agriculture story in marathi, Farmer Ashok Patil has made expertise in production of export quality chilli. | Agrowon

निर्यातक्षम मिरची उत्पादनात हातखंडा

चंद्रकांत जाधव
गुरुवार, 7 जानेवारी 2021

सुजालपूर (ता.जि.नंदुरबार) येथील अशोक व प्रवीण या पाटील पितापुत्रांनी मिरची पिकाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करून प्रतिकूल स्थितीत दर्जेदार व एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन घेण्यामध्ये हातखंडा तयार केला आहे. 

सुजालपूर (ता.जि.नंदुरबार) येथील अशोक व प्रवीण या पाटील पितापुत्रांनी मिरची पिकाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करून प्रतिकूल स्थितीत दर्जेदार व एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन घेण्यामध्ये हातखंडा तयार केला आहे. अलीकडील दोन वर्षांत ३५ ते ५० टनांपर्यंत मिरचीची आखातात निर्यात करण्यात ते यशस्वी झाले आहेत.

ओल्या लाल मिरचीचे उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून देशभरात नंदुरबारने ओळख तयार केली आहे. सुजालपूर (ता.नंदुरबार) शिवारही पपईपाठोपाठ मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. नंदुरबारपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर तापी नदीकाठी हा परिसर आहे. येथील अशोक बुद्धर पाटील व पुत्र प्रवीण यांची १० एकर शेती आहे. नदीकाठी शिवार असले तरी भूगर्भात जलसाठे पुरेसे नाहीत. पाणी गुणवत्तापूर्ण नाही. एक कूपनलिका आहे. परंतु तापी नदीवरून जलवाहिनी करून घेतली आहे. प्रकाशा (ता.शहादा) येथील तापी नदीवरील बॅरेजचा लाभ गावातील शिवारास होऊ लागला आहे.

पाटील यांची शेती
पाटील यांची जमीन हलकी व मध्यम प्रकारची आहे. अशोक हे पूर्णवेळ शेतीत असून प्रवीण नंदूरबार येथे राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून व सुट्ट्यांमध्ये तेही शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. मिरची हे पाटील यांचे मुख्य पीक आहे. अशोक यांना अनेक वर्षांपासून या पिकाचा अनुभव असला तरी अलीकडील काळात तंत्रज्ञान, व्यवस्थापन व वाण सुधार करून ते या पिकाची निर्यातक्षम शेती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

मिरचीचे सुधारित व्यवस्थापन असे

 • नाजूक व खर्चिक पीक म्हणून मिरचीची ओळख आहे. हिरव्या मिरचीचा बाजार अनेकदा अस्थिर असतो. अशा स्थितीत पाटील लालपेक्षा हिरव्या मिरचीच्या उत्पादनावर अधिक भर देतात.
 • १० एकर शेतीपैकी ५ एकरांत मिरची.
 • गुजरात राज्यातील पिंपळोद (ता.निझर, जि.तापी) येथील प्रसिद्ध मिरची उत्पादक योगेशभाई पटेल यांचे मार्गदर्शन
 • जूनच्या सुमारास लागवड. पाच बाय सव्वा फूट अंतर.
 • एकरी सुमारे सहाहजार झाडे बसतात.
 • पावसाळ्यात शेतात पाणी वा ओल साठू नये यासाठी चारी काढून पाण्याचा व्यवस्थित निचरा केला आहे. त्यामुळे मातीतील रोगांना प्रतिबंध केला आहे.
 • योगेशभाई यांच्यासोबत नंदुरबार, नाशिक भागातील दर्जेदार मिरची उत्पादकांच्या शेतांना भेटी दिल्या. रोगराईचा काळ कुठला, अतिपावसात किती हानी होते, प्रतवारीचे महत्त्व आदी बाबी जाणून घेतल्या. फवारणी, खत व्यवस्थापनाचे वेळापत्रक, जमिनीतील अन्नघटकांची कमतरता यावर काम केले.
 • दरवर्षी एकरी तीन ते चार ट्रॉली शेणखत. उत्तम कंपोस्ट. त्यानंतर गादीवाफे तयार केले जाते.
 • त्याचवेळी एनपीके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, निंबोळी पेंड एकरी ५० किलो यांचा वापर
 • त्यानंतर ठिबक व पॉली मल्चिंग
 • एकाच क्षेत्रात वारंवार मिरची पीक टाळतात. पीक फेरपालटीवर भर. मिरचीनंतर पपई किंवा कपाशी.
 • विषाणूजन्य रोगांची समस्या लक्षात घेऊन प्रादुर्भावित अवशेष जाळले जातात.
 • लागवडीपूर्वी एप्रिलमध्येच शेत खोल नांगरले जाते. तापू दिले जाते.
 • पिकाला मजबूत आधार म्हणून प्रत्येकी दहा फुटांवर बांबू. एकरी संख्या सुमारे ७००.
 • आंतरमशागत करीत नाहीत. कारण त्यामुळे मुळांना धक्का बसतो.
 • शंभर मजूर कायमस्वरूपी.
 • पॉली मल्चिंगमुळे तणनियंत्रण फक्त दोनवेळा करावे लागते.
 • अधिकचा पाऊस असला तरच तणनाशकाचा वापर होतो. निर्यातीसाठी रासायनिक अवशेषांची समस्या लक्षात घेऊन हिरव्या, निळ्या त्रिकोण रंगांच्या कीडनाशकांवर भर राहतो.

वाणाचा वापर
अलीकडील काळात लांबट, हिरव्या वाणाची लागवड करू लागले आहेत. पाटील म्हणाले की हिरवी मिरची विकायची तर या वाणाची निवड योग्य ठरते. थोडी तिखट, लांबट आहे. लांब वाहतुकीस चालते. आखातात व हॉटेल व्यवसायातून मागणी असते. या वाणाला नोव्हेंबरपर्यंत आखातात मागणी असते. त्यानंतर स्थानिक बाजारपेठेत विकली जाते.

निर्यातक्षम उत्पादन, उत्पन्न
पाटील सांगतात की जूनमध्ये लागवड केलेल्या मिरचीचा प्लॉट एप्रिलपर्यंत चालतो. एकरी सुमारे ३० टनांपर्यंत उत्पादन मिळते. एकरी खर्च सुमारे दोन लाख रुपये येतो. यंदा एकूण चार लाख रुपये उत्पन्न साध्य झाले. गेल्या वर्षी दर कमी असल्याने उत्पन्न यापेक्षा कमी होते. जेवढे एकूण उत्पन्न हाती आले त्यातील खर्च वजा करून ५० ते ६० टक्के निव्वळ नफा मिळाला.

विक्री व निर्यात
मागील वर्षी सुमारे ३५ टन मिरची योगेशभाई पटेल यांच्या सहकार्यातून आखातात पाठवली. यंदा ५० टनांपर्यंत निर्यात झाली आहे. काही कालावधीसाठी किलोला ८० ते ८५ रुपये दर मिळाला. मात्र सरासरी दर २० रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यंत मिळतो. निर्यातक्षम दर्जा असल्याने जागेवरून गुजरातमधील निझर (जि.तापी) येथील खरेदीदार उचल करतात. मिरचीची आवक अधिक झाली तर बाजारात दबाव असतो. बाजार अनेकदा अस्थिर असतो. परंतु गेले दोन वर्षे दर टिकून राहिल्याचा लाभ झाला आहे. लागवडीपासून खर्चाचे गणित बसवावे लागते. त्यासाठी गुंतवणूक करण्याचे धाडस पाटील यांनी केले. मिरचीचे चांगले उत्पादन देणाऱ्या वाणाची रोपे नाशिक जिल्ह्यातून ते दीड रुपये प्रतिरोप दराने खरेदी करतात. पाच एकरांत ३० हजार रोपांची गरज भासते. काढणी लागवडीनंतर सुमारे ५० दिवसांत सुरू होते. काढणीसाठी प्रति किलो किमान चार रुपये खर्च येतो.

संपर्क-प्रवीण पाटील- ९०११४७१८१८

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदलतुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद...
अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकहीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला...नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव...
डांगी गायींचे संवर्धन करण्याचे व्रतआंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
बांबू प्रक्रिया उद्योगात देश-परदेशात...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉनबॅक या संस्थेने...
सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...
निर्यातक्षम मिरची उत्पादनात हातखंडासुजालपूर (ता.जि.नंदुरबार) येथील अशोक व प्रवीण या...
माडग्याळी मेंढींपालनाचा तीन पिढ्यांचा...येळवी (ता. जि. जत) येथील पवार कुटुंबाच्या तिसरी...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
शेतीपेक्षा ठरले वराहपालन फायदेशीर तळणी (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील जनार्दन व...