agriculture story in marathi, Farmer Ganesh Joshi is getting his way of success in farming with hard struggle in critical situation. | Page 2 ||| Agrowon

प्रयत्नवाद, सातत्यातून शोधला दुष्काळात यशाचा मार्ग
संतोष मुंढे
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

गोण्यांमध्ये भाजीपाला प्रयोग 
दुष्काळ पिच्छा सोडत नसलेल्या मराठवाड्यात गणेश यांनी फेब्रुवारी ते मे दरम्यान सुमारे ५०० 
सिमेंट गोण्यांत माती, शेणखत व पालापाचोळा भरून कोथिंबीर, पालक व शेपू घेतला. फेब्रुवारीत विहिरीत उपलब्ध १० ते १२ फूट पाण्याचे काटेकोर नियोजन केले. पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी गोण्या ठेवलेल्या क्षेत्राला साड्यांपासून बनविलेल्या आच्छादनांचे संरक्षण दिले. पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा म्हणून सकाळी व सायंकाळीच पाणी दिले. या प्रयोगातून उन्हाळ्यात या भाजीपाला विक्रीतून ५६०० रुपयांची कमाई केली.

शिक्षणानंतर शेतीची कास धरली, पण दुष्काळानं परवड मांडली. त्याच्यासोबत दोन हात करताना गेवराई बाजार येथील गणेश जोशी (जि. जालना) यांनी पीकबदल, पूरक व प्रक्रिया तसेच थेट विक्री अशा प्रयोगांची जोड दिली. गणेश यांचे प्रयत्न पाहून खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने शेततळ्याची मदत देऊ केली. प्रशिक्षण, अभ्यासातून प्रतिकूलतेतही यशस्वी शेतीचं स्वप्न साकार करण्याचे गणेश यांचे प्रयत्न उल्लेखनीय म्हणावे लागतील. 

जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्‍यातील गेवराई बाजार येथील गणेश किसनराव जोशी यांची वडिलोपार्जित एक हेक्टर १६ गुंठे जमीन आहे. त्यापैकी एक एकर शेती वडील किसनराव यांनी १९८४ मध्ये मेंढ्या पाळून विकत घेतली. २००० मध्ये शासकीय अनुदानातून विहीर खोदली. परंतु पाऊस साथ देत नसल्याने अपवाद वगळता विहिरीला जेमतेमच पाणी असायचे. मग खरिपात कापूस अन्‌ खाण्यापुरती बाजरी घ्यायची अन् शक्‍य झालं तर रब्बी ज्वारी घ्यायची असं नियोजन होतं. 
आई रुखमनबाई, पत्नी सौ. लंका, ऋतुजा अन् तनुजा दोन मुली असा सहा जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ प्रतिकूल स्थितीत थोड्या क्षेत्रावर चालवायचं आव्हानच होतं. 

प्रयोगशीलतेला आव्हान 
शिक्षण घेतल्यानंतर गणेश २०१६ मध्ये कोरडवाहू शेतीत उतरले. निर्धार पक्‍का असल्याने पीकपद्धतीत काही बदल करून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाशी दोन हात करण्यास ते तयार झाले. सुरुवातीला संपूर्ण शेताची बांधबंदिस्ती केली. ज्या गटात शेत येतं त्या पंधरा एकरांच्या गटात पावसाळ्यातील पाणी वाहून जायचं. ते विहिरीकडे वळवून विहीर पुनर्भरणाचा प्रयोग सुरू केला. त्यासाठी खरपुडी (जालना) कृषी विज्ञान केंद्रानं ‘जेसीबी’ यंत्रासाठी मदत केली. बांधबंदिस्ती आणि विहीर पुनर्भरण प्रयोगातून डिसेंबर- जानेवारीपर्यंत एक ते दोन तास चालणारा पंप तीन ते चार तास चालू लागला. पावसाचा खंड पडला तरी ठिबकद्वारे पाणी देणे शक्‍य होऊ लागले. 

पीकपद्धतीत बदल, तूरविक्रीचा अनुभव 
गणेश यांनी पारंपरिक कपाशी पिकाला फाटा देत २०१६ पासून तूर, मूग, उडीद, खरीप बाजरी, रब्बी ज्वारी आदी पिके घेण्याचा मार्ग अवलंबिला. सुरुवातीला एकरी १६ क्‍विंटल तूर हाती आली. पैकी चार क्‍विंटल शासकीय खरेदी केंद्रावर विकण्यास नेली. पाच-सहा दिवस नंबर लावूनही दर्जावरून नाकारल्या गेल्याने खासगी व्यापाऱ्याला खरेदी केंद्राच्या दरापेक्षा कमी दराने म्हणजे ४२०० रुपये प्रति क्‍विंटल दराने विकावी लागली. त्यामुळे उत्पादनाबरोबर विक्रीतील अडचणी व त्यातून पर्याय काढण्याचा मार्गही मिळाला. 

हिशोबाची जुळवणी 
शेतीत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवताना श्रम, खर्च, पाणी कर आदींचा हिशेब ठेवणे सुरू केले. 
२०१६ मध्ये तुरीला किमान ८२०० रुपये प्रति क्‍विंटल दर मिळणे अपेक्षीत होते. परंतु जमा खर्चाचा ताळेबंद ठेवल्याने पुढील पिकात कशाप्रकारे नियोजन केले पाहिजे याची दिशा मिळाली. 

धान्य महोत्सवात मिळाली संधी 
प्रक्रियेतून मूल्यवर्धन होऊ शकते हे कळल्यावर तुरीची डाळ बनवण्यास प्रारंभ झाला. दोन मजुरांच्या मदतीने कुटुंबातील सर्वांनी पारंपरिक पद्धतीने जात्यावर भरडून घरीच डाळ तयार करणे व विक्रीची वाट शोधणे सुरू केले. एप्रिल २०१७ मध्ये जालना कृषी विभागामार्फत स्टॉल मिळविला. तुरीची शेती, डाळ निर्मिती असा ताळेबंद असलेला तक्ताच तिथे ग्राहकांसाठी उपलब्ध केला. शेतकऱ्याचे कष्ट प्रतिबिंबित करणाऱ्या या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला. साधारण १४० ते १६० रुपये प्रति किलो दराने दोन क्‍विंटल ६० किलो डाळ विकली गेली. त्यातून विक्रीबाबत आत्मविश्‍वास वाढला. 

विक्रीबाबत आत्मविश्‍वास 
औरंगाबाद शहरातील मित्र व ओळखीच्यांना खाऊन पाहा मग घ्या, या तत्त्वावर डाळीचे नमुने देण्यास सुरुवात केली. त्यातून अनेक ग्राहक जोडले गेले. पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे आयोजित तूरडाळ महोत्सवात साडेतीन ते चार क्‍विंटल डाळ १८० ते २०० रुपये प्रतिकिलोने दराने विकण्यात गणेश यशस्वी झाले. 

सेंद्रिय उत्पादन 
ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गणेश यांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन करण्यास सुरुवात केली. 
यंदा उत्पादित दहा क्‍विंटल तुरी व बाजरीचीही विक्री केली. मागील वर्षी मूग व बाजरी यांची लागवड केली. पावसाने दगा दिल्याने दीड क्‍विंटल तूर तर साडेपाच क्‍विंटल बाजरीचे उत्पादन झाले. त्यातील तीन ते साडेतीन क्‍विंटल बाजरीची पुणे व औरंगाबाद येथे जोडलेल्या ग्राहकांना ५० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने घरपोच विक्री केली. खर्च वजा जाता ५० रुपये दर मिळाला. 

गोण्यांमध्ये भाजीपाला प्रयोग 
दुष्काळ पिच्छा सोडत नसलेल्या मराठवाड्यात गणेश यांनी फेब्रुवारी ते मे दरम्यान सुमारे ५०० 
सिमेंट गोण्यांत माती, शेणखत व पालापाचोळा भरून कोथिंबीर, पालक व शेपू घेतला. फेब्रुवारीत विहिरीत उपलब्ध १० ते १२ फूट पाण्याचे काटेकोर नियोजन केले. पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी गोण्या ठेवलेल्या क्षेत्राला साड्यांपासून बनविलेल्या आच्छादनांचे संरक्षण दिले. पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा म्हणून सकाळी व सायंकाळीच पाणी दिले. या प्रयोगातून उन्हाळ्यात या भाजीपाला विक्रीतून ५६०० रुपयांची कमाई केली. या प्रयोगासाठी खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ पंडित वासरे यांच्यासह केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने, श्री. चौधरी आदींचे मार्गदर्शन लाभले. 

शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी 

  • कृषी विज्ञान केंद्राकडून शेततळ्याची मदत. सिंचनासह मत्स्यपालनासाठी केंद्राच्या पुढाकारातूनच गणेश यांनी रत्नागिरी येथे गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाचे प्रशिक्षण घेतले. 
  • गावशिवारात पडणाऱ्या पावसाची घेतात नोंद 
  • २०१६ मध्ये शेळीपालनाची जोड. त्यातील उत्पन्नातून कुटुंबाचे अर्थकारण जुळवून आणण्यास मदत. 
  • मोठ्या शेतकऱ्याकडे मजुरीला जाऊन मजुरी घेण्याऐवजी त्या शेतकऱ्याकडील बैलाचा वापर स्वतःच्या शेतीसाठी. 
  • यंदा बाजरीचे क्षेत्र वाढविले. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संशोधित लोह व जस्ताचे प्रमाण जास्त असलेल्या वाणाची निवड. 

 संपर्क- गणेश जोशी - ८६००२१९०७७ 
 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
बहुवार्षिक चारापिकांचा कृषी...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
जळगावच्या बाजारात फुलांना बारमाही उठाव...जळगावचा फूलबाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. विविध...
अकोली गावाने रेशीम व्यवसायातून गुुंफले...यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्‍यातील अकोली हे...
अधिक क्षारयुक्त जमिनीत प्रयोगशील शेती,...क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध...
नैसर्गिक शेतमालाला जागेवरच तयार केले...लोहारा (जि. लातूर) येथील शाम चंदरराव सोनटक्के...
ऑयस्टर मशरूम उत्पादनासह पापड, नूडल्स,...एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी’ पदवीप्राप्त कुंभेफळ (...
निकमांना श्रावणात पैसे मिळवून देणारे ...श्रावणात व त्यावेळच्या उत्सवांत कोणता शेतमाल...
रेशीम चॉकी व्यवसाय ठरला किफायतशीरयशस्वी लोक पारंपरिक व्यवसाय वेगळ्या पद्धतीने...
रेशीम शेतीने दिली आर्थिक प्रगतीची दिशाशेतमाल दरातील अस्थिरतेमुळे सातत्याने आर्थिक...
बहुवीध पीकपद्धती, यांत्रिकीसह प्रयोगशील...बेलापूर (जि. नगर) येथील राशीनकर कुटुंबाने...
मधमाशीपालनासह मधाचा ‘बिलिव्ह हनी’...गणित विषयातून बीएस्सीची पदवी घेतलेल्या जालना...
लष्करी अळीच्या सामूहिक नियंत्रण...अमेरिकन लष्करी अळीने मका पिकात संपूर्ण राज्यात...
साडेसात एकरांतील करवंद बागेतून आर्थिक...यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील अश्विनीपूर...
वर्षभर मागणी असलेला घेवडा...घेवड्याला वर्षभर चांगली मागणी असते. त्यामुळे...
गावरान पोल्ट्री व्यवसायातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावळे (ता. वैभववाडी) येथील...
उत्कृष्ठ कापूस व्यवस्थापनाचा पाटील...जळगाव जिल्ह्यातील घाडवेल येथील देवेंद्र पाटील हे...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...