वाढवा दुधातील फॅटचे प्रमाण

धारा काढण्याच्या वेळेमध्ये सतत बदल केल्यासही दुधाला फॅट कमी लागते.
धारा काढण्याच्या वेळेमध्ये सतत बदल केल्यासही दुधाला फॅट कमी लागते.

शासनाच्या नियमावलीनुसार गाईच्या आणि म्हशीच्या दुधामध्ये अनुक्रमे ३.५ आणि ६ टक्के फॅटचे प्रमाण असणे आवश्‍यक असते. यापेक्षा फॅटचे प्रमाण जास्त असल्यास त्यानुसार वाढीव दर दुधास मिळतो; परंतु फॅटचे प्रमाण यापेक्षा कमी असल्यास दूध स्वीकारले जात नाही. फॅटप्रमाणेच दुधास आवश्‍यकतेपेक्षा कमी डिग्री लागल्यास असे दूध नाकारले जाते. यासाठी शास्त्राचा आधार घेणे गरजेचे आहे.

दुधाला मिळणारा दर त्यातील फॅट आणि डिग्री (एसएनएफ) यावर अवलंबून असल्यामुळे कमी फॅट असणाऱ्या दुधास दर कमी मिळतो म्हणून दुधास फॅट कमी का लागतो? तो कसा वाढवावा? याबद्दल बहुतेक दूध उत्पादकांना अावश्‍यक माहिती नसते. कमी फॅट अाणि एसएनएफ असलेले दूध खूपच कमी दराने विक्री करण्याशिवाय उत्पादकास पर्याय नसतो अाणि मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो.

दुधाला फॅट कमी लागण्याची कारणे १. दुभत्या जनावरांची आनुवंशिकता जनावरांमध्ये अानुवंशिकतेमुळे अाई अाणि वडिलांचे ५० टक्के गुण येतात. अानुवंशिकतेच्या या निसर्गनियमानुसार गाईच्या दुधातील फॅटचे प्रमाण तिच्या आईच्या दुधातील फॅटच्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणून दूध उत्पादन आणि त्यातील फॅटचे प्रमाण याबाबत उत्तम आनुवंशिकता असणाऱ्या गाई- म्हशी पाळणे आणि त्यांच्या पैदाशीकरिता त्यासारखीच उत्तम आनुवंशिकता असणाऱ्या वळूचा वापर करणे आवश्‍यक आहे.

  • बऱ्याचवेळा गाय जास्त दूध देते. दुधातील फॅटचे प्रमाणही चांगले असते. तिची कालवड तिच्यापेक्षा जास्त दूध देते. मात्र, फॅटचे प्रमाण खूपच कमी असते. सर्व उपाययोजना करूनही तिच्या दुधातील फॅटचे प्रमाण वाढत नाही.
  • अशा परिस्थितीत या कालवडीचा जन्म होण्यासाठी योग्य वळूची निवड झाली नव्हती, असे म्हणता येईल. म्हणून पैदाशीकरिता वळूची निवड अत्यंत चोखंदळपणे आणि काळजीपूर्वक करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी सिद्ध वळूच्या वीर्याचा वापर करावा.
  • जेणेकरून त्यासोबत येणाऱ्या वळूच्या आनुवंशिक माहितीचा आधार घेऊन योग्य त्या वळूची निवड पैदाशीसाठी करता येईल. असे वीर्य वापरणे सर्वसामान्य वीर्यापेक्षा महाग पडेल; परंतु त्यापासून जन्माला येणारी कालवड उत्तमच गुणांची असेल.
  • उत्पादकांनी समजून घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे जर एखाद्या गाईची आनुवंशिक क्षमता ४.० टक्के फॅटचे दूध देण्याची असेल, तर कोणत्याही उपायाने तिच्यापासून त्यापेक्षा जास्त फॅट असणारे दूध मिळत नाही. मात्र, विविध कारणांनी तिच्या दुधातील फॅटचे प्रमाण त्यापेक्षा कमी होते. म्हणूनच उत्तम आनुवंशिकता असणारी जनावरे पाळणे आणि त्यांच्या दुधातील फॅटचे प्रमाण त्यांच्या आनुवंशिक क्षमतेपेक्षा कमी होणार नाही याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे.
  • २) दुभत्या जनावरांचा आहार

  • दुभत्या जनावरांपासून क्षमतेनुसार दूध आणि दुधातील फॅट मिळविण्यासाठी जनावरांना संतुलित आहार द्यावा.
  • दैनंदिन आहारात फक्त हिरवा चारा दिल्यास जनावरांपासून दूध जास्त, परंतु फॅटचे प्रमाण कमी मिळते. त्यासाठी त्यांच्या दैनंदिन आहारात वाळलेला चारा कमीतकमी ३ ते ४ किलो या प्रमाणात देणे आवश्‍यक आहे.
  • वाळलेल्या चाऱ्यामुळे अन्नपचनाची क्रिया चांगली होते. वाळलेल्या चाऱ्यामध्ये दुधातील फॅट तयार होण्यासाठी आवश्‍यक असणारे घटक भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे दुधातील फॅटच्या प्रमाणात वाढ होते.
  • दैनंदिन आहारात जनावरास तेलबियांची पेंड दिल्यासही दुधातील फॅटचे प्रमाण तात्पुरते वाढते, परंतु बहुतेक ठिकाणी अशा पेंडी जनावरांस देणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
  • ३) वासरू कासेला पाजणे

  • वासरास गाईच्या कासेला दूध पाजल्यास दुधास फॅट कमी लागण्याची शक्‍यता असते. बहुतेक ठिकाणी दूध काढण्याच्या सुरवातीस आणि शेवटी काही वेळ वासरू कासेला दूध पिण्यासाठी सोडले जाते.
  • सुरवातीस पान्हा फुटल्यानंतर त्वरित वासराला बाजूला करून गाईची धार काढली जाते.  वासराला कासेत असलेले सर्व दूध आरामात पिते. कासेतून दूध काढताना सुरवातीला काही धारांतील दुधात फॅटचे प्रमाण खूपच कमी म्हणजे १ टक्‍क्‍यापर्यंत असते.
  • दुधातील फॅट हा घटक इतर कोणत्याही घटकापेक्षा वजनाने हलका असल्याने दुधावर तरंगतो. त्यामुळे कासेतून शेवटी येणाऱ्या दुधात हा घटक जास्त प्रमाणात असतो. म्हणून ज्या ठिकाणी वासराला कासेतील शेवटचे दूध पाजले जाते, त्या ठिकाणी दुधास फॅट कमी लागते. हे टाळण्यासाठी सुरवातीचे दूध वासराला पाजून, शेवटचे जास्त फॅटचे दूध भांड्यात घ्यावे.
  • वासरासाठी दुधातील फॅट हा घटक जास्त प्रमाणात आवश्‍यक नसतो, म्हणून असे करणे योग्य ठरते. याशिवाय वासराला कासेला दूध न पाजता भांड्यातून पाजल्याने इतरही अनेक फायदे होतात.
  • ४) जनावरांचे व्यवस्थापन

  • दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन देखील दुधातील फॅट आणि डिग्रीच्या प्रमाणावर परिणाम करते. सलग दोन वेळा धार काढण्यामधील कालावधी वाढल्यास दूध जास्त मिळते; परंतु फॅटचे प्रमाण कमी होते. हा कालावधी कमी केल्यास दूध उत्पादन कमी, तर फॅटचे प्रमाण वाढते.
  • जनावराच्या कासेतील दूध संपूर्ण काढल्यास फॅट जास्त, तर अपूर्ण काढल्यास कमी लागते.
  • धारा काढण्याच्या वेळा सतत बदलल्यासही फॅट कमी लागते.
  • वेतामध्ये जनावरांचे दूध जसे वाढते तसे फॅट कमी होते, तर उत्पादन कमी झाल्यास फॅट वाढते. वाढत्या वयानुसार जनावरांच्या दुधातील फॅटचे प्रमाण घटते.
  • पावसाळ्यात अाणि हिवाळ्यात दूध उत्पादन जास्त, तर फॅटचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यात दूध उत्पादन कमी होऊन फॅटचे प्रमाण जास्त मिळते.
  • ५) दुभत्या जनावरांचे आरोग्य

  • जनावर आजारी पडल्यास दूध उत्पादन, फॅट अाणि डिग्री यांच्या प्रमाणात घट येते. विशेषतः दुसऱ्या जनावरांना होणाऱ्या सुप्त काससुजी या रोगात होणारे नुकसान मोठे असते.
  • या रोगात सहज जाणवणारी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळेच या रोगास अदृश्‍य काससुजी असेही म्हणतात. जनावराचे दूध उत्पादन, फॅट आणि डिग्री यांच्या प्रमाणात घट येते. ज्याचा संबंध आहार किंवा वातावरणातील बदलाशी जोडला जातो, त्यामुळे आजार दुर्लक्षित राहतो.
  • अशाप्रकारे कित्येक दिवस ही घट कायम राहते. हा रोग आटोक्‍यात राहण्यासाठी प्रत्येक वेळी धार काढल्यानंतर जनावराचे चारही सड जंतुनाशक द्रावणात बुडवावेत आणि दर १५ दिवसांनी चारही सडांतील दुधाची एस.टी. तपासणी करून त्यानुसार प्रतिबंधक उपाय करावेत. त्यामुळे पुढे होणारे हजारो रुपयांचे नुकसान टळते.
  •   संपर्क ः डॉ. अनिता काटेखाये, ९११२६४७१२४ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com