आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपी

दुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे. यातील पारंपरिक पद्धतीतील धोके, त्रुटी लक्षात घेऊन अंकुश वायकर यांनी लोखंडी व लाकडी संरचनेच्याआधुनिक व शास्त्रीय पध्दतीच्या यंत्राची सेवा पशुपालकांना देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
जनावर उभे करून यंत्राद्वारे खुरसाळणी करता येते.
जनावर उभे करून यंत्राद्वारे खुरसाळणी करता येते.

दुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे. यातील पारंपरिक पद्धतीतील धोके, त्रुटी लक्षात घेऊन अंकुश वायकर (वडगाव काशिंबेग, जि. पुणे) यांनी लोखंडी व लाकडी संरचनेच्या आधुनिक व शास्त्रीय पध्दतीच्या यंत्राची सेवा पशुपालकांना देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. तेरा वर्षांचा दीर्घ अनुभव, कमावलेली कुशलता यामुळे शेतकऱ्यांकडूनही त्यांच्या यंत्राला चांगली मागणी आहे.   वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव, जि.पुणे) येथील अंकुश वायकर यांनी दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर ‘डेअरी फार्म मॅनेजमेंट’ मधील अभ्यासक्रम पूर्ण केला. एका आधुनिक दूध डेअरीच्या गोठ्यात मदतनीस म्हणून २००७ मध्ये नोकरी सुरु केली. येथील डेअरी प्रकल्पात परदेशातील तज्ञ व्यवस्थापक कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गायींच्या खुरसाळणीचा अनुभव अंकुश घेऊ लागले. त्यावेळी गायींच्या खुरांचे महत्त्व, त्यांचे व्यवस्थापन याविषयी तज्ज्ञांकडून सर्व बारकावे जाणून घेता आले. परराज्यात सेवा व्यवसाय खूर साळणीचे तंत्र आत्मसात केल्यानंतर काही वर्षांनी डेअरीतील नोकरी सोडून तमिळनाडू येथील एका १२५ जनावरांच्या गोठा व्यवस्थापनाची नोकरी मिळाली. तीन वर्षे तेथे अनुभव घेतल्यानंतर मुळशी (ता.पुणे) येथील ४०० म्हशी तर पुढे बंगळूर येथे ४०० म्हशींच्या गोठा व्यवस्थापनाचे कंत्राट घेतले. याठिकाणी काही आजारी आणि लंगडणाऱ्या गायी विक्रीसाठी काढल्या होत्या. बहुतांश गायींना खुरांचे आजार झाल्याचे दिसले. त्यांना कृत्रिम बूट बसविण्याचा प्रयत्न केला. या उपचाराला गाईंनी चांगला प्रतिसाद दिला. एवढ्या दीर्घ अनुभवानंतर अंकुश यांनी आपणच यंत्र घेऊन त्याद्वारे सेवा देण्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले. यंत्राची संरचना अनुभव, ज्ञान, शेतकऱ्यांची नेमकी गरज व पारंपरिक खूर साळणीतील त्रुटी लक्षात घेऊन अंकुश यांनी आपल्या कौशल्यबुध्दीतून खूर साळणी यंत्राची संरचना (डिझाईन) तयार केली. यासाठी शिक्रापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी दत्तात्रय कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले. इंटरनेटसह यूट्यूब चॅनेलवरूनही माहिती संकलित केली. मात्र आर्थिक क्षमता नसल्याने यंत्र तयार करता आले नाही. अशावेळी पंजाबमधील एका कंपनीला ६० हजार रुपयांना ते डिझाईन विकले. अर्थात विकताना कंपनीला विनंतीही केली की पुढे हे यंत्र विकत घेण्याची वेळ आली त्यावेळी ते सवलतीच्या दरात मिळावे. त्यानुसार बाजारात सव्वा दोन लाखांपर्यंत किंमत असलेले हे यंत्र सव्वा लाख रूपयांत मिळाले. मागील वर्षी दसऱ्यावेळी यंत्र आणि टेम्पो खरेदी करून व्यवसाय सुरूही केला. असा आहे व्यवसाय

  • अंकुश अनेक वर्षांपासून या व्यवसायात असल्याने शेतकऱ्यांसोबत त्यांचे चांगले नेटवर्क आहे.
  • साहजिकच यंत्राद्वारे खूरसाळणी पद्धतीला परिसरातून मागणी होऊ लागली.
  • -भारतीय डेअरी संघाच्या व्हॉटस ॲप ग्रूपद्वारेही व्यवसायाचा प्रचार होतो.
  • यंत्राचे वजन ८०० किलोपर्यंत आहे. विविध गावांमध्ये ते नेण्यासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज घेऊन टेम्पो घेतला आहे. भविष्यात व्यवसाय वाढल्यास आणखी एक यंत्र व टेम्पो घेण्याचा विचार आहे.
  • यंत्राची सेवा शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत उपलब्ध केली जाते.
  • गाय, म्हैस, बैल अशा सर्वांसाठी शुल्कदर प्रति जनावर ५०० रुपये आहे.
  • जनावरांची संख्या २० पेक्षा जास्त असल्यास वाहन डिझेलचा खर्च घेतला जात नाही.
  • गावातील पशुपालकांनी एकत्रित येऊन मागणी नोंदविल्यास एकाच ठिकाणी सर्वांना सेवा मिळू शकते.
  • पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगव, शिरूर, मावळ, मुळशी, बारामती तालुक्यांमध्ये लहान- मोठे गोठे आहेत. या ठिकाणांहून खूर साळणीसाठी मागणी असते. नगर, नाशिक व सोलापूर जिल्ह्यातूनही मागणी असून संबंधित गावांमध्ये जाऊन सेवा दिली जात आहे.  
  • असे आहे यंत्र व उपचार पद्धती
  • यात लोखंडी सांगाडा व लाकडी प्लॅटफॉर्म आहे.
  • लोखंडी सांगाड्यामध्ये जनावराला उभे केले जाते.
  • चार पुली व दोरखंड आहेत. त्याआधारे पोटाखालून दोन पट्ट्यांनी बांधले जाते.
  • पुलीच्या साहाय्याने पाय दोरखंडाच्या साह्याने वर उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवले जातात.
  • त्यावर पाय ‘लॉक’ केले जातात.
  • पाय दुमडण्याची सोय असल्याने खूर साळणीस सोपे जाते.
  • त्यानंतर २२० ते ३३० वॅट क्षमतेच्या ग्राईंडरद्वारे खूर साळले जातात. हे काम हातानेच व कौशल्यपूर्ण करावे लागते.
  • हाताने चाकुच्या साहाय्याने खुरांना आकार दिला जातो.
  • साळणी करत असताना खुरांमध्ये दगड अडकून ते आतपर्यंत गेलेले असतात. ते काढून त्यावर उपचार देखील केले जातात.
  • दिवसाला २५ जनावरांचे उद्दिष्ट
  • दिवसाला २५ जनावरांच्या खूर साळणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थात तेवढे साध्य होत नाही. काहीवेळा दिवसाला एकही काम मिळत नाही. वाहन डिझेल व एक मदतनीस असा खर्चही असतो.
  • महिन्याला सरासरी ५० हजार रुपये एकूण उत्पन्न मिळते. खुरसाळणीचे सहा महिन्यांचे चक्र असते. दर सहा महिन्यांनंतर खूर साळणे गरजेचे असते असे अंकुश सांगतात.
  • आधुनिक पद्धतीतील फायदे पारंपरिक खूरसाळणीमध्ये पशुधनाला पायाला बांधून ओढून खाली बसवण्यात येते. या पद्धतीमध्ये काही वेळा सांधा निखळणे, बरगड्यांना इजा होणे, हाडाला जबर मार बसणे, जखम होणे हे धोके असतात. यात जनावर आजारी पडल्यास उपचारांचा खर्च वाढतो. आजारपणामुळे दूध देणे कमी होऊन पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. क्वचितप्रसंगी पशुधन जायबंदी होऊन मृत्यूचाही धोका संभवतो. याउलट नव्या पद्धतीत जनावर उभे राहूनच खूर साळणी होते. त्यात इजा होण्याचा धोका कमी असतो. खुरसाळणी न केल्यास होणारे आजार खुरसाळणी न केल्यास सोल अल्सरचा आजार होतो. खुरांमध्ये टोकदार आणि लहान दगड अडकतात. त्यातून सेप्टिक होऊन खुराला वेदना होतात. त्यामुळे पशुधन लंगडते. यामुळे कुबड येणे, पाठीच्या कण्याला त्रास होणे, बाक येणे आदि विविध व्याधी सुरु होतात. संपर्क- अंकुश वायकर- ९०९६६७७२६६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com