‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी इंजिनिअरची वाटचाल 

‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आम्ही वळलो महेश काळे म्हणाले कीभविष्यातील शेती कमीत कमी मनुष्यबळातील असेल. केवळ तंत्रज्ञान प्रणालीच साऱ्या शेतीचे व्यवस्थापन करेल. तीच सारे निर्णय घेईल. आमच्या शेतीचा प्रवास त्या दिशेनेच सुरू झाला आहे.
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी इंजिनिअरची वाटचाल 
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी इंजिनिअरची वाटचाल 

‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील शेतीचे आधुनिक स्वरूप असेल. हाच वेध पकडत पुणे येथील आयटी इंजिनिअर महेश काळे यांनी निमोणी येथील ३० एकरांत फळबाग केंद्रित शेतीची वाटचाल सुरू केली आहे. ड्रीप ॲटोमेशन व त्या पुढे जाऊन सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उभारणी त्यांच्या शेतावर झाली आहे. पाणी व्यवस्थापन विषयात त्यांचा हातखंडा तयार होत असून, त्याद्वारे व्यावसायिक शेतीतील उत्पादन व उत्पन्नाला मोठे बळ मिळू लागले आहे.   एप्रिलमधील रणरणते ऊन. उष्ण वारे, साधारण ४० अंशांपुढेच पारा. आजूबाजूला उघडा रानोमाळ. अशा परिस्थितीत फुले-फळे लगडलेली डाळिंब बाग, घडांमध्ये असलेली केळी, रमजान ईदसाठी तयार होत असलेले कलिंगड. सर्वत्र उन्हाची लाही लाही, तरीही शिवारात सभोवार हिरवाई, असं हे चित्र दृष्टीस पडतं पुणे जिल्ह्यात निमोणे (ता. शिरूर) येथील महेश काळे यांच्या शेतातील.  ‘आयटी’तील नोकरी सोडून शेती  पुणे येथे वास्तव्यास असलेले महेश आयटी इंजिनिअर आहेत. पुणे विद्यापीठातून ‘बीई कॉम्प्युटर’ची पदवी घेतल्यानंतर नामांकित आयटी कंपन्यांमधून त्यांनी बारा वर्षे नोकरीचा अनुभव घेतला. पण घरची ४० एकर शेती खुणावत होती. निमोणे येथे सलग ३५ एकर क्षेत्र, त्यातील ३० एकर पिकांसाठी, पाच एकर दुग्धव्यवसाय व निमोणीनजीक सुमारे साडेपाच एकर अशी त्यांची एकूण शेती आहे. आपल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग करून शेती अत्याधुनिक करावी असे महेश यांना वाटायचे. दोन वर्षांपूर्वी नोकरीचा राजीनामा देऊन ते पूर्ण वेळ शेतकरी झाले. नोकरी सुरू असताना शंभर संकरीत गायींचा सर्व सोयींनी युक्त सुसज्ज असा मुक्तसंचार गोठाही त्यांनी उभा केला.  पाणी व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य  शेतीत उतरल्यानंतर महेश यांनी सर्वप्रथम पाण्याची शाश्‍वतता मिळविणे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पिकांचे पाणी व्यवस्थापन करणे या बाबींवर भर दिला. गावापासून सुमारे सहा किलोमीटरवरील घोडनदीवरून सहा इंची पाइपलाइन केली. चासकमान प्रकल्पाचा फायदा झाला. दोन शेततळ्यांचे काम व अस्तरीकरण केले. प्रत्यकी सुमारे ८० लाख लिटर अशी प्रत्येक शेततळ्याची क्षमता आहे. तीन विहिरी, पाच-सहा बोअरवेल्स घेतल्या. क्षेत्र मोठे तसेच फळबाग केंद्रित शेती असल्याने मजूरबळ मोठे लागायचे. पण तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावरील अवलंबित्व कमी करण्याचे ठरवले. सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील अग्रेसर कंपनीची ड्रीप ॲटोमेशन यंत्रणा (एनएमसी प्रो कंट्रोलर) ३० एकरांत बसविली.  पाण्यावर आधारीत स्मार्ट पीक पद्धती 

  • फळबाग केंद्रित पीक पद्धतीची रचना 
  • यंदा पाण्याची भीषण स्थिती व भविष्यातील गरज लक्षात घेऊन ३० एकरांपैकी 
  • १० ते १२ एकरांतच व्यावसायिक पिकांचे नियोजन 
  • यात साडेचार एकर डाळिंब, प्रत्येकी दोन एकर केळी व कलिंगड 
  • सुमारे १६०० झाडांची डाळिंबाची नवी बाग 
  • सुमारे १०० (लहान-मोठ्या) गायींचा फार्म असल्याने ८ ते १० एकरांवर लसूणघास, मका, कडवळ. त्यासाठी तुषार सिंचनाचा वापर 
  • दोन एकरांत सीताफळाची नवी बाग 
  • येत्या काळात ग्रीनहाउस, कट फ्लॉवर, द्राक्षशेतीचा मानस 
  • सेंट्रलाइज्ड सिस्टिम 

  • संपूर्ण क्षेत्राचे पीकनिहाय सहा प्लॉटस 
  • संगणकीय प्रोग्रॅमिंग करून प्रत्येक पिकाला गरजेनुसार पाणी व खते एकाच ठिकाणाहून देण्याची सोय. त्यासाठी मध्यवर्ती (सेंट्रलाइज्ड) पद्धत 
  • मोजून मापून पाणी वापर 

  • स्वतः इंजिनियर असल्याने तंत्रज्ञानातील सर्व बाबी वापरण्यात महेश कुशल झाले आहेत. 
  • पूर्वी पाणी, खते देण्यासाठी चार-पाच मजुरांवर अवलंबून राहावे लागे. आता ती गरज उरलेली नाही. 
  • पिकाचे वय, वाढीची अवस्था, हवामान, तापमान, पाणी, बाष्पीभवन या बाबी लक्षात घेऊन 
  • प्रत्येक झाडाची पाण्याची गरज ते माहित करून घेतात. 
  • त्यानुसार कंट्रोलरच्या साह्याने प्रोग्रॅमिंग करून तेवढेच पाणी, खत (फर्टिगेशन) झाडांना पोचवले जाते. 
  • त्यासाठी व्हॉल्यूम बेस (क्वांटिटीनुसार) किंवा टाइम बेस (किती वेळ पाणी सोडायचे) अशा दोन पद्धतींचा वापर 
  • त्यामुळे पाणी व खतांचा अपव्यय टाळून पिकांना गरजेएवढाच पुरवठा. शिवाय त्यावरील खर्चातही बचत 
  • महिनाभराचे ‘प्रोग्रॅमिंग’ही शक्य 
  • कंट्रोलर कम्युनिकेशन कार्डचा वापर करून मोबाईल, लॅपटॉपद्वारेही वापर करता येतो 
  • सहा ॲटोमेटिक व्हॉल्व्हज, एक पॉलिहाउससाठी राखीव 
  • -ड्रीप ॲटोमेशनद्वारे पाच प्लॉटचे रोटेशन सुलभपणे शक्य 
  • -वीज गेल्यास प्रोग्रॅम बंद होऊन आहे तिथेच थांबतो. वीज आल्यानंतर तिथूनच पुढे सुरू होतो. 
  • थ्री फेजसाठी इनव्हर्टर्स 
  • वीजभारनियमनाच्या काळात शेताकडे रात्रीचे जाणे, बारीने पाणी देणे बंद झाले. 
  • -सुरवातीच्या लॅटरलपासून शेवटच्या लॅटरलपर्यंत एकसमान पद्धतीने पाणी देता येते. 
  • वॉटर मीटरचा उपयोग  वॉटर मीटर असल्याने किती तासात किती पाणी दिले गेले हे मोजता येते. एका प्लॉटची पाण्याची गरज एक लाख लिटर आहे व दोन तासात एक लाख तीस हजार लिटर जात असेल तर ‘व्हॉल्यूम बेस’चा वापर करू शकतो. यात एक लाख लिटर पाणी गेल्यानंतर ते पाणी आपोआप बंद होते. म्हणजेच पुढे होणारा तीस हजार लिटरचा अपव्यय टाळता येतो.  पाण्याच्या ठेवतात नोंदी  कोणत्या प्लॉटला किती वाजता, किती वेळ पाणी वा खते द्यायची याच्या नोंदी महेश दररोज ठळक अक्षरात मार्करच्या साह्याने करून ठेवतात. त्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी डॅशबोर्ड लावला आहे. त्यांच्या अनुपस्थितीतही अन्य व्यक्ती त्या नोंदी वाचून पाणी व्यवस्थापन करू शकतो.  ड्रीप ॲटोमेशनच्या पुढे   ड्रीप ॲटोमेशनचा वापर सुरू असतानाच महेश त्यापुढील तंत्रज्ञानाकडे वळले आहेत. नेटबीट असे त्याचे नाव आहे. ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’(कृत्रिम बुद्धिमता)चा वापर करणारी यंत्रणा असेही त्याला म्हणता येते. संबंधित कंपनीने मागील डिसेंबरमध्ये हे अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात ‘लॉंच’ केले. या तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्याच्या दृष्टीने कंपनीने आमची निवड केली याचा अभिमान वाटतो, असे महेश यांनी सांगितले.  या तंत्रज्ञानातून मिळणाऱ्या बाबी  १) ‘क्लाउड कनेक्टिव्हिटी’   महेश म्हणाले की आधीच्या तंत्रातील बाबींबरोबरच काही नव्या बाबी यात समाविष्ट केल्या आहेत. त्याद्वारे शेतीतील मनुष्यबळ अजून कमी होईल. यात ‘क्लाउड कनेक्टिव्हिटी’ आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून आपल्या शेताचे व्यवस्थापन करणे शक्य होते.  २) स्वयंचलित हवामान केंद्र (वेदर स्टेशन)  महेश यांच्या शेतात त्याची उभारणी केली आहे. त्या आधारे कमाल-किमान तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता, सूर्यप्रकाश, पर्जन्यमान आदी सात, आठ निकषांच्या नोंदी घेता येतात.  ३) सेन्सर्स-  मातीतील आर्द्रता, बाष्पीभवन सांगणाऱ्या सेन्सर्सची जोड आहे. त्याद्वारे आपली मातीच पाण्याची गरज सांगेल. पाणी गरजेपेक्षा जास्त झाल्यास सेन्सर ‘ॲटोमटिक’ पाणी बंद करेल. तसेच पाणी कमी पडत असल्यास पंप ‘ॲटोमेटिक’ सुरूही करेल.  ४)  डेटा  ॲनालिसिस-  पिकांना दिलेले पाणी, खते वा एकूणच व्यवस्थापनाच्या नोंदी ठेवता येतात. त्यानुसार काय चुका घडल्या, कशाची कमतरता भासली हे सारे ‘डेटा ॲनालिसीस’ करता येते. पुढील हंगामात त्या पिकाचे व्यवस्थापन करताना या सर्व बाबी सुधारता येतात. 

    ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आम्ही वळलो  महेश म्हणाले की नेटबीटमधील सेन्सर्स किंवा काही बाबी अद्याप कार्यान्वित झालेल्या नाहीत. येत्या काळात त्या सुरू होतील. पण भविष्यातील शेती कमीत कमी मनुष्यबळातील असेल. केवळ तंत्रज्ञान प्रणालीच साऱ्या शेतीचे व्यवस्थापन करेल. तीच सारे निर्णय घेईल. आमच्या शेतीचा प्रवास त्या दिशेनेच सुरू झाला आहे. 

    समाधानकारक उत्पादन  तंत्रज्ञानाला अभ्यासाची जोड व कुशल पाणी व्यवस्थापनाआधारे मिळणाऱ्या उत्पादनातून महेश यांचा आत्मविश्‍वास व उत्साह वाढीस लागला आहे. डाळिंबाचे एकरी ५ ते ६ टन उत्पादन आता ८ ते ९ टनांपर्यंत गेले आहे. केळीचे पहिलेच वर्ष आहे. तरीही दोन एकरांत ६० टन उत्पादन अपेक्षित आहे. सुमारे २२ टन मालाची विक्री झाली आहे. घड मजबूत व २८ ते ३२ किलो वजनाचे आहेत. त्यास आठ ते नऊ फण्या आहेत. डाळिंबाच्या नव्या बागेत यंदा कांद्याचे आंतरपीक घेतले. पाच एकरांत एकरी साडेसात टनांप्रमाणे उत्पादन मिळाले. त्याचा दर्जाही चांगला होता. चेन्नईला तो नऊ रुपये प्रति किलो दराने विकला. वाहतूक खर्च वगळून हा दर साडेसहा रुपये मिळाला.  गुणवत्ताही वाढली  मालाची गुणवत्ताही वाढली. दरांत त्याचा फरक दिसला. व्यापाऱ्याने १० ते साडेदहा रुपये प्रति किलो दराने केळीची जागेवरच खरेदी केली. डाळिंबाचे १५० ते २०० ग्रॅम वजनाचे फळ ३०० ग्रॅमपर्यंत मिळाले. त्याला चकाकी व रंगही आकर्षक होता. किलोला ४८ ते ५० रुपये दर मिळाला.  वडिलांचा मोठा आधार  महेश यांचे वडील राजाराम यांनी ३५ वर्षे मुंबईत आघाडीच्या कंपनीत नोकरी केली. सन २००४ मध्ये ‘व्हीआरएस’ घेऊन ते गावी शेती करू लागले. शेतीत त्यांचे श्रम मोठे आहेत.  बंधू हरिश्‍चंद्रही झाले शेतकरी  महेश यांचे बंधू हरिश्‍चंद्र हेदेखील आयटी इंजिनिअर. नामांकित कंपनीत ते मॅनेजर असून ३०० ते ४०० कर्मचारी त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. जगातील विविध देशांना हरिश यांनी भेटी दिल्या आहेत. दर शनिवार, रविवार ते पूर्ण वेळ शेतीत राबतात. बाहेरील देशांत अनुभवलेले तंत्रज्ञान आपल्या शेतात आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शेती, निसर्गाशी ‘कनेक्ट’ राहायचंय. ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हीच काळाची गरज आहे. तुमच्या शेतीतील डेटा  ॲनालिसीस केल्यानंतर त्या आधारे ‘भविष्य’ तुम्ही ठरवू शकता असं ते म्हणतात.  इस्त्रायली तज्ज्ञांनी बदलली शिप्ट  महेश यांनी रंजक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, शेतात अत्याधुनिक यंत्रणा बसवली. कंपनीला क्लाउड तंत्राद्वारे आमच्या शेतातील डेटा इस्त्रायल येथील आपल्या मुख्यालयात बसून पाहाता येतो. त्यासाठी वीज असावी लागते. आपल्याकडे कायम भारनियमन असते. भारतात वीज का नाही? ती जाते म्हणजे काय होते हे तिथल्या शास्त्रज्ञांना उमगायचे नाही. ते त्यांना समजून द्यावे लागले. मग स्टॅबिलायझर, इनव्हर्टर या बाबी आम्हाला बसवाव्या लागल्या. तो देश आपल्यापेक्षा साडेचार तासांनी मागे आहे. आपल्याकडे रात्री वीज यायची. त्या वेळी त्यांचे ऑफिस बंद झालेले असायचे. मग त्यांनी आपल्या कामाची शिप्ट बदलून ती रात्री म्हणजे भारतात वीज येण्याच्या वेळेत बदलून घेतली. त्याद्वारे शेतातील सर्व नोंदी घेणे त्यांना शक्य होऊ लागले. कामातील ‘डेडीकेशन’ कसे असावे याचा हा उत्तम नमुनाच महेश यांनी पेश केला. शेताचे ‘जिओ टॅगिंग’ केले आहे. त्या आधारे पुणे जिल्ह्यातील हवामान, तापमानातील चढ-उतार, मातीतील ओलावा आदी नोंदी इस्त्रायली शास्त्रज्ञांना घेता येतील. त्या आधारे ते पुढील मार्गदर्शन अचूक करू शकतील, असेही महेश यांनी सांगितले.  संपर्क- महेश काळे- ७७७४०००७९५   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com