agriculture story in Marathi, farmer conserves Ambemohar banana variety in Khandesh | Agrowon

काटक, स्वादयुक्त, गुणी ‘आंबेमोहोर’चे खानदेशी होतेय संवर्धन

चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

खानदेशच्या मातीतला आंबेमोहोर हा केळीचा दर्जेदार स्थानिक वाण आजघडीला नामशेष होण्याच्या स्थितीत आहे. जिल्ह्यातील काही भागांतील प्रयोगशील, जिज्ञासू वृत्तीच्या शेतकऱ्यांनी आजच्या उतिसंवर्धित रोपांच्या युगातही हा वाण टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. हा वाण करपा रोगाला तसेच तीव्र तापमानाला सहनशील आहे. गोडी असलेल्या या वाणाला बाजारपेठेत व निर्यातीसाठी चांगली मागणी असल्याचेही शेतकरी सांगतात.  

खानदेशच्या मातीतला आंबेमोहोर हा केळीचा दर्जेदार स्थानिक वाण आजघडीला नामशेष होण्याच्या स्थितीत आहे. जिल्ह्यातील काही भागांतील प्रयोगशील, जिज्ञासू वृत्तीच्या शेतकऱ्यांनी आजच्या उतिसंवर्धित रोपांच्या युगातही हा वाण टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. हा वाण करपा रोगाला तसेच तीव्र तापमानाला सहनशील आहे. गोडी असलेल्या या वाणाला बाजारपेठेत व निर्यातीसाठी चांगली मागणी असल्याचेही शेतकरी सांगतात.  

आंबेमोहोर हा भाताचा वाण सर्वत्र लोकप्रिय आहे. मात्र याच नावाचा केळीचा वाणदेखील आहे, हे अनेकांना कदाचित ठाऊक नसावे. जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी बदलत्या युगातही हा वाण घेत आहेत. यावरूनच त्याचे महत्त्व अधोरेखित व्हायला हरकत नसावी. शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार त्याची निर्यात होऊ शकते. गोड स्वादाच्या या वाणाचा पीलबागही जोमात येतो. 

शेतकऱ्यांचे अनुभव
आंबोमोहोरची लागवड करणाऱ्या गाढोदे येथील सतीश विनायक पाटील व पिलखेडा (ता. जि. जळगाव) येथील सुधाकर दामू चौधरी अनेक वर्षांपासून या वाणाची लागवड करून दर्जेदार उत्पादन घेत आहेत. त्याचे कंद दोघेही खानदेशातील विविध गावांमधून आणतात. हाच वाण हवा, दुसरा चालतच नाही, असा ठाम विश्‍वास या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

चौधरी यांचा अनुभव
पिलखेडा हे तापी व गिरणा नदीच्या मधोमध वसलेले गाव आहे. काही भागात पांढरी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आहे. केळी हेच गावचे प्रमुख पीक आहे. पाणी मुबलक असल्याने कूपनलिका अधिक आहेत. सुधाकर सुमारे १५ वर्षांपासून आंबेमोहोरची लागवड करतात. त्यांची १० एकर 
शेती आहे. केळीशिवाय दुसरे कोणतेही पीक ते घेत नाहीत. प्रत्येकी पाच एकरचे दोन प्लॉट असतात. पाच एकरांत सुमारे नऊ हजार कंद लागतात. ते कांदेबाग घेतात. सऱ्यांमध्ये लागवड करतात.

वाणाच्या शुद्धतेला जपतात 
साडेपाच बाय पाच फूट अंतरात लागवड होते. थंडीत कंद अंकुरण्यास काही वेळेस विलंब होतो. मात्र कंद वाया जाण्याचे प्रमाण कमी आहे, तरीही अतिरिक्त कंद मागवून ठेवतात. कारण नांग्या भरण्याची वेळ आली तर दुसऱ्या वाणाचे मिश्रण आपल्या केळीत व्हायला नको, याची काळजी ते घेतात. कंद चांगले अंकुरले की ठिबक वापरतात. प्लॅस्टिक मल्चिंगचा कधीच वापर केला नाही. 

चौधरी यांची निरीक्षणे 

  • झाड चांगले उंच वाढते.  
  • काही झाडांची ३० किलोपर्यंत रास मिळविली. मात्र, सरासरी २३ किलोची रास मिळवितात.
  • हा वाण करपा रोगाला सहनशील, त्यामुळे फवारण्या अन्य वाणांच्या तुलनेत कमी.
  • लागवड जेवढी अधिक अंतरात तेवढा बुंधा जाड, मग घडही अधिक वजनदार, चमकदार येतो.  
  • झाडाचे वजन कितीही अधिक असले तरी झाड पडणार नाही याची खात्री. तसेच, उन्हाळ्यात उष्ण वाऱ्याने काही झाडांना फटका बसला तरी पावसाळ्यात झाडे जोमात वाढतात. त्यांची चांगली निसवण होते.
  • कंदांची उपलब्धता 

आंबेमोहोर वाण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा किंवा नंदुरबारनजीक गुजरात राज्यातील विविध भागांतून आणतात. या भागातून कंद आण्याचा वाहतूक खर्च धरून तीन रुपये प्रतिकंद असा येतो. शहादा, अक्कलकुवा भागातील केळी उत्पादक मोफत कंद देतात, तेथे फक्त कंद खोदण्याची व ते वाहनात भरण्याची मजुरी द्यावी लागते.

विक्री
चौधरी यांच्या केळीला दर चांगले मिळतात. याचे कारण दर्जेदार उत्पादन. सावदा (ता. रावेर) येथील व्यापारी केळीची खरेदी करून ती दिल्लीस पाठवतात. काही वेळेस दिल्ली येथील व्यापारीही बागांची पाहणी करायला पिलखेडा येथे येतात. सावदा येथील पॅक हाउसमध्ये केळी बॉक्‍समध्ये पॅक केली जातात. तेथून उत्तरेकडे पाठवणूक होते. 

अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा
यंदा चौधरी यांचे अन्य पाच एकरांत आंबेमोहोर लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात अन्य पिकाची पेरणी केलेली नाही. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन गावातील विजय विठ्ठल चौधरी व प्रमोद विश्‍वनाथ महाजन यांनीही आंबेमोहोर लागवडीकडे मोर्चा वळवला आहे. 

अनुभव पाटील यांचा 
गाढोदे (ता. जळगाव) येथील सतीश पाटील यांचे केळी हे प्रमुख पीक.  ते कांदेबाग घेतात. त्यांची काळी कसदार शेती आहे. त्यांना बंधू दीपक व राहुल यांची शेतीत मदत होते. गाढोदे गाव गिरणा नदीकाठी आहे. पण तापीदेखील जवळच असल्याने तिच्या पाण्याचाही कूपनलिकांना लाभ होतो. पाटील पूर्वी श्रीमंती वाणाची लागवड करायचे; पण त्याची मागणी व्यापाऱ्यांकडून कमी झाली. मग अन्य वाणाच्या उतिसंवर्धित रोपांचा अनुभव  घेतला. मधल्या काळात परिसरातील काही शेतकऱ्यांनी शहादा (जि. नंदुरबार) व परिसरातून आंबेमोहोर वाण आणून लागवड केल्याचे व चांगले उत्पादन मिळाल्याचे त्यांना कळले. त्यानंतर जळगाव तालुक्‍यातील भोकर व परिसरात जाऊन ते पाच- सहा शेतकऱ्यांना भेटले. या केळीचे उत्पादन, निर्यातक्षमता, दर, व्यापारी आदींची माहिती घेतली. 

आता आंबेमोहोरवरच भर
मग सात वर्षांपूर्वी आंबेमोहोर वाण शहादा येथील ब्राह्मणपुरी भागातून आणले. ते मोफत मिळाले. पहिल्या वर्षीच्या लागवडीतून हवी तशी रास मिळाली नाही. मग नगरदेवळा (ता. पाचोरा) येथून कंद आणले. त्या वर्षी २२ ते २४ किलोची रास मिळाली. तेव्हापासून म्हणजेच पाच वर्षांपासून नगरदेवळा, औरंगाबाद जिल्ह्यातील नागद, दिघी भागातून कंद आणतात. तेथून वाहतूक खर्चासह चार रुपये प्रतिकंद असा दर पडतो. दरवर्षी किमान १० एकरांत साडेपाच बाय पाच फूट अंतरात कंद प्रक्रिया करून ते सप्टेंबरच्या अखेरीस लागवडीचे नियोजन करतात. 

व्यवस्थापन वैशिष्ट्ये 

    ज्या क्षेत्रात केळी घेतात, त्यात पुढील दोन वर्षे त्याची लागवड नाही.
    केळी लागवडीसाठी खरिपातील मुगाच्या क्षेत्राला पसंती. 
    मुगाच्या काढणीनंतर त्याचे अवशेष शेतात गाडून चांगली मशागत व मग कंदांची लागवड
    पाटील म्हणतात, की आंबेमोहोरचे झाड १३ फुटांपेक्षा अधिक उंच असते. वजनदार असल्याने पडझडीचे प्रमाण अतिशय कमी. 

विक्री 
उत्तरेकडील व्यापारी मध्यस्थांकडून केळीची खरेदी करतात. मागील दोन वर्षे ९०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. डिसेंबरअखेरपर्यंत ९० टक्के कापणी पूर्ण होते. सुमारे १६ महिन्यांत क्षेत्र रिकामे होते. जानेवारीत जळगाव जिल्ह्यात फारशी केळी लागवड नसते. मध्यंतरी एक-दोनदा रावेर भागातील केळी उत्पादक त्यांच्याकडून आंबेमोहोरचे कंद घेऊन गेले. 

आंबेमोहोरची लागवड करणारी मोजकी गावे 

    जळगाव ः पिलखेडे, गाढोदे, जापोरा, खेडी खुर्द
    रावेर ः उदळी
    मुक्ताईनगर ः चांगदेव, अंतुर्ली, नायगाव, धाबे
    शहादा (जि. नंदुरबार) ः ब्राह्मणपुरी, म्हसावद, जयनगर, जवखेडा
    अक्कलकुवा (जि. नंदुरबार) ः खापर, खटवानी, अक्कलकुवा 
    तळोदा (जि. नंदुरबार) ः मोड, आमलाड, प्रतापपूर, चिनोदा

अत्यंत उपयुक्त, महत्त्वपूर्ण वाण - शास्त्रज्ञांची प्रतिक्रिया 
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत जळगाव येथील केळी संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ नाझेमोद्दीन शेख म्हणाले, की आंबेमोहोर हा वाण जळगाव जिल्ह्यात तापी नदीच्या काठावरील असल्याची माहिती आहे. पिकवून खाण्यायोग्य अर्थात ‘कॅव्हेंडिश ग्रुप’ प्रकारात तो येतो. आमच्या केंद्रातही त्याची झाडे जतन करण्यात आली आहेत.

डॉ. शेख यांनी सांगितलेली आंबेमोहोरची वैशिष्ट्ये, निरीक्षणे 
    साधारण २५ ते ३० किलोपर्यंत त्याची रास मिळते.
    झाडाची उंची सव्वादोन मीटरपर्यंत. बुंधा ७२ ते ७५ सेंटिमीटर. 
    केळीच्या जुन्या वाणांमध्ये सर्वांत महत्त्वाचा. जळगाव जिल्ह्यात तो अजून टिकून. 
    त्याचे क्षेत्र मात्र हळूहळू कमी होत आहे. कारण उतिसंवर्धित रोपांसंबंधी काम या वाणात सुरू झालेले नाही. 
    त्याचा बुंधा जेवढा जाड, तेवढे चांगले उत्पादन मिळते. 
    सुमारे २४६ दिवसांत निसवण, तर ३५४ दिवसांत घड कापणीसाठी उपलब्ध. 
    उतिसंवर्धित रोपे तयार केली तर किमान महिनाभर आधी उत्पादन मिळणे शक्‍य.
    याची झाडे पडत नाहीत. 
    केळीची लांबी २१.८ सेंटिमीटर तर घेर १२ सेंटिमीटर. 
    करपा (सिगाटोका) रोगाला सहनशील. 
    प्रतिघडाला १० फण्या. प्रति फणीत सुमारे १२ पर्यंत केळी. चमकदार, दर्जेदार उत्पादन. 

जुने वाणच घातक रोगांसमोर टिकतील 
डॉ. शेख म्हणाले, की केळीत रोगांची महत्त्वाची समस्या आहे. आंबेमोहोर किंवा अन्य जुन्या वाणांत रोगाला सहनशील असण्याचे गुणधर्म आहेत, त्यामुळे असे वाण टिकून राहणे गरजेचे  आहे. उतिसंवर्धित रोपांद्वारे त्यांचा वापर निश्चित वाढू शकतो. 

टिकवण क्षमता चांगली 
नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ आर. एम. पाटील यांचा केळी पिकात गाढा अनुभव आहे. ते म्हणाले, की आंबेमोहोरचे झाड सव्वादोन मीटरपेक्षा अधिक उंच असते. व्यापाऱ्यांकडून आमच्या भागात त्यास चांगली मागणी आहे. टिकवण क्षमता चांगली आहे. साधारण १२ तासांपर्यंत अधिक काळ वाहतूक झाली तरी नुकसानीची शक्‍यता कमी असते.  वाणाचा पक्वता कालावधी इतर वाणांपेक्षा अधिक आहे. घड चांगले वजनदार येतात. कंदांचा खर्च शेतकऱ्यांना कमी येतो. बुंधा मजबूत असल्याने प्रतिकारशक्ती चांगली आहे. उष्णतेत फारसे नुकसान होत नाही. पडझड होत नाही. अक्कलकुवा तालुक्‍यातील कवली आणि तळोदामधील बोरद, तळोदा भाग या वाणाचे केंद्रच आहे. 

वाणाच्या संवर्धनासाठी आमची तयारी 
आंबेमोहोर वाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तो जुना असला तरी फायद्याचा वाटत असल्यानेच शेतकरी त्याकडे वळले. या वाणाच्या संवर्धनासाठी आम्ही तयार आहोत. आमच्याकडे त्या संदर्भात कोणी मदत मागण्यास आले तर ती निश्‍चित केली जाईल. अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाकडे निधीची कमतरता आहे. परंतु केळीच्या विकासासाठी जे शक्य आहे ते केले जाईल, असे केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत विश्‍वनाथ पाटील (निंबोल, ता. रावेर) म्हणाले. ऐनपूर (ता. रावेर) येथील विकास महाजन म्हणाले, की तुलनेने कमी खर्चात एखाद्या वाणाचे चांगले उत्पादन मिळत असेल तर असा वाण आमच्या फायद्याचाच राहील.

रंजक इतिहास 
 आंबेमोहोर केळी वाणाच्या इतिहासाबाबत चिनावल (ता. रावेर) येथील वसंतराव महाजन यांनी दिलेली माहिती रंजक अशीच आहे. ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे रावेर तालुक्‍यातील कोचूर व जामनेर तालुक्‍यातील शेंदुर्णी येथील काही सैनिक होते. त्यांनी कोकणातून केळीचे कंद आणले असे एेकिवात आहे. साधारण १९९९ मध्ये रावेर भागात केळीचा प्रसार झाला. पूर्वी बैलमोट होती. तेव्हा माझे आजोबा श्‍यामजी गोविंदा महाजन १००० ते १५०० कंदांची लागवड करायचे. निवड पद्धतीने केळीचे काही वाण विकसित झाले. त्यात आंबेमोहोरचा समावेश असावा. हा वाण पुढे धुळे, नंदुरबारात पोचला. केळी उत्पादक नवतंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणारा आहे. ते जसजसे येत गेले तसतसे ते आत्मसात झाले. मग वाणबदल घडला. केळी उत्पादकांनी तो स्वीकारला. त्यात जुने वाण मागे पडत गेले. आंबेमोहोर हा उशिरा येणारा वाण आहे. आमचे मित्र डॉ. के. एम. पाटील (पाडळसे, ता. यावल) हे जर्मनीतून उच्चशिक्षण घेऊन गावी आले. त्यांनी केळीची शेती करायला सुरवात केली. त्यांनी आंबेमोहोर वाणाला पसंती दिली. दर्जेदार केळी ते घ्यायचे. या वाणाचा प्रसार त्यांनी यावल, रावेर भागात केला. त्यांनी केळीचा व्यापारही केला. सन १९७२ च्या काळात आंबेमोहोर वाण जोमात होता. त्या वेळी त्यास केएम बीजवाईदेखील म्हटले जायचे.  सन १९९५ नंतर या वाणाखालील क्षेत्र कमी होत गेले.

संपर्क 
 ः सतीश पाटील, ९३२५००५५९५  
 ः आर. एम. पाटील, ९८५०७६८८७६ 
 ः सुधाकर चौधरी, ९७६४४९३८०८
 ः नाझेमोद्दीन शेख, ७५८८०५२७९२
 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
दूध रूपांतर योजनेचे १०० कोटी थकले पुणे: राज्यातील अतिरिक्त दुधाचे खरेदी करून भुकटी...
मॉन्सूनसाठी तयार होतेय पोषकस्थिती...पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात उन्हाच्या झळा असह्य पुणे: सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका...
नियमित कर्जदारांना द्या ५० हजाराचे...गोंदिया ः कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला...
शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा...मुंबईः राज्यात  ५० हजार उद्योग सुरु झाले....
कापसाचा हमीभाव २६० रुपयांनी वाढवा :...नवी दिल्लीः कापसाच्या हमीभावात गेल्या वर्षीच्या...
भेसळयुक्‍त धान बियाणे पुरविणाऱ्या...भंडारा  ः गेल्या हंगामात भेसळयुक्‍त...
जालन्यातील मोसंबी उत्पादकांना लॉकडाऊनचा...अंबड, जि. जालना : कोरोना संकट काळातील लॉकडाऊनचा...
विदर्भात उष्ण लाट पुणे : राज्यात उष्ण व कोरडे हवामान असल्याने...
थकबाकीदारांना पीककर्जाचा मार्ग मोकळा;...मुंबई: खरीपाच्या तोंडावर थकबाकीदार...
कृषी उद्योगांसाठी अजूनही चीन हाच...पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर...
व्यवसाय सांभाळून शेतीमध्ये वाढविली...खासगी नोकरी सोडून आपला पेपर प्रॉडक्‍ट, प्लॅस्टीक...
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...
भारत-पाकिस्तानात जूनमध्ये टोळधाडीचे...संयुक्त राष्ट्रसंघ: टोळधाडीने पिकांचे मोठ्या...
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...
राज्यातील बीज प्रक्रिया केंद्रांची कामे...पुणे: राज्यात नव्याने उभारली जाणारी बीज प्रक्रिया...