ज्ञानाचा व्यासंग केल्यानेच अल्पभूधारकाची शेतीत प्रगती

संजय व अनिता हे पवार दांपत्य निशिगंधाच्या शेतात
संजय व अनिता हे पवार दांपत्य निशिगंधाच्या शेतात

मुर्शीदाबादवाडी (जि. औरंगाबाद) येथील संजय पवार यांची दीड एकर शेती. शिक्षण दहावी नापास. मिळेल त्या नोकऱ्या केल्या. पुढे फुलशेतीतून व्यावसायिक शेतीचा मार्ग मिळाला. शास्त्रज्ञांसोबत मैत्री वाढवली. ज्ञानाचा व्यासंग केला. उत्पादनासह मार्केटिंगमध्ये कुशलता मिळवली. अथक व प्रामाणिक प्रयत्नांतून प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी अशी ओळख तयार करण्यापर्यंतची झेप संजय यांनी घेतली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातील मुर्शीदाबादवाडी येथील बहुतेक सर्वच शेतकरी अत्यल्पभूधारक. उन्हाळ्यात विहिरीला पाणी नाही. शेतीशिवाय उत्पन्नाचे साधन नाही. आले, कापूस, मक्याच्या शेतीला भाजीपाला उत्पादनाची जोड असे चित्र गावात दिसते. औरंगाबाद शहरापासून २५ किलोमीटरवर हे गाव आहे. ताजे उत्पन्न मिळत राहावे, यासाठी गावातील शेतकरी कमी क्षेत्रात पावसाळ्यात व हिवाळ्यात भाजीपाला घेतात. शेतीतला ध्यास याच गावचे संजय नामदेव पवार या ३२ वर्षे वयाच्या शेतकऱ्याची स्थिती फार वेगळी नव्हती. दहावी नापास असलेल्या संजय यांची शेतीदेखील केवळ दीड एकर होती. मग कुठे वॉचमन, कुठे पेट्रोल पंपावर कर्मचारी अशा नोकऱ्या त्यांनी केल्या. पण शेतीचा ध्यास कायम होता. त्यातूनच मोठे व्हायचे हे स्वप्न होते. सुशिक्षित मुलगी पत्नी म्हणून मिळाली दहावी नापास असले तरी सुशिक्षित मुलीशीच लग्न करायचे हे स्वप्न होते. दीड एकरात भाजीपाला व अन्य पारंपरिक पिके घेत थेट विक्रीतही कुशलता मिळवू लागले. होतकरू, प्रयत्नवाद, प्रामाणिकता हे गुण पाहून औरंगाबाद येथून लग्नासाठी सोयरिकही जुळली. बीएपर्यंत शिक्षण झालेल्या अनिता पवार यांच्याशी लग्न झाले. त्यांचे वडील बँकेत नोकरीस होते. अनिता यांचा शेतीचा संबंध तसा आलेलाच नव्हता.लग्नानंतर मात्र पदर खोसून त्यांनी शेती सुरू केली. सुरुवातीला त्रास झाला. काम करताना हाताला फोड यायचे. पण पतीची साथ मिळाल्यानंतर शेती अधिक सुकर होऊ लागली. ॲग्रोवनने दिली फुलशेतीची दिशा शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी पवार दांपत्याने फुलशेतीचा मार्ग निवडला. दरम्यान या प्रगतिशील शेतीचा रस्ता दाखवण्यासाठी संजय यांच्यासाठी ॲग्रोवन वाटाड्यासारखा धावून आला. या अंकात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील तज्ज्ञांचा फुलशेतीविषयक लेख प्रसिद्ध झाला होता. हिमायतबाग संशोधन केंद्रातील तत्कालीन शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील सोयगावकर यांनी संजय यांना तो दाखवला. त्यापासून प्रेरणा घेत संजय यांनी संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधला.त्यांच्याकडून माहिती घेतली. पण एवढ्यावर थांबून चालणारे नव्हते. अभ्यास ठरला महत्त्वाचा औरंगाबाद शहरातील फुलांच्या मागणीचा अभ्यास केला. निशिगंध पीक निश्‍चित केले. वीस गुंठे क्षेत्रावर प्रयोग करायचे ठरवले. पंधराशे रुपयांचे कंद खरेदी केले. फुलशेतीची निवडलेली ही वेगळी वाट गावात टिकेचा विषय ठरली. भाजीपाला सोडून हे काय गवत लावले असे घरातीलच नव्हे, तर आजूबाजूचे लोकही म्हणू लागले. पण संजय यांचा निश्‍चय ठाम होता. स्वतःवर विश्‍वास होता. लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमीन चांगली नांगरून घेतली. त्यात दोन ट्रॉली शेणखत मिसळले. त्यानंतर साडे चार फुटांवर सऱ्या पाडून वरंब्यावर एक फूट अंतरावर निशिगंधाचे कंद लावले. या लागवडीसाठी त्यांनी पंधराशे रुपयांना एक बॅग असे नऊ हजार रुपयांचे कंद खरेदी केले. पुढे कृषी विभाग- ‘आत्मा’ यांच्या मदतीने पुणे येथील हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे दहा दिवसांचे रीतसर प्रशिक्षण पूर्ण केले. आजची फुलशेती आज संजय यांची प्रत्येकी २० गुंठे क्षेत्रात बिजली व निशीगंध अशी शेती आहे. फुलांच्या विक्रीसाठी औरंगाबाद येथील एका फूल व बुके व्यावसायिकासोबत वर्षभराचा करार केला. आहे. पुष्पगुच्छ, हार तयार करण्यासाठी त्यांना निशिगंधाची फुले दररोज लागतात. यापूर्वी ते निशिगंधाची फुले पुण्याहून मागवत होते. त्यामुळे ताजी फुले मिळत नव्हती. आता ही गरज संजय यांच्या शेतीतून ते पूर्ण करीत आहेत. वर्षभराचा सरासरी दर प्रति स्टिकमागे अडीच ते तीन रुपये असा ठरला आहे. लग्नसराईच्या काळात हा दर चार ते पाच रुपये या दरम्यान राहतो. तर बिगर हंगामात तो ८० पैसे असाही घसरतो. साधारण १०० स्टिक्सचे एक बंडल करून ते बाजारात नेले जाते. व्यर्थ वेळ घालवणे नाही संजय यांचा दिवस पहाटे पाचला सुरू होतो. रात्री साडेनऊपर्यंत ते विविध कामांत व्यस्त राहतात. राजकारण हा शब्ददेखील समोर नको असे ते म्हणतात. त्यावरील चर्चादेखील ते टाळतात. पारावर बसून व्यर्थ गप्पांमध्ये वेळ घालवण्याला त्यांचा विरोध आहे. प्रगतिशील शेतकरी, अभ्यासू व्यक्ती वा मित्र, शास्त्रज्ञ यांच्या संगतीत राहून त्यांच्याकडून कायम शिकत राहण्याची त्यांना आवड आहे. हिमायतबाग येथील संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद, डॉ. संजय पाटील सोयगावकर, डॉ. किशोर झाडे तसेच अन्य तज्ज्ञांसोबत त्यांची सातत्याने ज्ञानाबाबत देवाणघेवाण होत राहते. काहीवेळा तज्ज्ञ देखील त्यांच्याकडून काही गोष्टी माहीत करून घेतात. मी कितीही ज्ञानी वा कुशल शेतकरी झालो तरी शास्त्रज्ञांना माझ्यापेक्षा काहीतरी निश्‍चित अधिक ज्ञान असते असे ते नम्रपणे सांगतात. संजय यांच्यातील गुण

  • वेळेचा सदुपयोग करणे
  • अधिकाधिक वेळ शेतीलाच देणे
  • सतत ज्ञान घेत राहणे, ज्ञानी व्यक्तींच्या संगतीत राहणे
  • स्वभाव मनमोकळा वा पारदर्शक ठेवणे, सत्यवादी वा प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणे
  • व्यवसाय करताना क्वाॅंटिटी व क्वॉलिटी या दोन्ही बाबींत खंड पडणार नाही असे नियोजन करणे
  • एखाद्या कंपनीप्रमाणे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन
  • फुलशेतीतील व्यवस्थापन

  •  संजय सांगतात, की निशिगंधाचा प्लॉट तीन वर्षांपर्यंत सुरू राहतो. पहिल्या वर्षी प्रति दोन दिवसाआड ४०० पर्यंत, त्यानंतर एक हजार व पुढील वर्षी दोन हजार ते अडीच हजार स्टीक्सपर्यंत उत्पादन मिळते.
  • उन्हाळ्यात फुलांचे उत्पादन घटते व दर चढे राहतात.
  • शेताच्या कामातून जशी उसंत मिळेल तसे निशिगंधाचे बंडल मोटरसायकलवर टाकून ते फुले व्यापाऱ्याकडे पोच करतात.
  • पाण्याअभावी निशिगंध मोडला  पाणी हा घटक आमच्या भागासाठी सर्वात महत्त्वाचा असल्याने फुलशेतीखालील क्षेत्र कमी ठेवल्याचे संजय सांगतात. सुरुवातीला लागवड केल्यानंतर फक्त दीड वर्षच फुलांचे उत्पादन घेता आले. विहिरीचे पाणी आटल्याने निशिगंध मोडावा लागला. गेल्या वर्षी पुन्हा १० गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे. त्याचे उत्पादनही सुरू झाले आहे. बेणेविक्रीतून फायदा निशिगंध मोडल्यानंतर बेणे विक्री साधली. त्यातून ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. फुले व बेणे असे मिळून दोन लाखांच्या जवळपास उत्पन्न मिळाले. साधारण दोन वर्षांनी बेणेविक्री साधता येते असे संजय सांगतात. ते म्हणतात की शेतकऱ्यांनी ताजे कंद लावू नयेत. एप्रिलच्या दरम्यान काढणी झाल्यानंतर एक महिना ते सुप्तावस्थेत सावलीत ठेवावेत. त्यानंतर जूनमध्ये लागवड करावी. निशिगंधात शेवगा मुर्शीदाबादवाडी गावातीलच संजय यांचे मित्र प्रकाश आनंदराव विटेकर यांच्या शेतात शेवग्याची फक्त दोन झाडे आहेत. त्यापासून वर्षाकाठी काही हजारांचे उत्पन्न मिळते. आपल्या मित्राचा सल्ला ऐकून संजय यांनी निशिगंधात नऊ बाय नऊ फुटांवर पाच महिन्यांपूर्वी शेवग्याची ७० झाडे लावली आहेत. शेवग्याच्या सावलीत निशिगंधाची चांगली वाढ झाली आहे. बिजलीची शेती निशिगंधाच्या शेतीत आत्मविश्‍वास आल्यानंतर संजय यांनी यंदा १० गुंठे क्षेत्रावर बिजली फुलांची लागवड केली आहे. प्रति रोप एक रुपया याप्रमाणे दोन हजार रोपे खरेदी करून साडेचार बाय दोन फुटांवर लागवड केली आहे. हे पीक सुमारे दोन ते अडीच महिने उत्पादन देते. पिकाचा एकूण कालावधी साडेचार महिन्यांपर्यंतचा आहे. थंडीचे दोन महिने उत्पादन मिळते. या फुलांची विक्री बाजार समितीत होते. दोन दिवसाआड सुमारे ९० किलो फुले मिळतात. या फुलांना किलोला ३५ ते ४० रुपये दर मिळतो. ठिबकद्वारे खत व्यवस्थापन सुरुवातीस निशिगंध लावला तेव्हा कमी पैसे होते. एकुलती गाय विकून पैसा उभा केला. त्यातून २० गुंठ्यात १३ हजार रुपयांची आयएसआय प्रमाणीत नसलेली ठिबक यंत्रणा बसविली. परंतु ती नंतर खराब झाली. फुलशेतीतून चांगले उत्पन्न सुरू झाल्यानंतर आता कृषी विभागाकडून अनुदानावर ठिबक बसवून घेतले आहे. भावाची शाबासकी  गवतासारखे दिसणारे निशिगंध लावल्यानंतर भाजीपाला सोडून काय हे काय गवत लावले? ते उपटून टाक असा सल्ला खुद्द पुंजाराम या भावानेच दिला. परंतु आता भाजीपाला पिकांपेक्षा फुलांचे जास्त पैसे होताना पाहून ते आपल्या भावाचे कौतुक करतात. फुलशेतीमुळे भावाची कष्टातून कशी मुक्ती झाली हे सांगताना ते म्हणतात की आम्ही गावातील अनेक शेतकरी भाजीपाला पिकवतो. भाजीपाला विक्रीसाठी औरंगाबादला बाजार समितीमध्ये जावे लागते. माल पाठवण्याच्या दिवशी भाजीपाला तोडून तो पॅक करून ठेवावा लागतो. यासाठी मजूरबळ लागते. भाजीपाला शेती अत्यंत कष्टाची आहे. रात्री दोन वाजता उठून भाजीपाला टेम्पोमध्ये भरावा लागतो. पहाटे चार वाजता हा टेम्पो औरंगाबादला निघतो. त्यात बसून पाच वाजता बाजार समितीत पोचावे लागते. नंतर लिलाव होतो व घरी परत यायला उशीर होतो. भावाच्या फुलशेतीमुळे हे सर्व कष्ट आता वाचले आहेत, असे पुंजाराम यांनी सांगितले. फुलशेतीतून प्रगती संजय यांना भाजीपाला, आले, कापूस, मका, गहू आदी पिकांमधून वर्षाकाठी अडीच ते तीन लाख रुपये मिळायचे. आता फुलशेतीतून उत्पन्नात भर पडली आहे. निशिगंधातून दिवसाला ५०० ते एकहजार रुपये उत्पन्नतर बिजलीतून खर्च वजा जाता ४० हजार ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. घरगुती समस्या व अन्य खर्चासाठी मध्यंतरी चार लाख रुपयांचे कर्ज काढण्याची वेळ आली. मात्र फुलशेतीतून उत्पन्नातून त्यातून मुक्त होणे शक्य झाल्याचे संजय म्हणाले. ॲग्रोवनकडून झाला सन्मान औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात युवा शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यात संजय यांचाही समावेश होता. ॲग्रोवनने माझ्या आयुष्यात झळाळी आणली असून, त्यामुळेच शेतीत प्रगती करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. संपर्क- संजय पवार - ९९७५७२८०७२ (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com