कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने माॅडेल

कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने माॅडेल
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने माॅडेल

नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ. दत्तात्रेय वने यांनी ‘कम पानी, मोअर मनी’ हेच आपल्या शेतीचे ब्रीदवाक्य बनवले आहे. अनेक वर्षांच्या प्रायोगिक तपश्‍चर्येतून सोयाबीन, हरभरा, कांदा, गहू आदी पिकांत पाण्याचा काटेकोर वापर सांगणारे २.४० हेक्टर क्षेत्रासाठी डॉ. वने मॉडेल त्यांनी विकसित केले. तुषार सिंचन व कार्यक्षम पाणी वापरातून पाण्याची व पिकांची उत्पादकता त्यातून वाढली. राज्यभरातील अनेक शेतकरी या तंत्राचा वापर करून आपली शेती फायदेशीर करत आहेत.   नगर जिल्ह्यातील मानोरी (ता. राहुरी) येथील कृषिभूषण डॉ. दत्तात्रेय वने यांची ओळख संपूर्ण राज्याला प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून आहे. सन १९८४ मध्ये डॉ. वने यांनी बीएएमएस ही पदवी पुणे विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने प्राप्त करून गावी दवाखाना सुरू केला. शेतीचीही तेवढीच आवड असल्याने वडिलोपार्जित ६.४६ हेक्टर क्षेत्रात वडिलांना शेतीत मदत करण्यास सुरवात केली. मुळा धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात शेती होती. त्या वेळी पाटाचे पाणी भुईदंडाने यायचे. पारंपरिक पद्धतीने शेती व्हायची. हरळी, लव्हाळा यांची बेसुमार वाढ व्हायची. पिकांना गरजेपेक्षा जास्त पाणी दिले जायचे. सुपीकता घटत चालली. खर्चात वाढ, उत्पादनात घट. निव्वळ नफ्याचे प्रमाण घटू लागले. अशातच १९८९ मध्ये वडिलांचे निधन झाले.  पाणी व्यवस्थापन सुधारण्याची खूणगाठ  शेतीचा अनुभव घेत असताना अडचणी ध्यानात येत होत्या. त्यांचे चिकित्सक मन सतत जागे असायचे. अयोग्य पाणी व्यवस्थापन हेच शेती न परवडण्याचे प्रमुख कारण असल्याचे अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले. पिकांसाठी अत्यंत काटेकोर पाणी व्यवस्थापन करायचे हीच खूणगाठ मनाने बांधली. त्यातून प्रयोगांना सुरवात झाली.  पाणी व्यवस्थापनातील प्रयोग  सर्वप्रथम भुईदंडाने पिकांना पाणी देणे बंद केले. कमी भांडवली गुंतवणुकीच्या तुषार सिंचन पद्धतीची निवड केली. चाळीस पाइप्स व दहा नोझल्स घेऊन उन्हाळी भुईमुगासाठी सर्वप्रथम त्याचा वापर केला. हे वर्ष होते १९९१ चे. या वेळी शासनाकडून ५० टक्के अनुदान मिळाले. दोन विहिरी, माफक पाणी, भुईदंडाने पाणी नियोजन असल्याने कमी हेडचे व जादा पाणी देणारे पंप होते. तुषार सिंचन ही दाब नियंत्रित पद्धती होती. किमान २.५ किलोग्रॅम प्रति सेंटिमीटर वर्ग दाब आवश्‍यक होता. उपलब्ध पंपाद्वारे हे साध्य होत नव्हते, त्यामुळे पंप बदलण्याची मानसिकता तयार केली.  हायहेडचे पंप खरेदी केले. शेताच्या कडेने ९० मिमी व्यासाची ४ किलो प्रति सेंमी वर्ग दाब सहन करणारी पीव्हीसी पाइप लाइन करून घेतली. त्यावर प्रत्येकी १६० फुटांवर तुषार सिंचन जोडण्यासाठी बारे (आउटलेट) तयार केले. पंपाचा डिलिव्हरी पाइप हा पाइपलाइनला विहिरीजवळ ज्या ठिकाणी जोडला, तेथे बायपास व्हॉल्व व प्रेशर मीटर बसविले. तुषार सिंचनासाठी आवश्‍यक तेवढेच पाणी सिस्टीमकडे पाठवून उर्वरित पाणी विहिरीत सोडणे यामुळे शक्‍य झाले. सिंचन पूर्ण होईपर्यंत सिस्टीमवर समान दाब ठेवणे साध्य झाले. परिणामी प्रभावी सिंचन साध्य होऊन पिकांची वाढ जोमाने होऊ झाली.  सर्व प्रयोगांसाठी कंपनीचे इंजिनिअर व शेतकरी मित्रांची मोठी मदत झाली, त्यातून डॉ. वने मॉडेल तयार झाले.  असे आहे डॉ. वने मॉडेल  उद्दिष्ट - रब्बी हंगामात चार महिने दररोज चार तास ३०० लिटर प्रति मिनीट पाणी उपलब्ध असेल तर संबंधित शेतकरी १.२० हेक्टरवर हरभरा, ०.६० हेक्टरवर गहू, तर ०.६० हेक्टरवर कांदा पीक तुषार सिंचनाखाली घेऊ शकतो, यासाठी २.४० हेक्टर क्षेत्राचे हे डॉ. वने मॉडेल आहे.  वरीलप्रमाणे मॉडेल तयार करण्यासाठी आजच्या घडीला सुमरे ७८ हजार ते ८० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील काही तांत्रिक बाबी पुढीलप्रमाणे  पंपाची निवड  विहिरीची खोली १० मीटर असेल तर ३५ मीटर हेडचा व ३०० लिटर प्रति मिनीट डिस्चार्ज असणारा पंप आवश्‍यक आहे. कारण एक किलो प्रति सेंमी वर्ग दाब तयार होण्यासाठी १० मीटर हेडची आवश्‍यकता असते.  तुषार संच -  ७५ मिमी. ३.२ किलो प्रति सेंमी वर्ग दाबाचे २१ पाइप्स, सात फूल सर्कल, सात पार्ट सर्कल नोझलचा ओव्हरहेड स्प्रिंकलर सेट  २२८ मीटर लांबीची ९० मिमी चार किलो प्रति सेंमी वर्ग दाबाची पीव्हीसी पाइपलाइन, त्यावर चार आउटलेटस  पिकांची निवड  वरीलप्रमाणे तुषार सिंचनाच्या पायाभूत सुविधा शेतावर तयार केल्या, की पीकपद्धती निवडता येते. डॉ. वने यांनी पिकाची पाण्याची गरज, उपलब्ध पाणी यांचा अभ्यास करून आपली पीकपद्धती निवडली. ती अशी  हरभरा - पाण्याची गरज तुषार सिंचन पद्धतीने - १५ सेंमी  गहू - ३० सेंमी  कांदा - ५० सेंमी  हरभऱ्याचे क्षेत्र जास्त, तर गहू, कांद्याचे कमी ठेवले.  हवामान बदल व दर या दोन गोष्टी हाती नसल्याने एक पीक पद्धतीला फाटा दिला.  निवडलेल्या पीक पद्धतीमुळे शाश्‍वत उत्पन्नाची हमी मिळते, हे अनेक वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झाल्याचे वने सांगतात.  एखाद्या पिकात तोटा झाला तरी दुसरे भरपाई करते. वार्षिक ताळेबंदात शेतकरी नफ्यात राहतो.  उपलब्ध साधन सामग्रीचा योग्य वापर हीच एकमेव गोष्ट शेतकऱ्यांच्या हाती आहे, त्याचा विचार करूनच ही पीकपद्धती निवडल्याचे ते सांगतात.  सिंचनाचे वेळापत्रक  वापरलेले सूत्र  सिंचनासाठी वापरलेले पाणी (लिटर्स) भागिले सिंचित क्षेत्र (मीटर वर्ग) = पाणी वापर (मिमी)  या सूत्राप्रमाणे एका तासात १४,४०० भागिले १२०० बरोबर १२ मिमी = १.२ सेंमी पाण्याचे सिंचन करण्यात येते. चार तासांत ४.८ सेंमी पाणी पिकाला दिले जाते. म्हणजेच एका पाणीपाळीत अंदाजे पाच सेंमी पाणी सिंचित होते. रब्बी हंगामासाठी १५ ऑक्‍टोबर ते २४ मार्चपर्यंतचे वेळापत्रक वने यांनी याप्रमाणे तयार केले आहे.  संवेदनशील अवस्थांनुसार सिंचन 

  • हरभरा पिकाच्या तीन संवेदनशील अवस्था 
  • प्रत्येक अवस्थेत पाच सेंमी प्रमाणे १५ सेंमी. 
  • गहू ६ अवस्था - ३० सेंमी 
  • कांदा १० अवस्था - ५० सेंमी असे निश्‍चित केले आहे. त्यानुसार 
  • हरभऱ्यास ३५ दिवसांच्या अंतराने पेरणीचे धरून ७० दिवसांपर्यंत तीन पाळ्या 
  • गव्हास १८ दिवसांच्या अंतराने ९० दिवसांपर्यंत ६ पाळ्या 
  • कांद्यास ११ दिवसांच्या अंतराने १०० दिवसांपर्यंत १० पाळ्यांद्वारे सिंचन पूर्ण होते. 
  • पाण्याचा एकूण वापर  वरील कालावधीत १.२० हेक्टर हरभऱ्यासाठी १८ लाख लिटर्स, ०.६० हेक्टर गव्हासाठी १८ लाख लिटर्स व ०.६० हेक्टर कांद्यासाठी ३० लाख लिटर्स असा एकूण ६६ लाख लिटर्स पाण्याचा वापर होणार आहे.  वने मॉडेलनुसार उत्पादनाची फलश्रुती  वने मॉडेलला ‘ॲग्रोवन’ने काही वर्षांपूर्वी प्रसिद्धी दिली. राज्यभर त्याचा प्रसार झाला.  डॉ. वने यांच्या मार्गदर्शनाखाली दीपस्तंभ व शेतकरी राजा गटाच्या सदस्यांनी या मॉडेलचा अवलंब सुरू केला.  रब्बी हंगाम २०१७-१८ मधील उत्पादनाची आकडेवारी  पीक  क्षेत्र     उत्पादन उत्पन्न        खर्च       नफा  हरभरा १.२०   २४००    ७९२००     ४८,०००   ३१,२००  गहू     ०.६०  २४००   ४०,८००      २४,०००   १६,८००  कांदा  ०.६०  २४००   ,६८,०००     ६०,०००      १,००,८००  एकूण २.४० ------ ---२,८८,०००   १,३२,०००, १,५६,०००  क्षेत्र व उत्पादन हेक्टरी व बाकी आकडे रूपयांत  उत्पादन दृष्टिक्षेपात (हेक्टरी)  हरभरा - सरासरी २० क्विंटल  गहू - ४० क्विं.  कांदा - ४० टन  अनुकूल परिस्थितीत हरभऱ्याचे ३० क्विंटल, गव्हाचे ५५ क्विंटल, तर कांद्याचे ५० टन उत्पादन मिळालेले. जादा दर मिळाल्यास तो बोनस ठरेल.  वने मॉडेलप्रमाणे गव्हाची लागवड केली तर दररोज चार तासांच्या उपलब्ध पाण्यात सहा एकर गव्हापासून १२० क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळते. भुईदंडाने शेती करून याच पाण्यात फक्त चार एकरांमधून ६० क्विंटल उत्पादन पदरी पडते. मजुरी व उत्पादन खर्च त्यातून वाढतो, असे डॉ. वने म्हणतात.  वने मॉडेलचा प्रसार 

  • तब्बल १६ वर्षे स्वतःच्या शेतात पाणी व्यवस्थापनाचे विविध प्रयोग 
  • सन २०१२ मध्ये ३० शेतकऱ्यांना एकत्र करून दीपस्तंभ शेतकरी गटाची निर्मिती 
  • देवळाली प्रवरा येथील २३ सदस्यांच्या शेतकरी राजा बचत गटास मार्गदर्शन 
  • सध्या टाकळीमिया, मुसळवाडी, माहेगाव, वळण, चंडकापूर, आरडगाव, मानोरी आदीसह परिसरातील शेतकऱ्यांकडून मॉडेलचा अवलंब 
  • वने मॉडेलने आणली समृद्धी  वने मॉडेलचा अवलंब ज्या शेतकऱ्यांनी केला त्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा मार्ग सापडला. जमिनीची सुपीकता वाढली. राहणीमान उंचावले. दरवर्षी मिळालेल्या नफ्यातून बचत करीत आपत्कालीन निधी तयार झाला. कुटुंबाचा आरोग्य विमा घेऊन आजारपणासाठी होणाऱ्या खर्चाचा पर्याय सापडला. उत्पादन खर्चात बचत झाली. बारमाही पाण्याची सोय उपलब्ध असलेल्यांनी शेततळे, फळबाग, ठिबकची साथ घेतली. गाडी, बंगला, मुलांचे शिक्षण शक्‍य झाले.  वीस हेक्टरवर बीजोत्पादन  डॉ. वने यांच्या मार्गदर्शनाखाली दीपस्तंभ ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मदतीने १६ शेतकऱ्यांकडे वीस हेक्टरवर हरभऱ्याचे बीजोत्पादन  एकरी ९ ते १३ क्विटंलपर्यंत उत्पादन मिळाले  कुटुंबाचीही साथ  डॉ. वने यांना शेतीत पत्नी सौ. शोभा यांची समर्थ साथ आहे. बीएस्सी बायोटेक्नोलॉजीचे शिक्षण घेतलेला मुलगा जयंत व सून प्रियंका यांचीही मोठी मदत होत आहे.  डॉ. वने यांच्या टिप्स 

  • नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेची कास धरा. 
  • सूक्ष्म सिंचनाचा वापर करून उपलब्ध विजेची उत्पादकता वाढवा. 
  • सूक्ष्म सिंचनाच्या पायाभूत सुविधा शेतावर तयार करून पाण्याची उत्पादकता वाढवा. 
  • टोकण पद्धतीचा अवलंब करून बियाणे बचत करा. 
  • दोन ओळी व रोपांतील अंतर आपल्या जमिनीच्या सुपीकतेनुसार ठरवा. प्रत्येक रोपाला समान सूर्यप्रकाश, हवा, अन्न, पाणी मिळेल याप्रमाणे हेक्‍टरी रोपांची संख्या ठेवा. म्हणजे प्रति रोपापासून जादा उत्पादकता मिळेल. 
  • कम पानी, मोअर मनी हे ब्रीद लक्षात ठेवा. 
  • दुष्काळी भागात सिंचन विहिरींची कामे करावीत आणि पावसाचे पाणी जिरवण्यासाठी पुढाकार घ्यावा. 
  • तुषार सिंचनामुळे जमिनीची धूप होत नाही, पाण्याचा अपव्यय होत नाही. 
  • संपर्क- डाॅ. दत्तात्रय वने- ९८२२२७४२२६  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com