सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला) येथील शेतकऱ्यांनी आंबा, काजू या मुख्य पिकांन
यशोगाथा
कोकणातील कातळावर ड्रॅगनफ्रूट
पूर्णगड (ता. जि. रत्नागिरी) येथील डॉ. श्रीराम नारायण फडके यांनी कातळ जमिनीवर ड्रॅगनफ्रूट लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. पिकाचे शास्त्र समजून घेत त्यादृष्टीने व्यवस्थापन करून दोन एकरांत पिकवलेल्या या फळाला यंदा किलोला १०० रुपये सरासरी दर मिळाला.
फडके यांच्या म्हणण्यानुसार आंबा, काजू पिकांव्यतिरिक्त उत्पन्नाचा नवा स्रोत बिगरहंगामात तयार व्हावा या दृष्टीने कोकणातील बागायतदारांसाठी हा प्रयोग अभ्यासपूर्ण ठरणारा आहे.
पूर्णगड (ता. जि. रत्नागिरी) येथील डॉ. श्रीराम नारायण फडके यांनी कातळ जमिनीवर ड्रॅगनफ्रूट लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. पिकाचे शास्त्र समजून घेत त्यादृष्टीने व्यवस्थापन करून दोन एकरांत पिकवलेल्या या फळाला यंदा किलोला १०० रुपये सरासरी दर मिळाला. फडके यांच्या म्हणण्यानुसार आंबा, काजू पिकांव्यतिरिक्त उत्पन्नाचा नवा स्रोत बिगरहंगामात तयार व्हावा या दृष्टीने कोकणातील बागायतदारांसाठी हा प्रयोग अभ्यासपूर्ण ठरणारा आहे.
पूर्णगड (ता. जि. रत्नागिरी) येथील डॉ. श्रीराम फडके यांचे सुमारे ५० एकर क्षेत्र आहे. परंपरागत भातशेती, आंबा-काजूची झाडे आहेत. वडिलांकडून शेतीची मुळं रुजलेली. फडके व्यवसायाने एमडी डॉक्टर आहेत. रत्नागिरी येथे त्यांनी अनेक वर्षे भूलतज्ज्ञ म्हणून सेवा केली.
ते करीत असताना शेतीकडे दुर्लक्ष केले नाही. मुलगा अनिरुद्धदेखील वैद्यकीय क्षेत्रात आहे.
ड्रॅगनफ्रूटचा शोध
फडके यांचे वय आज ७२ वर्षे आहे. मात्र स्वस्थ न बसता शेतीत प्रयोग करण्याची त्यांची धडपड सुरू असते. सन २०१६ मध्ये डाळिंब, पेरू, चिकू, मोसंबी यांचीही लागवड करून पाहिली. मात्र वानरांचा त्रास, प्रतिकूल वातावरणामुळे म्हणावे तसे उत्पादन मिळाले नाही. कातळावर लागवड होईल अशा पिकाचा शोध घेताना ड्रॅगनफ्रूटविषयी माहिती मिळाली. रायगड-कर्जत भागातील दिलीप शहा यांच्या या प्रयोगाविषयी समजताच मुलगा डॉ. अनिरुद्धसह तेथे भेट दिली. पिकाचे शास्त्र, बाजारपेठ आदी मुद्दे समजून घेत त्याचा प्रयोग करण्याचे नक्की केले.
लागवडीचा श्रीगणेशा
जून २०१७ मध्ये अर्धा एकर कातळ जमिनीवर माती टाकली. निवडुंग वर्गातील या पिकाला आधार देण्यासाठी खांब रोवावे लागतात. त्यासाठी खड्डे तयार केले. अर्धा एकरात सिमेंटचे १५० खांब रोवले. एका खांबाला चार याप्रमाणे ६०० रोपांची लागवड केली. प्रति खांबाचा खर्च १२०० रुपये होतो.
रोपांची जपणूक
फडके सांगतात, की कातळ जमीन असल्याने रोपांना नियमित व चांगल्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. पावसाळा संपला की एक दिवसा आड पाणी दिले जाते. सुरुवातीला रासायनिक खत, त्यानंतर महिन्याला प्रति झाड पाच लिटर जिवामृत असे नियोजन केले. त्यातून वाढ व फळधारणा वेगाने होते. जून ते सप्टेंबर काळात फळे लागतात. पुढे सहा महिने झाडांची देखभाल करावी लागते. काही प्रमाणात बुरशी आणि लाल मुंग्या येतात. जिवामृत व गोमूत्राच्या वापरातून काहीसा प्रतिबंध करता येतो. यंदा गोगलगाय मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे फळ खरवडल्यासारखी दिसत होती. मात्र गोमूत्राच्या फवारणीमुळे प्रमाण कमी झाले.
प्रयोग दृष्टिक्षेपात
- सध्या दोन एकरांत पावणेसातशे खांब
- अर्धा एकरांत ३०० किलो फळं पहिल्या वर्षी. मग उत्साह वाढून अजून दीड एकरांत लागवड
- दोन एकरांत पुढील वर्षी एक टन फळे मिळाली.
- यंदा तिसऱ्या वर्षी दोन एकरांत तीन टन उत्पादन
- दरवर्षागणिक वाढ होत राहणार.
- प्रति किलोत सरासरी तीन फळे बसतात.
- रोपे, खांब, विहीर बांधणी व देखभाल असा आतापर्यंत १० लाखांचा खर्च.
- गेल्या वर्षी पिकातून एक लाख, तर यंदा तीन लाख एकूण उत्पन्न.
विक्रीचे नियोजन
फडके आंबा बागायतदार असल्याने मुंबई, पुण्यातील व्यापाऱ्यांचा संपर्क होताच. ड्रॅगनफ्रूटची लागवड करतानाच व्यापाऱ्यांना त्याच्या विक्रीविषयी कल्पना दिली होती. ३६, ४५ अशा फळांचा बॉक्स भरून त्यांना पाठवले. किलोला ५० रुपये ते २५० रुपये व सरासरी दर १०० रुपये मिळाला. काही माल रत्नागिरीतील स्थानिक व्यापाऱ्यांनाही विकला.
फडके यांचे प्रयोगाबाबत निरीक्षण
- कोकणातील कातळावर ड्रॅगनफ्रूट येऊ शकते. मात्र पाण्याची गरज भासते.
- कोकणात पावसाळा भरपूर असतो. फुलगळ होते. तरीही तीन वर्षांत चांगले उत्पादन मिळाल्याचेही अनुभवण्यास आले.
- आंबा, काजूचे उत्पन्न उन्हाळ्यात मिळते. ड्रॅगनफ्रूटचा हंगाम जून ते सप्टेंबर असतो. त्यामुळे या काळात कोकणच्या शेतकऱ्याला उत्पन्नाचा नवा स्रोत मिळून जातो.
अन्य शेती
हापूस आंब्याची सुमारे ७००, तर काजूची ४०० झाडे आहेत. दरवर्षी सरासरी एक हजार पेटी आंबा, तर ८०० किलो ते एक टनापर्यंत काजू मिळतो. बागेतच पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी १० ते १२ कुंड बांधले आहेत. खरिपात भात, नाचणी, वरी होते. भाताच्या मधुमती, रत्नागिरी ५, लालभात, काळभात आदी जाती घेण्यात येतात. नाचणीची मागणीनुसार ४० रुपये प्रति किलो दराने, तर वरीची ७५ रुपये दराने विक्री होते.
सेंद्रिय खतनिर्मिती
गोठ्यात चार गायी. त्यांचे शेण, पालापाचोळा आणि नारळाच्या झावळीचे तुकडे एकत्र करून गांडूळ खत तयार केले जाते. त्याचे तीन वाफे. वर्षाला दोन वेळा सुमारे दोन टन खतनिर्मिती. जिवामृतासाठी गोमूत्राचा उपयोग होतो.
जिल्ह्यातील पहिला गोबरगॅस
जिल्ह्यातील पहिला गोबरगॅस प्रकल्प पूर्णगड आणि कुर्धे गावात आणला. त्यात डॉ. श्रीराम यांचे वडील नारायण फडके यांनी १९६६ मध्ये जिल्ह्यातील पहिला गोबरगॅस पूर्णगड येथील घरी बांधला. सोळा फूट खोल खड्डा खोदून त्यावर पत्र्याचे झाकण ठेवले. आजही याच प्रकल्पातील इंधनातून स्वयंपाक तयार केला जातो, असे डॉ. फडके यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
शेती माझे ‘पॅशन’ आहे. पहिल्या दिवसापासून ‘ॲग्रोवन’चा वाचक आहे. शेतकऱ्याला वर्षभर उत्पन्नाचे स्रोत सुरू राहतील, तर शेती अधिक फायदेशीर होईल.
संपर्क- डॉ. श्रीराम फडके ९४२२४२९७४३
फोटो गॅलरी
- 1 of 91
- ››