाशय योनी वाटे बाहेर पडणे, सुज येणे, रक्तस्त्राव होणे जनावर कमजोर होणे व योग्य उपचार न झाल्यास बाहेर पडलेला भाग सडणे इ. उपचार पशुवैद्यकाकडून बाहेर पडलेले गर्भाशय व्यवस्थित बसवावे, आवश्यकतेनुसार कॅल्शिअम देणे इत्यादी सर्व उपचार पशुवैद्यकाकडून करावेत.   संपर्क ः डॉ. सचिन राऊत, ७५८८५७१५११ (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com