प्रतिकूलतेतही लेअर पोल्ट्रीची आश्‍वासक वाटचाल 

शेतीने दिला पोल्ट्रीला आधार पोटे पोल्ट्रीव्यतिरिक्त शेतीचेही व्यवस्थापन स्वतःच पाहतात. एक एकर द्राक्षबागेतून सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. अन्य शेतकऱ्यांची द्राक्षेही ते विकतात. चार एकरांतील ऊस उत्पन्न देतो. कांद्याचे एकरी २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. या सर्वांतून मिळणारे उत्पन्न पोल्ट्रीसाठी महत्त्वाचा आधार ठरते आहे
पोटे यांचा लेअर पोल्ट्री व्यवसाय
पोटे यांचा लेअर पोल्ट्री व्यवसाय

दहावीच्या शिक्षणानंतर पिंपरी पेंढार (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील अरुण महादू पोटे यांची शेतीशी नाळ जुळली. नगदी पिकांच्या शेतीबरोबर ब्रॉयलर पक्षी करार शेती सुरू केली. उत्पन्न वाढवले. पुढे त्यातील अडचणींमुळे ते लेअर कोंबड्यांच्या व्यवयासात उतरले. आज अवाढव्य खर्चामुळे हा व्यवसाय नफ्यात नसला तरी त्यात तगून राहण्याची त्यांची धडपड उल्लेखनीय आहे. नगदी पिकांच्या आधारावर आपली पोल्ट्री त्यांनी सावरली आहे.  पुणे जिल्ह्यात पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील अरुण पोटे यांनी दहावीच्या शिक्षणानंतर शेतीलाच वाहून घेतले. पालक, चवळी, टोमॅटो व पुढे सहा एकरांत द्राक्ष लागवड केली. काही वर्षांत उपसा सिंचन योजनेमुळे परिसरात उसाचे क्षेत्र वाढले. मग पोटे यांनी आठ एकरांत ऊस लागवड केली.  शेतीसोबत पोल्ट्री व्यवसाय  सन २००६ मध्ये काही खडकाळ क्षेत्र विकत घेतले. शेतीला पूरक व आर्थिक आधार म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. सन २००६ मध्ये खासगी बॅंकेकडून कर्ज घेऊन साडेतेरा हजार चौरस फुटांवर शेड उभारले. करार पद्धतीने बारा हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे संगोपन सुरू केले. चांगल्या व्यवस्थापनातून सुदृढ, वजनदार पक्ष्यांचे उत्पादन घेत उत्पन्नही कमावले. काही लाख रुपयांची उलाढाल झाली. दहा वर्षे अनुभव तयार झाला. मात्र काळानुसार पक्ष्यांचे लिफ्टिंग, खाद्य, मजूर अशा अडचणी, खर्च, श्रम वाढत गेले. अखेर लेअर पक्ष्यांचा व्यवसाय बरा या मानसिकतेत ते आले. या व्यवसायातील अर्थकारण, मार्केटचा अभ्यास केला.  लेअर पक्ष्यांचा व्यवसाय  सन २०१६ पर्यंत ब्रॉयलर पक्ष्यांचा व्यवसाय सुरू राहिला. मग लेअर पक्ष्यांसाठी धोलवड (ता. जुन्नर) येथील पोल्ट्री व्यावसायिक गीताराम नलावडे यांचा सल्ला घेतला. विविध ठिकाणी भेटी दिल्या. एक हजार पक्ष्यांपासून सुरवात केली. शेड तयार होतेच. आधीच्या व्यवसायातील रकमेतून ७० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. बंगळूरहून ५० रुपये प्रति नग दराने पिंजरे आणले. एरवी हाच पिंजरा १२५ रुपयांना एक याप्रमाणे मिळतो. गेल्या तीन वर्षांत पक्ष्यांची संख्या दहा हजारांपर्यंत वाढविणे पोटे यांनी शक्य केले.  पोल्ट्री व्यवसाय- दृष्टिक्षेपात 

  • व्यवस्थापन 
  • दररोज सकाळी सहा वाजता कामास सुरवात 
  • दुपारी १२ वाजता व संध्याकाळी अंडी संकलन 
  • दररोज संध्याकाळी शेड निर्जंतुकीकरण 
  • रात्री १० च्या सुमारास शेडमध्ये अंधार. पक्ष्यांसाठी १६ तास प्रकाश तर आठ तास अंधार ठेवला जातो. 
  • पाच पक्ष्यांसाठी एक अशी पिंजऱ्यांची व्यवस्था. यात खाद्य ठेवणे, अंडी गोळा करण्याची सुविधा. 
  • चार हजार लिटरच्या टाकीतून पाइपलाइनद्वारे निपल सिस्टिमद्वारे पाणी. त्यामुळे हवे तेव्हा पाणी मिळते. शेडमध्ये सांडत नसल्याने माशांचा त्रास कमी. 
  • खाद्याची शेडमध्येच निर्मिती. ‘फिडमील’चा वापर. मका, सोया, तांदळाचा चोथा आदींचा वापर होतो. एका पक्ष्यासाठी दररोज ११० ग्रॅम याप्रमाणे एक हजार १०० किलो खाद्य तयार केले जाते. त्यासाठी प्रतिकिलो २५ रुपये खर्च. 
  • उत्पादन 

  • एक पक्षी साधारण १६ महिने कालावधीत सुमारे साडेतीनशेपर्यंत अंडी देतो. 
  • दहा हजार पक्षी हा पाया धरल्यास दररोज सरासरी एकूण सुमारे ८००० पर्यंत अंडी 
  • अंडी देण्याचा कार्यकाल संपल्यानंतर पक्ष्यांची ६० ते १०० रुपयांना विक्री. त्यानंतर दोन महिने पोल्ट्री रिकामी ठेवली जाते. त्यानंतर नवी बॅच. 
  • विक्री 

  • सुमारे ८० टक्के अंड्यांची पुणे, मुंबईतील व्यापाऱ्यांकडून जागेवर खरेदी. तर २० टक्के अंडी स्थानिक विक्रेत्यांना. 
  • आवश्‍यकता असल्यास व्यापाऱ्यांना घरपोच सेवा. वाहतुकीचे भाडे व्यापारी देतात. 
  • थंडीच्या महिन्यांत अंड्यांना चांगली मागणी व दर. उन्हाळ्यात दरात घसरण. 
  • अर्थकारण  दहा हजार पक्ष्यांसाठी दररोज २० बॅग्ज (प्रति ५० किलोच्या) लागतात. लसीकरणासाठी दरमहा सहा हजार रुपये तर जीवनसत्त्वे, प्रथिनांसाठी दहा हजार रुपये खर्च येतो. प्रति दिन मजुरी एक हजार रुपये, वीज शंभर रुपये, शेड निर्जंतुकीकरण १०० रुपये खर्च येतो. अलीकडील काळात अंड्याला ३ रुपये सरासरी तर कमाल पाचपर्यंत (क्वचितच) मिळतो. प्रति बॅचमधून ९० ते १०० ट्रॉली कोंबडीखत मिळते. प्रति ट्रॉलीची सहा हजार रुपयांना विक्री होते.  अडचणीतील व्यवसाय  पाऊस नसल्याने कोंबडीखताला मागणी नाही. खाद्याचा खर्च खूपच वाढला आहे. ११ ते १४ रुपये प्रति किलो दराने मिळणारा मका २६ रुपये दरांपर्यंत पोचला आहे. दररोज प्रति अंड्यासाठी ३.९० पैसे खर्च येत आहे. विक्री मात्र सध्या ३.१० पैसे दराने होत आहे. प्रति अंड्यामागे ८० पैसे खर्च सोसावा लागत आहे. येत्या काळात खाद्याचे दर कमी करून व व्यवस्थापनात बदल करून पोल्ट्री पुन्हा फायद्यात आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत व्यवसाय बंद करणार नाही.  शेतीने दिला पोल्ट्रीला आधार  पोटे पोल्ट्रीव्यतिरिक्त शेतीचेही व्यवस्थापन स्वतःच पाहतात. एक एकर द्राक्षबागेतून सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. अन्य शेतकऱ्यांची द्राक्षेही ते विकतात. चार एकरांतील ऊस उत्पन्न देतो. कांद्याचे एकरी २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. या सर्वांतून मिळणारे उत्पन्न पोल्ट्रीसाठी महत्त्वाचा आधार ठरते आहे. पोटे यांना वडील महादू, आई सौ. सीताबाई, पत्नी सौ. नीता यांची मदत होते. दोन मजूर आहेत. अंजनापूर (ता. कोपरगाव) येथील नीलेश गव्हाणे, पशुवैद्यक डॉ. नीलेश वाघमारे, सचिन नऱ्हे यांचेही मार्गदर्शन लाभते 

    संपर्क- अरुण पोटे - ९८९०५६५५१५ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com