स्पर्धेच्या युगात टिकवला गुणवत्तेतून दुग्ध प्रक्रिया व्यवसाय

अधिकराव शंकर जाफळे-पाटील यांनी बनवलेली दुग्धोत्पादने
अधिकराव शंकर जाफळे-पाटील यांनी बनवलेली दुग्धोत्पादने

रामानंदनगर-किर्लोस्करवाडी (जि. सांगली) येथील अधिकराव जाफळे-पाटील यांनी रीतसर प्रशिक्षण घेऊन दुग्ध प्रक्रिया उद्योग मोठ्या चिकाटीने यशस्वी केला आहे. सुमारे १० ते १२ विविध पदार्थांची निर्मिती करून पदार्थांचा उत्तम दर्जा व ग्राहकांना खात्रीची सेवा देत राधेश्‍याम ब्रॅंडची ओळख तयार केली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका द्राक्ष, ऊस, भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. पशुधनही मोठ्या संख्येने असल्याने त्यामुळे दूध उत्पादकांचा तालुका अशीही ओळख तालुक्याची आहे. येथील रामानंदनगर-किर्लोस्करवाडी गावातील अधिकराव जाफळे-पाटील यांची सहा एकर शेती. त्यांचे वडील शंकर महावितरण कंपनीत नोकरीत होते. नोकरी सांभाळून ते शेती पाहायचे. दरम्यान, अधिकरावांना २००३ मध्ये दुबईत नोकरी मिळाली. सन २००५ ला सुट्टीसाठी ते गावी आले. त्या वेळी घरच्यांनी परदेशी लांब राहण्यापेक्षा इथेच करिअर करावे, असा आग्रह धरला. दरम्यान, एका नामांकित कंपनीच्या मसाला विक्रीची एजन्सी मिळाली. यापूर्वी दुचाकीवरून लस्सी पाकीटविक्रीचा थोडाफार अनुभव घेतला होता. त्यामुळे या एजन्सी व्यवसायात यश मिळाले. त्यानंतर या भागात दुग्ध प्रक्रिया व्यवसायाला असलेला वाव पाहाता त्याकडे लक्ष केंद्रित करायचे ठरले. मार्च २०१५ मध्ये श्री भाग्यलक्ष्मी डेअरी प्रॉडक्ट्स या नावाने व्यवसायाची उभारणी केली. व्यवसायाची पूर्वतयारी अधिकरावांनी विविध ठिकाणी जाऊन दुग्धव्यवसाय विषयातील प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केले. प्रक्रिया उद्योगांना भेटी दिल्या. सकाळ माध्यम समूहातर्फे कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या डेअरी विषयावरील प्रशिक्षणात सहभाग घेतला. त्या वेळी मार्गदर्शन केलेल्या सदाशिव चौगुले यांची नंतर भेट घेत अधिक माहिती घेतली. व्यवसाय तर सुरू झाला. परंतु, पुढेही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे चौगुले यांच्याकडून पुन्हा मदत घेतली. या उद्योगातील दोन अनुभवी व्यक्ती त्यांनी अधिकराव यांच्याकडे पाठविल्या. त्यांच्याकडून ‘प्रॅक्टिकल’ ज्ञान आत्मसात केले. सुरुवातीचे अनुभव गावात दूधसंकलन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे व्यवसायासाठी दूध मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गावच्या शेजारी सर्वांत मोठा दूध प्रक्रिया उद्योग असल्याने शेतकरी आपल्याकडे कोणत्या आधारावर दूधपुरवठा करणार, असाही प्रश्न होता. या भागात दूधसंकलन करणारे व्यावसायिक खाद्याचाही पुरवठा करायचे. अशा स्थितीत त्यांच्यापेक्षा लिटरला दोन रुपये अधिक दर देण्याचा निर्णय घेतला. त्यातून दूधसंकलन सोपे झाले. जाफळे-पाटील म्हणाले की, युनिटमध्ये प्रक्रिया करण्यासाठी एक व्यक्ती तयार केली होती. त्यामुळे काम सहजपणे पूर्ण होत होते. परंतु, कालांतराने त्या व्यक्तीने काम सोडून दिले. मग कठीण परिस्थिती निर्माण झाली. हे सारे लक्षात घेऊन मी स्वतःच प्रक्रिया करण्यास शिकलो. परंतु, उत्पादन आणि विक्री या दोन्ही आघाड्या एकाचवेळी सांभाळण्याची कसरत होऊ लागली. अशावेळी पत्नी सौ. पूनम यांना प्रक्रियेचे धडे देण्यास सुरुवात केली. आज या कामात त्या कुशल झाल्या असून, मार्केटिंग व विक्रीची जबाबदारी अधिकराव पाहतात. विक्री व्यवस्थेचे प्रयत्न सांगली भागात दुग्धव्यवसायात अनेक ब्रॅंड होते. त्यात टिकून आपली ओळख तयार करणे हे आव्हानाचे होते. अशावेळी व्यावसायिकांना नमुना मोफत देण्यास सुरुवात केली. गुणवत्ता पाहून मागणी द्या, असे आवाहन केले. व्यावसायिकांनीही मग उत्पादनांची पारख करीत हळूहळू मागणी नोंदविण्यास सुरुवात केली. असा आहे अधिकरावांचा प्रकल्प

  • दोन गुंठ्यांत प्रकल्पाची उभारणी
  • प्रक्रियेसाठी असलेली साधने - श्रीखंड मिक्सर, चक्का पिसणे यंत्र, लस्सी चर्नर, क्रीम सेपरेटर,
  • खवानिर्मिती यंत्र, पॅकिंग, कोल्ड स्टोअरेज- (५ टन क्षमतेचे)
  • प्रतिदिन प्रक्रिया क्षमता- ५०० ते ७०० लिटर
  • वर्षभर मागणीनुसार तयार होतात १० ते १२ पदार्थ
  • उदा. दही, खवा, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, बासुंदी, लस्सी
  • बिगर हंगामात प्रतिदिन दूध प्रक्रिया- १५० ते २०० लिटर, हंगामात- ४०० लिटर
  • प्रकल्प गुंतवणूक- सुमारे २० लाख रुपये (जागेव्यतिरिक्त)
  • दुग्धव्यवसायाची मुख्य वैशिष्ट्ये

  • गुणवत्तेशी तडजोड नाही. त्यामुळेच बाजारात टिकून.
  • वर्षभर उत्पादन सुरू. ग्राहकांना खात्रीशीर सेवा
  • शेतकऱ्यांकडून बाजार दरापेक्षा अधिक दराने दूधखरेदी. त्यांना पशुखाद्याचा पुरवठा.
  • गरजेवेळी विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या डेअरींकडून ‘ओव्हररेट’ने दुधाची खरेदी
  • विक्री साखळी उभी केली
  • वाहतुकीसाठी दोन गाड्यांची सोय
  • उत्पादन प्रक्रियेत चार जणांना रोजगार, शिवाय सेल्समन, डिलिव्हरी बॉईज
  • सुरुवातीला वार्षिक चार ते पाच लाखांपर्यंत असलेली उलाढाल आता वीस लाखांपर्यंत पोचली आहे.
  • व्यवसायातील नफा - २० ते ३० टक्के
  • ‘राधेश्याम ब्रॅंड’ची विक्री

  • विक्रीचे मुख्य क्षेत्र पलूस तालुका
  • वितरकांची संख्या सुमारे १००
  • हॉटेल्स, केटरर्स, लग्नसमारंभ, बेकरी, किराणा दुकान
  • होलसेलचे दर (प्रतिकिलो)
  • दही- ५० रु.
  • श्रीखंड- १४० रु.
  • आम्रखंड- १५० रु.
  • बासुंदी- १६० रु.
  • पनीर- २८० रु.
  • तूप- ४२० रु.
  •  प्रतिक्रिया दरांची स्पर्धा कधीच करीत नाही. गुणवत्तेशी तडजोड करून कोणत्याही गोष्टी केलेल्या नाहीत. सन २०१५ पासून व्यवसायाला सुरुवात केली. तेव्हापासून एकही दिवस प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ आलेली नाही. -अधिकराव शंकर जाफळे-पाटील संपर्क-   ९९२२४२४००३, ९३०७८७०१७१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com