व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाब उत्पादक झाले सज्ज

व्हॅलंटाईन डे निमित्त येथील फ्लोरिक्ल्चर पार्क मधुन गुलाब निर्याताची लगबग सुरु असून, काढणी झालेली फुले पॅकहाऊस मध्ये घेऊन जाताना महिला.
व्हॅलंटाईन डे निमित्त येथील फ्लोरिक्ल्चर पार्क मधुन गुलाब निर्याताची लगबग सुरु असून, काढणी झालेली फुले पॅकहाऊस मध्ये घेऊन जाताना महिला.

तोंडावर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने लाल गुलाबांची निर्यात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यासह तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधून सुरू झाली आहे. यंदा प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन आणि त्या अनुषंगाने निर्यात घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तरीही यंदा चांगल्या दरांच्या अपेक्षेने मावळ तालुका आणि फ्लोरिकल्चर पार्कमध्ये निर्यातीची लगबग सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव, मावळ भाग फूलशेतीसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डेसाठी या भागातून गुलाबाच्या फुलांची परदेशात निर्यात होते. त्यासाठी बराच काळ आधीपासून फूलशेती व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी आदींची लगबग सुरू असते. ‘तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क ग्रोअर्स असोसिएशनचे सचिव मल्हारराव ढोले म्हणाले की यंदा एकूण १०० एकरांवरील पॉलिहाउसमधील गुलाबांच्या निर्यातीचे नियोजन आहे. सुमारे २५ लाख फुलांच्या निर्यातीचे उद्दिष्ट आहे. पंचवीस जानेवारीपासून निर्यातदारांकडून फुलांचे नमुने पाठविण्यास सुरुवात झाली आहे. तीस जानेवारीपासून नियमित निर्यात सुरू आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ती सुरू राहते. उत्पादनात घट यंदा लांबलेला पाऊस, उष्ण तापमानाचा अधिक कालावधी आणि थंडीचे कमी मिळालेले दिवस यामुळे पॉलिहाउसमध्ये डाऊनी, करपा, थ्रिप्स, माईटस आदींचा प्रादुर्भाव झाला. फुले काळी पडण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे २० ते ३० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट झाली आहे. मात्र दरांत काही अंशी वाढ मिळाली. गेल्या वर्षी ४२, ५२ आणि ६२ सेंटिमीटरच्या लांब काडीच्या फुलांना अनुक्रमे ७ रुपये, ११ आणि १२ रुपये दर मिळाला. यंदा तो एक रुपयाने जास्त मिळाला आहे. फ्लोरिकल्चर पार्कमधील ‘सनटेक ॲग्रो’चे व्ही. एम. जम्मा म्हणाले की, माझे सहा एकरांवर पॉलिहाउस आहे. गेल्या वर्षी दोन लाख फुलांची निर्यात केली. यंदा उत्पादनात २० टक्के घट असून दीड लाखांपर्यंत निर्यातीची अपेक्षा आहे. मावळ तालुक्यातील चित्र मावळ तालुक्यात सुमारे तीन हजार एकरांवर गुलाब शेती केली जाते. हवामान बदलामुळे यंदा फुलांचे उत्पादन व निर्यातही लवकर सुरू करण्याची वेळ आली. गेल्या वर्षी मावळ तालुक्यातुन सुमारे ७५ लाख फुलांची निर्यात झाली. यंदा ती ५० लाखांपर्यंतच झाली. गेल्या वर्षी मावळ भागातून देशांतर्गत बाजारपेठेत एक कोटी फुलांचा पुरवठा झाला होता. यंदा तो २५ लाखांपर्यंतच झाला. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत यंदा चांगले दर राहतील, अशी अपेक्षा पुणे जिल्हा फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे यांनी व्यक्त केली. यंदा दीड लाख फुलांची निर्यात आमचे पाच एकरांत पॉलिहाउस आहे. गेल्या वर्षी एक लाख तर यंदा दीड लाख फुलांची निर्यात झाली आहे. यात ४०, ५०, ६० सेंटिमीटरच्या फुलांना अनुक्रमे ९, १३, आणि १५ रुपये दर मिळाला. गेल्या वर्षी हेच दर ८, ११ आणि १२ रुपये होते. यंदा दिल्ली, बडोदा, अहमदाबाद, उदयपूर, इंदूर आणि चेन्नई येथे सुमारे सव्वा लाख फुलांची विक्री झाली. प्रति वीस फुलांच्या जुडीला १६० रुपये तर निर्यातीसाठी प्रति १० फुलांच्या जुडीला १५० रुपयांपर्यंत दर मिळाला.  सतीश मोहोळ, साई फ्लॉवर्स, पवनानगर, कडधे, ता. मावळ, जि. पुणे दरांच्या वाढीची आशा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत फूल बाजारात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने नऊ फेब्रुवारीपासून गुलाबांना मागणी सुरू झाली आहे. सरासरीपेक्षा ४० टक्क्यांनी मागणी वाढली. वीस फुलांच्या गड्डीला १४० ते १६० रुपये दर असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी राहण्याचा अंदाज आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दोन दिवस आधी हा दर २०० ते २५० रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज फूल व्यापारी सागर भोसले यांनी व्यक्त केला. अन्य रंगांच्या गुलाबांनाही मागणी फूल उत्पादक सतीश मोहोळ सांगतात की, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ७० टक्के मागणी ही लाल गुलाबांना असते. मात्र त्याचबरोबर पिवळा, नारंगी, पांढरा, बाय कलर (पाकळीच्या कडा पांढऱ्या व पाकळ्यांचा रंग गुलाबी) आदी रंगांच्या फुलांचीही एकूण निर्यातीच्या सुमारे २५ ते ३० टक्के निर्यात होते. फूल उत्पादक सतीश मोहोळ सांगतात की, नेदरलॅंड मार्केटला फुले पाठविण्यात येतात. तेथून युरोपातील अन्य देशांमध्ये फुले जातात. फुले वर्षभर निर्यात होत असल्याने निर्यातदारांशी ‘कमिटमेंट’ केलेली असते. प्रति फूल सरसकट सहा रुपये दर मिळतो. फूल उत्पादकांसाठी वर्षभरात हाच एक सण गुलांबाच्या मोठ्या मागणीचा असतो. त्यामुळे त्यावरच विशेष लक्ष केंद्रित केले जाते. युरोपाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया तसेच दुबई व अन्य आखाती देशांमध्ये फुले जातात. -मल्हारराव ढोले- ८६००३००७९५ -शिवाजी भेगाडे- ७०६६२१११७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com