शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
यशोगाथा
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘पद्मालया’ ब्रॅण्ड
शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक कंपनीने दादर ज्वारी, हरभरा, गहू, बाजरी यांचे प्रमाणित बियाणे तयार करून त्यांचा ब्रॅण्ड तयार केला आहे. ‘दर्जेदार बी, भरघोस उत्पन्न’ हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्ह्यासह राज्यात बियाणे लोकप्रिय करण्यास सुरुवात केली आहे.
शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक कंपनीने दादर ज्वारी, हरभरा, गहू, बाजरी यांचे प्रमाणित बियाणे तयार करून त्यांचा ब्रॅण्ड तयार केला आहे. ‘दर्जेदार बी, भरघोस उत्पन्न’ हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्ह्यासह राज्यात बियाणे लोकप्रिय करण्यास सुरुवात केली आहे.
शिवणी (ता. भडगाव, जि. जळगाव) हा गिरणा नदी क्षेत्रातील परिसर दादर ज्वारी, हरभरा यासाठी प्रसिद्ध आहे. काळी कसदार, मध्यम प्रकारची जमीन भागात आहे. गावात २०१७ मध्ये पद्मालया फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. कृषी पदवीधर राहुल पाटील अध्यक्ष, तर जितेंद्र पाटील उपाध्यक्ष आहेत. सुनीता सिसोदे, करिष्मा पाटील व प्रवीण पाटील हे कंपनीत त्यांचे साथीदार आहेत.
कंपनीची वाटचाल
राहुल यांनी सुमारे १० वर्षे बियाणे कंपनीत नोकरी केली. साहजिकच बीजोत्पादन, विक्री, त्याचे अर्थशास्त्र, शेतकऱ्यांच्या गरजा यांचा चांगला अभ्यास होता. गावात पाणलोटच्या कामासंबंधी जळगाव आत्मा विभागाचे तत्कालीन संचालक तथा सध्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व कृषी उपसंचालक अनिल भोकरे आले होते. त्या वेळी बीजोत्पादन कार्यक्रम व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापण्यासंबंधी प्राथमिक चर्चा झाली व प्रोत्साहन मिळाले. ‘पद्मालया’ ने तूर, दादर ज्वारी, हरभरा, गहू आदींचे बीजोत्पादन करण्यावर मुख्य लक्ष केंद्रित केले आहे. सुरुवातीला (२०१७) शिवणी व परिसरात १० एकरांत बीजोत्पादन कार्यक्रम राबविला. त्यातून दोन लाख रुपयांची उलाढाल झाली. पुढील वर्षी ती १० लाख रुपयांपर्यंत नेली. यंदा रब्बीत १५० हेक्टर क्षेत्रात बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जात आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत आतापर्यंत ३०५ शेतकऱ्यांना ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ दिला आहे. २५ जणांना बारमाही रोजगार मिळाला आहे.
उत्पादन वाढीसाठी कार्यक्रम
बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना उत्पादकता वाढीसंबंधी आवश्यक मार्गदर्शन केले जाते. त्यात कीडनियंत्रण, खतांचा मर्यादित व गरजेनुसार वापर यावर अधिक भर आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनीने यंदाच्या कापूस हंगामात दोन हजार कामगंध सापळ्यांचे कापूस उत्पादकांना वितरण केले. शिवणी गावात दोन वर्षे जलसंधारणाचीही कामे केली जात आहेत. उत्पादन वाढ व खर्च कमी करण्याच्या तंत्रामुळे बीजोत्पादन शेतकऱ्यांचा साधारणतः १० ते १२ टक्के खर्च कमी करण्यास गेल्या दोन हंगामांत यश आले आहे.
खर्च व यंत्रणेचे गणित
कंपनीने जळगाव जिल्ह्याचे कार्यक्षेत्र यंदापासून राज्यात विस्तारण्यास सुरुवात केली आहे.
भाडेतत्त्वावर प्रक्रिया केंद्र व गोदाम चोपडा शहरात सुरू केले आहे. गोदामाला दरमहा १२ हजार रुपये शुल्क द्यावे लागते. नऊ लाख रुपये आर्थिक भांडवल राष्ट्रीयीकृत बँकेच्या मदतीने उभे केले. प्रक्रियेसाठी प्रति क्विंटल बियाण्यामागे ३५० रुपये खर्च येतो. आजवरच्या ताळेबंदानुसार एक लाख रुपयांमागे २० टक्के खर्च आला आहे. एवढा खर्च करून कंपनीने बऱ्यापैकी नफा वर्षाकाठी उभा केला आहे. राज्यभर बियाणे विक्रीचा परवाना कृषी आयुक्तालयातर्फे घेतला आहे.
कंपनीचे कामकाज
- कंपनीचे सुमारे ३५० सदस्य. पैकी बीजोत्पादनात २०० जण सहभागी
- शेतकऱ्यांकडून बियाण्याची खरेदी (रॉ सीड) थेट जागेवरून
- संबंधित धान्याला बाजारात त्या त्या वेळी असणाऱ्या दरापेक्षा १० टक्के अधिकचा त्यांना दर
- कंपनीच्या गोदामात बियाणे पोहोच करण्यासाठी वाहतूक भाडे कंपनी देते.
- ज्यांना ते शक्य नसते तेथे कंपनी वाहनाची व्यवस्था करते.
- वाहन भाडे व अधिक दर यामुळे बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांचा नफा वाढत आहे.
विद्यापीठाच्या वाणांचा प्रसार
- बीजोत्पादनासाठी कृषी विद्यापीठांकडून संशोधित वाणांचा (ब्रीडर सीड) वापर
- असे आहेत वाण
- तूर- परभणी कृषी विद्यापीठाची बीडीएन ७११
- दादर ज्वारी- कोरडवाहू क्षेत्रासाठी- सुचित्रा- महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वाण
- ओलिताखालील क्षेत्रासाठी- फुले रेवती
- हरभरा- महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून संशोधित विजय, दिग्विजय
- ग्वाल्हेर कृषी विद्यापीठाकडून संशोधित राजविजय २०२ या वाणाचा उपयोग
- बाजरी- महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे धनशक्ती वाण
- आदिवासी शेतकऱ्यांना ना नफा तत्त्वावर हे बियाणे देण्याचा प्रयत्न
पॅकिंग व दर
- बाजरीचे बियाणे दीड व तीन किलोच्या पॅकिंगमध्ये, ज्वारी पाच किलो, गहू ३० किलो, हरभरा २० व २० किलो, तूर पाच किलो, मूग पाच किलो पॅकिंग.
- बियाण्यांचे दर बाजारातील कंपन्यांपेक्षा २० टक्क्यांनी कमी
- यंदापासून जळगाव, धुळे, नांदेड, सोलापूर भागात विक्री विस्तार
- यंदा तिसऱ्या वर्षी २१ लाख रुपयांपर्यंत उलाढाल अपेक्षित
व्यवसायातील अडचणी
कृषी विद्यापीठांच्या पैदासकार बियाण्यांपासून (ब्रीडर सीड) बियाणे उत्पादित करण्यासाठी तीन टक्के रॉयल्टी व तीन वर्षांसाठी २५ हजार रुपये अनामत रक्कम द्यावी लागते. गोदाम, प्रक्रिया केंद्र यासाठी शासनाकडून अनुदानाची रक्कम शंभर टक्के हवी. अन्यथा, कंपनीचा आर्थिक बोजा वाढतो. त्यामुळे सदस्य शेतकऱ्यांना अधिकचा लाभ मिळवून देता येत नाही. कोरडवाहू क्षेत्रासाठी शिफारस असलेल्या प्रमाणित रब्बी ज्वारी बियाण्याची विक्री करताना शेतकरी कंपनीला अनुदानाचा लाभ मिळत नाही या समस्या राहुल पाटील बोलून दाखवतात.
संपर्क- राहुल पाटील- ९४२३१५८७८६
फोटो गॅलरी
- 1 of 91
- ››