मिरची पिकात प्रमोद पाटील यांनी तयार केला हातखंडा

मोद हिरालाल पाटील यांनी उत्तम व्यवस्थापनातून मिरची पिकात तयार केला हातखंडा
मोद हिरालाल पाटील यांनी उत्तम व्यवस्थापनातून मिरची पिकात तयार केला हातखंडा

सावळदा (ता. जि. नंदुरबार) येथील प्रमोद हिरालाल पाटील यांनी उत्तम व्यवस्थापनातून मिरची पिकात हातखंडा तयार केला आहे. दरवर्षी जुलैमध्ये लागवड असलेल्या मिरचीचे तीन संकरीत वाण घेत एकरी ३८ ते ४० टन उत्पादीत या मिरचीला त्यांनी जागेवरच मार्केटही मिळवले आहे.

सावळदा (ता. जि. नंदुरबार) हे गाव तापी नदीनजीक आहे. येथील जमीन काळी कसदार आहे.गुजरातमधील तापी जिल्ह्यातील निझर तालुका या गावापासून जवळ आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य उन्हाळ्यात अनेकदा जाणवते. कापूस, मिरची व पपई ही या भागातील प्रमुख नगदी पिके आहेत. गावातील प्रमोद पाटील यांची वडिलोपार्जीत १५ एकर शेती आहे. दोन कूपनलिका आहेत. पाणी कमी पडत असल्याने मागील वर्षी तापी नदीवरून जलवाहिनी टाकून पाण्याचा शाश्‍वत स्त्रोत त्यांनी निर्माण केला. वडील हिरालालदेखील पूर्णवेळ शेतकरी असून त्यांचे मार्गदर्शन प्रमोद यांना मिळते.

मिरचीची शेती पाटील यांचा मिरची पिकात सुमारे पाच वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. दरवर्षी जुलैमध्ये लागवड असते. लागवडीपूर्वी जमीन चांगली तापू देतात. त्यात एकरी चार ट्रॉली शेणखत देतात. पाच बाय सव्वाफूट अंतरात दीड फूट उंचीच्या गादीवाफ्यावर पॉली मल्चिंग तंत्राचा उपयोग करून लागवड होते. सिंचनासाठी ठिबकची व्यवस्था आहे. निविष्ठा विक्रेते योगेशभाई पटेल (पिंपळोद, गुजरात) यांचे मार्गदर्शन मिळते. खते व फवारणीसंबंधीचे वेळापत्रक तयार करून घेतले आहे. मिनी ट्रॅक्‍टरद्वारे आंतरमशागत होते. बोअरच्या पाण्याची व्यवस्था आहे.

तीन प्रकारच्या वाणांची निवड पाटील दरवर्षी तीन प्रकारच्या वाणांची निवड करतात. त्यातील एक वाण हिरवी व लाल मिरची यासाठी वापरता येते. दुसरा वाण निर्यातीच्या दृष्टीने व अधिक टिकण्यासाठी फायदेशीर ठरतो. तर तिसरा वाण निर्यात व स्थानिक अशा दोन्ही बाजारपेठांसाठी उपयोगी ठरतो. यात तिखट, आखूड, जाड, मध्यम, तिखट असाही वाणांचा विचार असतो. रोपे नाशिक येथील नर्सरीतून एक रुपये २० पैसे प्रतिरोप या दराने खरेदी होतात. एकरी सहा हजार रोपे लागतात.

उत्पादन व विक्री मिरचीचा प्लॉट मार्चपर्यंत चालतो. एकरी ३८ ते ४० क्विंटलपर्यंत उत्पादन पाटील घेतात. यंदा डिसेंबरच्या मध्यात हिरव्या मिरचीची काढणी बंद केली. लाल झाल्यानंतर विकण्याचा मानस आहे. त्याची विक्री नंदुरबार बाजार समितीत होईल. काढणीसाठी गुजरातमधील निझर तालुक्‍यातील मजुरांची मदत घेतात. बारा एकरांत काढणीसाठी सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत दर १० दिवसाआड १०० ते १२५ मजुरांची आवश्‍यकता असते. पाटील यांच्या दर्जेदार मिरचीची खरेदी निझर व शहादा (जि. नंदुरबार) येथील खरेदीदार जागेवरच करतात. पुढे ही मिरची मुंबई व तेथून आखाती देशांत ती निर्यात होते. दरवर्षी निर्यातक्षम मिरचीला किलोला २२ रुपये, काहीवेळेस ३५ रुपये तर स्थानिक मिरचीला त्याहून कमी किंवा १८ रुपयांपर्यंत दर मिळतो. दरवर्षी खर्त वजा जाता एकरी पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

पपईची जोड तीन एकरांत मिरचीची तर पपईचीही तीन -चार एकरांत दरवर्षी लागवड असते. नवे तंत्रज्ञान, बाजारातील मागणी त्यासाठी लक्षात घेतली जाते. पपईचे मागील वर्षी एकरी ३० टन उत्पादन मिळाले. मागील हंगामात अखेरपर्यंत सरासरी पाच रुपये प्रति किलो दर मिळाला. यंदा सुरुवातीला १८ रुपये तर सध्या ८ रुपये दर मिळतो आहे. आत्तापर्यंत आठ टन विक्री झाली आहे.

मिरचीने तारले नैसर्गिक आपत्ती व संकटांमुळे २०१५ मध्ये कर्जबाजारी होण्याची वेळ पाटील यांच्यावर आली. जमिनीचा तुकडाही विकावा लागण्याची स्थितीही आली. पण पाटील खचले नाहीत. योगेशभाई पटेल (पिंपळोद, गुजरात), मिरची उत्पादक, खरेदीदारांनी त्यांना मदत व मार्गदर्शन केले. सन २०१६ मध्ये मिरची पिकात चांगला फायदा झाला. आर्थिक संकटे दूर होऊ लागली. आज या पिकाने प्रतिष्ठा मिळवून दिल्याचे पाटील सांगतात.

संपर्क- प्रमोद पाटील - ७०२०१५४११८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com