agriculture story in marathi, export oriented grape farming in high rainfaill region, chousale, niphad, nasik | Agrowon

जास्त पावसाच्या प्रदेशात निर्यातक्षम द्राक्षशेती (video सुद्धा)

मंदार मुंडले
मंगळवार, 12 मार्च 2019

गणेश म्हणतात... 

 • द्राक्षशेतीत आजपर्यंत बरेचसे काम जमिनीच्या वरच्या भागातच झाले. माती व मुळ्यांवर त्या तुलनेत काम कमी झाले. आम्ही त्यावरच अधिक लक्ष केंद्रित केले. 
 • प्रत्येक गोष्ट का करायची, त्यामागील वैज्ञानिक कारण माहीत हवे. 
 • कोणतेही शास्त्र जसेच्या तसे प्रत्येकाला लागू होते असे नाही. शास्त्रामागील संकल्पना महत्त्वाची. स्थानिक परिस्थितीनुसार त्यात बदल घडवावा लागतो. 
 • द्राक्षशेतीत ६० ते ७० टक्के ‘रोल’ हा इरिगेशनचाच आहे. 
 • झाडाची ‘फिजिऑलॉजी’ (वनस्पती शरीरक्रिया शास्त्र) माहीत हवी. 

जास्त पावसाच्या भागात द्राक्षशेती आणि तीही निर्यातक्षम म्हणजे प्रचंड आव्हानाची गोष्ट. पण, पिंपळगाव (जि. नाशिक) येथील युवा शेतकरी गणेश मोरे यांनी चौसाळे (ता. दिंडोरी) येथील आपल्या पंधरा एकरांवर हे शिवधनुष्य पेलले. द्राक्षशेतीत अग्रेसर देशांना भेटी दिल्या. पिकासह माती, मुळे, पाणी यांचे विज्ञान अभ्यासले. कायम शास्त्रज्ञाची वृत्ती जोपासत उत्तम तंत्रज्ञानाचा आविष्कार घडवत जागतिक गुणवत्तेची द्राक्षे आपल्या मातीत पिकवली. 
 
नाशिक जिल्हा प्रयोगशील शेतकऱ्यांची खाणच आहे. येथील द्राक्ष बागायतदारांनी कर्तृत्वाच्या जोरावर देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. पिंपळगाव बसवंत येथील गणेश मोरे हे त्यापैकीच अभ्यासू युवा शेतकरी. केवळ जमिनीच्या वरच्या भागातील पिकाकडे न पाहता जमिनीखाली म्हणजे मुळे, माती, पाणी अशा सर्व घटकांवर लक्ष केंद्रित केले. द्राक्षशेतीत अग्रेसर देशांना भेटी देत सर्वोत्तम तंत्रज्ञान शिकून घेतले. एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे काम करून अतिपावसाच्या प्रदेशात निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन त्यांनी यशस्वी घेऊन दाखवले आहे. देशभरातील शेतकरी आणि तज्ज्ञांसाठीही गणेश आदर्श म्हणून पात्र ठरले आहेत. 

गणेश मोरे यांची द्राक्ष शेती प्रत्यक्ष पहा.. video

गणेश यांची शेती 

 • पिंपळगाव- चार एकर 
 • चौसाळे- पंधरा एकर- तेरा एकर थॉमसन सीडलेस, दोन एकर- सुधाकर 
 • लागवड अंतर- ९ बाय ६ फूट. 
 • नवी बाग- १० बाय सहा वा पाच फूट. सूर्यप्रकाश व ‘स्पेसिंग’ जास्त मिळण्यासाठी बागेची उंची वाढवली. 

भौगोलिक स्थिती 
गणेश यांना द्राक्षशेतीचा वारसा आजोबा आणि वडील शशिकांत यांच्याकडूनच मिळाला. त्यांनी २००३ मध्ये चौसाळा येथे पंधरा एकर शेती घेतली. इथे पूर्णपणे द्राक्षशेतीच होते. चौसाळे परिसर दिंडोरी तालुक्यात येत असला, तरी तो वणी, सापुतारा यांना जवळ आहे. बागेसमोर मोठ्या डोंगरारांगा उभ्या आहेत. इथं पावसाचं प्रमाण १२०० ते १५०० मिमीपर्यंत आहे. 

जास्त पावसाच्या प्रदेशात द्राक्षशेती 
गणेश म्हणतात, की जास्त पावसाच्या प्रदेशात द्राक्षशेती करणे जगाच्या पाठीवर आव्हानाचे आहे. पण, हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरवले. जमिनीत खूप ओलावा द्राक्षाला सहन होत नाही. पाऊस खूप पडतो त्या वेळी जमिनीत सतत दलदल, वरती ढगाळ वातावरण. पावसाळ्याचे चार महिने झाड पूर्ण क्षमतेने कार्य करू शकत नाही. सुमारे ७० ते ९० दिवस सूर्यप्रकाश मिळत नाही. त्याचा फटका द्राक्षाच्या वजनाबाबत सहन करावा लागतो. वॉटर बेरीज असतात. अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी गणेश यांनी १२ वर्षांच्या काळात प्रचंड कष्ट व अभ्यास केला. द्राक्षघडांचं वजन कमी ठेवून अधिकाधिक चांगलं उत्पादन घेण्यावर भर दिला. 

उत्पादन (१२ ते १३ वर्षांचे सातत्य) 

 • पंधरा वर्षांची बाग- एकरी- १४ टन, पैकी १२ ते १३ टन निर्यातक्षम 
 • एकूण उत्पादनाच्या ९० टक्के ‘एक्सपोर्ट’ 
 • अपवादाची वर्षे- 
 • सन २००९- फयान, मोठा पाऊस. ६० टक्के नुकसान 
 • मागील वर्षी ऑक्टोबर- सात-आठ दिवसांत ७० मिमी. पाऊस 

बागेचे पुनरुज्जीवन 
गणेश यांनी जुन्या बागांचे पुनरुज्जीवन करण्यास प्रारंभ केला आहे. ते म्हणाले, की दक्षिण आफ्रिका, चिली, पेरू या द्राक्षशेतीत अग्रेसर देशांत आम्हाला मातीच्या जडणघडणीवर भरपूर काम केलेलं पाहायला मिळालं. मातीत चुनखडी, बाय कार्बोनेटस, सोडियम आदी घटक जास्त झाल्यास ‘ट्रीटमेंट’ करून ते कमी करण्याचं तंत्रही महत्त्वाचं वाटलं. 

पाण्यासाठी खर्च 
पंधरा एकराला उन्हाळ्यातले चार महिने पुरेल एवढं पाणी शेततळ्यातून पुरेसं होत नव्हतं. एकलहरे धरण सहा किलोमीटरवर आहे. चार वर्षांपूर्वी तेथून पाइपलाइन केली. विहीरही आहे. सन २००३ मध्ये जमीन घेण्यासाठी खर्च केला, सुमारे सव्वा १९ लाख रुपये. पण, त्याच जमिनीवर पाणी आणण्यासाठी मात्र खर्च केला तब्बल ३५ लाख रुपये. यातूनच पाण्यासाठी केलेला संघर्ष कळून येतो. 

जमीन, पाण्याची वैज्ञनिक भाषा 
मोघम किंवा अंदाजे हा शब्दच गणेश यांच्या डिक्‍शनरीत नाही. प्रत्येक गोष्ट शास्त्रीय परीक्षण व वैज्ञानिक कसोटीवर तोलण्याची त्यांची पद्धत आहे. झाडाला वाढीच्या प्रत्येक अवस्थेत लागणाऱ्या पाण्याचा हिशेब त्यांच्याकडे आहे. जमीन वरकरणी काळी, पण प्रयोगशाळेच्या अहवालाआधारे ‘लोमी क्ले’ प्रकारची आहे. त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता (वॉटर रिटेंशन) १७० मिमी. आहे. जमिनीत १० ते १२ टक्के चुनखडी असून, पीएच ८ पर्यंत आहे. 

‘फिक्स शेड्यूल’ नको 
खतांचे निश्‍चित म्हणजे फीक्स शेड्यूल वापरण्याची गणेश यांची पद्धत नाही. ते प्रत्येक हंगामात माती, पाणी परीक्षण करतातच. पाच वेळा पान- देठ परीक्षण होते. त्यानुसारच अन्नद्रव्यांचे प्रत्येक स्टेजसाठी डोसेस दिले जातात. कोणत्याही प्लॉटचा ‘फर्टीगेशन प्रोग्रॅम’ एकसारखा असत नाही. 

पान देठ परीक्षण (पाच वेळा) 

 • बाग फुटून साधारणतः १० सेंटीमीटर फूट आल्यानंतर ते मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेपर्यंत 
 • दर १५ दिवसांनी. 
 • मातीत पोटॅशचे प्रमाण जास्त. 
 • मॅग्नेशियमचे प्रमाण पाणी व मातीतही कमी. त्यामुळे वर्षभर प्रत्येक इरिगेशनद्वारे मॅग्नेशियम 

जागतिक दर्जाचे गुरू लाभले 
पिंपळगाव येथील महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या विज्ञान संशोधन समितीचे सदस्य अरुण मोरे हे गणेश यांचे काका आणि गुरूही. आपल्या द्राक्षशेतीत त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे व त्यांनीच बाहेरचे जग दाखवल्याचे गणेश नम्रपणे सांगतात. सन २०१५ च्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्यात भेटलेले जगप्रसिद्ध द्राक्षतज्ज्ञ व कंसल्टंट रॉडरिगो ऑलिव्हा हे गणेश यांचे दुसरे गुरू झाले. जमिनीपासून वर दिसणारे पीक म्हणजेच केवळ शेती नव्हे, तर जमिनीखालील पीक (माती व मूळसंस्था) हा तेवढाच महत्त्वाचा भाग असल्याचा गुरुमंत्र रॉडरिगो यांनी दिला. मग गणेश व सहकाऱ्यांनी स्वखर्चाने रॉडरिगो यांना भारतात आणले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार बागांत बदल घडू लागले. 

मुळांचे कार्य ‘लाइव्ह’ पाहण्याचा प्रयोग 
दक्षिण आफ्रिकेतील द्राक्ष बागायतदाराकडे गणेश यांनी झाडांच्या मुळांचे कार्य ‘लाइव्ह’ पाहण्याचा अभिनव प्रयोग अनुभवला. एक मीटर खोल व एक मीटर रुद आकाराची पेटी (याला जादूची पेटी म्हणता येईल) बागेत दोन झाडांच्या मध्यभागी खड्डा करून बसवण्यात येते. आपण पेटीत उतरायचे. त्याच्या दोन्ही बाजूंना काचा असतात. या बाजूंकडील झाडांची मूळसंस्था काचेतून दिसू लागते. द्राक्षाच्या मुळ्या किती खोल गेल्या आहेत? किती नव्या मुळ्या येताहेत? त्यांची स्थिती काय आहे? जमिनीवरून दिले जाणारे पाणी खालीपर्यंत कसे पसरते, अशा सर्व बाबी पेटीत उतरून अभ्यासण्याचा ‘लाइव्ह’ अनुभव खरोखरंच रोमांचक व आपले ज्ञान उंचीवर नेणारा असतो. 

मुळांच्या वाढीचे ‘रीडिंग’ 
गणेश यांनी ही पेटी आपल्या बागेत बसवली. यातील काचेवर प्रत्येक इंचाचे चौरस आहेत. मुळी जसजशी प्रत्येक चौरस पार करीत पुढे जाईल तसतसे मार्करद्वारे ‘रीडिंग’ घ्यायचे. किती दिवसांत मुळी किती मिलिमीटर वाढली, वेग कुठे मंदावला? त्या वेळी हवामान कसे होते? बाग ताणात असताना, खूप थंडीत मुळांच्या संख्येवर काय परिणाम होतो? अशा अनेक बाबींचे निरीक्षण घेत राहणे म्हणजे संशोधक होऊनच काम करण्यासारखे असते. 

पाणी किती व केव्हा द्यायचे? 

रॉडरिगो यांनी सांगितलेल्या मुद्द्यांवर गणेश पाणी व्यवस्थापन करतात. 

मुद्दा १- द्राक्षाच्या मुळ्या किती फूट खोल व रुंद पसरल्या आहेत? 
क्षेत्र निश्‍चित करायचे. उदा. एकरी ८०० झाडे आहेत. तर, तेवढे क्षेत्र ओलावणे गरजेचे. 

मुद्दा २- पाणी धरून ठेवण्याची (वॉटर रिटेंशन) जमिनीची क्षमता 
प्रयोगशाळेद्वारे त्याची तपासणी करायची. 
-या क्षमतेपेक्षा जास्त उपलब्ध असलेले पाणीच पिकाला उपलब्ध होते. 

उदा. १०० लिटर पाणी दिले व जमिनीची ‘वॉटर रिटेंशन’ क्षमता ४० टक्के असेल, तर उर्वरित 
६० टक्केच पाणी पिकासाठी उपलब्ध असते. 

या दोन मुद्द्यांआधारे ठरवलेले क्षेत्र ओलित करायला किती लाख लिटर पाणी लागेल, याचे गणित काढता येते. 

मुद्दा ३- पाण्याचे बाष्पीभवन होण्यास किती दिवस लागतात, हे झाडाच्या वाढीवर अवलंबून आहे. मुळांच्या वाटे कॅनोपी वा पानांद्वारे पाणी उत्सर्जित होते. 

अतिरिक्त पाण्यासाठी चर 
अतिपावसाच्या भागात गणेश यांनी पंधरा वर्षे जोपासलेल्या द्राक्षबागा पाहिल्या की त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाला व प्रयत्नांना दाद द्यावीच लागते. पूर्वी पावसाचे अतिरिक्त पाणी जमिनीत साचून मुळ्या गुदमरून निकामी व्हायच्या. त्यावर बुरशीचा संसर्ग व्हायचा. उपाय म्हणून नव्या प्लॉटमध्ये ड्रेनेजची व्यवस्था केली आहे. दर शंभर फुटांवर तिरपा पाच फूट खोल चर आहे. खालून तीन थरांत दगड गोटे, जाड वाळू आहे. प्लॅस्टिकचा पेपर अंथरला आहे. वरच्या दोन फुटांत माती आहे. हे चर किती अंतरावर घ्यायचे, त्याचा अभ्यास व उतार पाहून अडीच एकरांसाठी सुमार सहा अशी त्यांची संख्या ठेवली. 

संजीवकांचा वापर नियंत्रणात 
गणेश सांगतात, की थॉमसन, गणेश आदी वाण जोमाने वाढणारे (व्हिगरस) नसल्याने संजीवके वापरणे गरजेचे ठरते. मधल्या काळात संजीवकांचा भरमसाट वापर सुरू झाला. त्यातून झाडाचे आरोग्य, आयुष्य कमी झाले. द्राक्षांची नैसर्गिक गोडी, रंग, चमक, पातळ साल या बाबी गमावण्यास सुरुवात झाली. आज ग्राहकांमध्ये चवीबाबतही जागरूकता तयार झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे बागायतदारांची नवी पिढी संजीवकांच्या वापराबाबत अधिक जागरूक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअरच्या वापरातून आम्ही डिपिंग कमी केले. रंग, चव याबाबत सुधारणा होऊ लागली आहे. 

रुटस्टॉकची निवड 
गणेश म्हणतात, की आपल्याकडे बंगळूर डॉगरीज हा लोकप्रिय रुटस्टॉक आहे. सोडियम, क्लोरिन, चुनखडीच्या ठिकाणीही त्याचे परिणाम चांगले आढळतात. दोन-तीन वर्षांपासून पोलसन रुटस्टॉक चांगला वाटतो आहे. नव्या बागेत त्याचा वापर करणार आहे. चिली देशातील नर्सरीत चार-पाच प्रकारचे रुटस्टॉक्स पाहिले. एकच वाण प्रत्येक रुटस्टॉकवर घेऊन त्याचे उत्पादन, रंग, घड, मण्यांचा आकार, पक्वता, साखरेचे प्रमाण आदी अनुषंगाने तेथे सखोल संशोधन होते. त्यानंतर अमूक वाण, अमूक रुटस्टॉकवर अमूक मातीत वापरला पाहिजे, असे ठाम निष्कर्ष शेतकऱ्यांना दिले जातात. 

घड, मण्यांच्या संख्येवर उत्पादनाचे गणित 

 • नऊ बाय सहा फूट क्षेत्र- झाडांची संख्या ८१० ते ८२० 
 • प्रतिझाड- १३ ते १४ किलो वजन निश्‍चित करायचे. 
 • निर्यातीसाठी मण्याचा आकार- १८ ते २० मिमी. 
 • अशा मण्याचे वजन सहा ग्रॅम गृहीत 
 • १३ हजार ग्रॅम भागीले सहा म्हणजे २१६६ मणी प्रतिझाड ठेवायचे, हे निश्‍चित होते. 

मण्याचा अपेक्षित दर्जा पुढीलप्रमाणे हवा असल्यास

 • चांगली फुगवण
 • एकसारख्या आकाराचे 
 • मजबूत 
 • कमी संजीवकांचा वापर होणारे 
 • स्वाद व साखर योग्य प्रमाणात 

त्यासाठी हवे पुढील नियोजन

 • बाग फुटल्यानंतर अपेक्षित बंच
  संख्या- ५०. (अनेकांकडे हा लोड ७० पर्यंत असतो. इथूनच गणित बिघडण्यास सुरुवात होते.) 
 • थिनींगनंतर अंतीम घड संख्या हवी २७ ते ३० पर्यंत. 

बागेत चिमटे लावण्याची पद्धत 

 • ५० बंचपैकी सर्वांत चांगले २५ ते ३० बंच निवडायचे. 
 • त्यांना प्लॅस्टिकचे चिमटे लावायचे. (टॅगिंग) 
 • चिमटे न लावलेल्या घडांची काढणी आधी 
 • सूर्यप्रकाशात असलेले व डागी घड काढायचे. 
 • एका काडीवरील तिसरा घडही काढायचा. 
 • दोन घडांमध्ये एकसमान अंतर हवे. 

पाण्याची गरज सांगणारे उपकरण 
गणेश यांच्या विनंतीवरून आयआयटी- पवई (मुंबई) येथील शास्त्रज्ञांनी पाण्याची गरज ओळखणारे उपकरण विकसित केले आहे. ते झाडाजवळ मुळांच्या कार्यक्षेत्रात बसवले आहे. यात सेन्सर व इन्फ्रा रेडकिरणांचा वापर केला आहे. ही किरणे मातीवर पडतात. त्याद्वारे मातीत उपलब्ध पाणी व गरज समजून येते. ‘वाय फाय’ च्या माध्यमातून त्याची माहिती मोबाईलवर पाहता येते. एकाच प्रकारची माती असलेल्या प्रतिप्लॉटसाठी एक उपकरण लावता येते, असे गणेश म्हणतात. हे उपकरण ओलाव्याबरोबर तापमानही मोजते. 

निर्यात 
स्थानिक निर्यातदारांना गणेश माल देतात. तो मुख्यत्वे युरोपीय बाजारपेठेलाच जातो. आपल्या द्राक्षाला मागील तीन वर्षांत किलोला ८० रुपयांच्या खाली दर मिळालेला नाही, असे ते अभिमानाने सांगतात. उर्वरित माल ‘लोकल’ला जातो. ते म्हणतात, की आपण द्राक्षांची विक्रमी निर्यात करतो. त्यातील ६५ ते ७० टक्के वाटा युरोपीय देशांना जातो. पण, दरांचे गणित सुधारायचे, तर चीन, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर या आशियाई देशांचाही विचार हवा. चीन मोठे मार्केट आहे. चिली व पेरू या दोन देशांचा ५० ते ६० टक्के माल याच देशाला जातो. रशियाही मोठे मार्केट आहे. 

गुणवत्तेचे वास्तव 
निर्यात किती झाली, हा आकडा महत्त्वाचा नाही. जागतिक गुणवत्तेची द्राक्षे कंटेनरमध्ये किती असतात, ही बाब महत्त्वाची आहे. कमी गुणवत्तेच्या द्राक्षांना आयातदार देशांकडून योग्य दर मिळत नाही. काही वेळा एखादी कंपनी पैसेही बुडवते. हा फटका शेतकऱ्यालाच सहन करावा लागतो. गणेश यांचे हे भाष्य चिंतन करायला लावणारे आहे. 

जग फिरल्याने आवाका आला 
गणेश यांचे वय सुमारे ३३ वर्षे आहे. कमी वयातच दक्षिण आफ्रिका, चिली, पेरू, स्पेन आदी देशांतील अभ्यासदौरा त्यांनी अनुभवला. हे सर्व देश द्राक्षशेतीत जगात आघाडीवर असल्याने त्यांच्या तुलनेत आपण कोठे आहोत, कुठपर्यंत पोचले पाहिजे, याचा आवाका आला. त्यातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावत द्राक्षशेतीत तसे बदल करीत अनुभवविश्‍व आणि व्यक्तिमत्त्वही गणेश यांनी समृद्ध केले. 

कुटुंबाचे पाठबळ 
वडील शशिकांत, आई सौ. शैला, पत्नी सौ. गायत्री, मुलगा अवनिश, मुलगी अनन्या, भाऊ प्रशांत, त्यांची पत्नी सौ. तृप्ती असे गणेश यांचे कुटुंब आहे. कुटुंबाच्या मदतीच्या बळावरच शेती सुकर झाल्याचे गणेश सांगतात. 
 

प्रसिद्धीपासून दूर राहून कार्यरत 
प्रसिद्धीपासून कायमच चार हात दूर राहायला गणेश यांना आवडते. चौसाळे परिसरात पाच-सहा वर्षांपासून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात गणेश यांचा वाटा मोठा आहे. परिसरातील २५ ते ३० शेतकऱ्यांसमवेत सातत्याने ज्ञान, तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण सुरू असते. गणेश यांचा व्हॉट्सॲप ग्रुपही आहे. मात्र, द्राक्षशेतीव्यतिरिक्त अवांतर चर्चा करण्यास येथे कडक मनाई आहे. 

गणेश म्हणतात... 

 • द्राक्षशेतीत आजपर्यंत बरेचसे काम जमिनीच्या वरच्या भागातच झाले. माती व मुळ्यांवर त्या तुलनेत काम कमी झाले. आम्ही त्यावरच अधिक लक्ष केंद्रित केले. 
 • प्रत्येक गोष्ट का करायची, त्यामागील वैज्ञानिक कारण माहीत हवे. 
 • कोणतेही शास्त्र जसेच्या तसे प्रत्येकाला लागू होते असे नाही. शास्त्रामागील संकल्पना महत्त्वाची. स्थानिक परिस्थितीनुसार त्यात बदल घडवावा लागतो. 
 • द्राक्षशेतीत ६० ते ७० टक्के ‘रोल’ हा इरिगेशनचाच आहे. 
 • झाडाची ‘फिजिऑलॉजी’ (वनस्पती शरीरक्रिया शास्त्र) माहीत हवी. 

महत्त्वाच्या बाबी 

 • शेतात रेनगेज लावले आहे. चार वर्षांपासून रोजचा पाऊस मोजून त्याचे रेकॉर्ड ठेवले आहे. 
 • कीडनाशके, खतांवरील खर्च कमी. काडी बांधणे, घड बांधणी, घड काऊंट, कॅनोपी मॅनेजमेंट अशी विविध कामे अत्यंत बारकाईने. त्यामुळे मजुरीचा खर्च तुलनेने जास्त. 

इरिगेशनचा पाया महत्वाचा
आपला ‘इरिगेशन’चा पाया कच्चा आहे. हे द्राक्षशेतीलाच नव्हे, तर सर्वच पिकांना लागू आहे. आपल्याकडे डाळिंबाच्या बागा संपण्याचे कारणही हेच आहे. संत्रा, भाजीपाला पिकांत जगात आघाडीवर स्पेनमध्येही मुळांच्या कक्षांपासून ठरावीक अंतरावर पाणी देण्यात येते.
-गणेश मोरे 

संपर्क- गणेश मोरे- ९८२२६७२९९९ 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
पाच भावांच्या एकीतून पुढारलेली...ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत...
शेतकरी गट ते कंपनी चांगदेवच्या...चांगदेव (जि. जळगाव) येथे शेतकऱ्यांनी सातत्याने...
व्हॅलेंटाइन डेसह विविध रंगी गुलाबांना...वासाळी (ता. जि. नाशिक) येथील संजीव गजानन रासने...
व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाब उत्पादक झाले...तोंडावर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या...
दर पडले? चिंता नको इंगळे घेऊन आले...शेतकऱ्यांच्या मालाला अनेक वेळा समाधानकारक दर मिळत...
यांत्रिकीकरणातून शेती झाली कमी श्रमाचीतांदलवाडी (जळगाव) येथील प्रेमानंद हरी महाजन यांनी...