पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळा

कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव येथील श्रीकांत जिनगोंडा पाटील यांनी२० गुंठे पॉलीहाऊसमध्ये खाऊच्या पानाची शेती करण्यास सुरुवात केली आहे.या तंत्रज्ञानानुसार पानाचा आकार व गुणवत्ता यात वाढ होऊन दरही चांगला मिळत असल्याचाअनुभव आला आहे.
 श्रीकांत पाटील यांनी पॉलीहाऊसमध्ये फुलवलेला पानमळा
श्रीकांत पाटील यांनी पॉलीहाऊसमध्ये फुलवलेला पानमळा

कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीकांत जिनगोंडा पाटील यांनी मागील वर्षापासून २० गुंठे पॉलीहाऊसमध्ये खाऊच्या पानाची शेती करण्यास सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानानुसार पानाचा आकार व गुणवत्ता यात वाढ होऊन दरही चांगला मिळत असल्याचा अनुभव पाटील यांना आला आहे. उसाच्या पट्ट्य़ात हा आश्‍वासक प्रयोग म्हणावा लागेल. कोल्हापूर- सांगली महामार्गाजवळ निमशिरगाव (जि. कोल्हापूर) हे छोटेखानी गाव आहे. शिरोळ तालुका बागायती पट्ट्यात असला तरी निमशिरगावला नदी नसल्याने त्याचा समावेश कोरडवाहू भागात होतो. गावातील श्रीकांत पाटील यांची सुमारे अडीच एकर शेती आहे. त्यात दोन एकर ऊस, काही गुंठे पेरु आहे. पॉलीहाऊसमध्ये पानमळा पाटील अलीकडील काळात वेगळे काही करण्याच्या प्रयत्नात होते. पॉलीहाऊसमध्ये जरबेरा फुले घेण्याचा प्रयत्न होता. मध्यंतरी कर्नाटक राज्यातील चिकोत्री शिरगाव भागात त्यांनी पॉलीहाऊसमध्ये केलेली पानमळ्याची शेती पाहिली. त्यातून मिळणारे गुणवत्तापूर्ण उत्पादन व दर या बाबी त्यांना भावल्या. जिल्ह्यात पान मळ्याचे क्षेत्र फारसे नाही. पॉलीहाऊसमध्ये तर क्वचित पाहायला मिळेल. हा प्रयोग करून पाहण्याचे ठरवले. मागील वर्षी नागपंचमीला २० गुंठे पॉलीहाऊसमध्ये लागवडही केली. त्यासाठी १४ लाख रुपये भांडवल उभारले. कृषी विभागाच्या कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमातून नऊ लाख रुपयांचे अनुदान मिळाले. पानमळा रचना व व्यवस्थापन

  • मुरमाड जमिनीवर लागवड. साडेचार फुटी सरी
  • एकूण ६० सऱ्या
  • प्रत्येकी दीड फुटावर एक वेल
  • बहुतांश वाण देशी. काही रोपे बनारसी पानांची.
  • एकूण सुमारे २६०० रोपे
  • दररोज एक तास ठिबकने पाणी
  • दर पंधरा दिवसांनी साठ लीटर गोमूत्र ठिबकद्वारे
  • वर्षातून एकदा शेंगपेंड, निंबोळी वा करंजी पेंड यांचा प्रत्येकी चार ते साडेचार पोती वापर
  • महिन्यातून एकदा वेलबांधणी व खुडणी
  • लावणीनंतर सात महिन्यांनी उतरण व चुंबळ
  • तापमान नियंत्रण करण्यासाठी फॉगर
  • वेल बांधणी व पानांच्या खुडणीसाठी दोन मजूर. सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पानांची काढणी. त्यानंतर तातडीने बाजारपेठेत नेली जातात
  • उत्पादन व अर्थकारण

  • दररोज सुमारे सात ते आठ डाग काढणी. प्रति डाग ३५०० पानांचा.
  • इचलकरंजी व परिसरातील व्यापाऱ्यांना विक्री
  • प्रति डागास एकहजारापासून ते कमाल १७००, २१०० पर्यंतही दर मिळाला.
  • मागील वर्षी सर्व खर्च वजा जाता उत्पन्न दीड लाख रुपये
  • दररोज ताजा पैसा
  • पॉलीहाऊस तंत्राच्या वापराचा फायदा

  • तापमान व अन्य बाबी नियंत्रित वातावरणात. त्यामुळे पानांचा आकार व दर्जा चांगला. त्यातच
  • सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन असल्याने पानांना वेगळी चव, तजेलदारपणा व ग्राहकांकडून मागणी.
  • साहजिकच खुल्या पानमळ्यातील पानांपेक्षा चांगला दर
  • पानपट्टी व्यावसायिकांकडून बनारसी पानाला खास पसंती.
  • पानपट्टी चालक स्वत: पानमळ्यात येऊन खरेदी करतात. दररोज जागेवर तीन रुपयाला एक पान या प्रमाणे चारशे ते पाचशे पानांची विक्री. दररोज दीड हजार रुपयापर्यंतचे उत्पन्न
  • लॉकडाऊनच्या संकटाशी सामना या भागात पॉलीहाऊसमधील पानमळे फारसे नसल्याने पाटील यांच्याकडील पानांची ओळख हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील बाजारपेठांत झाली आहे. मात्र कोरोना संकटात पानमळ्यासही फटका बसला. एकेकाळी प्रति डाग किमान एकहजार रुपये असलेले दर मागणीअभावी ३०० रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. तरीही पाटील यांनी धीर सोडलेला नाही. ज्या गावांतून मागणी तसे काढणीचे नियोजन करून त्यांनी विक्री व शेती सुरू ठेवली आहे. आता बाजारपेठा खुल्या होत असल्याने मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा चांगल्या दरांची अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे. संपर्क- श्रीकांत पाटील- ९८८१२५८८०१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com