नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
यशोगाथा
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार मनुकानिर्मिती
नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या कापडी बंधूंनी निर्यातक्षम द्राक्ष शेती यशस्वी केली आहे. वडिलांचे मार्गदर्शन, कष्टाची तयारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार व प्रत्येक टप्प्यावर काटेकोर व्यवस्थापन करून किफायतशीर उत्पन्न मिळविण्यात त्यांना यश आले आहे. यंदाच्या वर्षी कोरोनासारख्या संकटात न डगमगता विक्री न झालेल्या द्राक्षांचे रसायन अवशेषविरहित मनुके तयार केले. त्यांचा श्री ब्रॅण्ड तयार करून विक्रीचे अचूक नियोजन करून गावोगावी थेट विक्री केली.
नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या कापडी बंधूंनी निर्यातक्षम द्राक्ष शेती यशस्वी केली आहे. वडिलांचे मार्गदर्शन, कष्टाची तयारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार व प्रत्येक टप्प्यावर काटेकोर व्यवस्थापन करून किफायतशीर उत्पन्न मिळविण्यात त्यांना यश आले आहे. यंदाच्या वर्षी कोरोनासारख्या संकटात न डगमगता विक्री न झालेल्या द्राक्षांचे रसायन अवशेषविरहित मनुके तयार केले. त्यांचा श्री ब्रॅण्ड तयार करून विक्रीचे अचूक नियोजन करून गावोगावी थेट विक्री केली.
नाशिक जिल्ह्यातील वनसगाव (ता. निफाड) येथील मधुकर पंढरीनाथ कापडी यांनी १९८३ मध्ये अर्धा एकर क्षेत्रात द्राक्ष लागवडीस प्रारंभ केला. नोकरी सांभाळून अनेक प्रयोग केले. कष्टातून आठ एकर जमीन खरेदी केली. वडिलांचा आदर्श व मार्गदर्शनातून थोरला शैलेश व धाकटा संदीप या मुलांनी शेतीतच करियर सुरू केले. संदीप राज्यशास्त्र पदव्युत्तर पदवीधारक आहेत.
वडिलांचे निधन झाल्यानंतर आज दोघे बंधू शेतीची सर्व जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत.
शेती दृष्टिक्षेपात
- क्षेत्र- ९ एकर अधिक दोन एकर करार शेती
- सहा एकर- थॉमसन सीडलेस द्राक्षवाण
- एक एकर- शेवगा
- दोन एकर- कांदा, सोयाबीन, मका
- दोन एकर- सीताफळ
शेतीची वैशिष्ट्ये
- नियोजनपूर्वक काम करताना सिंचन व्यवस्थापन, बदलती पीक पद्धती यांचा अभ्यास करून बागायती क्षेत्र करण्यावर भर
- अडचणीच्या काळात थेट विक्रीही करता आली पाहिजे त्या दृष्टीने कौशल्य निर्मितीवर भर
- मशागत, फवारणी यासाठी अद्ययावत यांत्रिकीकरण स्वीकारले.
- निर्यातक्षम उत्पादनावर भर. सुरुवातीला द्राक्ष विक्री स्थानिक व्यापाऱ्यांना व्हायची.
- आता निर्यातीसंबंधीच्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीत नोंदणी. तज्ज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन. आखाती देश, रशिया, बांगलादेश, युरोप आदी ठिकाणी निर्यात.
कामांचे व्यवस्थापन :
- मजुरांच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने बागांची छाटणी
- माती, पाणी, पानदेठ परीक्षणाद्वारे पाणी व खत व्यवस्थापन
- सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी एप्रिल खरड छाटणीपूर्ण एकरी एक ट्रक शेणखत
- आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी पाचटाचे मल्चिंग
- 'रेसिड्यू फ्री’ उत्पादन मिळण्यासाठी रासायनिक कीडनाशकांचा काटेकोर वापर
- हवामानाचा अंदाज घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना
अडचणींवर शोधला पर्याय
सन २०१९-२० मध्ये नैसर्गिक आपत्तीसह लॉकडाउनचा मोठा फटका बसला. तीन टप्प्यांत असलेल्या सुरुवातीच्या पहिल्या दोन एकर बागेचे अतिवृष्टीमुळे संपूर्ण नुकसान झले. नंतरच्या दोन एकरांतून सुमारे २४ टन माल मिळाला. मात्र लॉकडाउन होण्यापूर्वी कामकाज अडचणीत सापडल्याने अवघ्या ३५ रुपये प्रति किलो दराने मालाची विक्री झाली. अखेरच्या टप्प्यातील दोन एकरांतील माल टाळेबंदीत सापडला. व्यापारी मातीमोल भावाने मागत होते. मग धोरणी निर्णय घेऊन संपूर्ण बागेचा खुडा करून घड सुकविले. कुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता २८० क्विंटल द्राक्षांपासून ४८ क्विंटल मनुके बनविले. या प्रक्रियेत खुडणी, वाळवणी, यंत्राच्या साह्याने प्रतवारी, पॅकिंग यासाठी ९.५० रुपये प्रति किलो खर्च आला.
गावोगावी थेट विक्री
- टाळेबंदीमुळे बाजारपेठा खुल्या नव्हत्या. व्यापारी मातीमोल दराने २० ते २५ रुपये प्रति किलो दराप्रमाणे मनुका मागू लागले. पाच किलो द्राक्षे सुकवून एक किलो मनुका तयार झाला असल्याने या दरात देणे परवडणारे नव्हते. अशा काळात ४८ क्विंटल मनुका विकायचा कसा हा प्रश्न भेडसावत होता. थेट विक्रीद्वारे हा प्रश्न सोडवला.
- एक किलो वजनाच्या पाकिटांची निर्मिती
- तयार केला श्री ब्रॅण्ड
- कुटुंबातील सदस्यांकडून वजन, पॅकिंग व अन्य कामकाज
- वाहनाचे टायर खराब असताना पैसे जुळवून नव्या टायरची जोडणी.
- माल भरून गावोगावी थेट विक्रीचे नियोजन. (नाशिक जिल्ह्यासह जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यांत)
- जून ते ऑगस्ट कालावधीत संपूर्ण ४८ क्विंटल मालाची सरासरी १०० रुपये प्रति किलोप्रमाणे दराने विक्री.
- सात लाख रुपये खर्च वजा जाता सुमारे पावणेपाच लाख रुपये नफा
एकमेकांच्या समन्वयातून शेतीची वाटचाल
दोघा बंधूंनी कामे वाटून घेतली आहेत. शेती कामे, फवारणी, व्यवहार संदीप, तर प्रक्षेत्र व्यवस्थापन व मजूर देखरेख शैलेश पाहतात. गरजेनुसार पीककर्ज घेण्यात येते. पत अबाधित ठेवण्यासाठी वार्षिक परतफेड नियमित केली जाते. उत्पन्नातून अद्ययावत यांत्रिकीकरण, मुलांचे शिक्षण, कुटुंबीयांचा विमा आदींसाठी आर्थिक नियोजन होते. त्यातून आर्थिक स्थैर्यता मिळविली आहे.
प्रतिक्रिया
शेती करताना अनेक संकटे येतात. वडिलांनी उभा केलेला आदर्श घेऊन खचून न जाता धैर्याने आणि कुटुंबातील सदस्यांच्या साथीने शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. संकट काळात व्यापारी, मध्यस्थ यांच्या अडवणुकीला बळी न पडता मालाच्या थेट विक्रीचे नियोजन केले तर निश्चित आपला नफा वाढेल. ग्राहकांनाही रास्त दरात माल मिळेल.
-संदीप कापडी
संपर्क- संदीप कापडी- ७०२०१२२५६१, ९८५०९६०४४७
फोटो गॅलरी
- 1 of 92
- ››